• mahesh_kale_1250by200.jpg
13 Jan 2018

Pimpri : तिर्थक्षेत्र देहूगाव, हिंजवडीसह नऊ गावे पिंपरी महापालिकेत समाविष्ट होणार; महासभेसमोर प्रस्ताव




 
(गणेश यादव) 
पालिकेत समाविष्ठ होण्यास गावक-यांनी या अगोदर दर्शविला होता विरोध 
 
एमपीसी न्यूज  - हिंजवडी, माण, मारुंजी, नेरे, जांबे, सांगवडे, गहुंजे आणि तिर्थक्षेत्र देहूगाव, विठ्ठलनगर ही नऊ गावे पिंपरी-चिंचवड महापालिकेत तातडीने समाविष्ट करून घेण्याबाबत पुन्हा जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. पिंपरी महापालिकेने पुण्याच्या विभागीय आयुक्तांना 7 एप्रिल 2017 रोजी पत्र पाठवून ही गावे महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी राज्य सरकारकडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती केली आहे. 20 जानेवारी रोजी होणा-या महासभेसमोर हा प्रस्ताव मंजुरीसाठी ठेवला आहे. दरम्यान, यापूर्वी देखील ही गावे महापालिकेत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यावेळी ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे तो प्रस्ताव बारगळला होता. 
 
महापालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे पालिका सभा ठराव क्रमांक 632 नुसार पालिकेत समाविष्ठ करण्याबाबतचा प्रस्ताव 3 जून 2015 रोजी सरकारकडे सादर केला होता. परंतु, 31 मार्च 2015 रोजी पुणे महानगर प्रदेश विकास क्षेत्र प्राधिकरणाची (पीएमआरडीए) स्थापना झाली असून त्यामुळे हिंजवडी, गहुंजे, जांबे, मारुंजी, माण, नेरे आणि सांगवडे ही सात गावे महापालिकेत समाविष्ठ करण्याची आवश्यकता नसल्याचे पत्र राज्याच्या नगरविकास विभागाने महापालिकेला पाठविले होते. 
 
तत्पूर्वी, राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सात मे 2013 रोजी बैठक झाली होती. या बैठकीत पिंपरी महापालिकेत चाकणसह, देहू, आळंदी, म्हाळूंगे, मोई, निघोजे, कुरूळी, नाणेकरवाडी, खराबवाडी, कडाची वाडी, चिंबळी, केळगाव, खालुंबरे, गहुंजे या परिसराचा समावेश करणे शक्य आहे का? याबाबतचा अभ्यास करून परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी, पिंपरी पालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सरकारकडे सादर करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यापार्श्वभूमीवर महापालिका हद्दीत वरील गावे व परिसराचा समाविष्ठ करण्याबाबत महापालिकेच्या सर्व पदाधिका-यांची 30 ऑगस्ट 2013 रोजी आयुक्त दालनात बैठक घेण्यात आली होती. 
 
या बैठकीत महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील 14 गावे आणि पश्चिमेकडील सहा गावे समाविष्ठ करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. त्याअनुषंगाने महापालिकेच्या उत्तरेकडील आळंदी, चिंबळी, कुरुळी, मोई, निघोजे, देहू, विठ्ठलनगर ही सात गावे आणि पश्चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे, सांगवडे अशी एकूण 14 गावे समाविष्ठ करून घेण्याबाबतचा प्रस्ताव महासभेसमोर मंजुरीसाठी ठेवला होता. मात्र, महापालिका सभेने 10 फेब्रुवारी 2015 रोजी महापालिकेच्या हद्दीत हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे पालिका हद्दीत समाविष्ठ करण्यास मान्यता दिली.  पालिकेने हा प्रस्ताव 3 जून 2015 रोजी राज्य सरकारकडे पाठविला होता. मात्र, राज्य सरकारने तब्बल एका वर्षाने 3 जून 2016 रोजी हा प्रस्ताव नामंजूर केला.  
 
त्यामुळे पिंपरी महापालिकेने पुण्याच्या विभागीय आयुक्तांना 7 एप्रिल 2017 पत्र पाठवून पालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे, तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीचे नैसर्गिक हद्दीपर्यंतचे देहुगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहुरोड कँन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र आणि आळंदी नगरपरिषदेचे संपूर्ण क्षेत्र पिंपरी महापालिका हद्दीत समावेश करण्याविषयी सरकारडे उचित अहवाल सादर करण्याची विनंती देखील करण्यात आली आहे. ही गावे महापालिकेशी भौगोलिकदृष्ट्या संलग्नता असल्याने महापालिकेत समाविष्ट होणे योग्य आहे. देहुगाव या तिर्थक्षेत्र परिसराचा व पश्चिमेकडील सात गावांचा नियोजनबद्ध व सुनियोजित विकास होण्यासाठी आणि नागरिकांना देखील शहरी नागरी सुविधा उपलब्ध करून देणे या भागाचा विकास पाहता गरजेचे आहे. महापालिकेच्या प्रशासकीय यंत्रणेमार्फत हे शक्य होऊ शकले, असे याबाबतच्या प्रस्तावात म्हटले आहे.  
 
त्यामुळे पालिका हद्दीच्या पश्चिमेकडील हिंजवडी, जांभे, माण, मारुंजी, नेरे, गहुंजे व सांगवडे ही सात गावे, तसेच महापालिका हद्दीच्या उत्तरेकडील इंद्रायणी नदीचे नैसर्गिक हद्दीपर्यंतचे देहूगाव, विठ्ठलनगर या गावांचे देहूरोड कँन्टोन्मेंट क्षेत्र सोडून उर्वरित क्षेत्र पिंपरी महापालिकेत समाविष्ट करण्याबाबतचा हद्दवाढीचा  प्रस्ताव पुनश्च राज्य सरकारकडे पाठविण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव 20 जानेवारी रोजी होणा-या महासभेसमोर हा प्रस्ताव मान्यतेसाठी ठेवला आहे. दरम्यान, यापूर्वी पिंपरी-चिंचवड महापालिकेत समाविष्ट होण्यास गावक-यांनी विरोध दर्शविला होता. तसेच राजकीय नेत्यांनी देखील विरोध केला होता.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares