• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
15 Jul 2017

तब्बल 12 प्रकारच्या भजींचा आस्वाद घेण्याची खवय्यांना संधी

 

एमपीसी न्यूज - पावसाळ्यात खमंग खुसखुशीत गरम तेलकट असं काहीतरी खावंसं वाटतं. त्यात जर पावसाने जोर धरलेला असेल, सगळीकडे पाणीच पाणी झाले असेल तर मग विचारताच सोय नाही. बाहेर पडणा-या पावसाला घरात बसून अनुभवावे. थंड वा-याची झुळुक अंगावर घ्यावी. अंथरुणातून बाहेर न येता जागेवरच काहीतरी खमंग खायला असावे, असं सर्वांनाच वाटतं. पण कामाच्या व्यस्ततेमुळे आणि रोजच्या धावपळीमुळे काहीही असले तरी हे वाटणं केवळ वाटणचं राहतं. पण तळेगावकरांना भर पावसाळ्यात वेगवेगळ्या प्रकारची कुरकुरीत आणि खमंग भजी खाण्याची नामी संधी मिळणार आहे.

आश्चर्य वाटले ना ! वाटणं साहजिकच आहे. कारण तळेगाव दाभाडे येथील योगीराज फाउंडेशनतर्फे खास खवय्यांसाठी प्रथमच गिरीजा भजी महोत्सव भरतो आहे. येत्या शनिवारी (दि. 22) तळेगावातील डी पी रोड, राव कॉलनी येथील योगीराज हॉलमध्ये सायंकाळी 5 ते 7 या वेळेत हा महोत्सव भरणार आहे. महोत्सवात वेवेगळ्या १२ पेक्षा अधिक प्रकारच्या भजींचा आस्वाद इथे घ्यायला मिळणार आहे. चीज भजी, पालक भजी, मिर्ची भजी, मका भजी, कांदा भजी, बटाटा भजी, पनीर भजी अशी काही उदाहरणे देता येतील.

मावळ भागाला निसर्गाची अदभूत देणगी लाभली आहे. इथल्या निसर्गाने संबंध महाराष्ट्राला भुरळ पडली आहे. निसर्गाच्या सानिध्यात, गार थंड वा-यात पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील काही लोकांचा भाजी म्हणजे अगदी जिव्हाळ्याचा विषय ठरला आहे. बरीच भजीप्रेमी मंडळी आपल्या जिभेचे चोचले पुरविण्यासाठी पार लोणावळा गाठतात. यांच्यासाठी भजी महोत्सव पर्वणी ठरेल. कधी धो धो, कधी हळुवार तर कधी कमी जास्त पडणारा पाऊस, त्यात गरमागरम भजी आणि वाफाळणारा चहा हे कॉम्बिनेशन पावसाळ्यात खवय्यांच्या मनावर अधिराज्य करीत असतं.

यासोबत जर नव्या जुन्या गाण्यांची मैफल अनुभवायला मिळाली तर आनंद काही औरच. भजी, पाव, गरमागरम चहा असा सुरेख संगम असेल आणि त्यात कुणाला गाणे गाण्याची हुक्की आली तर ही हौस सुद्धा या महोत्सवात पूर्ण होणार आहे. भजी महोत्सवात नवोदित गायकांना आपली गायन कला सादर करण्याची संधी मिळणार आहे. यातून संधीच सोनं झालं तर चांगलंच. आणि नाही सोनं झालं तर आनंद तर कुठे गेला नाही.

वेगवेगळ्या प्रकारच्या भजींचे नुसते नाव घेतले तरी तोंडाला पाणी येते. मग जिभेची हौस पुरवायला भजी महोत्सवाला गेलंच पाहिजे. महोत्सवाच्या प्रवेशिका 20 व 21 जुलै रोजी सायंकाळी 5 ते 7:30 या वेळेत योगीराज हॉल येथे मिळणार आहेत. महोत्सवातील प्रवेश फी केवळ 100 रुपये असणार आहे. शंभर रुपयांमध्ये पोटभर आपल्या आवडीची भजी खायला मिळणे म्हणजे हा एक प्रकारे दुग्ध शर्करा योगच म्हणावा लागेल.

15 Jul 2017

एमपीसी न्यूज- गुरु पौर्णिमेचे निमित्त साधून कलापिनीत ‘गुरुवंदना’,’विद्यार्थी कौतुक सोहळा’ आणि कुमार भवनचा प्रथम वर्धापन दिन साजरा झाला या कार्यक्रमासाठी नापासांची शाळा चालवणारे प्रा.नितीन फाकटकर व तळेगावचा बाल कलाकार ‘रिंगण’, फेम साहिल जोशी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावर कलापिनीचे अध्यक्ष विनायक अभ्यंकर, चेतन शहा, सचिव हेमंत झेंडे, सुनील गोडसे, विनोदभाई मेहता, अशोक बकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कुमार भवन च्या विद्यार्थ्यांनी मनाचे श्लोक, गणेश वंदना नृत्य सादर केले त्यांनी सादर केलेल्या ‘चोर चोर’ या विनोदी नाटुकल्याने धमाल आणली, संगीत सौभद्र मधील एक प्रवेश सादर केला या प्रवेशाला पार्थ ढोबळे (तबला) प्रदीप जोशी ( संवादिनी) याच साथ सांगत होती.

नृत्य पारंगत साहिल जोशी याने बहारदार नृत्य सादर केले. प्रा.नितीन फाकटकर सरांनी कलापिनी परिवारातील १० वी,१२ वी, पदवी आणि पदव्युत्तर यश संपादन केलेल्या गुणवंतांचा गौरव केला. विद्यार्थ्यांचा कल पाहूनच त्यांच्या आवडीच्या विषयांचे शिक्षण द्याला हवे, त्यांच्यावर सक्ती करण्याचे टाळावे असे फाकटकर सरांनी मार्गदर्शन करताना सांगितले. कार्यकारिणी सदस्या अंजली सहस्त्रबुद्धे यांनी कै.पुष्पलता अरोरा स्मृती पुष्प व कुमार भवन उपक्रमची माहिती दिली संस्थे अध्यक्ष विनायक अभ्यंकर यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सायली रौन्धळ व खगेश जोशी यांनी केले. गुणवंताना देण्यात आलेल्या भेट वस्तू विनोदभाई मेहता यांनी पुरस्कृत केल्या होत्या.

या कार्यक्रमाचे नियोजन कुमार भवन प्रमुख अनघा बुरसे, विशाखा बेके, प्रतीक मेहता, हृतिक पाटील,चेतन पंडित, रश्मी पांढरे, मुक्ता भावसार, आदित्य धामणकर यांनी केले त्यांना श्रीपाद बुरसे,रामचंद्र रानडे, राहुल मुजुमले यांनी सहाय्य केले. अंजली सहस्त्रबुद्धे यांनीआभार मानले .कलापिनीच्या प्रार्थनेने समारोप होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

sahil 1

sahil 2

14 Jul 2017


एमपीसी न्यूज - मावळ व मुळशी तालुक्यातून जाणा-या रिंगरोडला शेतक-यांनी सुरुवातीपासून विरोध केला असून आज (शुक्रवार) पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गित्ते यांनी मावळ भागातील शेतक-यांच्या भेटी घेतल्या. यावेळी वंदे मातरम शेतकरी संघटनेच्या वतीने विरोध दर्शविण्यात आला.

पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकरी किरण गित्ते यांना वंदे मातरम शेतकरी संघटनेतर्फे निवेदन देण्यात आले. यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, वंदे मातरम शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन पायगुडे, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक राजाराम राक्षे, शेतकरी किसान मंचचे किसनराव शेलार, रिंगरोड कृती समितीचे रामनाथ गराडे, बाबा बुचडे, किसान औंधे, पोपटराव राक्षे, सूर्यकांत सोरठे, शामराव राक्षे, शरद सावंत उपस्थित होते.

मावळ आणि मुळशी तालुक्यातील ज्या गावांमधून रिंगरोड जात आहे. त्या भागातील सर्व जमिनी बागायती असून कालबाह्य झालेला रिंगरोडचा प्रस्ताव केवळ बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी करण्याचा घाट शासनाने चालविला आहे. कासारसाई धरणात जमिनी गेलेल्या शेतक-यांना नेरे, दारुंब्रे गावांमधील जमिनी देण्यात आल्या. परंतु काही ठराविक बांधकाम व्यावसायिकांनी त्या जमिनी खरेदी केल्या. प्रस्तावित रिंगरोड झाल्यास या बांधकाम व्यावसायिकांना फायदा होईल व व शेतक-यांना आपल्या जमिनी गमवाव्या लागतील, अशी माहिती वंदे मातरम शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी दिली.

1997 साली 90 मीटरचा रिंगरोड मंजूर करण्यात आला. आता त्याची रुंदी वाढवून 110 मीटर करण्यात आली आहे. परंतु शेतक-यांचा संपूर्ण रस्त्याला विरोध आहे. तरीही शासनाने शेतक-यांना आमिष दाखवून रिंगरोडचा घाट सुरूच ठेवला तर शेतकरी आत्मदहन करणार असल्याचा इशारा वंदे मातरम शेजारी संघटनेचे अध्यक्ष जनार्दन पायगुडे यांनी दिला आहे.

14 Jul 2017


एमपीसी न्यूज - तीन वर्ष पूर्ण करणा-या केंद्र सरकारने आता आगामी निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. या दृष्टीकोनातून भारतीय जनता पक्षाने पंचसूत्री कार्यक्रम हाती घेतला आहे. यात 22 जुलै ते 8 ऑगस्ट या कालावधीत राज्यात 10 हजार शाखा उभारण्यात येतील. महापालिका, नगरपरिषद व गणात पक्षाच्या प्रत्येकी दोन शाखा स्थापन करण्याच्या सूचना युवा प्रदेश सचिव व पुणे जिल्हा प्रभारी जितेंद्र बोत्रे यांनी युवा पदाधिका-यांना दिल्या.

भारतीय जनता युवामोर्चा तर्फे पक्षाच्या वडगाव मावळ कार्यालयात युवा पदाधिका-यांचा मेळावा झाला. याप्रसंगी प्रदेश चिटणीस अभिजित देवकाते, सह प्रभारी नकुल कडू, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुदर्शन चौधरी मावळचे युवामोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोट्कुले, नगरसेवक गणेशजी भेगडे, पंचायत समिती सदस्या निकिता घोट्कुले, हवेली तालुका अध्यक्ष स्वप्नील उंद्रे, लोणावळा शहर अध्यक्ष मुकेश परमार, तळेगाव शहर अध्यक्ष विनायक भेगडे, देहूरोड शहराध्यक्ष अमोल नाईकनवरे, जिल्हा उपाध्यक्ष श्याम गावडे, तालुका सरचिटणीस अर्जुन पाठारे, अनंता कुडे, गणेश ठाकर, अरुण लाड, प्रदीप साखरे, रवींद्र काकडे, शंकर भोंडवे, यादव सोरटे, उमेश बोडके, सचिन कदम आदि कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मेळाव्यात बोलताना बोत्रे म्हणाले, "येत्या 30 जुलै रोजी केंद्र सरकारला 1000 दिवस पूर्ण होतील. या कालावधीत राबवलेल्या योजना तसेच सरकारने घेतलेले धाडसी निर्णय जनतेपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे. त्यासाठी भाजपा युवा मोर्चाने राज्यात पंचसूत्री कार्यक्रम राबविण्यासाठी घोषणा केली आहे. यात '1000 दिवस सरकारचे' हा पहिला कार्यक्रम राबविण्यात येईल.

मागील तीन वर्षात घेतलेले निर्णय युवकांपर्यंत पोहचविण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयाबाहेर डिजिटल स्क्रीनद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील. युवा सरकार या कार्यक्रमाच्या माध्यमातून कोलेज कनेक्ट हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात ज्याचे वार्षिक उत्पन्न सहा लाख रुपयां पेक्षा कमी असेल अशा विद्यार्थ्यांना ईबीसी सवलत अंतर्गत पन्नास टक्के अनुदान देण्यात येईल, युवतींसाठी ‘घे भरारी’ हा राज्यव्यापी कार्यक्रम होणार आहे.

‘सांस्कृतिक व खेलो भारत’ हे देशव्यापी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. ‘खेलो भारत’ अभियान सप्टेंबर महिन्याच्या     दुस-या आठवड्यात पूर्ण होईल त्यासाठी स्थानिक पातळीवर खो-खो व कबड्डी या दोन खेळांसाठी युवक-युवतीचे स्वतंत्र संघ तयार केले जातील. या संघाचे तालुका, जिल्हा व विभागीय स्तरावरील साखळी सामने 6 जुलै ते 26 ऑगस्ट या कालावधीत होतील. पंचसूत्रीच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहचण्यासाठी राज्यभर शाखा विस्तार करण्यात येणार आहे. आपण मावळ तालुक्यात हा कार्यक्रम प्रत्येक गावागावात तसेच तळेगाव, लोणावळा, देहूरोड मधील प्रत्येक प्रभागांमध्ये राबवावा, असे आवाहन कार्यकर्त्यांना व पदाधिका-यांना करण्यात आले.

14 Jul 2017


एमपीसी न्यूज- मावळातील चांदखेडे गावात भातलावणीचा चिखल करत असताना ट्रॅक्टर पलटी होऊन एका शेतकरी मजुराचा ट्रॅक्टरखाली येऊन मृत्यू झाला आहे. हि घटना आज (शुक्रवार) सकाळी अकराच्या सुमारास घडली.

परशुराम पवार (वय 32 रा. चांदखेडे), असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.

भातलावणी करताना शेतात चिखल करत असताना ट्रॅक्टर पलटी झाला. या घटनेत शेतकरी मजुराच्या अंगावर ट्रॅक्टर पडला. यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. पवार हे सुरेश मते यांच्या शेतात शेतमजूर म्हणून कामाला होते. ते मुळचे औरंगाबाद येथील गंगापूरचे रहिवशी आहेत. त्यांच्या मृतदेह गंगापूर येथे पाठवण्यात आला आहे.

13 Jul 2017


एमपीसी न्यूज - वराळे येथील डॉ. डी. वाय. पाटील ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स महाविद्यालयात नवीन विद्यार्थ्यांचा स्वागत समारंभ आज (गुरुवार) आमदार बाळा भेगडे यांच्या हस्ते संपन्न झाला.

या कार्यक्रमासाठी जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, डी. वाय. पाटील महाविद्यालयाचे प्रमुख व सल्लागार सुशांत पाटील, उपसरपंच निलेश शिंदे, प्राध्यापक, प्राचार्य व पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.

आमदार बाळा भेगडे यांनी सर्व विद्यार्थ्यांना महाविद्यालयातील प्रवेशाबाबत व पुढील शिक्षणाकरिता शुभेच्छा दिल्या. डॉ. डी. वाय. पाटील महाविद्यालय आपल्या दर्जेदार शिक्षणासाठी प्रसिद्ध असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. या महाविद्यालयाने आजवर अनेक गुणवंत विद्यार्थी, आदर्श नागरिक घडविले आहेत. जबाबदार व आदर्श नागरिक बनून तो वारसा पुढे चालू ठेवण्याचे मोठे आव्हान आणि जबाबदारी सर्व विद्यार्थ्यांवर आहे, असेही आमदार भेगडे म्हणाले.

13 Jul 2017


एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटी दुस-या वर्षात पदार्पण करीत असून येत्या शुक्रवारी पहिला वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे. मागील एका वर्षात रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने आपल्या सामाजिक कार्यातून समाजात आपली एक ओळख निर्माण केली आहे. वर्षभर विविध प्रकल्प राबवत समाजसेवा करण्याची वृत्ती जपली आहे.

रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने अनेक छोटे मोठे प्रकल्प राबवले आहेत. 44 नवदाम्पत्यांचा सामुदायिक विवाह सोहळ्याचे यशस्वी आयोजन करण्यात आले. तसेच तळेगाव एस टी स्थानकावर अद्ययावत सुविधांयुक्त सार्वजनिक स्वच्छतागृह बांधून पूर्ण केले. यातून स्वच्छ भारत अभियानाला चांगले प्रोत्साहन मिळाले आहे. त्याच बरोबर तळेगाव परिसरात महिलांसाठी एकूण 8 ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे बांधून तयार आहेत. या स्वच्छतागृहांचा लोकार्पण सोहळा रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार (दि. 14) रोजी होणार आहे.

मागील एका वर्षात 100 सभासद झालेल्या रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीचे दुस-या वर्षासाठी शशिकांत हळदे यांची अध्यक्षपदी, नितीन शहा यांची उपाध्यक्षपदी तर मनोज ढमाले यांची सचिव पदावर निवड करण्यात आली आहे. आजच्या तरुणांना समाजाची सेवा करण्याची सवय ते युवा असल्यापासूनच लागण्याकरिता रोटरी क्लब ऑफ तळेगाव सिटीने आपल्या अखत्यारीत 18 ते 30 वयोगटातील 50 युवकांचा एक नवीन रोट्रॅक क्लब ऑफ तळेगाव सिटी काढला असून त्याच्या अध्यक्ष पदावर प्रतीक मेहता, उपाध्यक्ष केशव मोहोळ-पाटील, सचिव शुभम कारके यांची निवड करण्यात आली आहे.

13 Jul 2017

एमपीसी न्यूज - लायन्स क्लब ऑफ वडगांव चा पदग्रहण समारंभ आज संपन्न झाला. यावेळी अध्यक्षपदी प्रदीप बाफना, सचिवपदी झुंबरलाल कर्णावट व खजिनदार पदी नंदकिशोर गाडे याची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिनाथ ढमाले तर कार्यक्रम प्रमुख पदी आनंद छाजेड उपस्थित होते. तसेच पंचायत समिती मावळचे उपसभापती शांताराम कदम, वडगाव ग्रामपंचायतचे सरपंच संभाजी म्हाळसकर, उपसरपंच सुधाकर ढोरे, ग्रामपंचायत सदस्य किरण भिलारे, पोटोबा देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे, माथाडी नेते महेंद्र म्हाळसकर, स्मित कला रंजनचे अध्यक्ष अतुल राऊत व मावळ मनसेचे अध्यक्ष रुपेश म्हाळसकर, इतर लायन्स सदस्य, व्यापारी बांधव व नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रमात आनंद छाजेड यांची खडकी शिक्षण संस्थेच्या सचिव पदी नियुक्ती झाल्याबद्दल, भूषण मुथा यांची लायन्स क्लबच्या राष्ट्रीय समितीवर नियुक्तीबद्दल, मावळते अध्यक्ष आदिनाथ ढमाले, सचिव संजय भंडारी, खजिनदार झुंबरलाल कर्नावट आणि व गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

मा मल्टिपल कॉऊन्सिल चेअरपर्सन द्वारकाजी जालन यांच्या हस्ते तर विभागीय अध्यक्ष संतोष सोनावले व उपविभागीय अध्यक्ष अमित लुणावत यांच्या प्रमुख उपस्थितीत पदग्रहण समारंभ संपन्न झाला. मावळते अध्यक्ष आदिनाथ ढमाले यांनी गेल्या वर्षभर केलेल्या विविध सेवाकार्याचा अहवाल सादर केला तर मावळते सचिव संजय भंडारी यांनी सचिव अहवाल सादर केला.

द्वारकाजी जालन यांनी आंतरराष्ट्रीय लायन्सच्या कार्याची तसेच जीवनात परिवाराचे असलेले स्थान व आवश्यकता विशद केली, वास्तव आयुष्य जगताना मानवाने प्रत्येक घटकाला योग्य तो न्याय दिला पाहिजे असे मत त्यांनी विविध उदाहरणे देऊन अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात व्यक्त केले.

नवनिर्वाचित अध्यक्ष प्रदीप बाफना यांनी आपल्या मनोगतात आगामी वर्षात करण्यात येणार असलेले प्रकल्प व सेवाकार्याची माहिती दिली. गरजू अस्थीरुग्णांना आवश्यक व्हील चेअर, वॉकर, स्टिक, कमोड चेअर आदी उपकरणांच्या केंद्राची सुरुवात करण्यात आली, ज्या मध्ये रुग्णांना फक्त अनामत रक्कम भरून या उपकरणांचा लाभ घेता येईल व यासाठी त्यांना कोणतेही भाडे भरावे लागणार नाही. लायन्स क्लबचे राष्ट्रीय समिती सदस्य व अखिल भारतीय स्वच्छ भारत समितीचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक भूषण मुथा यांच्या सहकार्याने ग्रुप ग्रामपंचायत वडगांव मावळ येथे 1 वैयक्तिक स्वच्छतागृहाची निर्मिती आणि पद्मावती येथील जिल्हा परिषद शाळेला संगणक संच देण्यात आला. गरजू अपंग रुग्णांना व्हील चेअर आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

ध्वजवंदन वाचन छाया रावल यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन लायन्स क्लब ऑफ वडगावचे संस्थापक अध्यक्ष अॅड. दामोदर भंडारी, संतोष चेट्टी, अॅड. चंद्रकांत रावल, अमोल मुथा, बाळासाहेब बोरावके, भूषण मुथा, संजय गांधी, दिलीप मुथा, जितेंद्र रावल, प्रशांत गुजराणी, डॉ. नेमीचंद बाफना, सुनित कदम, प्रथम लायन महिला सदस्या सिमा बाफना यांनी केले. सूत्रसंचालन विनया केसकर व माधवी बोरावके यांनी केले. आभार प्रदर्शन नूतन मुथा यांनी केले.

13 Jul 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नाना नानी पार्कमध्ये रोटरी सिटी क्लबतर्फे उद्या (शुक्रवार) सकाळी 9:30 वाजता महिला स्वच्छतागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

महिलांना स्वच्छतागृहाची आवश्यकता लक्षात घेता रोटरी क्लब सिटीतर्फे महिला स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यात आली आहे. शुक्रवारी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष सुनील शेळके, संस्थापक अध्यक्ष विलास काळोखे उपाध्यक्ष शशिकांत हळदे यांच्या उपस्थितीत लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे.

स्वच्छतागृहाच्या लोकार्पणानंतर हॉस्पिटल कॉलनी येथील राधाकृष्ण मंदिरात सीसीटीव्ही कॅमे-याचा देखील लोकार्पण सोहळा होणार आहे. या कार्यक्रमासाठी रोटरी सिटी क्लबच्या सर्व सदस्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रकल्प प्रमुख संतोष शेळके, सह प्रकल्प प्रमुख संजय मेहता आणि सचिव नितीन शहा यांनी केले आहे.

12 Jul 2017

एमपीसी न्यूज - संस्कार प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहर आणि टाटा व्हॉलेंटियरिंग टाटा मोटर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील वारू गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या 87 विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

संस्थेचे अध्यक्ष डॉ. मोहन गायकवाड आणि केंद्र प्रमुख रामराव जगदाळे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना वह्या, पेन, पेन्सिल अशा शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी वारु गावचे उपसरपंच किरण बेनगुडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष निंबळे, ज्ञानेश्वर निंबळे आदी उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ मोहन गायकवाड म्हणाले, "शाळेत दिलेला गृहपाठ दररोज केला पाहिजे. आपल्याला आवडणा-या विषयात रस दाखवून अभ्यास केला पाहिजे. हस्ताक्षर सुधारण्यासाठी दररोज शुध्दलेखन करावे. कारण सुंदर हस्ताक्षर हाच खरा दागिना आहे. या स्पर्धेच्या युगात अभ्यासाला फार महत्त्व आहे.

कार्यक्रमाचे संयोजन अनिल माने, भरत शिंदे, राजेंद्र फडतरे, पोपट दिक्षीत, रुपाली नामदे, नामदेव कदम, मारुती उत्तेकर, आनंद पाथरे, डॉ. रेश्मा फोंडेकर, वसंत ढवळे, विजय कुलकर्णी, दत्तात्रय माने, संदीप रांगोळे, विलास सैद, सुनीता गायकवाड, सागर अडसुळ, मिलन गायकवाड, सुमन गुजर, प्रिया कुलकर्णी, रंजना जोशी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी टाटा मोटर्स फौंड्रीचे प्रमुख दीपक आमडेकर, उमेश मेंगलोर, सुनील चैतन्य यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाचे प्रास्तविक कल्पना गायकवाड, सूत्रसंचालन संजय यमगर तर आभार योगेश ठोसर यांनी मानले.

Page 10 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start