• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
26 Jul 2017


तहसीलदार रणजित देसाई यांची माहिती

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या समाज बांधवांच्या जमिनींचे विभाजन, खातेफोड अथवा वाटणीपत्र करण्यासाठी गुरुवार (दि. 27) रोजी मंडलनिहाय शिबिर आयोजित करण्यात येणार असून भूमिहीन शेतमजूर, शिया व सुन्नी समाजाच्या वक्फ जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, अशी माहिती तहसीलदार रणजित देसाई व नायब तहसीलदार सुनंदा भोसले यांनी दिली.

एकाहून अधिक सहधारक असलेल्या जमिनीतील हिश्श्याचे विभाजन करण्यासाठी यापूर्वी अनुसूचित जमातीच्या लोकांना जिल्हाधिका-यांकडे अर्ज करावा लागत होता. परंतु, जुलै महिन्यात महसूल व वन विभागाने दिलेल्या शासन निर्णयानुसार हे अधिकार आता तहसीलदारांना देण्यात आले आहेत. त्यानुसार तहसीलदार देसाई यांनी मावळ तालुक्यातील अनुसूचित जमातीच्या लोकांच्या जमिनींचे विभाजन, खातेफोड, वाटणीपात्र करण्यासाठी मंडलनिहाय शिबिराचे आयोजन केले असून त्याच ठिकाणी 27 रोजी अर्ज स्वीकारण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये शेतक-यांनी अर्ज दाखल करून लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्र कुळवहिवाट शेतजमीन अधिनियमान्वये भूमिहीन शेतमजुरांचे सर्वेक्षणही करण्यात येणार असून वक्फ अधिनियमातील सुधारित तरतुदीनुसार शिया व सुन्नी समाजाच्या वक्फ जमिनींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे, असे तहसीलदार देसाई व नायब तहसीलदार भोसले यांनी सांगितले.

26 Jul 2017

एमपीसी न्यूज- खामशेत येथील डोंगराच्या कडेला गायरान असून या गायरानात कामशेत शहराचा कचरा डेपो आहे. पण गेल्या एक महिन्यापूर्वी या डेपो कडे जाणाऱ्या रस्त्यावर भिंत बांधली असल्याने कचरा डेपो पर्यंत जाण्याचा मार्ग बंद झाला असल्याने कचरा वाहतूक ठप्प झाली आहे. यामुळे कामशेत मधील कचरा टाकायचा कुठे असा कामशेत ग्रुप ग्रामपंचायती समोर प्रश्न निर्माण झाला आहे .

कामशेत शहर हे मावळ तालुक्यातील प्रमुख बाजारपेठ तसेच अनेक खेडेगावांचे मध्यवर्ती  ठिकाण असून कामशेत मध्ये रेल्वे स्थानक महामार्ग व दळण-वळणाच्या अनेक सुविधा असल्याने परिसरातील अनेक खेडेगावातील लोकांनी कामशेत मध्ये स्थलांतर केले आहे  वाढत्या रहदारीमुळे कामशेत मधील मुलभुत सुविधांवर ताण येत आहे . कामशेतची  लोकसंख्या गेल्या काही वर्षांमध्ये झपाट्याने वाढत चालली असल्याने कचऱ्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे. 

ग्रुप ग्रामपंचायत कामशेतचा कचरा डेपो खामशेत येथील डोंगर पायथ्याशी असलेल्या गायरान जागेत [ गट नं. ११० ] असून कामशेत शहरातील संपूर्ण घंटागाडी मध्ये सफाई कार्याचारी कचरा संकलित करून या कचरा डेपोत टाकला जातो.  मे महिन्याच्या १२ तारखेला हेलीन टेकचंद शहा व इतरांनी कचरा डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर विनापरवाना अनधिकृत भिंत बांधकाम केले आहे यामुळे कचरा डेपोकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे . या बाबतीत कामशेत पोलीस ठाण्यात तक्रार देऊन त्यांना ग्रामपंचायतीच्या वतीने रीतसर नोटीस बजावण्यात आली आहे. तसेच तहसीलदार मावळ यांच्याशी पत्रव्यवहार केला असून तहसीलदार कार्यालयाकडून अजून कोणतीच कारवाई झाली नसल्याने कामशेत मधील  कचऱ्याची समस्या गंभीर बनली असल्याची माहिती ग्रामसेवक बाळासाहेब मतकर यांनी दिली.

खामशेत येथील कचरा डेपोचा रस्ता हा गेली ४० ते ५० वर्षांपासूनचा वहिवाटीचा रस्ता असून त्या भागातील रहिवाशी  व शेतकऱ्यांना हा एकच रस्ता आहे , पण या रस्त्याच्यामध्ये सह्याद्री फाऊडेशन फोर इंटीग्रेड ग्लोबल एज्युकेशन संस्थेने स.नं/ग.नं.८७ मध्ये अनधिकृत भिंत बांधल्यामुळे हा रस्ता वापरासाठी बंद झाला आहे. त्यामुळे शहरातील कचऱ्याच्या समस्या वाढत चालली असून कामशेतमध्ये ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साठले आहेत. काही दिवस शायरी येथील खाजगी मोकळ्या जागेत कचरा टाकला जात होता पण या जागा मालकाने त्यावर आक्षेप घेतल्याने हा पर्यायही बंद झाला.

शहरातील लोकसंख्येत गेल्या काही वर्षात वाढ होऊन शहरातील कच-याचा मुलभूत प्रश्न ऐरणीवर आला आहे. कामशेत शहरात एकूण सहा वॉर्ड असून यात गावठाण, माऊलीनगर, बाजारपेठ, देवराम कॉलनी, दत्त कॉलनी, सहारा कॉलनी, गणेशवाडी, इंद्रायणी कॉलनी, पंचशील कॉलनी, खामशेत आदीं अनेक कॉलनी असुन येथे कच-याची समस्या मोठी आहे. या ठिकाणी  मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर नागरिकांकडून कचरा टाकला जात आहे. कचरा डेपोचा रस्ता बंद झाल्याने ग्रामपंचायतीने घंटागाडी बंद केली. त्यामुळे मागील एक महिन्यांपासून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे.

25 Jul 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील इंद्रायणी महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत महिला सुरक्षा रक्षक नेमणे आवश्यक असून महाविद्यालय परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याबाबतचे निवेदन पुणे जिल्हा मानवाधिकार संघटना व अखिल भारतीय सेना मावळ यांच्या वतीने महाविद्यालयाला देण्यात आले. 

शाळा, महाविद्यालयांमध्ये मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण वाढत असून त्यावर आळा घालणे आवश्यक आहे. समुपदेशन सारख्या माध्यमातून वैचारिकदृष्ट्या विद्यार्थ्यांचे मनपरिवर्तन करणे जेवढे आवश्यक आहे, तेवढेच महाविद्यालयाच्या परिसरात सुरक्षितता बाळगणे देखील आवश्यक आहे. त्यासाठी महाविद्यालय परिसरात सुरक्षा राखणे गरजेचे आहे.

पुणे जिल्हा मानवधिकार संघटनेचे सरचिटणिस प्रदिप नाईक व अखिल भारतीय सेना मावळ उपाध्यक्ष संतोष महादेव जाचक यांच्या वतीने इंद्रायणी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राचार्य ओव्हाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी प्रा.डी. डी. बाळ सराफ, उमाबाई दाभाडे ब्रिगेड संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा वंदना राजाराम केमसे, प्रा. भोसले आदी उपस्थित होते. 
25 Jul 2017


एमपीसी न्यूज - मुलींच्या जन्माचे घटते प्रमाण लक्षात घेऊन मुलींच्या जन्माला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रुप ग्रामपंचायत वडगाव मध्ये कन्या लक्ष्मी येजनेला सुरुवात करण्यात आली. या योजनेअंतर्गत जे नागरिक वडगाव येथील रहिवासी आहेत. त्यांना या योजनेत सहभागी होता येणार आहे. मुलीच्या जन्मावर ग्रामपंचायतीकडून कन्या लक्ष्मी योजनेअंतर्गत पाच हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

जे नागरिक वडगाव ग्रामपंचायतीचे कायमस्वरूपी नागरिक आहेत. तसेच ज्यांच्याकडे वडगाव येथील रहिवासी व ओळखीचा पुरावा असेल अशा मातांना अटींसह या योजनेत सहभागी होता येणार आहे. ग्रामपंचायतीच्या झालेल्या बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला. या योजनेचा प्रस्ताव ग्रामपंचायत सदस्या अंजली बवरे, कल्पना चव्हाण, सुशीला ओव्हाळ, रुक्मिणी गराडे यांनी मासिक सभेत मांडला.

सरपंच संभाजी म्हाळसकर यांच्या अध्यक्षतेखाली नितीन कुडे, सुधाकर ढोरे, किरण भिलारे, विलास दंडेल, मयूर ढोरे, प्रवीण ढोरे, ग्रामविकास अधिकारी डी. एस. सिरसाट यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. यांसारख्या उपक्रमांमधून मुलींचा घटता जन्मदर सुधारण्यासाठी मदत होईल असा विश्वास सरपंच संभाजी म्हाळसकर यांनी यावेळी दाखविला. 

25 Jul 2017


मावळ तालुक्यातील पाणी पुरवठा योजनेच्या समस्यांबाबत बबनराव लोणीकर आणि आमदार बाळा भेगडे यांची बैठक

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील नळपाणी पुरवठा योजनांबाबत पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि मावळचे आमदार बाळा भेगडे यांची बैठक पार पडली. मावळ तालुक्यातील पाणीप्रश्नावर तोडगे काढत लोणीकरांनी संबंधित अधिका-यांना सूचना केल्या. तर पाणीप्रश्नावर मात करण्यासाठी आमदार बाळा भेगडे यांनी विविध उपाय सुचविले.

यावेळी सभापती गुलाबराव म्हाळसकर, भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, उपसरपंच प्रदीप हुलावळे, कृष्णा घिसरे, नितीन घोटकुले, रामभाऊ गोणते, बाळासाहेब काळोखे, विश्वनाथ जाधव, देहू ग्रामपंचायत सरपंच सुनीता टिळेकर, रामभाऊ मोरे, गणपत शिंदे, शंकरराव शिंदे, अर्जुन पाठारे, हेमलता मोरे, संदीप तिकोने, संभाजी कोंडे, समीर हुलावळे, सचिन कदम, संजय जंबुकर, संतोष हगवणे,गणेश परंडवाल, पाणी पुरवठा महाराष्ट्र राज्य सल्लागार लांडगे , पाणी पुरवठा विभागाचे सचिव संतोष कुमार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व ग्रामीण नळपाणी पुरवठा विभागाचे संबंधित अधिकारी आदी उपस्थित होते.

कार्ला प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेमध्ये कार्ला, मळवली, वेहेरगाव, वाकसई, देवघर, करंडोली, दहिवली, शिलाटणे आदी गावांचा समावेश होत असून लोकसंख्या वाढीमुळे योजनेतून होणारा पाणी पुरवठा अपुरा पडत आहे. त्यामुळे योजनेतील समाविष्ट गावे योजनेपासून वंचित राहू नये यासाठी या बैठकीत लोणीकर यांनी कृती आराखडा 2016-17 नुसार नवीन डी. एस. आर. प्रमाणे 13 कोटी 29 लक्ष 2 हजार 121 रुपये एवढा निधी मंजूर करीत असल्याचे सांगितले.

त्याचप्रमाणे पाटण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना, चिखलसे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना या योजनेचा नव्याने सर्व्हे करून योजने अंतर्गत येणा-या गावांचा ठराव करून तसा अहवाल शासनास सादर करण्याबाबतच्या सूचना लोणीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या. डोणे, आढले येथील योजना ग्रामपंचायतीच्या आर्थिक उत्पन्नामुळे चालविण्यास असमर्थ असल्यामुळे जिल्हानियोजन समितीमधून तरतूद करून घेण्याच्याही यावेळी सूचना देण्यात आल्या.

निधीच्या उपलब्द्धते नुसार डोणे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, पुसाने, चांदखेड, दिवड, ओव्हळे, वाड्या वस्त्या येथील पाणी समस्येवर तोडगा काढून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने (मजीप्रा) खडकाळा, पाथरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेची थकीत रक्कम भरून या योजनेचा नव्याने सर्व्हे करून योजना कार्यान्वित करावी. त्यामुळे खडकाळा, पाथरगाव, खामशेत, ताजे, पिंपळोली व त्याचप्रमाणे कामशेत परिसरातील सोसायटीचे पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे आमदार बाळा भेगडे यांनी बैठकी दरम्यान सूचित केले.

श्रीक्षेत्र देहूची लोकसंख्या 35 हजारांच्या पुढे गेली असून दररोज सुमारे 15 हजार भाविक येथे दर्शनासाठी येतात. उपलब्ध पाणीपुरवठा एवढ्या नागरिकांसाठी अपुरा पडत असल्याने मलकापूरधर्तीवर श्रीक्षेत्र देहूगावात पाण्याचे मीटर बसवावेत व सद्यस्थितीत चालू असलेली योजना नियमितपणे सुरु ठेवावी. असेही भेगडे यांनी सुचविले.

24 Jul 2017एमपीसी न्यूज - कलापिनी अध्यात्म मंचतर्फे घेण्यात येणा-या अभ्यास वर्गाला पुनःप्रारंभ झाला आहे. कलापिनीच्या सांस्कृतिक केंद्रात दर बुधवारी दुपारच्या वेळी हे अध्यात्म वर्ग भरणार आहेत. चातुर्मासाचे निमित्त साधून कलापिनी अध्यात्म मंचचा पुनःप्रारंभ तळेगावचे संत वाड्मय अभ्यासक जयंत जोशी व विठ्ठल मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प. माउली दाभाडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आला.

‘अध्यात्म आणि कला या दोन्ही एकच असून कलेमध्ये प्राविण्य मिळवण्यासाठी आध्यत्मिक बैठकीची आवश्यकता आहे आणि व्यावहारिक जीवनात मन:शांती मिळविण्यासाठी अध्यात्माचा कायमच उपयोग होतो असे कलापिनीचे विश्वस्त डॉ. अनंत परांजपे यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले. ‘मनाचे श्लोक ही सोन्याची लगड आहे’ विचारपूर्वक नियोजन केल्यास मनाच्या श्लोकाचा अभ्यास सर्वांनाच लाभदायक आहे, असे मनोगत तळेगावचे संत वाड्मय अभ्यासक जयंत जोशी यांनी व्यक्त केले. यावेळी स्वराली भजनी मंडळाच्या उषाताई धरणे आणि सहका-यांनी भावपूर्ण भजने सादर केली.

‘सकल कला आध्यात्म यांची योग्य सांगड जाणारा मार्ग आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जातो’ असे विठ्ठल मंदिर संस्थानचे प्रमुख ह.भ.प.माउली दाभाडे यांनी सांगितले. त्यांनी श्रोत्यांना अनेक सोप्या दृष्टांतांचा आधार देऊन अध्यात्माचे महत्व विषद करून सांगितले व आध्यात्म मंचच्या अभ्यास वर्गासाठी वेळ देण्याचे मान्य केले.

सुजाता कुलकर्णी म्हणाल्या की, अध्यात्म मंचच्या वर्गांमध्ये मनाच्या श्लोकांवर अभ्यास होणार आहे. मन हे खूप चंचल आणि अस्थिर आहे; म्हणूनच मनाला समजवण्यासाठी समर्थांनी प्रत्येक वेळी ‘मना सज्जना’ असा मनाचा उल्लेख केला आहे." कार्यक्रमाची  सांगता मोरेश्वर होनप व शांताराम मोडक यांनी गायलेल्या ‘कल्याण करी रामराया’ या प्रार्थनेनी झाली. वंदना मालकर यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कलापिनीचे अशोक बकरे, दीपक जयवंत, रश्मी पांढरे आणि माधुरी बेलसरे यांनी परिश्रम घेतले.

24 Jul 2017


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत 1952 पासून सव्वातीन गुंठ्यात कार्यरत आहे. ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत व जागा विद्यमान सदस्याच्या पती व दिराने परस्पर खरेदी करून बळकावत असल्याचा प्रकार शुक्रवार (दि.14) रोजी उघडकीस आला.

मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे ग्रामपंचायत कार्यालयाची इमारत माधव चिंतामण खानविलकर व इतर यांच्या मालकीच्या जागेत उभी आहे. 65 वर्षे झाली असूनदेखील इमारत अजूनही सुस्थितीत आहे. नवलाख उंब्रे ग्रामपंचायत हद्दीत औद्योगिक क्षेत्र असल्याने इथल्या जागा व जमिनीला चांगला भाव आला आहे. ग्रामपंचायत कार्यालयाची जमीन व इमारत गावाच्या मध्यवर्ती भागात असल्याने यावर सर्वांची नजर आहे. परंतु ही जागा व इमारत ग्रामपंचायत कार्यालयालाच असावी, असा ठराव सर्व गावक-यांनी मंजूर केला आहे. 

विद्यमान ग्रामपंचायत सदस्य स्वाती गणेश जगनाडे यांचे पती गणेश नारायण जगनाडे व दीर अमोल नारायण जगनाडे यांनी परस्पर (दि. 8 मे 2017) तळेगाव दाभाडे येथील दुय्यम निबंधक कार्यालयात खानविलकर कुटुंबीयांकडून (दस्त क्रमांक 3051/2017) नुसार खरेदीखत करून घेतले आहे. हा प्रकार उघडकीस आल्याने नवलाख उंब्रे ग्रामस्थांमध्ये चर्चेला उधान आले आहे. ग्रामपंचायत कार्यालय व जागा सदस्यांच्या नातेवाईकांनी खरेदी करून ग्रामपंचायत बेदखल करण्यात आली आहे. 

खरेदीखतास संपूर्ण ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे. ग्रामपंचायत कार्यालय आहे त्याच ठिकाणी राहील, अन्यथा ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलन करण्यात येणार असल्याचे 350 स्वाक्ष-यांचे लेखी निवेदन मावळ तहसीलदार रणजीत देसाई, गटविकास अधिकारी निलेश काळे व पोलीस निरीक्षक पांडुरंग सुतार यांना उपसभापती शांताराम कदम, संतोष पापळ, जालिंदर शेटे, समाधान शेटे, रोहिदास गायकवाड, सतीश जगनाडे, विक्रम कदम, विशाल शेटे, उमेश शेटे, रामदास लालगुडे बळीराम मराठे, दीपक बधाले, पांडुरंग मावळे, सुनील कदम, नागेश शिर्के, पंडित जाधव आदींनी दिले. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन मावळ तालुक्याचे गटविकास अधिकारी निलेश काळे यांनी दिले.

भाजप आंदर मावळ अध्यक्ष संपत शेटे म्हणाले की, ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीचा कारभार मोठ्या विश्वासाने ज्यांच्या हातात दिला त्यांनीच गावक-यांच्या विश्वासाला तडा दिला आहे. तसेच ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीचे बांधकाम गावठाण जागेत सुरू करून ग्रामस्थांची दिशाभूल केली आहे. मागील एक वर्षापासून ग्रामपंचायतीची इमारत व जागा बळकावण्याचा प्रयत्न सुरु होता. ही जागा शासकीय दराप्रमाणे ग्रामपंचायत खरेदी करण्यासाठी तयार आहे. ज्या ग्रामपंचायत सदस्यांनी पदाचा गैरवापर केला आहे त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी.

राष्ट्रवादी आंदर मावळ उपाध्यक्ष संतोष नरवडे म्हणाले की, जनतेची सेवा करणारे लोकप्रतिनिधीच स्वतःच्या स्वार्थासाठी पदाचा गैरवापर करत आहेत. ग्रामपंचायत इमारत व बखळ जागा विकत घेण्याचे आजपर्यंत कोणत्याही ग्रामपंचायत सदस्यांच्या नातेवाईकांना जमले नाही ते या सदस्यांच्या नातेवाईकांनी करून दाखवले. मोक्याची जागा असल्याने ती बळकावली असून याला संपूर्ण ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.

सामाजिक कार्यकर्ते राहुल शेटे म्हणाले की, ग्रामपंचायत कार्यालय व जागा जगनाडे कुटुंबीयांनी ग्रामस्थांची दिशाभूल करून घेतली आहे. या ठिकाणी असलेले कार्यालय इतरत्र हलविण्यास आमचा तीव्र विरोध आहे.

सरपंच दत्तात्रय पडवळ म्हणाले की 1952 पासून ग्रामपंचायतीचे कार्यालय व जागा असून ही जागा खानविलकर कुटुंबीयांनी ग्रामपंचायतीलाच विकत देण्याचा ठराव (दि.2 ऑक्टोबर 2016) करून तहसीलदार कार्यालयाला दिला आहे. संबंधित कुटुंबाला (दि.23 नोव्हेंबर 2016) ठराव सूचना दिली आहे. जी जागा जगनाडे कुटुंबाने घेतली असून ती जागा आम्ही सोडणार नाही. गरज भासल्यास न्यायालयात देखील जाण्याची तयारी आहे. त्या जागेत तलाठी कार्यालय, पोस्ट ऑफीस व सभागृह तयार करण्यात येणार आहे.

जागेचे खरेदीदार गणेश जगनाडे म्हणाले की, या जागेवर ग्रामपंचायतीचा ताबा असून ही जागा खासगी मालकीची आहे. मी मूळ मालक खानविलकर कुटुंबियांकडून रीतसर खरेदी घेतली आहे. माझी पत्नी विद्यमान ग्रामपंचायत सदस्य आहे. ही मोक्याची जागा असल्याने आता राजकारण होत आहे.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - ढाण्या वाघ म्हणून पश्चिम महाराष्ट्रात अन्यायाविरोधात चार दशकाहूनही अधिक काळ लढा दिलेल्या बापू बिरू वाटेगावकर यांच्यावर मावळातील पवना रुग्णालयात सांधे प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया नुकतीच करण्यात आली. वयाच्या 102 वर्षाच्या रुग्णाच्या दोन्ही पायांवर हे प्रत्यारोपण झाले असून बापू पुन्हा एकदा स्वत:च्या पायावर चालू लागले आहेत.

पवना हॉस्पिटलच्या कार्यकारी संचालिका डॉ. वर्षा वाढोकर, संचालक डॉ. सत्यजित वाढोकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. त्यापूर्वी पत्रकारांनी बापू वाटेगावकर यांच्याशी संवादही साधला. गुडघेरोपण तज्ज्ञ डॉ. प्रवीण वाघमारे, डॉ. अजय डोंबाळे आणि डॉ. अश्विन भालेराव यांनी ही शस्त्रक्रिया केली. बापू वाटेगावकर वयाच्या शंभरीनंतरही धडधाकट असून त्यांचे कसलेले शरीर, दमदार आवाज आणि स्मरणशक्ती अजूनही शाबूत आहे. देशभरातील वाढत्या विनयभंग, बलात्कार आणि विवाहितांच्या छळांच्या घटनांना आळा कसा घालायचा, असे छेडले असता ते म्हणाले, लढलं पाहिजे. ताकद, हिम्मत आणि नैतिक नियमांचे पालन केले तर अन्यायाला गाडता येते. पण त्यासाठी गुरू पाहिजे.

पोलीस, सरकार, न्यायालय संरक्षण करू शकत नाही, न्याय होत नाही तेव्हा लढले पाहिजे. असे लढा की पुरावा देखील शिल्लक राहायला नको. मायाबहिणींच्या अब्रूवर घाला घातलेल्यांना मी कायमचं मिटवलं. आजही सर्व जातीधर्माची लोक बोरगावला माझ्याकडे येतात. माहेरवाशीनींना न्याय द्यायला सासरकडच्यांना शब्द टाकला तरी ते तो पाळतात. व्यसनमुक्तीचेही काम सुरू आहे. मांस, दारू, बाईचा नाद, तंबाखू अशा व्यसनांनी माणूस स्वत: संपतो आणि दुस-यांना देखील संपवतो. अन्यायाचे मूळ इथे आहे. लढायचे असेल तर माणूस म्हणून नितीनियम पाळले पाहिजेत.

पवना रुग्णालयातील डॉक्टरांबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली. पुण्या मुंबईतील डॉक्टरांनी वयाचे कारण देत गुडघ्यावर ऑपरेशन करायचे धाडस नाही केले. इथे मात्र वेगळा अनुभव आला. सर्वांनी माझी काळजी घेतली. आज चार वर्षांनी मी चालू लागलो आहे. आमचे 70 माणसांचे कुटुंब आहे. त्यांनाही आनंद झालाय.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - आंदर मावळातील डाहुली गावालगत असलेल्या बेंदेवाडी बंधार्‍याच्या पाण्यात बुडून आज पर्यटनासाठी आलेल्या एका युवा पर्यटकाचा मृत्यू झाला.

कुशल नारायण सुतार (वय 26, रा. महाड, जिल्हा रायगड), असे या बुडून मयत झालेल्या युवकाचे नाव आहे.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर पुणे येथील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटंट ऑफ इंडिया या ठिकाणी सीएचे शिक्षण घेणारे सुमारे 15 विद्यार्थी आंदर मावळ भागात आज सकाळी रविवारच्या सुट्टीनिमित्त वर्षाविहारासाठी आले होते. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास ते डाहुली गावालगतच्या बेंदेवाडी या तलावात पोहत असताना कुशलचा दमछाक झाल्याने पाण्यात बुडून मृत्यू झाला.

लोणावळा परिसरात मागील आठवड्यात दोन युवा पर्यटकाचा वेगवेगळ्या धबधब्यामध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना ही तिसरी घटना मावळात घडली आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या मावळ तालुक्यात विविध पर्यटनस्थळांवर राज्यभरातून तसेच परराज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटक वर्षाविहारासाठी येत असतात. उत्साहाच्या भरात युवा पर्यटक स्वतःच्या हाताने जिविताला धोका निर्माण होईल अशा पद्धतीने वागत असल्याने दुर्दैवी घटना घडत आहे. याकरिता पर्यटकांनी सुरक्षित पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन वडगाव मावळचे पोलीस निरीक्षक प्रदीप काळे यांनी केले आहे.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - वीस वर्षापर्यंत मावळमध्ये पदांनी हुलकावणी दिली आहे. अजितदादा मुख्यमंत्री होण्यासाठी मावळातून राष्ट्रवादीचा आमदार असायला पाहिजे. तसेच कार्यकर्त्यांच्या ताकदीवर या पुढील निवडणुकीत मावळचा आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल, असा विश्वास राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.

मावळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व मावळ तालुका प्रतिष्ठानच्या वतीने मा. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त वडगाव मावळ येथील भेगडे लॉन्स मंगल कार्यालयात आज कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. मेळाव्याचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी  माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, मुंबई प्रदेशाध्यक्ष सचिन अहिर, पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, माजी मंत्री मदन बाफना, कृष्णराव भेगडे, जालिंदर कामठे, वैशालीताई नागवडे, बाळासाहेब नेवाळे, मानसिंग भैय्या पांचुदकर, गणेश ढोरे, रमेश गायकवाड, जितेंद्र इंगवले, अर्चनाताई घारे, विठ्ठलराव शिंदे, गणेश काकडे, किशोर भेगडे, गणेश खांडगे, विजय काळोखे, कृष्णा दाभोळे, सुभाषराव जाधव, महादुबुवा कालेकर, काळूराम मालपोटे, शुभांगी राक्षे, शोभाताई कदम,  अतिष परदेशी, असंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तटकरे पुढे म्हणाले की, मावळ प्रतिष्ठानचे काम जरी जोरात असले तरी; चांगली गोष्ट आहे. मला मावळ प्रतिष्ठानने जरी बोलावले असले तरी त्यासाठी आलो नसतो. फक्त राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यासाठी आलो असल्याचे सांगून मला फक्त राष्ट्रवादी हवी आहे वेगळी चूल मांडू नये. नवीन परिवर्तन घडविण्याची ताकद माझ्या कार्यकर्त्यांत आहे. यासाठी अजित पवार आगे बढो हम तुम्हारे साथ है! म्हणून चालणार नाही, पुणे जिल्ह्यात फक्त राष्ट्रवादीचे अवघे 3 आमदार आहेत. पवारांना ताकद देण्यासाठी पक्ष संघटनेच्या कामात कार्यकर्त्यांनी झोकून दिले पाहिजे. शरद पवार साहेबांनी संसदीय कामकाजात नाबाद 50 वर्षाची कारकीर्द पूर्ण केली आहे. त्यांनी आमदार, राज्यमंत्री, मंत्री, मुख्यमंत्री, केंद्रीय संरक्षण मंत्री, कृषी मंत्री म्हणून केलेले काम आजच्या पिढीला प्रेरणा देणारे आहे. मंडल आयोगाची अंमलबजावणी, महिलांना 50% आरक्षण, ओबीसी धोरण असे निर्णय साहेबांनी घेतले असल्याचे तटकरेंनी सांगितले.

मावळचा इतिहास फार संघर्षमय आहे. मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसची संघटना कार्यकर्त्यांच्या बळावर जोरात आहे. नेत्यांनी मनात आणले तर इकडचा डोंगर तिकडे करतील. येथे कार्यकर्ते जोमात असले तरी नेत्यांमध्ये 'एकमत नाही. त्यामुळे 20 वर्षापासून राष्ट्रवादी सत्तेपासून दूर आहे. नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे संघटना पुढे घेऊन जावी. असे आवाहन विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी केले. माजी मंत्री मदन बाफना, कृष्णराव भेगडे यांनी या तालुक्याचे नेतृत्व केले. भात पिकणारा मावळ, अशी या तालुक्याची ओळख बदलून पर्यटन, औद्योगिकीकरणाचा परिसर अशी या तालुक्याची ओळख झाली. अन्नधान्य आयात करणारा देश आता निर्यातीत पुढे आला आहे. अन्नधान्य, फळे व दुग्धजन्य व्यवसायात देशाची प्रगती होत असल्याचेही दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, माजी मंत्री मदन बाफना या दोन मान्यवरांचा मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात वडगाव ग्रामपंचायत पक्षप्रतोद व काँग्रेसचे कार्यकर्ते प्रवीण ढोरे व भाजपचे दिगंबर आगिवले यांच्या सह अन्य कार्यकर्त्यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. तर आशिष खांडगे व अक्षय दाभाडे यांना तळेगाव शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवडीचे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या हस्ते देण्यात आले.

बाळासाहेब नेवाळे, रमेश अप्पा थोरात, सचिन अहिर, वळसे पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक गणेश अप्पा ढोरे यांनी केले. स्वागत मावळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष नामदेव ठूले यांनी केले. सूत्रसंचालन किरण हुलावळे आणि अतुल सातकर तर मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस सहकार संघाचे अध्यक्ष सुभाष जाधव यांनी आभार मानले.

Page 7 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start