• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
28 Jul 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील 'रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन' या शाळेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून सैनिकांना राख्या पाठविल्या जातात. आज (शुक्रवार) शाळेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सैनिक मित्रपरिवाराचे संस्थापक आनंद सराफ यांच्याकडे सैनिकांसाठी 500 राख्या सुपूर्द केल्या.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती वृद्धींगत व्हावी व देशासाठी लढणा-या सैनिकांच्या त्यागाची महती कळावी या करीता शाळेतील शिक्षिका स्नेहल दत्तात्रय बाळसराफ यांच्या कल्पनेतून हा उपक्रम साकारला जातो. यावर्षी सैनिक मित्रपरिवाराचे संस्थापक आनंद सराफ यांच्याकडे मुलांनी 500 राख्या सुपूर्द केल्या. त्यावेळी पोलीस काॅन्स्टेबल प्रकाश गारकर उपस्थित होते. या भावस्पर्शी कार्यक्रमात मार्गदर्शन करून आनंद सराफ यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

देशाचे रक्षण ही एक जटील समस्या आहे. परकीय शत्रूंपासून होणारे हल्ले तसेच दहशतवादांचा बिमोड करण्याकरिता आपल्या भारतभूमीचे जवान ऊन, वारा, पाऊस यांची तमा न बाळगता सतत दक्ष असतात. प्रसंगी प्राणाची आहुती देऊन देशवासियांचे सरंक्षण हाच त्यांचा जीवनाचा उद्देश असतो. त्यासाठी ते सतत संघर्ष करत असतात. अशा शूर व धाडसी जवानांप्रती प्रत्येकाच्या मनामध्ये आदरभाव असला पाहिजे. त्यांच्या ऋणातून मुक्त होणे हे जरी अवघड असले तरी स्वताच्या कुटुंबापासून दुर राहणा-या जवानांना तळेगाव दाभाडे येथील 'रामभाऊ परुळेकर विद्यानिकेतन' या शाळेच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून राख्या पाठविल्या जात आहेत. 

पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून विद्यार्थ्यांनी या राख्या तयार केल्या आहेत. या राख्यांमधून विद्यार्थ्यांमध्ये आपल्या सैनिकांबद्दल असलेली आपलेपणाची भावना व्यक्त होते. मागील अनेक वर्षांपासून या शाळेतील विद्यार्थी स्वतः राख्या तयार करून सीमेवरील जवानांना पाठवतात. सीमेवरील जवानांना शाळेच्या राख्या मिळाल्यानंतर सैनिकांकडून विद्यार्थ्यांना पत्राद्वारे प्रतिक्रिया येतात. सैनिकांची आलेली पत्रे वाचताना विद्यार्थ्यांच्या आनंदाला पारावर उरत नसल्याचे बाळसराफ आवर्जून सांगतात.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका चौधरी यांनी केले. पाहुण्यांचा परिचय पर्यवेक्षक कांबळे यांनी केला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजय जाधव, निरंजन वारके, अक्षदा मुनोत, साक्षी फंड, पायल गोजारणे, करूणा गवई, हेमराज ठाकरे, अक्षदा बांद्रे, साक्षी पारगे, ऋतुजा काळे यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन व आभार प्रकल्प प्रमुख स्नेहल बाळसराफ यांनी केले. शाळेचे विश्वस्त नंदन रेगे यांनी सातत्यपूर्ण व स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले.

28 Jul 2017


नऊ घरफोडीचे गुन्हे उघड

एमपीसी न्यूज - तळेगाव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेतर्फे काल (गुरुवारी) घरफोडी करणा-या सराईत गुन्हेगाराला  अटक केली असून. त्याच्याकडून 9 घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

जफर (पूर्ण नाव माहित नाही) (वय.23 रा. शिवाजीवाडी, मोशी) याला पिंपरीतील भातरनगर झोपडपट्टी येथून पोलिसांनी अटक केले आहे.

जफर याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने त्याची आई व मित्र याच्या सहायाने तळेगाव, लोणावळा, देहूरोड या परिसरात केलेल्या 9 घरफोड्या उघड झाल्या आहेत. यामध्ये आरोपीकडून 2 लाख 75 हजार 400 रुपयांचे 10.2 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.

आरोपीला आज वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला उद्यापर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

28 Jul 2017


एमपीसी न्यूज - आई-वडील मुलांना संस्कार तर शिक्षक मुलांच्या जीवनाला आकार देतात. विद्यार्थ्यांनी अडचणींना न घाबरता आत्मविश्वासाने सामोरे गेल्यास ध्येयप्राप्ती निश्चित साध्य होते, असे मत तळेगाव नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती जयसिंग भालेराव यांनी केले.

श्री. गणेश प्रतिष्ठान वतननगर या संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या विद्यार्थी गुणगौरव समारंभात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ होते. यावेळी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष गणपत काळोखे गुरूजी, तरूण मित्र मंडळाचे अध्यक्ष निलेश नाचण, नगरसेवक सचिन टकले यांच्यासह पालक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

येथील नगर परिषद हद्दीतील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम  क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या प्राजक्ता देवरे, वैष्णवी मखर, शंतनु हळदवणेकर, अथर्व जांभळे, कविता खरात, केतकी  सातपुते, अनुराग ढगे, रोहित घोजगे, भाग्यश्री वाघमारे, ऋतुजा जाधव, पूजा अमनाजी, निखील तेलमासारे, नलिनी संकपाळ, रूचा दरेकर या गुणवंत विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, प्रशस्तिपत्रक व गुलाबपुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात आले.

प्राचार्य दत्तात्रय बाळसराफ  म्हणाले की, पालकांनी  विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे  ओझे लादू नये. आवड असलेल्या क्षेत्रात विशेष गुणवत्ता मिळवत विद्यार्थ्यांनी करिअर करावे. कार्यक्रमाचे नियोजन संस्थेचे विश्वस्त व पदाधिकारी सचिन टकले, दामू चोरगे, शंकर कुचिक, चंद्रशेखर मेनन, नंदा उभे  यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.साहेबराव गावडे यांनी  केले. प्रा. मगन ताटे यांनी आभार मानले.

27 Jul 2017

राष्ट्रवादी काँग्रेसममधील गटबाजी चव्हाट्यावर

एमपीसी न्यूज - मावळ तालुका खरेदी-विक्री संघ अध्यक्ष निवडणुकीत बंडखोरी झाल्याने सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रकाश पवार यांना अवघ्या एका मताच्या फरकाने मिळालेल्या निसटत्या विजयावर समाधान मानावे लागले. या निवडणुकीच्या निमित्ताने मावळ राष्ट्रवादी काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा उफाळून आल्याने राजकीय वर्तुळात तो चर्चेचा विषय झाला आहे. 

खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार म्हणून प्रकाश पवार तर त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचेच बंडखोर उमेदवार भाऊ मावकर या दोघांत निवडणूक झाली. विजयी उमेदवार प्रकाश पवार यांना दहा तर पराजित उमेदवार भाऊ मावकर यांना नऊ मते पडली.

मागील वर्षी मावळ तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष यांनी 19 जागा पैकी 13 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळविले होते. भाजपाला 6 जागा मिळाल्या होत्या.

अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार प्रकाश पवार हे एक मताने जरी विजयी झाले असले तरी त्यांच्याविरोधात त्याच पक्षाचे भाऊ मावकर निवडणूक रिंगणात उभे राहिले. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी झाली.

राष्ट्रवादीच्या चार सदस्यांनी अधिकृत उमेदवाराच्या विरोधात मतदान केल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर पवार यांना विजय मिळवून देणारे दहावे निर्णायक मत कोणाचे, याबाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे. अत्यंत तणावपूर्ण वातावरणात ही निवडणूक झाली. राजेश लव्हेकर यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पहिले.

मावळते सभापती बाळासाहेब भानुसघरे यांनी महिन्यापूर्वी सभापतिपदाचा राजीनामा दिला होता. त्या रिक्त झालेल्या पदासाठी आज निवडणूक घेण्यात आली. सभापतिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे प्रकाश पवार, भाजपाचे दत्तात्रय केदारी, राष्ट्रवादीचे बंडखोर भाऊसाहेब मावकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते ऐनवेळी भाजपाचे केदारी यांनी निवडणूक रिंगणातून माघार घेत राष्ट्रवादीचे बंडखोर उमेदवार मावकर यांना पाठिंबा दिला. त्यामुळे निवडणूक खूपच चुरशीची झाली. 

यावेळी पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे , राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब ढोरे, संघाचे संचालक पंढरीनाथ ढोरे, रोहीदास गराडे,  उपसभापती दत्तात्रय शिंदे, अॅड. खंडुजी तिकोणे, प्रवीण ढोरे, विलास दंडेल आदी उपस्थित होते.
27 Jul 2017

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील मनोज म्हाळसकर याची निवड राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धेसाठी झाली आहे.

कोल्हापूर येथे राज्यस्तरीय पावर लिफ्टिंग स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेमध्ये खेळाडु मनोज शांताराम म्हाळसकर याने 66 किलो वजनी गटात 540 किलो वजन उचलून सुवर्ण पदक मिळवले आहे. 14 आगस्ट ते 19 ऑगस्ट दरम्यान केरळ येथे राष्ट्रीय पावर लिफ्टिंग स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेसाठी मनोजची निवड झाली आहे. मनोज वडगाव मावळ येथील महाराष्ट्र स्पोर्टस क्लब येथे रविंद्र यादव व विक्रमसिंग देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहे. 
27 Jul 2017

एमपीसी न्यूज - महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना आकर्षित करणा-या दोन गोष्टी असतात; एक मोबाईल आणि दुसरी बाईक. यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षणावरील लक्ष विचलित होते, त्याची पालकांनी दखल घेतली पाहिजे असे मत इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. बाळसराफ यांनी व्यक्त केले. 

इंद्रायणी महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या नवोदित विद्यार्थ्यांच्या पालक सभेत ते बोलत होते. यावेळी महाविद्यालय पालक समितीवर प्रभाकर तुमकर, आशा शिंदे, रवींद्र कदम आणि जयश्री कदम यांची पालक प्रतिनिधी म्हणुन निवड करण्यात आली. यावेळी प्राध्यापक उत्तम खाडप, प्रा. मुक्ता देशमुख, प्रा. संदीप भोसले, प्रा. एस. आर. जगताप आदी उपस्थित होते.

डॉ बाळसराफ पुढे म्हणाले, "महाविद्यालयातील ग्रंथालय, अभ्यासिका आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन व पालकांचे आशीर्वाद यामधून अभ्यासातील प्रगती प्राप्त होईल. मात्र मोबाईल आणि बाईकच्या अतिवापराने विद्यार्थी अभ्यासापासून दुरावत चालले आहेत. विद्यार्थ्यांचे वय आणि अपरिपक्वता याचा गैरफायदा काही अपप्रवृर्त्ती घेत आहेत. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांच्या वर्तनावर व त्याच्या आसपासच्या वातावरणावर चौकस राहणे आवश्यक आहे."

मुलामुलींच्या शारीरिक मानसिक आणि दैनदिन व्यवहाराकडे जाणीवपुर्वक लक्ष दिले पाहिजे. मुलांना सुखवस्तुत ठेवले तर त्याची किंमत त्यांना कळत नाही. मुलांमध्ये आत्मविश्चास निर्माण करून अभ्यासाकडे आकर्षित करण्यासाठी योग्य मार्गदर्शन करायला हवे. अकरावी हा पुढील शिक्षणाचा पाया आहे. त्यामुळे भविष्यातील शैक्षणिक बीजे याच वर्षात पेरली गेली पाहिजे.
27 Jul 2017

एमपीसी न्यूज -  तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे वरिष्ठ जिल्हा उपाध्यक्ष व  ज्येष्ठ नगरसेवक गणेश वसंतराव खांडगे यांना मंगळवार (दि.१८ जुलै) रोजी मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितलेल्या आरोपीला तळेगाव दाभाडे पोलिसांनी गुरुवार (दि.२६) रोजी अटक केली. या घटनेने मावळ तालुक्यात खळबळ उडाली होती. आठ दिवसात आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे.

भीमराव मलाप्पा बोडके (वय २७, रा. भीमाशंकर कॉलनी वराळे ता. मावळ, मूळ : भंडारी चौक, आनंदनगर चिंचवड पुणे) असे मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस निरीक्षक एम बी पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार गणेश खांडगे यांच्या मोबाईलवर आरोपी भीमराव बोडके याने रविवार (दि.१६) रोजी मेसेज पाठविला. खांडगे यांनी मंगळवार (दि.१८) मोबाईलवर आलेला मेसेज वाचला असता, त्यात १२ जण तुमचा पेट्रोल पंप शोरूमचे नुकसान करून तुमची गेम करण्याचा धोका आहे. त्या १२ जणांमधील मी एक असून मला त्यात पडायचे नाही. हि माहिती तुम्हाला देतो याचे काय देणार ? या नंबर ची चौकशी नका. रिप्लाय मेसेज करूनच द्यावा. असे नमूद केले. खांडगे यांनी या मेसेजकडे दुर्लक्ष केले. पुन्हा सोमवार (दि.१७) रोजी “काय झाले साहेब” अशा मेसेज आला. त्यावर खांडगे यांनी मदत करण्याची तयारी दर्शवून “प्रत्यक्ष भेटण्यास यावे” असा मेसेज केला.

तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितल्याचा गुन्हा मंगळवार (दि.१८ जुलै) रोजी दाखल केला. या घटनेची दखल पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक यांनी घेतली होती.

या गुन्ह्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले होते. मोबाईल तपास व गुप्त सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी भीमराव बोडके यांचा माग काढीत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक, देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम बी पाटील, उपनिरीक्षक वैभव सोनवणे, ज्ञानेश्वर बाजगिरे, कर्मचारी प्रकाश वाघमारे, नितीन गार्डी, अजित काळे आदींनी आरोपी भीमराव बोडके याला  गुरुवारी(दि.२६) सायंकाळी पाच वाजता अटका केली. मोबाईलवरून जीवे मारण्याची धमकी देवून खंडणी मागितल्याच्या गुन्ह्याचा कसून तपास आरोपी बोडके याच्याकडे सुरु आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक वैभव सोनवणे करत आहे.
27 Jul 2017


एमपीसी न्यूज-  तळेगाव येथील ऐतिहासिक तळ्याकाठच्या 160 वृक्षांच्या बेकायदेशीर कत्तलीसंदर्भात सत्यता निदर्शनास आल्यानंतर मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलिसांकडे याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रार दिली होती. मात्र, गुन्हा दाखल करता येतो किंवा कसे यासाठी तळेगावचे पोलीस निरीक्षक मुगुट पाटील संभ्रमात पडले आहेत. एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अशा प्रकरणात निर्णय घेता येत नसल्याबाबत येथील निसर्गराजा संस्थेचे कायदेशीर सल्लागार अॅड.गणेश जगताप यांनी खंत व्यक्त केली आहे.

ईगल फ्लास्क कंपनीच्या पाठीमागे असणा-या सुमारे 85 एकर क्षेत्रातील या ऐतिहासिक तळ्याकाठचे देशीवृक्ष बेकायदेशीरपणे तोडून गायब केल्याप्रकरणी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी मुख्याधिकारी वैभव आवारे आणि उद्यान निरीक्षक विशाल मिंड यांना तातडीने चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. प्राप्त अहवालानुसार अशी वृक्षतोड झाली असल्याचे आणि वृक्षप्राधिकरण समितीने वृक्षतोडीस कोणतीही परवानगी दिली नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर मुख्याधिका-यांनी पोलिसांकडे याबाबत गुन्ह्याची नोंद व्हावी व वृक्षतोड करणा-यांचा तपास करण्यासाठी लेखी अर्जही दिला आहे.

तथापि, या प्रकरणाची गंभीरता पाहता पोलिसांवर राजकीय किंवा अन्य प्रकारचा दबाव आहे किंवा कसे अशी शक्यता नागरिकांच्या चर्चेत आहे. कारण पोलीस निरीक्षकांना तक्रार प्राप्त झाल्यानंतर आठ दिवसानंतरही गुन्हा दाखल करू शकतो किंवा कसे, असा प्रश्न पडला आहे. त्यासाठी ते तज्ज्ञांच्या सल्ल्याच्या प्रतीक्षेत आहेत. याबाबत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, हा विषय पोलिसांच्या कार्यकक्षेत येत नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, पर्यावरण चळवळीतील कायदेसल्लागार अॅड. गणेश जगताप, वृक्षप्राधिकरण समितीचे माजी सदस्य संदीप संघवी यांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत खंत व्यक्त केली आहे. गायब झालेले वृक्ष ही सार्वजनिक मालमत्ता आहे. तिची अज्ञात व्यक्तींकडून बेकायदेशीर तोड झाली आहे. त्याचा तपास होवून संबंधिताविरूद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी नगरपालिकेच्या सर्वोच्च प्रशासन अधिका-याने लेखी तक्रारही दिली आहे, असे असून देखील पोलीस निरीक्षक कोणाच्या सल्ल्यावर अवलंबून राहून काम करत आहेत? असा सवाल जगताप यांनी उपस्थित केला. पोलिसांकडून कर्तव्यात कसूर होणार असेल तर न्यायालयाच्या निदर्शनास तसे आणले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

दरम्यान, श्रीमंत सरदार दाभाडे घराण्यातील वारसदार याज्ञसेनीराजे दाभाडे-सरकार यांनी माहितीच्या अधिकाराखाली नगरपालिकेकडे अर्ज दाखल केला आहे. याबाबत त्यांना विचारले असता याज्ञसेनीराजे दाभाडे-सरकार म्हणाल्या की, सरसेनापती खंडेराव दाभाडे-सरकार यांनी लोकांना पिण्यासाठी पाण्याचा साठा करता यावा या उद्देशाने तळ्यासाठी 85 एकर जागा नाममात्र भाडेतत्वावर दिली होती. पर्यावरण आणि निसर्गाचा समतोल तळ्यामुळे राखला जात होता. मात्र, गेल्या तीन महिन्यांपूर्वी त्यातील जलसाठा पूर्णपणे सोडून दिला गेला. तळ्यातील गाळाच्या नावाखाली मुरूम आणि मातीही परस्पर गायब करण्यात आली. काठावरील 160 वनसंपदेचीही चोरी करण्यात आली, असे असताना नगरपालिकेला याची खबर देखील नसेल तर त्यांनी तळ्याच्या देखभालीवरील जबाबदारी आमच्याकडे द्यावी. तळ्याच्या जागेची मूळ मालकी आजही दाभाडे-सरकारांकडे आहे. हे कोणी विसरू नये. त्यासाठी न्यायालयीन लढा देण्याचीही आमची तयारी आहे, असेही त्यांनी सांगितले.

27 Jul 2017


एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील इंदोरी येथील एका चार वर्षांच्या चिमुरडीचा काल (दि. 26) रोजी स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. स्वाईन फ्लूचा विळखा दिवसेंदिवस वाढत असून यामुळे चार वर्षाच्या निष्पाप चिमुरडीला आपला जीव गमवावा लागला आहे. जानेवारीपासून स्वाईन फ्लूने मृतांचा आकडा 26 झाला आहे.

स्वाईन फ्लूची लक्षणे आढळताच या चिमुरडीला खाजगी रुग्णालयात भरती करण्यात आले. तिला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. परंतु उपचार सुरु असताना चिमुरडीचा मृत्यू झाला.

पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही महिन्यापासून 'स्वाईन फ्लू'ने ठाण मांडले असून गेल्या सहा महिन्यात पिंपरी-चिंचवड शहरातील विविध रुग्णालयात 26 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मागील सहा महिन्यात शहरातील 203 रुग्णांना स्वाईन फ्लूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यापैकी सध्या 37 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत.

पुण्यात एका महिलेचा मृत्यू

पुण्यात एका 52 वर्षीय महिलेचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला. पंढरपूर येथील महिलेस 24 जुलै रोजी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना 26 जुलै रोजी सायंकाळी सात वाजून 50 मिनिटांनी त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यामुळे पुणे शहरात स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 75 झाली आहे. शहरात 369 रुग्णांना स्वाईन फ्लूची बाधा झाली असून सध्या 13 रुग्ण अतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. स्वाईन फ्लूवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू असून त्यावर विजय मिळविणे अजूनही शक्य झालेले नाही.

27 Jul 2017


शीतल हगवणे देहूरोड तर मंजुश्री वाघ लोणावळा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी 

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीच्या वतीने मावळ तालुक्यातील प्रमुख शहरातील महिला पदाधिका-यांची निवड वडगाव मावळमधील पीसीसीसी बँक येथे करण्यात आली. यावेळी तळेगाव, देहूरोड आणि लोणावळा राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सुनीता काळोखे, शीतल हगवणे आणि मंजुश्री वाघ तसेच मावळ तालुका महिला संघटनेच्या उपाध्यक्ष पदी नीलम अनिल सातकर यांची निवड करण्यात आली. 

जिल्हा बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्षा वैशाली नागवडे, मावळ तालुका राष्ट्रवादी महिला अध्यक्षा शुभांगी राक्षे, हवेली पंचायत समिती सदस्या हेमलता काळोखे हवेली महिला अध्यक्षा लोचन शिवले यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली.

यावेळी युवक अध्यक्ष रमेश गायकवाड, विद्यार्थी अध्यक्ष अमोल केदारी, तळेगाव शहर अध्यक्ष गणेश काकडे, लोणावळा शहर अध्यक्ष राजू बोराठी, देहूरोड शहर अध्यक्ष अॅड. कृष्णा दाभोळे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, लोणावळा नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष नारायण पाळेकर, लोणावळा सहकारी बँकेचे अध्यक्ष शांताराम टाकले, मावळ तालुका महिला सरचिटणीस निलम घाडगे, अंदर मावळ राष्ट्रवादीचे अध्यक्ष आशिष ढोरे, पवन मावळ महिला अध्यक्षा कल्पना सावंत, नाणे मावळ अध्यक्षा सीमा बालगुडे उपस्थित होते.

vadgaon 1

Page 6 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start