• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
06 Aug 2017

एमपीसी न्यूज - तळेगावच्या गणेश तरुण मंडळातर्फे 26 ऑगस्ट रोजी लोकनृत्य स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे हे 31 वे वर्ष आहे.

दरवर्षी प्रमाणे यंदाही गणेश तरुण मित्रमंडळातर्फे लोकनृत्य स्पर्धा भरवली आहे. ही स्पर्धा  तळेगाव येथील विठ्ठल मंदिर संस्थान येथील स्व. कासापाई भेगडे सभागृहात 26 ऑगस्ट रोजी आयोजित केल्या आहेत. या स्पर्धेसाठी  22 ऑगस्टपर्यंत प्रवेशिका स्वीकारल्या जाणार आहेत.

इच्छुकांनी अधिक माहितीसाठी श्रीकांत मेढी 9671105022, शैलेश भोसले - 7350888948, शुभम फाकटकर - 9075708025 या क्रमांकावर संपर्क साधावा. या स्पर्धेमध्ये विजोत्याला 12 हजार 500 रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.  गेल्या 31 वर्षापासून ही स्पर्धा भरत असून तळेगाव व पंचक्रोशीत ही मानाची स्पर्धा म्हणून ओळखली जाते.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचा रिंगरोड मावळ तालुक्यातील बागायती क्षेत्रामधून न नेता पर्यायी मार्गाने वळविण्यात यावा या मागणीसाठी व पर्यायी मार्ग सूचित करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी किरणजी गित्ते साहेब यांच्या समवेत आमदार बाळा भेगडे, पदाधिकारी व शेतकरी यांची बैठक संपन्न झाली. यामध्ये प्राधिकरणाच्या वतीने नियोजित रिंगरोडचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी आमदार बाळा भेगडे यांनी मावळ तालुक्यातील जमिनी शासनाने विविध प्रकल्पासाठी संपादित झाले आहे, असे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले.

यावेळी आमदार बाळा भेगडे, माजी खासदार व संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष नानासाहेब नवले, माजी आमदार कृष्णराव भेगडे, भारतीय किसान संघाचे अध्यक्ष शंकरमामा शेलार, राजारामजी राक्षे, जनार्दनजी पायगुड़े, भास्करराव म्हाळसकर, एकनाथरावजी टिळे, सभापती गुलाबकाका म्हाळसकर, प्रशांतजी ढोरे, बाळासाहेब घोटकुले, किरण राक्षे, बाबा बुचडे, रामनाथ गराडे,  सुर्यकांत सोरटे, यादव सोरटे आदी मान्यवर, शेतकरी व अधिकारी उपस्थित होते.

त्यामुळे बागायती क्षेत्र असणाऱ्या नेरे, सांगावडे, दारूब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे, परंदवडी, उर्से या प्रमाणे नियोजित रिंगरोड झाल्यास येथील बागायती क्षेत्र बाधित होणार आहे. त्यामुळे या मार्गास पर्यायी मार्ग म्हणून 1) नांदे, मारुंजी, कुसगाव, कासारसाई, पाचाणे, चांदखेड, उर्से या मार्गे किंवा 2) नांदे, गोडांबेवाडी, रीहे, आढले बु., पारिटेवाडी, उर्से या मार्गे करण्यात यावा असे सुचविले.

05 Aug 2017

मावळ गोळीबारातील शहिदांच्या स्मरणार्थ भाजप व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानचा उपक्रम

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे- पालवे यांच्या वाढदिवसांनिमित्त तसेच मावळ गोळीबारातील शहिदांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे प्रतिष्ठान यांच्या वतीने क्रांतिदिनी दि.9 तसेच 10 ऑगस्टला पवनानगर येथे मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांसाठी  मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. 'सुंदर मावळ, निरामय मावळ' हा संकल्प करण्यात आला असून त्यासाठी मावळ तालुक्यात ठिकठिकाणी अशाच पद्धतीची महाशिबिरे आयोजित केली जाणार आहेत. 

महाशिबिराचे मुख्य संयोजक व तळेगाव दाभाडेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी ही माहिती दिली. पवनानगर येथील पवना विद्या मंदिर येथे बुधवार (दि. 9) व गुरुवार (दि.10) रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हे शिबिर होणार आहे. महाशिबिराचे उद्घाटन मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी पुणे जिल्हा भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार रुपलेखा ढोरे, माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

महाशिबिरात हृदयरोग, कॅन्सर, मणक्याचे आजार, मोतीबिंदू व तिरळेपणा, कान, नाक व घसा, पोटातील गाठी, फाटलेले ओठ व टाळूवरील शस्त्रक्रियांसाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी केली जाणार असून नंतर त्यांच्यावर रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत. दंतचिकित्सा, त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, किडनी व मूत्रमार्गाचे विकार, अपेन्डिक्स, हार्निया, अँजिओग्राफी, अँजोप्लास्टी, श्रवण यंत्र, चष्मा, अपंगांना जयपूर फूट यांचे मोफत तपासणी, उपचार व औषधवाटप करण्यात येणार आहे.

शिबिराच्या ठिकाणी नागरिकांना येण्या-जाण्यासाठी त्यांच्या गावापासून मोफत वाहनव्यवस्था देखील करण्यात येणार आहे. त्यासाठी सुमारे 150 वाहनांची सोय करण्यात आली आहे. शिबिराच्या ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत चहापान आणि अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. महाशिबिरासाठी मोफत औषधे उपलब्ध होण्यासाठी अतुल शहा यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. महाशिबिरात पवना हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, मायमर मेडिकल कॉलेज, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद मावळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, हिमालया ड्रग कंपनी, सेनफोर फार्मासिटिकल, अलकेन लॅबोरेटरी, एफडीसी कंपनी, एबोट हेल्थ केअर या संस्था सहभागी होणार आहेत.

महाशिबिरासाठी येताना नागरिकांना पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड, आधारकार्ड आणि पूर्वी काही आजार असल्यास त्याची कागदपत्रे आणावी लागणार आहेत. पवन मावळातील आढे, ओझर्डे, बौर, सडवली, शिवणे, मळवंडी, थुगाव, बौरवाडी, करुंज, राऊतवाडी, बेडसे, कडधे, आर्डव, भडवली, शिवली, धनगव्हाण, येलघोल, कोथुर्णे, मळवंडी ठुले, वारू, ब्राह्मणोली, येळसे, शिवती, काळे कॉलनी, महागाव, धालेवाडी, मालेवाडी, कालेगाव, आंबेगाव, सिंधगाव, दुधिवरे, घेरेवाडी, लोहगड, आपटी, गेव्हंडे, आतवण, ठाकूरसाई, खडक गेव्हंडे, गेव्हंडे वसाहत, तिकोणा पेठ, जवण क्र. 1, 2, 3, अजिवली, शिळींब, बोडखेल, वाघेश्वर, कादव, चाऊसर, चांदेवाडी, मोर्वे, केवरे, कोळे, चापेसर, तुंगी सुमारे 50 पेक्षा अधिक गावांमधील ग्रामस्थांना या महाशिबिराचा लाभ मिळणार आहे.

याच उपक्रमाचा भाग म्हणून मावळ तालुक्यात ठिकठिकाणी अशाच आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील शेळके यांनी दिली. 'सुंदर मावळ, निरामय मावळ' हा संकल्प करून आयोजित केलेल्या या महाशिबिराचा मावळातील सर्व नागरिकांनी या  लाभ घ्यावा, असे आवाहनही शेळके यांनी केले आहे.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज - डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक आंबी तळेगाव येथे गुणवत्ता कौशल्य विकास व जीवन कौशल्य विकास हा तीन दिवसीय कार्यक्रम संपन्न झाला. डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक आंबी व श्री श्री रविशंकर फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेचे उद्घाटन प्राचार्य डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले.

मानसिक ताणाची कारणे व दुष्परिणाम तसेच ताण कमी करण्याचे उपाय डॉ. कुलकर्णी यांनी सांगितले. सुदर्शन प्रक्रियेतून हा ताण कमी करता येऊ शकतो. आजच्या स्पर्धेच्या जगात केवळ अभियांत्रिकीची पदवी मिळविणे म्हणजे शिक्षण पूर्ण करणे नव्हे. तर पदवीसोबत विविध कौशल्ये आत्मसात करणे महत्वाचे आहे, असेही कुलकर्णी म्हणाले. 27, 28 आणि 29 जुलै रोजी पार पडलेल्या या कार्यशाळेला शमिका वैद्य यांनी मार्गदर्शन केले.

प्रत्येक सत्रात कौशल्य विकासाचे उपक्रम घेण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन, संस्थेचे अध्यक्ष डॉ. विजय डी. पाटील यांनी केले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले

05 Aug 2017

अजितदादांकडे साकडे घालणार

वडगाव मावळ- मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसध्ये मनमानी कारभार सुरु झाल्याने पक्ष टिकवण्यासाठी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांना बदलण्याची मागणी करण्याचा ठराव राष्ट्रवादीच्या नाराज कार्यकर्त्यांच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत करण्यात आला. याबाबत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भेटणार भेटून त्यांना साकडे घालण्यात येणार आहे.

या बैठकीला जिल्हा परिषद सदस्य बाबुराव वायकर, दीपक हुलावळे , नगरसेवक संतोष भेगडे, माजी नगराध्यक्ष सुरेश चौधरी, संत तुकाराम सह. साखर कारखान्याचे संचालक अंकुश आंबेकर, माजी मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संतोष मुर्हे, माजी सरपंच तानाजी दाभाडे, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके, कृषी उत्पन्न बाजार समिती उपाध्यक्ष विष्णु गायखे, खरेदी विक्री संघ माजी अध्यक्ष बाळासाहेब भानुसघरे, मिकी कोचर, संदीप आंद्रे, सरपंच दत्तात्रय पडवळ, नारायण ठाकर, माजी पं स सदस्य सचिन घोटकुले, भरत येवले, संजय देवकर, विष्णु मुर्हे, नितीन मुर्हे, बाळासाहेब मोहोळ, चद्रकांत दहीभाते, बाबाजी गायकवाड, सुनील दाभाडे, निलेश राक्षे, विशाल दाभाडे, विशाल वहिले, शांताराम लष्करी, संजय शेंडगे, कैलास गायकवाड, नामदेव शेलार, मनोज येवले, राजेंद्र घोजगे आदीसह मोठ्या संख्येने पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी किशोर भेगडे म्हणाले की, गटातटाच्या राजकारणामुळे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत चांगल्या उमेदवाराची तिकिटे या मंडळींनी कापली. त्यामुळे पक्षाला सत्ता गमवावी लागली. मावळ तालुकाध्यक्षाची निवड ही कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप भेगडे यांनी केला. गेल्या दोन वर्षात पक्षाची बांधणी झाली नाही. पक्षातील प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलुन जवळच्या कार्यकर्त्यांना पदे वाटण्यात आली. अध्यक्षांच्या या 'व्यक्तिनिष्ठ' कार्यक्रमामुळे मावळात पक्षाचे अस्तित्व धोक्यात आले आहे. स्वत:च्या फायद्यासाठी पक्षाला समांतर अशा संघटना स्थापन केल्यामुळे वडगाव मावळ येथे पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अशा समातंर संघटना बंद करा असा आदेश दिला होता अशी माहिती किशोर भेगडे यांनी दिली. 

भेगडे पुढे म्हणाले की, तालुक्यात रिंगरोड, एमआयडीसी सारखे प्रश्न उभे असतांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभा असल्याचे दिसत नाही. मावळ तालुक्यात गेल्या दोन वर्षांत कोणत्याही प्रकारचे विधायक कार्य झालेले दिसत नाही. बैठकीत तालुकाध्यक्षांसह सर्व पदाधिकार्यांना हटविण्याचा निर्णय घेण्यात आला असून लवकरच पक्षनेते अजित पवार यांची भेट घेणार आहोत असे सांगण्यात आले.

या बाबत प्रतिक्रिया देताना गणेश ढोरे म्हणाले की, काही लोकांकडून पक्षविरोधी काम होत असूनही मावळात पक्ष संघटनेची वाढ होत आहे. पक्ष आणि पक्षाचे पदाधिकारी यांना बदनाम करण्याचे कटकारस्थान चालू असून माझी निवड वरिष्ठांनी केली आहे. त्यामुळे पक्षविरोधी काम करणाऱ्याना मला हटविण्याचा अधिकार नाही असे तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी सांगितले. अशा कार्यकर्त्यांना जनता थारा देणार नाही.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज- कलापिनी कालामंडळाच्या वतीने गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून जुन्या संगीत नाटकांच्या आणि लोकनाट्याच्या प्रवेशांचा नाट्यबंध कलापिनीच्या सांस्कृतिक केंद्रात अलीकडेच सादर करण्यात आला.

नाट्य बंधात संगीत मानापमान, संगीत सौभद्र आणि लाडाची मैना या अजरामर नाटकातील प्रवेश डॉ.परांजपे यांच्या कुशल दिग्दर्शनाखाली उत्तम रित्या सादर झाले आणि रसिकांनीही तितक्याच उत्कटतेने दाद दिली. संगीत सौभद्र्च्या प्रवेशात कौस्तुभ रामायणे, ईशान धर्माधिकारी आणि वरुण लोमटे या कुमार भवन च्या कलाकारांचा सहभाग होता कृष्णाच्या भूमिकेतील कौस्तुभच्या गाण्याने रसिक मंत्रमुग्ध झाले. संगीत मानापमान मध्ये राजीव कुमठेकर (लक्ष्मीधर) आणि सागर कणसे (विलासधर) या जोडीने धमाल आणली.त्याच प्रमाणे माधव देसाई (धैर्यधर), प्रतीक मेहता (विनोद), सुनील गोडसे (शिलधर), अपूर्वा दामले (भामिनी) यांनीही नाट्य प्रवेशात रंगत आणली. चंद्रिका ही जणू...., या नव नवल नयनोत्सवा आणि खरा तो प्रेमा......या पदांना प्रेक्षकांनी पसंतीची दाद दिली.

लाडाची मैना या नाट्यप्रवेशात समीर नरवडे, राजीव कुमठेकर,अविनाश शिंदे,राहुल मुजुमले,सायली रौंदळ यांनीही आपल्या अभिनयाने नाट्य प्रवेशाची रंगत वाढविली जुन्या अवीट नाटकाच्या स्मृती जागृत करण्यात कालापिनीची युवा टीम चांगलीच यशस्वी झाली आणि नाट्य बंध ही संकल्पना यशस्वी होणार याची ग्वाही मिळाली. या नाट्य प्रवेशांना प्रदीप जोशी (संवादिनी) आणि विनय कशेळकर यांच्या साथीने मजा आणली. मुक्त भावसार हिची रंगभूषा होती तर वेशभूषा संजय पावसकर यांची होती. विशाखा बेके यांच्या कुशल संयोजनाखाली श्रीपाद बुरसे,चेतन पंडीत, हेमंत आपटे,हृतिक पाटील,अशोक बकरे,मुक्ता भावसार आणि आदित्य धामणकर यांनी परिश्रम घेऊन नाट्यबंध यशस्वी केले.

कलापिनीचे कलाकार नेहमीच आपल्या नवीन उपक्रमाची सुरुवात कलापिनी संस्थेला गुरु मानून कलेद्वारे गुरु वंदना करीत असतात. संपूर्ण नाटकाचा पसारा बराच मोठा असतो पण विविध नाटकातले छोटे छोटे प्रवेश सादर केले तर जास्त रंजक होतात आणि कलाकारांचे प्रशिक्षण ह्या संकल्पनेतून हे नाट्य बंध आकाराला आले आणि या पुढे अशा प्रकारची मेजवानी तळेगावच्या नाट्य रसिकांना नेहमीच मिळणार असल्याचे कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे यांनी आपल्या मनोगतात सांगितले.

 

Kalapini 2

Kalapini 5

Kalapini 3

04 Aug 2017


एमपीसी न्यूज - सेल्फी हा कसा जीवघेणा ठरू शकतो याची प्रचिती काल (गुरुवारी) पुन्हा आली. मावळातील कुंडमळा येथे एक तरुण सेल्फीच्या नादात पाय घसरुन नदीपात्रात पडला. मात्र नशीब बलवत्तर म्हणून तो स्थानिकांच्या मदतीने बचावला.

सुशील कुमार बिल्ले (वय 24. रा. काळेवाडी) असे त्या तरुणाचे नाव आहे. सुशील काल मित्रांसोबत कुंडमळा येथील रांजण खळगे बघण्यासाठी गेला होता. पाण्याचा प्रवाह पाहून त्यांना तेथे सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही.

मित्रांसोबत सेल्फी काढत असताना त्याचा पाय घसराला व तो इंद्रायणी नदीच्या पाण्यात पडला. फेसाळलेले पाणी व गतीमान प्रवाह याच्यामुळे तो क्षणार्धात दिसेनासा झाला. मित्रांनी आरडाओरड केली मात्र उपस्थित कोणीही मदतीसाठी धजावले नाहीत. शेवटी स्थानिक रहिवासी कुंडदेवी मित्र मंडळाचे कार्यकर्ते केतन भागवत, सचिन भेगडे, सुयश भेगडे, दत्ता भेगडे, अमोल भेगडे, किशोर भेगडे, आंनद ढोरे ,योगेश शेलार पुढे सरसावले व मोठ्या धाडसाने स्वतःचा जीव धोक्यात घालून दोरीच्या सहायाने सुशीलला वाचवले.

काही दिवसापुर्वीचा अतुल दशरथ पाटील ( वय 25, रा. ढोलीगाव ता. पारोळा, जि. जळगाव ) या महाविद्यालयीन युवकाचा मावळात पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. तर आंबोली घाटात दारुच्या नशेत कड्यावरुन कोसळून मृत्यू पावलेल्या तरुणाचांही थरार ताजाच आहे. त्यामुळे तरुणांनी किंवा इतर पर्यटकांनी जीव धोक्यात घालून सेल्फी काढणे किंवा दारुच्या नशेत कड्यावर जाऊ नये. कारण तो तुमच्या आयुष्यातील पर्यंटनाचा शेवटचा आंनद ठरु शकतो.

03 Aug 2017


एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेतील प्रमुख मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीतर्फे आज सकाळी (गुरुवारी) मारुती मंदिर चौक ते नगर परिषदे, असा मोर्चा काढण्यात आला. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब भेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली व गटनेते किशोर भेगडे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला.

नगर परिषद हद्दीतील नीलकंठनगर, संभाजीनगर, सर्व्हे नंबर 6523, सिद्धार्थनगर, आदी भागातील झोपडपट्टीधारक, बेघर नागरिक आदींना पंतप्रधान आवास योजनेतून घरे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या योजनेसंबंधीच्या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीच्या नगरसेविका वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, नगरसेवक संतोष भेगडे, अरूण माने, विशाल दाभाडे यांच्यासह कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. नगर परिषदेचे अधिकारी अनगळ यांनी निवेदन स्वीकारले.

यावेळी किशोर  भेगडे  म्हणाले की, झोपडपट्टी धारक व गोरगरिबांना या योजनेचा लाभ मिळालाच पाहिजे. स्थानिक लाभार्थींना  विश्वासात घेऊन पारदर्शकपणे योजना राबवायला हवी. ख-या लाभार्थींवर अन्याय  होऊ देणार नाही.

निवेदनात करण्यात आलेल्या महत्वाच्या मागण्या - 

ही योजना लागू करताना संबंधित झोपडपट्टी धारकाला विश्वासात घ्यावे. त्यांना योजनेविषयी सविस्तर माहिती द्यावी. या योजनेमध्ये पूनर्वसनासाठी चार पर्याय उपलब्ध असून नगरपरिषदेने डेव्हलपमेंट प्लॅन तयार करून त्या-त्या भागातील लाभार्थ्यांचे त्या ठिकाणीच पुनर्वसन करावे.

तळ्याकाठी सर्वे नंबर 6523 मधील रणजितसिंह  दाभाडे कॉलनीवर निवासी क्षेत्राचा आरक्षणाचा ठराव पारित करावा. त्यावरील झोपडपट्टीधारकांना त्याच ठिकाणी जागा विकसित करून  भूखंड देण्यात यावा. ज्या ठिकाणी जागेचे क्षेत्रफळ कमी परंतु झोपड्यांची संख्या अधिक आहे. त्यांचे पूनर्वसन करताना लाभार्थींना भरावे लागणारे पैसे नगरपरिषदेने भरावेत.

ज्या झोपडपट्ट्या सन 2005 च्या अगोदरच्या आहेत, त्या नागरिकांचे पूनर्वसन करताना नगरपरिषदेने आरक्षण क्रमांक 78,79,82 कलम 37 अन्वये बदलून त्या ठिकाणी नियोजित विकास आराखडा तयार करून त्याठिकाणी नागरिकांना भूखंडाचे वाटप करावे.

नगर परिषदेच्या हद्दीत समाविष्ट केलेल्या भागात बेघरांसाठी घरांचे आरक्षण टाकावे.

बहुमजली इमारत उभारल्यास त्यातील लिफ्ट व दुरुस्ती खर्च नगरपरिषदेने करावा. अपंग (दिव्यांग) व्यक्तींना या योजनेत समाविष्ट करून घेऊन त्यांना हक्काचे घर देऊन त्यांना भरावयाची रक्कम नगरपरिषदेने भरावी. आदी मागण्या  निवेदनात करण्यात आल्या आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगरसेवक अरुण माने यांनी केले. आभार नगरसेवक संतोष भेगडे यांनी मानले.      

IMG 20170803 WA0039

03 Aug 2017


आमदार बाळा भेगडे यांनी दिली माहिती 

एमपीसी न्यूज - मावळ गोळीबार प्रकरणातील आंदोलनातील शेतक-यांवरील गुन्हे सरकार मागे घेणार आहे. आठ ऑगस्ट रोजी हे गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत, असे आश्वासन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती मावळचे आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची आज (गुरुवारी) भेट घेऊन शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली. मुनगंटीवर यांनी त्वरित गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर दळवी, भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना मावळ विभाग प्रमुख राजू खांडभोर, शिवसेना ज्येष्ठ नेते भारत ठाकूर, भाजयुमेचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कार्याध्यक्ष अजित आगळे, राजेश मु-हे, संदीप भुतडा, मधुकर धामणकर, रामा गोपाळे, संभाजी म्हाळसकर तसेच आंदोलक व शेतकरी उपस्थित होते.

9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातून भुमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई महामार्गावर  आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मावळातील सुमारे 190 शेतक-यांवर गुन्हे दाखल केले होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांच्यासोबत आमदार बाळा भेगडे आणि शेतक-यांची मुंबईत बैठक झाली. यावेळी मुनगंटीवर म्हणाले, आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हे अत्यंत योग्य होते. आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. नुकसानी बाबत चुकीची माहिती देऊन आंदोलक शेतक-यावर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

सरकार शेतक-यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. चुकीच्या मार्गाने नोंदविलेले गुन्हे निश्चितपणे मागे घेण्यात येतील. आठ ऑगस्ट रोजी बैठक घेऊन गुन्हे मागे घेण्यात येतील, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले आहे, अशी माहिती बाळा भेगडे यांनी दिली.

03 Aug 2017


इलेक्ट्रिक डीपी चोरीचे एकूण 24 गुन्हे उघडकीस

एमपीसी न्यूज - चिखली परिसरातून इलेक्ट्रिक डीपी चोरीच्या अनुषंगाने सहा संशयितांना तळेगावच्या स्थानिक तपासी पथकाने ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी पुणे व पिंपरी-चिंचवड शहर व ग्रामीण परिसरात 24  इलेक्ट्रिक डिपी चोरल्याचे उघड झाले आहे. यामध्ये दोन आरोपी फरार झाले आहेत.

अब्दुल कलाम याकूब शेख, (वय 33, रा.कुदळवाडी चिखली), जलालुद्दीन रजा मणियार (वय 32, रा. वासुलीफाटा ता. खेड), रामेशकुमार कल्लू मातब्बर चौहान (वय 22, रा. कुदळवाडी चिखली), कुतूबुद्दीन हसन शेख (वय 35, रा कुदळवाडी चिखली), नूरमोहमद हबीब शेख, (वय 24 रा. शिवाजीनगर नाशिक सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश), अमीरउद्दीन हैतुल्ला शेख (वय 25 रा. शिवाजीनगर नाशिक मूळ रा. सिद्धार्थनगर उत्तरप्रदेश), ताहीर (फरार,पूर्ण नाव माहित नाही रा. कुदळवाडी चिखली),  खोड्या (फरार,पूर्ण नाव माहित नाही रा.कुदळवाडी चिखली) आरोपींना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी तळेगाव दाभाडे, वडगाव मावळ, तळेगाव एमआयडीसी, लोणीकंद आणि चाकण या पोलीस ठाण्याच्या हद्दीत इलेक्ट्रिक डीपीच्या चोऱ्या केल्याची कबुली दिली. तपासामध्ये तळेगाव पोलीस ठाण्यात 10 गुन्हे, वडगाव मावळ पोलीस ठाण्यात 5 गुन्हे, लोणीकंद येथे  4 गुन्हे, चाकण पोलीस ठाण्यात 4 गुन्हे तसेच तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात 1 गुन्हा, असे इलेक्ट्रिक डीपी चोरीचे एकूण 24 गुन्हे उघडकीस आले आहेत.

यामध्ये पोलिसांनी चोरीस गेलेली 1035 किलो (100%) तांब्याची तार/पट्ट्या असा माल जप्त आहे. वरील सर्व आरोपींना उद्या वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

Page 4 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start