• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
10 Aug 2017


सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण

एमपीसी न्यूज - इंदोरी मावळ येथील इंद्रायणी नदीवरील ब्रिटिश कालीन पुलाचे साफसफाईचे काम इंदोरी शहर राष्ट्रवादी कोंग्रेस मार्फत आज (गुरुवार) युद्धपातळीवर करण्यात आले. यावेळी ब्रिटिश कालीन पुलावरील वड, पिंपळ, गवत तसेच जंगली झाडे तोडून पुलाची साफसफाई करण्यात आली.

यावेळी मावळ तालुका पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, तंटामुक्ती समिती इंदोरी अध्यक्ष रमेश घोजगे, राष्ट्रवादी काँग्रेस इंदोरी अध्यक्ष दिलीप ढोरे, प्रदीप काशिद, ऋषिकेश लोंढे, उपसरपंच नारायण पवळे, प्रशांत भागवत, सुनील हिंगे, मारुती भापकर, नारायण पवार, साहेबराव काशिद, आशिष ढोरे, आंकुश ढोरे, अरुण काशिद आदि उपस्थित होते.

यावेळी महाड येथील राजावाडी परिसरातील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेत मृत पावलेल्या निष्पाप नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. महाड येथील राजावाडी परिसरातील सावित्री नदीवरील दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर कोकणातील ब्रिटिशकालीन पुलांचे 'स्ट्रक्चरल ऑडिट' करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते. याच पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ब्रिटिशकालीन पुलांचेही 'स्ट्रक्चरल ऑडिट' होणे काळाची गरज बनली असल्याचे तंटा मुक्ती समिती इंदोरी अध्यक्ष रमेश घोजगे यांनी यावेळी म्हणाले.

माजी उपसरपंच प्रशांत भागवत म्हणाले की, तळेगाव दाभाडे-चाकण रस्त्यावरील इंदोरी येथे इंद्रायणी नदीवर इंग्रजांनी बांधलेल्या सुमारे दीडशे वर्षे जुना ब्रिटिशकालीन पूल सुमारे तीनशे मीटर लांबीचा आहे. इंदोरी आणि पंचक्रोशीतील स्थानिक नागरिक या पुलावरून मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. सध्या या पुलावरील रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठ्या भेगा पडल्या आहेत. त्यामुळे मोठा अनर्थ होण्यापूर्वी याची योग्य दुरुस्ती होणे आवश्यक आहे.       

10 Aug 2017


एमपीसी न्यूज - आपण ज्या तळमळीने काम करतो त्यावर आपले भविष्य अवलंबून असते. केलेल्या कामातून समाजात आपली ओळख निर्माण होते. केवळ मोठ्या पदावरील खुर्चीवर बसून मान मिळत नाही. त्यासाठी अपार मेहनत करावी लागते तेव्हा यश मिळते, विद्यार्थ्यांनी आपल्या कर्तृत्वातून स्वतःला सिद्ध करावे, असे मत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक अंकुशराव आंबेकर यांनी केले.

वडगाव मावळ येथील मॅजेस्टिक डेव्हलपर्सचे संचालक रोहित सुदेश गिरमे यांच्या वाढदिवसानिमित्त (बुधवारी) वडगाव मावळ ठाकर वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील आयोजित कार्यक्रमात आंबेकर बोलत होते. यावेळी मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे संचालक पंढरीनाथ ढोरे, माजी सरपंच राजेंद्र कुडे, व्याख्याते विवेक गुरव, वडगाव लायन्स क्लबचे माजी अध्यक्ष बाळासाहेब बोरावके, उद्योजक गणेश भेगडे, माजी उपसरपंच विशाल वहिले, ज्येष्ठ पत्रकार सुदेश गिरमे, पत्रकार गणेश विनोदे, प्रभाकर तुमकर, पोटोबा देवस्थानचे विश्वस्त मंगेश खैरे, अॅड. अजित वहिले, शिवाजी घारे, उत्कृष्ट क्रिकेट खेळाडू शैलेश वहिले, शेखर वहिले, दादा ढमाले, समीर घुमटकर, अजय भवार, संजय लोणकर, आदित्य म्हाळसकर, मनोज पानसरे, आफताब सय्यद, मकरंद कुंभार, यतिश वाघमारे आदी उपस्थित होते.

आंबेकर पुढे म्हणाले की, मागील दहा वर्षांपासून गिरमे परिवाराकडून वाढदिवसाच्या अनावश्यक खर्चाला टाळून ते खर्च समाजातील वंचित घटकांसाठी ती मदत करीत असतात. शाळेची गरज ओळखून शाळेला संगणक भेट देण्यात आला. तसेच शाळेसाठी व विद्यार्थ्यांसाठी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक महादेव कट्टे यांनी प्रास्ताविक केले. उपशिक्षक पायगुडे यांनी आभार मानले.

10 Aug 2017

एमपीसी न्यूज- मुंबईला मराठा क्रांती मुक मोर्चासाठी निघालेल्या सर्व मराठा बांधवांना उर्से टोल नाका येथे मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या वतीने बाळा भेगडे स्नेह ग्रुप कार्यकर्त्यांनी मोफत पाणी वाटप केले.

यावेळी भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष विनायक भेगडे. भाजपा कार्याध्यक्ष गोकुळ किरवे, आमदार बाळा भेगडे स्नेह ग्रुपचे संथापक संदीप भेगडे, सुनील कांबळे , सागर खोल्लम, गौरव गुंड, संदीप सावंत, अविनाश दरेकर, रामदास भेगडे, अनिल गोळे , अविनाश पिंजण , केदार भेगडे इतर युवा मोर्चा कार्यकर्ते उपस्थित होते.

09 Aug 2017

मावळ खादी ग्रामोद्योग संघाची मागणी

एमपीसी न्यूज - जिल्ह्यातील ज्या खादी ग्रामोद्योग संघाकडे जिल्हा बँकेची थकबाकी नाही अशा संघाला जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करून ग्रामीण भागातील बेरोजगारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाचे चेअरमन तथा संत तुकाराम सहकारी साखर कारखाना सचांलक अंकुश आंबेकर यांनी केली आहे.

याबाबत उपाध्यक्ष गणेश भांगरे, संचालक चंद्रजित वाघमारे, सोपान कदम, साहेबराव मोहिते, चंद्रकांत दहिभाते, सुदेश गिरमे, विजय साबळे, कल्पना कांबळे, भावना ओव्हाळ, लक्ष्मण भालेराव, नवनाथ हारपुडे, सचिव श्रीरंग पिचड आदींच्या सह्यांचे निवेदन जिल्हा बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात, उपाध्यक्षा अर्चना घारे, मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार भोसले यांना दिले आहे.

मावळ तालुका खादी ग्रामोद्योग संघाने बँक पातळीवर शंभर टक्के वसुली केली असून जिल्हात सर्वात जास्त ठेवी असणारा संघ म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. जिल्ह्यातील शंभर टक्के बँक वसुली असलेल्या मावळ तालुका संघाला जिल्हा बँकेने कर्ज पुरवठा करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

जिल्हा बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार भोसले यांनी या मागणीवर सकारत्मक भूमिका घेत लवकरच कर्ज पुरवठा सुरू करण्याचे आश्वासन यावेळी त्यांनी दिले आहे. यामुळे मावळ तालुक्यातील गरजू कारागीरांना व्यवसायासाठी कर्ज मिळेल असे अंकुश आंबेकर यांनी सांगितले.

09 Aug 2017

मोफत आरोग्य तपासणी, औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि शस्त्रक्रियाही!

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे-पालवे यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच मावळ गोळीबारातील शहिदांच्या स्मरणार्थ भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते आणि लोकनेते स्व. गोपीनाथराव मुंढे प्रतिष्ठान यांच्या वतीने पवनानगर येथे आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाशिबिराच्या पहिल्याच दिवशी पाच हजारपेक्षा अधिक रुग्णांची तपासणी करण्यात आली.

तळेगाव दाभाडेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी हे महाशिबिर आयोजित केले आहे. हे महाशिबिर उद्या (बुधवार) देखील सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

येळसे, पवनानगर येथील शिवप्रसाद मंगल कार्यालयात झालेल्या या महाशिबिराचे उद्घाटन मावळचे आमदार संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते झाले. यावेळी पुणे जिल्हा भाजपचे ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, माजी आमदार दिगंबरशेठ भेगडे, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, पंचायत समितीचे माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, माजी तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे, माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, रवींद्र दाभाडे, माजी विरोधी पक्षनेते गणेश भेगडे, नगरसेवक संदीप शेळके, सामाजिक कार्यकर्ते शंकरराव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.

महाशिबिरात हृदयरोग, कॅन्सर, मणक्याचे आजार, मोतीबिंदू व तिरळेपणा, कान, नाक व घसा, पोटातील गाठी, फाटलेले ओठ व टाळूवरील शस्त्रक्रियांसाठी रुग्णांची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. आवश्यकता असलेल्या रुग्णांवर लवकरच रुग्णालयात मोफत शस्त्रक्रियाही केल्या जाणार आहेत. दंतचिकित्सा, त्वचारोग, रक्तदाब, मधुमेह, रक्त तपासणी, स्त्रीरोग तपासणी, किडनी व मूत्रमार्गाचे विकार, अपेन्डिक्स, हार्निया, अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी आदी सर्व प्रकारच्या मोफत चाचण्या व उपचारांची मोफत सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. श्रवण यंत्र, चष्मा, अपंगांना जयपूर फूट यांचे मोफत वाटप करण्यात येत आहे. सर्व रुग्णांना औषधही मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहेत. शिबिराच्या ठिकाणी नागरिकांना येण्या-जाण्यासाठी त्यांच्या गावापासून मोफत वाहनव्यवस्था देखील करण्यात आली आहे. त्यासाठी सुमारे 150 वाहनांची सोय करण्यात आली आहे. शिबिराच्या ठिकाणी रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी मोफत चहापान आणि अल्पोपहाराची देखील व्यवस्था करण्यात आली आहे.

महाशिबिरात पवना हॉस्पिटल, स्पर्श हॉस्पिटल, मायमर मेडिकल कॉलेज, डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद मावळ, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे, हिमालया ड्रग कंपनी, सेनफोर फार्मासिटिकल, अलकेन लॅबोरेटरी, एफडीसी कंपनी, एबोट हेल्थ केअर या संस्था सहभागी झाल्या आहेत. पिंपरी-चिंचवड केमिस्ट असोसिएशनचे सचिव अतुल शहा यांच्या प्रयत्नांतून मोफत औषधे उपलब्ध झाली आहेत, अशी माहिती शेळके यांनी दिली.

पवन मावळातील सुमारे 50 पेक्षा अधिक गावांमधील ग्रामस्थ या महाशिबिराचा लाभ घेत आहेत. याच उपक्रमाचा भाग म्हणून मावळ तालुक्यात ठिकठिकाणी अशाच आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया महाशिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुनील शेळके यांनी दिली. 'सुंदर मावळ, निरामय मावळ' हा संकल्प करून आयोजित केलेल्या या महाशिबिरांचा मावळातील सर्व नागरिकांनी या लाभ घ्यावा, असे आवाहनही शेळके यांनी केले आहे.

shibir2

shibir 1

09 Aug 2017

पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलनातील हुतात्म्यांना पवनानगर येथे श्रद्धांजली

एमपीसी न्यूज - पवना जलवाहिनी प्रकल्प पूर्णपणे रद्द झाल्यानंतरच पवना बंद जलवाहिनी विरोधी आंदोलन पूर्णत्वास जाणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा बंद होण्यासाठी शिष्टमंडळासह मुख्यमंत्र्यांकडे मागणी करणार असल्याचे मावळ तालुक्याचे आमदार बाळा भेगडे यांनी आज (बुधवारी) जाहीर केले. 

पवना बंद जलवाहिनीच्या विरोधात 9 ऑगस्ट 2011 साली पुकारलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी शेतकऱ्यांवर केलेल्या गोळीबारात येळसे येथील कांताबाई ठाकर, शिवणे येथील मोरेश्वर साठे व सवडली येथील श्यामराव तुपे या तीन बळीराजांना आपले प्राण गमवावे लागले होते. या घटनेस आज (बुधवारी) सहा वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर हुतात्म्यांच्या सहाव्या स्मृतिदिनानिमित्त पवनानगर येथे श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार भेगडे बोलत होते.

येळसे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ असलेल्या हुतात्मा स्मारकाला अभिवादन करून क्रांतीज्योती मिरवणुकीचे सभास्थळी आगमन झाले. येळसे येथील श्रद्धांजली सभेला आमदार बाळा भेगडे, माजी आमदार दिगंबर भेगडे, ज्येष्ठ नेते केशवराव वाडेकर, भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार, तळेगावचे माजी नगराध्यक्ष बाळासाहेब जांभूळकर, मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, एकनाथ टिळे, लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, शिवसेनेचे तालुका प्रमुख राजू खांडभोर, भारत ठाकूर तसेच भास्करराव म्हाळसकर, रवींद्र दाभाडे, भाऊ गुंड, रवींद्र भेगडे, अविनाश बवरे, गणेश भेगडे, बाळासाहेब जाधव, संदीप शेळके, बाबा शेट्टी, रघुवीर शेलार आदी उपस्थित होते.

190 शेतकऱ्यांवरील जीवे मारण्याचा प्रयत्न यासह गंभीर गुन्हे मागे घेण्याबाबत क्रांतिकारक निर्णय घेतल्याबद्दल सुधीर मुनगंटीवार व मंत्रीगटाच्या सदस्यांचे आमदार भेगडे यांनी आभार व्यक्त केले. शेतकऱ्यांकडून 70 लाख नुकसान भरपाईची मागणी होती, पण एक रुपयाही भरणार नसल्याचे भेगडे यांनी स्पष्ट केले. गोळीबारातील जखमींना, दिव्यांगांना नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही भेगडे यांनी सांगितले.

श्रद्धांजली सभेत राज्याचे अर्थ आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा व्हिडिओ संदेश दाखविण्यात आला. आपल्या संदेशात मुनगंटीवार म्हणाले की, शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागतोय. शेतकऱ्यांवरील अन्याय दूर करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न केले जातील. शेतकऱ्यांना आनंदाने जगता येईल असा प्रयत्न सरकारकडून केले जातील, असे आश्वासन मुनगंटीवार यांनी दिले.

यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले की, भाजपची सत्ता असताना शेतकऱ्यांवर अन्याय होता कामा नये, हीच अपेक्षा आहे. आरोग्य शिबिराचे आयोजन ही पुण्याची संधी. एक रुपयाही न घेता तपासणी, उपचार देताना आनंद होतोय.

भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकरराव शेलार यांनी आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतल्याबद्दल आभार व्यक्त करताना बंद जलवाहिनी प्रकल्पच रद्द करून पवना नदीतून पिंपरी-चिंचवडला पाणी द्यावे अशी मागणी केली.

शिवसेना तालुकाप्रमुख राजू खांडभोर म्हणाले, पाणी मागितले तर गोळ्या देणारे सरकार उलथवून लावले. त्या घटनेच्या जखमा आजही ताज्या आहेत. गोळीबाराचा आदेश देणाऱ्या संदीप कर्णिक यांना गडचिरोलीला पाठवून पवना जलवाहिनी कायमची रद्द व्हावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.

ज्ञानेश्वर दळवी म्हणाले की, पाणी आहे तर लक्ष्मी आहे. समृद्धी आहे. पाण्यासाठी लढा द्यावा लागला. तेव्हाच्या शासनाने बेकायदा, बेछूट गोळीबार केला. 190 आंदोलक शेतकऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल केले. भाजप सरकार आल्यानंतर मृतांच्या वारसांना नोकरी मिळाली. आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले, हे स्वागतार्ह आहे. मात्र बंद जलवाहिनी प्रकल्प रद्द करावा अशी त्यांनी मागणी केली.

प्रास्ताविक संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक पांडुरंग ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन विश्वनाथ जाधव यांनी केले.

Maval

08 Aug 2017

आमदार बाळा भेगडे यांची माहिती

एमपीसी न्यूज - मावळ गोळीबार प्रकरणातील आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे सरकार मागे घेणार आहे. अर्थमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या एका समितीने यावर चर्चा केली आहे.  या चर्चेचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवला जाणार असून यावर अंतिम निर्णय मुख्यमंत्रीच घेणार आहेत, अशी माहिती आमदार बाळा भेगडे यांनी दिली.

आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांची 3 ऑगस्ट रोजी भेट घेऊन शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंती केली होती. त्यावर मुनगंटीवर यांनी गुन्हे मागे घेण्याचे आश्वासन दिले होते.

या शिष्टमंडळात भारतीय किसान संघाचे जिल्हाध्यक्ष शंकर शेलार, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती एकनाथ टिळे, ज्ञानेश्वर  दळवी, भाजपचे मावळ प्रभारी भास्करराव म्हाळसकर, आरपीआयचे अध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, भाजप अध्यक्ष प्रशांत ढोरे, शिवसेना मावळ विभाग प्रमुख राजू खांडभोर,  शिवसेना ज्येष्ठ नेते भारत ठाकूर, भाजयुमोचे अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, कार्याध्यक्ष अजित आगळे, राजेश मु-हे, संदीप भुतडा, मधुकर धामणकर, रामा गोपाळे, संभाजी म्हाळसकर तसेच आंदोलक व शेतकरी उपस्थित होते.

9 ऑगस्ट 2011 रोजी पवना धरणातून भूमिगत जलवाहिनीच्या विरोधात शेतकर्‍यांनी पुणे-मुंबई महामार्गावर आंदोलन केले होते. आंदोलनाला हिंसक वळण मिळाल्यामुळे पोलिसांनी गोळीबार केला होता. या गोळीबारात तीन शेतकर्‍यांचा बळी गेला होता. त्यानंतर तत्कालीन सरकारने मावळातील सुमारे 190 शेतक-यांवर गुन्हे दाखल केले होते. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर आणि आमदार बाळा भेगडे यांच्यात 3 ऑगस्ट रोजी मुंबईत बैठक झाली. यावेळी मुनगंटीवर म्हणाले, आमदार भेगडे यांच्या नेतृत्वाखाली झालेले आंदोलन हे अत्यंत योग्य होते. आंदोलक शेतक-यांवरील गुन्हे मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. नुकसानीबाबत चुकीची माहिती देऊन आंदोलक शेतक-यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी रविवारी इंदोरी येथील कै. दादू इंदुरीकर अंध अनाथ मुलांच्या संस्थेमधील अंध मुलांना राखी बांधून राखी पौर्णिमा एक दिवस अगोदरच साजरी केली.

मावळ तालुक्यातील इंदोरी येथे अंध अनाथ मुलांची निवासी शाळा आहे. या शाळेतील विद्यार्थ्यांना राखी पौर्णिमेचा आनंद साजरा करता यावा, यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी एक नवी टूम काढली. शरीराने अंधत्व आलेले आणि नशिबाने अनाथत्व आलेल्या मुलांना आयुष्यातल्या एखाद्या राखीपौर्णिमेदिवशी अशा डोळस बहिणी राखी बांधतील अशी पुसटशी कल्पना देखील त्यांच्या मनात आली नसेल. परंतु साक्षात डोळस बहिणींनी राखी बांधल्यानंतर मात्र त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला.

भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे नाते जपण्याचा प्रत्यत्न इंद्रायणी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थिनींनी केला आहे. राष्ट्रीय सेवा योजना म्हणजे केवळ स्वच्छता आणि साफसफाई नव्हे तर अनाथांचा नाथ होणे किंवा गरजूंना मदत करणे देखील राष्ट्रीय सेवा योजनाच आहे. अंध अनाथ संस्थेचे शिक्षक हिरे यांनी यावेळी सर्व विद्यार्थ्यांना अंध संस्थेविषयी माहिती सांगितली. यावेळी सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर तुमकर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. आर. आर. डोके यांनी केले.

07 Aug 2017

'जनतेच्या हितापेक्षा स्वहिताला प्राधान्य दिल्याने पक्षाची पिछेहाट'

एमपीसी न्यूज - पक्षविरोधी काम करणाऱ्यांच्याच हाती मावळातील राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्रे असून या मंडळींनी केवळ स्वहिताचाच अजेंडा राबवत सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांकडे डोळेझाक केल्यामुळे तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पिछेहाट सुरू आहे, असा घणाघाती आरोप तळेगाव दाभाडे येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे यांनी केला आहे. 

 

तळेगाव दाभाडे येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यामध्ये तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे यांना हटविण्याची मागणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर नगरसेवक किशोर भेगडे यांनी सविस्तर भूमिका 'एमपीसी न्यूज'शी बोलताना स्पष्ट केली. त्यात त्यांनी तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे व पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे यांच्या कार्यपध्दतीवर सडकून टीका केली. 

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 10 जून 1999 ला स्थापना झाली. अवघ्या सहा महिन्यांत पक्षाला विधानसभेच्या निवडणुकीला सामोरे जावे लागले. पहिल्या निवडणुकीत अधिकृत उमेदवार कृष्णराव भेगडे, सन 2004 चे अधिकृत उमेदवार मदन बाफना तर 2009 मध्ये बापूसाहेब भेगडे हे अधिकृत उमेदवार आणि सन 2014 मध्ये माऊली दाभाडे यांच्या रूपाने अधिकृत उमेदवारी होती. पक्षाच्या या चारही अधिकृत उमेदवारांना पराभवाला सामोरे जावे लागले. या चारही जेष्ठांना विचारा की, बाळासाहेब नेवाळे यांनी प्रामाणिकपणे पक्षाचे काम केलं का, असा सवाल भेगडे यांनी केला. 'पदरी पडलं अन पवित्र झाले' या न्यायाने दादांनी त्यांना पक्षात ठेवले असले तरी त्यांनी इतरांना 'पक्षनिष्ठा ' शिकवू नये, असेही भेगडे यांनी सुनावले.

 

त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत दादांनी मावळ मधून अधिकृत उमेदवार म्हणून माऊली दाभाडे यांच्या नावाची घोषणा केली असतांना; पक्षाच्या विरोधात बंडखोरी करत नेवाळे यांनी अपक्ष निवडणूक लढविली. तेव्हा कुठे गेली होती, पक्षनिष्ठा आणि पक्ष प्रेम, असा सवाल भेगडे यांनी उपस्थित केला.

 

स्वहित कसे साध्य करता येईल याचा एक आदर्श नमुना म्हणजे पुत्रप्रेमाने आंधळे झालेले तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे यांनी त्यांच्याच जिल्हा परिषद गटात मुलाला उमेदवारी घेऊन निवडणुकीत पुरता पराभव होऊन तिसऱ्या क्रमांकाची मते पडली. अर्थात त्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून अध्यक्षपदाचा राजीनामा देणे आवश्यक होते. मात्र पदाला चिकटून राहिले, अशी टीका भेगडे यांनी केली. हट्टाने पदे मागून घेता, साधा उमेदवार निवडून आणता येत नाही ही नामुष्की आहे, अशी टिप्पणी त्यांनी केली.

 

नुसत्या भावकीमध्ये भांडणे लावून पक्ष विस्तार होत नाही. तुम्हांला पक्षाचे हित दिसले तर; स्वत:च्या मुलाला व नेवाळे यांनी भाच्याला उमेदवारी दिली. मग तालुक्यात पक्षाकडे यांच्या व्यतिरिक्त जनमानसात चांगली प्रतिमा असलेले, सक्षम उमेदवार नव्हते का? स्वतःच्या हट्टापायी पक्षाची हानी करायची ही कुठली रीत, हेच का पक्षाचे हित, असा सवाल भेगडे यांनी केला.

 

स्वत:च्या फायद्यासाठी पक्षाला समांतर अशी संघटना स्थापन केली आहे. हे दोघे मिळून कुणाचेही न ऐकता पक्षाचा मनमानी कारभार करतात. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना सुद्धा बैठकीस साधे निमंत्रण देत नाही. यांचा फक्त एकच कार्यक्रम आहे. पदे देऊन नियुक्त्या करणे आणि सत्कार समारंभ या व्यतिरिक्त काहीच नाही, असा शेराही भेगडे यांनी मारला.

 

तालुक्यात शैक्षणिक संस्था असूनही स्थानिकांची प्रवेशप्रक्रिया व वाढीव फी बाबतचे धोरण, स्थानिक विद्यार्थ्यांना प्राधान्याने प्रवेश देण्यासाठी पक्ष पातळीवर प्रयत्न होणे गरजेचे आहे. पाॅलिटेक्निक, इंजिनीअर, आयटीआय झालेल्यांना शिकाऊ उमेदवार म्हणून तर कायम स्वरूपी नोकरी साठी कंपन्यांमध्ये त्यांना रोजगारांच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न पक्षाच्या माध्यमातून होणे जरुरीचे होते . ते आजतागत झालेले नाही. 

 

पीएमआरडी व एमएसआरडीसीच्या रिंगरोड बाबत गावेच्या गावे बाधित झालेली असतांना त्या प्रश्नासाठी आंदोलन वा उपोषण केलेले कधी दिसले नाही. त्याचबरोबर एमआयडीसीच्या चौथ्या टप्प्याबाबत शेतकरी वर्गासाठी काय भूमिका पक्षाने निभावली आहे. शेतकरीवर्गाच्या पाठीशी उभे न राहता पक्षाने त्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून सोडवणूक केली नाही, या बाबत भेगडे यांनी नाराजी व्यक्त केली.

 

जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचीच सत्ता असताना मावळच्या विकासासाठी किती निधी मंजूर करून कोणकोणत्या कामासाठी वापराला यांचा लेखाजोखा पक्षाकडे असावा. ज्या कामासाठी निधी मंजूर करून आणला ती कामे अंदाजपत्रकाप्रमाणे होतात की नाही, तसेच तालुक्यात चालू असणाऱ्या विविध कामांचा दर्जा टिकविण्याबाबत लक्ष ठेवणे.अशा स्वरूपाच्या कामामध्ये पक्षाच्या माध्यमातून लक्ष पुरविले पाहीजे. तेथे लक्ष दिले गेले नाही, अशी टीका त्यांनी केली.

 

या सगळ्या गोष्टींचा विचार करताना पक्षाला पुन्हा चांगले दिवस यावे व जनमानसात पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी लोकांच्या प्रश्नांबाबत जाण असणाऱ्या निष्ठावान नेत्यांकडे पक्षसंघटनेची धुरा देणे गरजेचे आहे, अशी मागणी भेगडे यांनी केली.

06 Aug 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील निम फाटा चौक येथे सहाआसनी रिक्षा व इंडिका यांच्यात जोरदार धडक बसली. ही घटना आज दुपारी चारच्या सुमारास घडली.

यामध्ये सात जण जखमी होते. त्यांना तातडीने जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये सहा जण किरकोळ जखमी असल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना सोडून देण्यात आले आहे. तर एकाची प्रकृती गंभीर असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

Page 3 of 33
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start