• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
01 Jun 2017

एमपीसी न्यूज - चांदखेड (ता.मावळ) येथील शेतकरी कुटुंब व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कार्यकर्त्या द्रौपदाबाई मारुती बांदल (वय 86) यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.

 

द्रौपदी बांदल यांच्यामागे दोन मुले, मुलगी, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. संत रामजीबाबा विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन अशोक बांदल व तळेगाव रोटरीचे सदस्य राजेंद्र बांदल यांच्या त्या मातोश्री होत.

31 May 2017

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील वडगाव येथील युवा शेतकरी तुषार वहिले यांनी आपला वाढदिवस गरीब, होतकरू व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप करून सत्कारणी लावला. अतिरिक्त आणि वायफळ खर्च टाळून विद्यार्थ्यांना मदत केल्याने त्यांना समाधान वाटत आहे.

दिवसेंदिवस शाळेचा खर्च अवाढव्य स्वरूप वाढत चालला आहे. वाढीव खर्चाचा बोजा गरीब विद्यार्थ्यांवर पडत आहे. शिकण्याची आवड आहे, शाळेत हुशार आहे, पण घरची गरिबी असल्याने शिकता येत नाही. अशी बरीच उदाहरणे समाजात पाहायला मिळतात. हा प्रकार कमी करण्यासाठी वैयक्तिक स्तरावर आपण काय प्रयत्न करू शकतो याचा विचार प्रत्येकाने करायला हवा. असाच विचार तुषार वहिले यांनी केला व वडगाव येथील मिलिंदनगर परिसरातील विद्यार्थ्यांना वह्या व खाऊचे वाटप केले.

वह्या मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेह-यावर निरागस समाधान पसरलेले पाहून तुषार यांना वाढदिवस योग्य कामासाठी खर्ची लागल्याचे समाधान मिळाले. तुषार सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्रचे क्रियाशील सभासद असून विविध समाजकार्यात अग्रेसर असतात तसेच वडगाव येथील जय मल्हार ढोल पथकाचे ते प्रमुख आहेत.

bhiku waghere advt

31 May 2017

एमपीसी न्यूज - मावळ व मुळशी तालुक्यातून जाणारा रिंगरोड शासनाने ताबडतोब रद्द करावा अन्यथा शेतकरी रस्त्यावर उतरतील, असा इशारा मावळ व मुळशी तालुक्यातील दहा गावातील शेतक-यांनी दिला. याबाबत अनेक वेळा शासनाला निवेदने दिली असून शासनाने रिंगरोड बंदच करावा, असा सूर शेतक-यांमधून येत होता.

पोपट राक्षे, राजू राक्षे, सुनील राक्षे, दत्तात्रय राक्षे, प्रवीण राक्षे, मारुती राक्षे, शंकर लिमिन, पंढरीनाथ आमले, संतोष धामणकर, अनिल राक्षे यांसह दहा गावातील शेतक-यांनी मावळातील रिंगरोड प्रकल्प शासनाने कायमचा रद्द करावा. पर्यायी चर्चा करू नये, अशी मागणी करत पुढील दिशा ठरविण्यासाठी 2 जून रोजी गोडुंबे येथे विशेष बैठक आयोजित केली आहे.

प्रस्तावित रिंगरोड मुळशी तालुक्यातील हिंजवडी, मारुंजी, नेरे आणि मावळ तालुक्यातील सांगवडे, दारुंब्रे, साळुंब्रे, गोडुंब्रे, धामणे, परंदवडी आणि उर्से असा तळेगाव एमआयडीसी मार्गे जाणार आहे. या भागातील शेतकरी प्रस्तावित रस्त्याच्या भागात ऊस, भाजीपाला, फुलशेती, भात अशी पिके घेणारी शेकडो एकर सुपीक आणि बागायतीची जमीन यामध्ये जाण्याचा धोका असल्याने शेतक-यांकडून या रस्त्याला विरोध केला जात आहे.

या रस्त्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. तर बांधकाम व्यावसायिकांचा मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. बांधकाम व्यावसायिकांच्या फायद्यासाठी शासन या रिंगरोडसाठी धावपळ करत आहे, असे शेतक-यांचे म्हणणे आहे.

bhiku waghere advt

31 May 2017

एमपीसी न्यूज - वडगाव-कातवी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच अर्चना विलास भोकरे यांच्यावर सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम व घरात वैयक्तिक शौचालय नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्यानुसार प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे यांनी भोकरे यांना ग्रामपंचायत सदस्यपदी अपात्र ठरवत त्यांचे सरपंचपद रद्द केले आहे.

महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे  कलम 14 (ज- 3) व ज (ज-5) अन्वये कालच्या  (दि. 30)  निकालपत्रात त्यांचे सदस्यपद रद्द करण्यात आले. भोकरे यांनी व त्यांच्या कुटुंबाने सरकारी जागेत अतिक्रमण करून घराचे बेकायदा बांधकाम केले आहे. व त्यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नसल्याने त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी वडगाव ग्रामपंचायतीचे सदस्य किरण भिलारे यांनी 11 जानेवारी 2017 रोजी जिल्हाधिका-यांकडे केली होती.

याबाबत जिल्हाधिकारी काळे यांनी दोन्ही बाजूंकडून सादर करण्यात आलेले पुरावे व झालेला युक्तिवाद आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मिळालेला अहवाल या सर्व बाबींचा विचार करून काल ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द करण्यात आल्याचा आदेश देण्यात आला. त्याचबरोबर भोकरे यांच्याकडे वैयक्तिक शौचालय नसल्याने त्या सार्वजनिक शौचालयाचा वापर करत असल्यामुळे त्यांना ग्रामपंचायत सदस्यपदी कार्यरत राहण्यास अपात्र ठरविले आहे.

ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अर्चना भोकरे या भाजपच्या वतीने  निवडून आलेल्या होत्या. मागील वर्षी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व सरपंचपदी बिनविरोध निवडून आल्या. त्यांनी केलेल्या या बंडखोरीमुळे भाजपला  ग्रामपंचायतीवरील सत्ता गमवावी लागली होती. त्या गोष्टीचे मोठे शल्य भाजपला होते.

bhiku waghere advt

30 May 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील आदर्श ज्युनियर कॉलेजचा 12 वी परीक्षेचा वाणिज्य शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून विज्ञान शाखेचा निकाल 98.14 टक्के लागला आहे. दोन्ही शाखांमध्ये विद्यालयात पहिले तीनही क्रमांक मुलींनी पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे.

विद्यालयात वाणिज्य शाखेत तृप्ती संभाजी बुटे ही विद्यार्थीनी 86.92 टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम आली. द्वितीय क्रमांक काजल राजाराम मु-हे 82.92टक्के, तर तृतीय क्रमांक विजयलक्ष्मी त्रिभुवन जैस्वार 82.77 टक्के या विद्यार्थिनींनी पटकावला.

विद्यालयाच्या विज्ञान शाखेचा निकाल 98.14 टक्के लागला असून विद्यालयात प्रथम क्रमांक भाग्यश्री हरीराम वाघ 80.61 टक्के, द्वितीय क्रमांक ऐश्वर्या प्रविण मु-हे 76.46 टक्के तर तृतीय क्रमांक  उमा गोरख भोते 73.69 टक्के यांनी मिळविला आहे.

संस्थेचे अध्यक्ष डॉ.कृष्णकांत वाढोकर, सचिव डॉ. दत्तात्रय बाळसराफ, उपाध्यक्ष यादवेंद्र खळदे, प्राचार्य संजय देवकर यांनी यशस्वी विद्यार्थांचे अभिनंदन केले आहे.

मावळ तालुका 82.68 टक्क्यांवर

मावळ तालुक्यात इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी 3636 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 3632 विद्यार्थी उपस्थित राहिले आणि त्यापैकी 3003 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मावळ तालुक्याचा एकूण निकाल 82.68 टक्के लागला आहे. तालुक्यातील एकूण मुलांचा निकाल 76.61 टक्के तर मुलींचा निकाल 89.65 टक्के लागला असल्याने मावळ तालुक्यात देखील मुलींनीच बाजी मारली आहे.

30 May 2017


एक वर्षात दररोज एक वेळ तर दोन वर्षात दोन वेळ पाणीपुरवठा

एमपीसी न्यूज - नागरिकांच्या जिव्हाळ्याचा पाणी पश्न मार्गी लावण्यासाठी खर्चात मोठी बचत करून केलेल्या तांत्रिक उपाययोजनांची कामे पूर्ण झाली असून इंद्रायणी आणि पवना नदीवरील विविध कामांचे समारंभपूर्वक उद्घाटन येत्या 7 जून रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता संपूर्ण तळेगावकरांना नियमित आणि पुरेसे पाणी प्राप्त होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगरपालिकेकडून पाणी संकटावर मात करण्यासाठी योग्य प्रयत्न केले जात असून तळेगावकरांना येत्या एक वर्षात दररोज एक वेळ तर दोन वर्षात दोन वेळा पाणीपुरवठा सुरु करून भविष्यात लवकरच 24 × 7 पाणीपुरवठा करण्याचा मानस असल्याचे तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष तथा पाणी पुरवठा समितीचे सभापती सुनील शेळके यांनी सांगितले.


तळेगाव येथे आयोजित पत्रकार परिषदेत उपनगराध्यक्ष सुनील शेळके बोलत होते. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, नगरसेविका सुलोचना आवारे, केशवराव वाडेकर, पक्षप्रतोद सुशील सैंदाणे, नगरसेवक सचिन टकले, अंबर भेगडे, तळेगाव शहर भाजपा महिला आघाडी अध्यक्षा शोभा भेगडे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळगे आदी उपस्थित होते.

पाणी पुरवठा यंत्रणेतील प्रलंबित तांत्रिक दोष दूर करून गाव आणि स्टेशन विभागीतील सुमारे 60 हजार नागरिकांना येत्या 15 जून नंतर पुरेसा, सुरळीत आणि नियमित पाणी पुरवठा करण्यात येणार असल्याचे सांगून शेळके पुढे म्हणाले, ‘’ सोमाटणे पंपासह इंद्रायणी नदीवर वीजेचे एक्स्प्रेस फीडर्स बसविण्यात आले आहेत. त्यामुळे 24 तास वीज पुरवठा प्राप्त होईल आणि क्षमतेने पाणी उचलता येईल. पाणी योजनेचे नियोजन केल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. इंद्रायणी योजनेची पाणी क्षमता दुप्पट करण्यासाठी 2कोटी 93लाख रूपये खर्च अपक्षित होता. हे काम केवळ 64 लाखातच पूर्ण केले. सोमाटणे पंपासाठी दरमहा चार लाख रूपये वीजबीलाचा खर्च येतो त्यात दीड लाखाची बचत होईल. अतिरिक्त पाणी उचलल्याबद्दल वार्षिक सहालाख साठ हजार रूपयांचा दंड एमजीरीकडे भरावा लागत असे. पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त केल्याने तो खर्चही वाचणार आहे. याच पंपावरील मोटारीसाठीच्या सुमारे दोन कोटी रूपये खर्चातून 46 लाख रूपयांची बचत केली आहे..’’

शासनाच्या माध्यमातून तळेगाव शहरासाठी दीर्घकालीन इंद्रायणी योजनेसाठी 63 कोटी खर्चास राज्य शासनाने मंजुरी दिल्याचे आमदार संजय भेगडे यांनी सांगितले.

‘’पाणी योजनेतील दुरूस्ती, सुधारणा आणि सक्षमीकरण करताना स्मार्ट नियोजन केल्याने खर्चात मोठी बचत झाली आहे. इंद्रायणी योजनेची पाणी क्षमता 5 एमएलडीवरून 10 एमएलडी करण्यासाठी 2कोटी 93लाख रूपये खर्च अपक्षित होता. परंतू ती केवळ 64 लाखातच पूर्ण केली. दोन कोटी 20 लाख रूपयांची बचत केली. सोमाटणे पंपासाठी दरमहा  19 लाख  रूपये वीजबीलाचा खर्च येतो त्यात तांत्रिक बदल केल्याने सुमारे चार लाखाची बचत होणार आहे. अतिरिक्त पाणी उचलले गेल्याने गेली चारपाच वर्षे दरमहा 55 हजार रूपयांचा दंड जीवन प्राधिकरणाकडे भरावा लागत असे. आता जादा पाणी उचलण्याची परवानगी प्राप्त केल्याने तो खर्चही वाचणार आहे. याच पंपावरील मोटारीसाठीच्या एक कोटी 93 लाख खर्चातून 46 लाख रूपयांची बचत केली आहे. पुढील वर्षात दोन वेळा पाणी पुरवठा करण्याचा संकल्प आहे असल्याचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी सांगितले.

30 May 2017

एमपीसी न्यूज - कविता करणे ही एक कला असून ती प्रत्येकाने जोपासली पाहिजे. कवी हा विचारवंत असतो. अचूक शद्बात भाव मांडण्याची कला कविला अवगत असते. कविता आपले दु:ख विसरुन जाण्यास मदत करत असून कविता माणसाला जिवंत ठेवण्याचे काम करते, असे मत तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी व्यक्त केले.

नक्षत्राचं देणं काव्यमंचच्या मावळ विभागातर्फे तळेगाव येथील इंद्रायणी महाविद्यालयात राज्यस्तरीय काव्य वाचन स्पर्धा व काव्यमैफलचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी नक्षत्राचं देणं काव्यमंच्याचे अध्यक्ष प्रा. राजेंद्र सोनवणे, सुरेश घंगाळे, निलेश कुंभार, नितीन पवार, नक्षत्राचं देणं काव्यमंच मावळ विभागप्रमुख भूपेंद्र आल्हाट आदी उपस्थित होते.

कवींनी प्रथम काव्य रसिक झाले पाहिजे. आपल्या कवितेप्रमाणे इतरांच्या कवितांचे वाचन करावे. कवींनी स्वाभीमानी असले पाहिजे. कवितेवर मनापासून प्रेम करावे. कवी नसते तर जग सुंदर आहे. हे कोणाला कळले नसते. कवींनी जग सुंदर असल्याचे सांगितले आहे. कविता संवेदनशीलता जपण्यास शिकविते. भविष्यात काव्य माणसांची संजीवनी असेल, असे प्रा. राजेंद्र सोनवणे म्हणाले.

कवयित्री वीणा माच्छी यांच्या काव्यसंग्रहास ''नक्षत्र काव्य दौलत पुरस्कार 2017''  आणि नितीन पवार यांना ''साहित्य गौरव पुरस्कार 2017''  हा पुरस्कार देवून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे सूत्रंसचालन राजेंद्र सोनवणे यांनी केले. तर, भूपेंद्र आल्हाट यांनी आभार मानले.
29 May 2017

एमपीसी न्यूज - विकासाला प्राधान्यक्रम देऊन, सर्व सामान्य जनतेची कामे करा, जनता ही केंद्रबिंदू मानून विकासात्मक कार्य करून, आर्थिकदृष्ट्या ग्रामपंचायत सक्षम करा कारण ग्रामपंचायत ही विकासाची मुख्य गंगा आहे, असे समांतर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक माऊली दाभाडे म्हणाले.

नवलाख उंब्रे ग्रामपंचायतीच्या विविध विकास कामांच्या उद्घाटन प्रसंगी माउली दाभाडे बोलत होते. यावेळी सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच महेश शिर्के, सदस्य रवींद्र कडलक, संदीप शेटे, ज्योती बधाले, चिंधू बधाले, प्रभाकर बधाले, नारायण जाधव, तानाजी पडवळ, दिनकर शेटे, बाळासाहेब शेटे, बाळासाहेब वायकर आदी उपस्थित होते.

नवलाख उंब्रे  ग्रामपंचायतीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रातील मिंडेवाडी येथील पाईप लाईन (15 लाख),  नवलाख उंब्रे येथील पाईप लाईन (17 लाख), मुस्लिम समाजाचे कब्रस्थान बांधण्यासाठी (10 लाख), ग्रामपंचायत कार्यालयासाठी (40 लाख), बंदिस्त गटार योजना (50 लाख) अशा 1 कोटी 32 लाख रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन आज (सोमवार, दि. 29) रोजी समांतर राष्ट्रवादीचे संस्थापक माऊली दाभाडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. वरील कामे ग्रामपंचायत व जिल्हा परिषदेच्या निधीतून केली जाणार आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केले व सूत्रसंचालन रवींद्र कडलक तर आभार उपसरपंच महेश शिर्के यांनी व्यक्त केले.

26 May 2017

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण रस्त्यावरील माळवाडी येथे गॅरेजमालकाच्या झालेल्या निर्घृण खून प्रकरणी तळेगाव एमआयडीसी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे. गॅरेजमालकाने खुन्नस देऊन आमच्याकडे बघितल्याच्या रागातून त्याचा खून केल्याचे आरोपींनी कबूल केले आहे.

निखील रामदास पानसरे (वय 26, रा. इंदोरी, ता. मावळ), असे या गॅरेजमालकाचे नाव असून काल गुरुवारी (दि. 25) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घटना घडली होती. या प्रकरणी अक्षय राजाभाऊ मुळे (वय 18), अनिकेत अंकुश दुबे (वय 18), अतुल दीपक शिंदे (वय 18) या तिघांना पोलिसांनी कार्ला येथून आज (शुक्रवार) पहाटे तीन वाजता अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल एका हॉटेलमध्ये बसले असताना निखील याने खुन्नस देऊन पाहिले याचा राग मनात धरून त्याचा पाठलाग करून त्याला  माळवाडी येथे गाठून त्याच्या डोक्यात दगड घालून हत्या केली असल्याचे या तिघांनी कबूल केले आहे. निखिल इंदोरीकडे दुचाकीवरून जात असताना वाटेत दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्याला अडवून खाली पाडले व डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. घटनास्थळी रक्ताचा सडा पडला होता. घटनास्थळी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. भर दिवसा वर्दळीच्या राज्य महामार्गावर ही हत्या झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती.

निखील हा  बीसीएस पदवीधर होता. त्याने तळेगाव दाभाडे येथील मनोहरनगरजवळ टू व्हीलर गॅरेज सुरू केले होते.  गॅरेजचे  कामकाज आटोपून काल तो घरी जात असताना हा प्रकार घडला.

26 May 2017
एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे औषधनिर्माण शास्त्र पदवी (बी फार्म) आणि औषधनिर्माण शास्त्र पदविका (डी फार्म) या दोन महाविद्यालयांची येत्या शैक्षणिक वर्ष २०१७-२०१८ पासून सुरुवात होत आहे. तळेगाव व मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणाची योग्य संधी यानिमित्ताने मिळणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांना महाराष्ट्र शासनाने मान्यता दिली.
 
इंद्रायणी महाविद्यालयाचे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असून या वर्षी नवीन दोन महाविद्यालये सुरु झाल्याने संस्थेच्या नावलौकिकात भर पडली आहे. संस्था व्यावसायिक विद्याशाखांची प्रथमच सुरुवात करत आहे. ५०००० स्क्वेअर फूट एवढ्या क्षेत्रात अत्याधुनिक यंत्रसामुग्री, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत संगणक कक्ष अशा सर्व आवश्यक सर्व सोयी-सुविधांसह दोन्ही महाविद्यालये येत्या शैक्षणिक वर्षांपासून सुरु होत असून बारावी शास्त्र शाखेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या कोर्सेस साठी प्रवेश घेता येईल.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावर योग आणि आयुर्वेद यांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता औषध निर्माण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होत आहेत. तळेगाव आणि मावळ भागात वाढते औद्योगिकीकरण लक्षात घेता औषध निर्माण क्षेत्रालाही यामुळे या भागात चांगलीच संधी मिळणार आहे. तळेगाव रेल्वे स्थानक तसेच बस स्थानकांपासून संस्था अगदी जवळ असल्याने जवळपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांसाठी सोयीचे होणार आहे.
 
इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे विद्यमान अध्यक्ष माजी आमदार कृष्णराव भेगडे यांची आग्रही भूमिका तर संस्थेचे कार्यवाहक रामदास काकडे, खजिनदार केशवराव वाडेकर, उपाध्यक्ष मुकुंदराव खळदे, गोरखनाथ काळोखे, नियामक मंडळ सदस्य चंद्रकांत शेटे, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दत्तात्रय बाळसराफ, उपप्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. बी. जैन आदींच्या परिश्रमातून तळेगाव दाभाडे येथील पहिलेच बी. फार्मसी आणि डी. फार्मसी महाविद्यालयाची सुरुवात होत आहे. या महाविद्यालयांच्या निर्मितीसाठी आतापर्यंत ६.५ कोटी खर्च करण्यात आला असून पुढे आणखी जवळपास ५ कोटी खर्च करण्यात येणार आहे.
 
भारतातील शिखर संस्थांची मान्यता
महाराष्ट्र शासनाने येत्या शैक्षणिक वर्षापासून बी. फार्मसी आणि डी. फार्मसी महाविद्यालये सुरु करण्यासाठी नुकतीच मान्यता दिली आहे. तसेच अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद ( A. I. C. T. E. ) नवी दिल्ली आणि फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया ( P. C. I. ) या शिखर संस्थांची देखील मान्यता मिळाली आहे. बी. फार्मसी महाविद्यालयाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेर आणि डी. फार्मसी महाविद्यालयाला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई ( M. S. B. T. E. ) ची मान्यता मिळाली आहे. मोठ्या संस्थांची मान्यता मिळाल्याने महाविद्यालयांच्या गुणवत्तेत निश्चितच वाढ होणार आहे.
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start