• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
20 Aug 2017


एमपीसी न्यूज - मध्यंतरी विश्रांती घेतलेल्या पावसाने मावळ तालुक्याला चांगलेच झोडपले. शनिवारी मध्यरात्री पासून तालुक्यात सर्वत्र पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. या पावसाच्या जोरदार आगमनाने नद्या, ओढे - नाले दुतर्फा भरून वाहत आहेत. तालुक्यातील विविध धरणांच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. भात खाचरे पाण्याने तुडूंब भरली आहेत.

मावळ आणि परिसरातील पावसाचे जोरदार पुनरागमनाने शेतक-यांची मने सुखावली असून भातपिकास हा पाऊस उपयुक्त असल्याची माहिती माळवाडी येथील प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय दाभाडे यांनी दिली. तालुक्यात आजही भात हेच प्रमुख पीक असून त्यावर उपजीविका अवलंबून आहे.हा पाऊस भातपिकास पोषक आहे.

वेळेवर पाऊस पडल्याने भातपिकास उतारा चांगला पडेल अशी माहिती सडवली येथील प्रगतिशील शेतकरी दत्तात्रय ओझरकर यांनी दिली.

20 Aug 2017


एमपीसी न्यूज - नवलाख उंबरे व बधालेवस्ती येथील पहिली व दुसरीच्या 125 विद्यार्थी व विद्यार्थ्यांनींना दप्तर व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी नवलाख उंबरे गावाचे सरपंच दत्तात्रय पडवळ, सी. एस. आर. समन्वयक एल ॲण्ड टी कंपनी संदीप कणसे, सी. एस. आर. प्रतिनिधी सुजाता दुर्गकर, प्रियांका जगताप यांचे हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.

यावेळी दत्ता शिवेकर ,विनायक बधाले ,नितिन बधाले माऊली डिंबळे, पांडुरंग दाभाडे ,अनिल बाबर, मयुर नरवडे, लक्ष्मण पापळ, महादेव बधाले, किरण जाधव, सचिन बधाले, प्रभाकर बधाले, आकाश बधाले, सुभाष मोधळे, मच्छिंद्र चोरघे, मुख्याध्यापक विजय चव्हाण, सुर्यवंशी मॅडम, गुजर मॅडम, हिरामण बधाले सर व सर्व शिक्षक व विद्यार्थीं मोठया संख्येने उपस्थित होते.

संदीप कणसे म्हणाले की, एल अँड टी कंपनी अनेक सामाजिक उपक्रम राबवते. या उपक्रमांतर्गत आरोग्य शिबिर, मोबाईल व्हॅनही कंपनीने चालु केली आहे. त्याचा फायदा आंदर मावळ मधील अनेक लोकांना मोठ्या प्रमाणात होत आहे .कंपनी आपले उपक्रम शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्याचे काम पुढील काळात करणार आहे .यामध्ये वर्ग खोल्या, खेळण्यासाठी मैदान, पाणी आडवा पाणी जिरवा यावर भर देणार आहे.

सरपंच दत्तात्रय पडवळ आपल्या भाषणात म्हणाले कि, कंपन्यांनी जर प्रत्येक गावात विकास करण्याचे ठरविले तर मावळचा विकास होण्यासाठी वेळ लागणार नाही. कंपन्यांनी आपला सी एस आर हा गावासाठी खर्च करावा. गरजूंना मदत करावी आणि पुढील काळातही अशीच मदत करावी. शिक्षणासाठी खर्च न करता तरुण वर्गाला प्रशिक्षण दयावे व आपल्या कंपनीत रोजगार उपलब्ध करुन दयावेत. यामुळे तरुणांना इतर तालूक्यात कामासाठी जावे लागणार नाही.

या दप्तरामध्ये शाळेत लागणारे सर्व साहित्य विद्यार्थ्यांना मिळाल्यामुळे त्यांच्या मुखावरून आनंद ओसंडून वाहत होता. या प्रसंगी सरपंच व ग्रामस्थांनी कंपनी व्यवस्थापनाचे कौतुक करून आभार ही व्यक्त केले.

सुत्रसंचालन अरविंद बधाले व आभार संदीप उडाफे यांनी मानले.

18 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - सुदुंबरे (ता. मावळ) येथील वारकरी संप्रदाय व शेतकरी कुटुंबातील किसन भाऊसाहेब गाडे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते 86 वर्षांचे होते.

त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे. किसान गाडे प्रसिद्ध बैल व्यापारी होते. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सचिव आनंदा गाडे व माजी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल गाडे यांचे ते वडील तर सामाजिक कार्यकर्ते राजाराम गाडे यांचे ते बंधू होते.

18 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - तळेगाव येथील नूतन महाराष्ट्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील शुभम तोडकर याची चीनमधील तायपेई येथे होणा-या जागतिक वेटलिफ्टिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तो नुकताच चीनला रवाना झाला आहे.

नवी दिल्ली येथील ऑल इंडिया युनिव्हर्सिटी यांच्या सौजन्याने आणि आचार्य नागार्जुन विद्यापीठ, गुंटूर यांच्या विद्यमाने जून महिन्यात झालेल्या जागतिक वेटलिफ्टिंग निवड चाचणीत शुभम सावित्रीबाई फुले विद्यापीठातर्फे सहभागी झाला होता. त्यात अव्वल ठरल्याने शुभम आता आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होत आहे. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धा 19 ते 30 ऑगस्ट दरम्यान होणार आहेत. 56 किलो वजनी गटात सहभागी झालेला शुभम तोडकर अभियांत्रिकीच्या दुस-या वर्षात शिकत आहे.

संस्थेचे अध्यक्ष कृष्णराव भेगडे, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, प्राचार्य डॉ.राजेंद्र कानफाडे यांनी शुभम तोडकर तसेच क्रीडाशिक्षक प्रा. राजेंद्र लांडगे यांचे अभिनंदन केले आहे.

17 Aug 2017


नवलाख उंब्रे गावाच्या स्वागत कमानीचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज - गावाच्या विकासासाठी तरुणांनी एकत्र यावे. त्यामध्ये कोणतेही राजकारण करून नये. असे आवाहन तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी केले.

नवलाख उंबरे गावाच्या स्वागत कमानीचे भूमिपूजन सुनील शेळके यांच्या हस्ते आज (गुरुवार) करण्यात आले. यावेळी शेळके बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब काकडे, माजी आर. टी. ओ. अधिकारी हरिचंद्र गडसिंग, ह.भ.प. विष्णू महाराज खांडेभराड, ह. भ. प. दिनकर शेटे, नितिन मोरे, तानाजी पडवळ, आबाजी बधाले, संदिप शेटे, विठ्ठल बधाले, सुभाष पापळ, बासरकर गुरुजी, बाळासाहेब लोणकर, प्रभाकर बधाले, माऊली कोयते, नवनाथ पडवळ, निवृत्ती शेटे, मनोहर गायकवाड, विजय शेटे, दिलीप बधाले, विश्वास शेटे, चंद्रकांत शेटे, दामोदर मराठे,  पांडुरंग कोयते, गावातील तरुण व ज्येष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गावाला वेस असणे गरजेच आहे. आता उभारण्यात येणारी कमान देखील वेशीचे प्रतीक असून लोकवर्गणीतून होणारे कमानीचे काम आदर्श काम आहे. गावाच्या वैभवात वाढ करण्यासाठी गावक-यांनी देणगीच्या स्वरूपात मदत करावी आणि तरुणांनी संघटित होऊन हे काम पूर्ण करावे. इतर सहकार्य आम्ही करू असेही शेळके म्हणाले.

हरिचंद्र गडसिंग म्हणाले की, पूर्वीचे नवलाख उंब्रे आणि आताचे नवलाख उंब्रे यामध्ये मोठा बदल झाला आहे. गावाच्या विकासात दिवसेंदिवस भर पडत आहे. ग्रामपंचायतीने लोकसहभाग वाढवून लोकहिताची कामे हाती घेतल्याने हा बदल शक्य झाला आहे.'

सरपंच दत्तात्रय पडवळ म्हणाले की, लोकवर्गणी आणि लोकसहभागातून उभारण्यात येत असलेल्या भव्य कमानीसाठी सुमारे 30 लाख रुपये खर्च करण्यात येणार आहे. लोकवर्गणीला स्थानिक कंपन्यांच्या सीएसआर निधीचे देखील सहकार्य घेण्यात येणार आहे.

भूमिपूजन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन रविंद्र कडलक यांनी केले. प्रास्तविक सरपंच दत्तात्रय पडवळ यांनी केले आणि आभार उपसरपंच महेश शिर्के यांनी मानले.

17 Aug 2017

एमपीसी न्यूज- कलापिनी, साने गुरुजी कथामाला, दास बोध अभ्यास मंडळ आणि योगीराज फौंडेशनच्या वतीने मनाचे श्लोक पाठांतर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण 185 स्पर्धकांनी भाग घेतला. या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी योगीराज फौंडेशनचे आशिष पाठक व जिप्सी भटकती चे गिर्यारोहक नाद थत्ते, कलापिनीचे विश्वस्त डॉ.अनंत परांजपे, अशोक बकरे आणि समर्थ मंडळाचे श्री.सुभाष नाईक गुरुजी उपस्थित होते.

यावेळी बोलताना डॉ परांजपे म्हणाले, “मनाचे श्लोकाचे पठण मुलांनी रोज करावे आणि पालकांनी त्यांना श्लोकाचा अर्थ व्यक्तिश: सांगावा कारण मनाच्या श्लोक पठणाने मानसिक ताण कमी होतोच पण आपल्या दैनंदिन वागणुकीवर पण चांगला परिणाम होतो” असे सांगितले.

या स्पर्धेसाठी विजया मायभाटे, मोरेश्वर होनप, सुभाष नाईक गुरुजी ,चेतन पंडित, इनामदार, श्रीपाद बुरसे, शांताराम मोडक, हृतिक पाटील, मुक्त भावसार यांनी विशेषसा परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाखा बेके, मोहिनी घाबडे आणि सायली रौंधळ यांनी केले व सौ.अनघा बुरसे यांनी आभार मानले. स्पर्धेचे हे 23 वे वर्ष होते. सुवर्णरेखा इतराज ( चिंचवड) आणि वंदना मालकर यांनी या स्पर्धेचे परीक्षण केले.

17 Aug 2017

एमपीसी न्यूज- देशी -विदेशी दारूची बेकायदा वाहतूक करणाऱ्या सहा जणांना तळेगाव दाभाडे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून तीन वाहनांसह 11 लाख 78 हजार 422 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास पुणे- मुंबई महामार्गावर सोमाटणे फाटा (ता.मावळ) येथे केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गजानन आत्माराम बारसकर (वय 47), गोपाल दुर्गाई शर्मा (वय 19) दोघे रा. वडगाव – तळेगाव फाटा ता. मावळ), सुरेश नामदेव ढमाले (वय 40, रा. मोरया चौक , वडगाव ता. मावळ), अनिल काशिनाथ तरस (वय 36), संजय वसंत तरस (वय 42) दोघे रा. मुकाई चौक, किवळे ता. हवेली) रेशीमलाल साधुराम लालका (वय २७, रा. सातेगाव ता.मावळ) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या कारवाईत 11 लाख78 हजार 422 रूपये किमतीची दारू जप्त करण्यात आली आहे.

मावळ तालुक्यातील महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या काही हॉटेल व ढाब्यांवर बेकायदा देशी -विदेशी दारू विक्री सुरु असल्याच्या माहितीवरून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेज हक व देहूरोड उपविभागीय पोलीस अधिकारी गणपत माडगुळकर यांनी याकडे जातीने लक्ष घातले आहे.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कान्हे फाटा येथे गाडी वळवत असताना शेजारून जाणा-या ट्रेलरला धडक लागल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज सकाळी पावणेसातच्या सुमारास घडली. ट्रेलर चालकाला वडगाव पोलिसांनी अटक केली.


दत्तात्रय गंगाराम देशमाने (वय 46, रा. नांदूर पठार ता.पारनेर जि. अहमदनगर), असे अटक केलेल्या ट्रेलर चालकाचे नाव आहे. तर अक्षय सुरेश ओव्हाळ (वय 22, रा. राहुलनगर, नायगाव ता.मावळ), असे तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय ओव्हाळ हा त्याच्या (एम एच 14 एफ व्ही 4315) क्रमांकाच्या दुचाकीवरून कान्हे फाटा येथून वळत असताना पुणे बाजूला जाणाऱ्या (एम एच 06 के 4725) क्रमांकाच्या ट्रेलरची जोरात धडक बसून अपघात झाला. यात अक्षयच्या डोक्याला गंभीर जखम झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.

अक्षय हा मावळातील शिरोता येथील वनपरिक्षेत्र वनमजूर सुरेश ओव्हाळ यांचा मुलगा असून त्याच्यामागे आई, वडील, बहीण व लहान भाऊ असा परिवार आहे.
यापकरणी वडगाव मावळ पोलीस अधिक तपास करत आहेत.

16 Aug 2017

मावळातील भाजे लेणीजवळ तिरंग्यावर बेगडी प्रेमासाठी जलस्रोताचा बेरंग

एमपीसी न्यूज - स्वातंत्र्य दिन साजरा करणे, हा भारतीय म्हणून आपला हक्क आहे, मात्र तो साजरा करताना आपल्याच देशातील आपल्याच हक्काच्या नैसर्गिक जलस्रोताला हानी पोहचवावी का, हा प्रश्न उपस्थित व्हावा, अशी घटना काल मावळ तालुक्यात घडली. स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी पर्यटक व काही पोलिसांनी त्यांच्या कल्पनेतून मावळातील भाजे लेणीजवळील धबधबा अक्षरशः तिरंगी केला. कल्पना छान आहे, तिचा हेतूही चांगला आहे, मात्र त्यातून आपण पिण्याच्या पाण्याचा एक नौसर्गिक स्रोत खराब करत आहोत, याचे भान पर्यटकांना व पोलिसांनाही राहिले नाही.

लोहगडाच्या पायथ्याशी असलेल्या प्राचीन भाजे लेणीजवळील धबधब्यात काल पर्यटक व पोलिसांच्या संकल्पनेतून हिरवा व नारंगी रंग टाकण्यात आला. याने धबधबा सुंदर दिसला व पर्यटकांचे, पोलीसांचे फोटो, व्हिडिओ व डीपीही उत्तम आले, युट्यूबवर, फेसबुकवर व्हिडिओ चांगला व्हायरल झाला, पण त्या रंग मिसळलेल्या पाण्याचे काय, त्याचा विचार कोणी केला नाही. प्रत्येक घटनेला दोन बाजू असतात तशाच यालाही आहेत. काहींना गर्व वाटला, अभिमान वाटला तर पर्यावरणप्रेमींना हे चुकीचे वाटले, एखादी गोष्ट खराब करुन कसले आले सेलिब्रेशन, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

याविषयी पवना माई जलमैत्री अभियान या नदी प्रदुषणावर काम करणा-या संस्थेचे राजीव भावसार एमपीसी न्यूजशी बोलताना म्हणाले की, पाणी ही अशी गोष्ट आहे की त्यामध्ये एक थेंब जरी अशुद्ध टाकला तरी ते सारे पाणी अशुद्ध करते. त्यामुळे तुम्ही थोडा रंग टाकला किंवा जास्त टाकला काय सारखेच. तसेच झरा किंवा धबधबा पुढे नदीतच जातो ज्याचे पाणी तुम्ही शहरवासीय व स्थानिक गावकरी दोघे पिण्यासाठी वापरता. जलशुद्धीकरणात पाणी 100 टक्के शुद्ध होते असे नाही. रंग व त्यातील रसायने काही प्रमाणात तशीच राहतात. त्यात वापरलेला रंग पर्यावरणपूरक होता का, त्यात कोणती रसायने होती, याचाही पर्यटक व प्रशासन म्हणून सर्वांनीच विचार करायला हवा होता.

एखाद्या नैसर्गिक जलस्रोताची जाणून-बुजूण नासाडी करणे कधीही अयोग्यच आहे. असे प्रकार पुन्हा होऊ नयेत म्हणून जनजागृती होणे गरजेचे आहे,. त्या पाण्याच्या स्त्रोताला कोणताही धक्का न लावता ही मंडळी वेगळ्या माध्यमातून देशभक्तीचे दर्शन घडवू शकली असती, असेही त्यांनी आवर्जून सांगितले.

पर्यावरणतज्ज्ञ विकास पाटील म्हणाले की, तरुणवर्गात पर्यावरणाचे गांभीर्य नाही त्यात पोलिसांनीच त्यांना साथ द्यावी ही निंदनीय बाब आहे. 
उटल त्यांनी केलेल्या या गैरकृत्याचे त्यांना गांभीर्य कळावे यासाठी उपस्थित पोलिसांसकट संबंधित  पर्यटकांवर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करायला हवी. तुम्ही केवळ मजा म्हणून असा जलस्रोत खराब करु शकत नाही. तसेच आपल्या देशाचा ध्वज असा वाहून जाणारा आहे का, याचाही विचार करायला हवा होता. त्यांचा क्षणाचा आनंद नागरिकांच्या आरोग्याला घातक ठरु शकतो, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.

तेथील स्थानिक गावक-यांनाही ही बाब काही रुचली नाही, पण बोलणार कोण? कारण दैनंदिन कामासाठी तेच पाणी त्यांना वापरावे लागते. तुमचा क्षणाचा खेळ त्यांच्या जीवाशी बेतू शकतो. त्यामुळे पर्यटनला जरुर जा, तेथे मनसोक्त आनंद लुटा, पण त्या पर्यावरणाला जपा, कारण... त्या पर्यावरणवर आपण अवलंबून असतो व आपली पुढची पिढीही!
water foll
16 Aug 2017


एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील गणपती चौकातील श्री गणेश तरुण मंडळाचा 2017-18 चा अहवाल प्रकाशन सोहळा साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.

गणेशोत्सव लोकाभिमुख होण्यासाठी लोकमान्य टिळकांना अभिप्रेत असलेल्या उत्सवाची जपणूक श्री गणेश मंडळ करीत आहे. मंडळाचे स्वतःचे ढोलपथक असून त्यामध्ये सुमारे 100 कार्यकर्ते आहेत. मंडळाच्या वतीने दरवर्षी लोकनृत्य स्पर्धा, महिला अथर्वशीर्ष पठण, गणपती मूर्ती रंगवण्याची स्पर्धा, श्री गणेशयाग, श्री गणेशाची पंचोपचार पूजा असे विविध स्पर्धा व कार्यक्रम घेण्यात येतात. त्याबद्दल साखवळकर यांनी मंडळाचे कौतुक केले.

मंडळाचे अध्यक्ष शैलेश धर्माधिकारी आणि उपाध्यक्ष निखिल जगताप यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत मेढी यांनी केले. अवधूत कुलकर्णी यांनी आभार व्यक्त केले.

Page 2 of 35
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start