• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Vadgaon : ढोरे, नेवाळे, आता सांगा, बाबूराव वायकर यांना डीपीडीसीवर संधी देणा-यांवर काय कारवाई करणार?


किशोर भेगडे यांचा जाहीर सवाल

एमपीसी न्यूज - अपक्ष जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देऊन जिल्हा नियोजन व विकास समितीवर (डीपीडीसी) बिनविरोध निवडून दिल्याबद्दल आता तालुकाध्यक्ष गणेश अप्पा ढोरे व जिल्हा बँकेचे अपक्ष  संचालक बाळासाहेब नेवाळे कोणाला पक्षातून निलंबित करणार, असा खोचक सवाल तळेगाव नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक किशोर भेगडे यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ढोरे व जिल्हा बँकेचे संचालक नेवाळे हे मनमानी पद्धतीने पक्षसंघटना चालवीत असल्याचा आरोप यापूर्वीही किशोर भेगडे यांनी केला होता. जिल्हा परिषद निवडणुकीत अपक्ष म्हणून निवडून आलेल्या व पुढे राष्ट्रवादीचे सहयोगी सदस्य बनलेल्या वायकर यांना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्वत: जिल्हा व नियोजन समिती सदस्य म्हणून काम करायची संधी दिली आहे.

मावळ तालुक्यांतील वडगाव-खडकाळा गटाचे अपक्ष जिल्हा परिषद सदस्य बाबूराव वायकर यांना तसेच तालुका खरेदी विक्री संघ निवडणुकीत अपक्षांना मदत केल्याच्या आरोपावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या तीन निष्ठावान नेत्यांना पक्षातून निलंबित करण्याचा निर्णय ढोरे व नेवाळे यांनी घेतला होता. आता त्याच वायकर  यांना आणखी वरिष्ठ पदावर कामाची संधी देणा-यांवर काय कारवाई करणार, असा सवाल भेगडे यांनी केला आहे.

वायकर जिल्हा नियोजन समितीवर बिनविरोध निवडून आले त्याबद्दल भेगडे यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले. तसेच पुढील राजकीय व सामाजिक कार्यास शुभेच्छा दिल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वायकर यांना राष्ट्रवादी पक्षाकडून संधी दिल्याबद्दल भेगडे यांनी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांचे जाहीर आभार देखील मानले.