11 Jun 2018

Talegaon Dabhade : उपनगराध्यक्षपदी संग्राम काकडे यांची बिनविरोध निवड

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सत्ताधारी भाजपा, जनसेवा विकास समिती, आरपीआय(आठवले गट) मनसे महायुतीचे नगरसेवक संग्राम काकडे यांची सोमवारी बिनविरोध निवड झाली. उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी ही निवडणूक झाली.

नगर परिषद सभागृहात झालेल्या विशेष सभेला पिठासन अधिकारी म्हणून नगराध्यक्षा चित्रा जगनाडे यांनी काम पाहिले. मुख्याधिकारी वैभव आवारे यांनी त्यांना मदत केली. जनसेवा विकास समितीचे संग्राम काकडे व तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे अरुण माने यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. दोन्ही अर्ज छाननीत वैध ठरले. तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे गटनेते किशोर भेगडे यांच्याकडे सुनील शेळके यांनी अरुण माने यांचा अर्ज मागे घ्यावा अशी विनंती केली. त्या विनंतीला मान देऊन किशोर भेगडे यांनी अरुण माने यांचा अर्ज मागे घेतला. माने यांच्या माघारीनंतर संग्राम काकडे बिनविरोध निवडून आल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी चित्रा जगनाडे यांनी जाहीर केले.

आगामी काळातही तळेगाव शहर सुधारणा व विकास समिती,शहराच्या विकास कामासाठी पूर्ण सहकार्य करेल मात्र सर्व प्रभागात नि:पक्षपणे विकासकामे व्हावीत, अशी अपेक्षा किशोर भेगडे यांनी व्यक्त केली. नगर परिषदेत भाजपा 14 ,जनसेवा विकास समिती 6 , तळेगाव शहर सुधारणा व विकास समितीचे 6 नगरसेवक असे पक्षीय बलाबल असून भाजपा,जनसेवा विकास समिती, आरपीआय आठवले गट महायुतीची नगरपरिषदेत सत्ता आहे.

या नंतर झालेल्या सभेत आमदार संजय भेगडे, संत तुकाराम कारखान्याचे उपाध्यक्ष,ज्येष्ठ नगरसेवक बापूसाहेब भेगडे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, पक्षप्रतोद सुशील सैदाणे, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष विशाल खंडेलवाल, माजी नगराध्यक्ष अॅड. रवींद्रनाथ दाभाडे ,शहर भाजपचे अध्यक्ष संतोष दाभाडे पाटील,माजी उपनागराध्यक्ष सुनील शेळके, चंद्रभान खळदे, जनसेवा विकास समितीच्या गटनेत्या सुलोचनाताई आवारे यांनी मनोगत व्यक्त केले.

आमदार संजय भेगडे म्हणाले, " तळेगाव शहराच्या विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून दिला आहे. यातून इंद्रायणी पाणीपुरवठा योजना, प्रशस्त रस्ते,रेल्वे भुयारी मार्ग, भुयारी गटारे आदी कामे प्रगतीपथावर असून विकासकामातून शहराचा चेहरा मोहरा बदलायचा आहे. आठ एकर जागेत सुमारे 22 कोटी रुपये खर्चाचे राज्यातील सर्वात मोठे जिल्हा क्रीडा संकुल उभारण्याचा मानस असून जागा मिळवून देण्यासाठी काकडे व आवारे घराण्याने पुढाकार घ्यावा" असे त्यांनी आवाहन केले.

आपल्या कारकिर्दीत सर्वांना विश्वासात व बरोबर घेऊन शहर विकासाला पूरक असलेल्या निर्णयांची अंमलबजावणी गतिमान करण्याचे आश्वासन संग्राम काकडे यांनी दिले. त्यानंतर त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब काकडे, मुख्य प्रवर्तक किशोर आवारे, पंचायत समितीचे उपसभापती शांताराम कदम, माजी सभापती निवृत्ती शेटे, भाजपचे तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, संत तुकाराम कारखान्याचे संचालक गोपीचंद गराडे, हभप नितीनमहाराज काकडे,माजी नगराध्यक्ष राजेंद्र जांभूळकर,माजी नगरसेवक चंद्रकांत शेटे,चंद्रकांत काकडे, बाबा शेट्टी आदी उपस्थित होते.

Tagged under

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares