• 1250-x200.jpg
  • Advt-Baba-Tripbhun.jpg
  • Advt-Laxman-saste.jpg
  • Advt-Nitin-Kalje.jpg
  • IMG-20171212-WA0093.jpg
  • Vaishali-Kalbhor.jpg
  • Vishal-Kalbhor.jpg
04 Dec 2017

Vadgaon Maval : गॅस एजन्सीकडून ग्राहकांच्या फसवणुकीच्या विरोधात एक दिवसीय लाक्षणिक उपोषण


एमपीसी न्यूज - कामशेत शहरातील कचरा समस्या तसेच गॅस एजन्सीकडून वारंवार होत असलेल्या लुबाडणुकीच्या विरोधात कामशेत येथील सजग ग्राहकांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले. या उपोषणात संजय पडवकर, मनोज धावडे, सहदेव केदारी, विजय काजळे, अंकुश कचरे, चंदू परचंड, वसंत काळे, उपसरपंच काशिनाथ येवले, भुमाता ब्रिगेड पुणे जिल्हा उपाध्यक्ष दत्तात्रय पोंधे आदींनी सहभाग घेतला.


कामशेत शहरात एचपी व भारत गॅस एजन्सीचे ग्रामीण वितरक आहेत. गॅस सिलेंडर घरपोच करणे कामी अतिरिक्त रक्कम आकारली जाते. त्याबाबत कोणतीही पावती दिली जात नाही. गॅस सिलेंडर वजन करून दिले जात नाही. गॅस सिलेंडर रक्कमेबाबत छपाई न करता पावती दिली जाते. तसेच आजूबाजूचा रहिवासी परिसर असूनही नियमबाह्य जादा सिलेंडर स्टॉक करून ठेवले जातात. एखादे वेळी कोणतीही अनुचित घटना घडल्यास अग्निशमन यंत्रणा, उपाययोजना कार्यान्वित नसून सर्व सामान्य ग्राहकांना ज्या मोफत सुविधा दिल्या जातात त्याची कोणतीही माहिती दिली जात नाही.

याशिवाय मूळ सिलेंडरची किंमत ही ७२० रुपये असून घरपोच सेवेसाठी १८.५० पैसे जादाने आकारून त्या सिलेंडरची किंमत ७३८.५० होते. मात्र सिलेंडर घरपोच करणारे वितरकांचे कर्मचारी कामशेत मधील गॅस ग्राहकांकडून एका सिलेंडर मागे जास्तीचे सुमारे ३० रुपये घेतात. तर इतर ग्रामीण भागातील गॅस ग्राहकांकडून एका सिलेंडर मागे सुमारे ४० ते ५० रुपये घेतले जातात. याची कोणत्याही प्रकारची पावती दिली जात नाही. हा सर्व प्रकार गॅसग्राहक गेली अनेक वर्षे निमूटपणे सहन करीत असून कामशेतच्या जागृत नागरिकांनी या आर्थिक लुबाडणूक प्रकरणी आवाज उठवला आहे.

ग्रामीण भागातील ग्राहक असूनही सूचना व माहिती ही जाणीवपूर्वक इंग्रजी भाषेत लावली जाते. त्यामुळे नागरिकांना व ग्राहकांना काहींच कळत नाही. यातून त्यांची आर्थिक फसवणूक होत आहे. असा आरोप कामशेत शहरातील नागरिकांनी केला. या संदर्भात ग्रामपंचायतीला निवेदन देऊन ग्रामसभेत वेळोवेळी ठराव ही करण्यात आले आहेत. शिवाय मागील महिन्याच्या १६ तारखेला दोन्ही गॅस एजन्सीना  ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रव्यवहार करून माहिती मागवण्यात आली मात्र संबंधित गॅस एजन्सीनी कोणत्याही प्रकारची माहिती पुरवली नाही.

कामशेत येथील कचरा समस्येने नागरिक हैराण; लाक्षणिक उपोषणात कच-याचा मुद्दाही पुन्हा एकदा सरकार दरबारी

कामशेत शहरातील कचरा समस्येवर वारंवार पत्रव्यवहार करूनही गेल्या अनेक महिन्यांपासून कोणताही तोडगा निघालेला नाही. त्यात ग्रामपंचायतीच्या वतीने कचरा वाहतूक, विल्हेवाट लावण्याचे काम बंद करण्यात आल्याने संपूर्ण शहरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रोगराई वाढीची समस्या निर्माण होणार आहे. सद्यस्थितीत सुरू असलेले साथीचे आजार व त्यात कचरा समस्येमुळे अधिक भरच पडणार असून कामशेतकर नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे.

कामशेत शहरातील कच-याची समस्या तातडीने सोडवण्यात यावी, घनकचरा विघटन प्रकल्प करण्यासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करावा, व्यावसायिक गृहप्रकल्प उभारताना घनकचरा व्यवस्थापन - गांडूळ खत प्रकल्प न करणे कामी तातडीने सर्वेक्षण करावे आदी समस्यांसाठी हे उपोषण करण्यात आले असल्याची माहिती उपोषण कर्त्यांनी दिली. यावर प्रशासनाने तातडीने योग्य उपाययोजना करून तोडगा काढला नाही तर याला प्रशासन जबाबदार राहील असे त्यांनी सांगितले. पंचायत समिती सदस्य दत्तात्रय शेवाळे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या प्रश्नांवर चर्चा केली तसेच या प्रकरणी मावळ तहसीलदार यांची भेट घेऊन तातडीने उपाययोजना करण्याची विनंती केली.