• baban.jpg
  • Home-Advt-Pruti-Gas.jpg
  • Khedekar-1250-X-200-For-Web.jpg
  • mpc1.jpg
20 Mar 2018

एमपीसी न्यूज - वडगाव मावळ मधील माळीनगर येथे मुकबधीर मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर रविवार (दि.18) रोजी आनंदी फाऊंडेशन ची स्थापना करण्यात आली. फाउंडेशनचे उद्घाटन उपसरपंच संभाजी म्हाळसकर यांच्या हस्ते करण्यात आले. 

उदघाटनप्रसंगी सोमनाथ शिंदे, मोहिनी निकम, जितेंद्र कोल्हे, भाग्यश्री शिंदे, परीक्षित भालेराव, संतोष जांभूळकर, मनाली लोखंडे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना उपसरपंच म्हाळसकर म्हणाले की, मुकबधीर विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकस व्हायला हवा. मूकबधिर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी अपंग कल्याणकारी निधी उपलब्ध करुन देण्यासाठी पुढाकार घेणार. माया इव्हेंट्स वाशीम यांनी मुलांना बलून डेकोरेशनचे वर्कशॉप घेतले. आनंदी व उत्साही वातावरणात आनंदी फाऊंडेशन च्या कार्यक्रमाची सांगता झाली.

20 Mar 2018

एमपीसी न्यूज - गुढीपाडव्या निमित्त वडगाव मावळ उपसभापती प्रविण चव्हाण, मावळ फेस्टिवल अध्यक्ष शामराव ढोरे, सरपंच नितिन कुडे यांनी तिकोणा गडाच्या संवर्धनासाठी 21 हजार रुपयांची मदत केली आहे. 

तिकोणा गड मावळातील महत्वाची ऐतिहासिक वास्तू आहे. हा वारसा जपून त्याचे संवर्धन करायला हवे या जाणिवेतून हा मदतनिधी उभारण्यात आला आहे. तिकोणा गडावर जाण्यासाठी पाय-या आहेत. मात्र, या पाय-यांची काळाच्या ओघात मोठी पडझड झाली असून त्याच्या संवर्धनासाठी या निधीचा वापर करण्यात येणार आहे. 

चव्हाण, ढोरे आणि कुडे यांनी मावळ फेस्टिवलचे यशस्वी आयोजन करून वडगाव मावळातील कला, क्रीडा, व संस्कृतीची जपणूक केली आहे.

19 Mar 2018
एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ नागरी सहकारी पतसंस्था मर्या. तळेगाव दाभाडे यांच्यातर्फे  पुणे पीपल्स को आॅप बँकेचे विद्यमान अध्यक्ष बबनराव बळवंतराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. अभीष्टचिंतन सोहळ्यामध्ये बबनराव भेगडे यांना शुभेच्छा देण्यासाठी राजकीय, सामाजिक, सहकार, अध्यात्मिक, कला, क्रिडा अशा विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती नगरसेवक संतोष भेगडे यांनी दिली. 
 
अभिष्टचिंतन सोहळा मंगळवार (दि 20) रोजी  नगरसेवक संतोष छबुराव भेगडे यांचे निवास स्थान, अशोक विक्रम सोसायटी, घोरावाडी रेल्वे स्टेशन जवळ, तळेगाव दाभाडे येथे सायंकाळी सात वाजता होणार आहे.  
 
बबनराव बळवंतराव भेगडे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी अध्यक्ष आहेत. त्यांचे राजकीय, सामाजिक, सहकार तसेच अन्य विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य आहे.
19 Mar 2018
एमपीसी न्यूज - वडगाव मावळ येथील गडभटकंती ग्रुपच्या मावळ्यांनी किल्ले तिकोनागडावर नवचैतन्याची गुढी उभारली. गडकिल्ल्यांवर गुढी उभारण्याचा प्रसंग पहिल्यांदाच घडला असल्याने गुढी उभारण्यासाठी मावळातील शिवप्रेमींनी चांगलीच गर्दी केली. हिंदू नववर्षाचा सण म्हणजे गुढीपाडवा. निसर्गात नवीन चैतन्य, नवीन पालवी फुटण्याची ही वेळ असते. अशा वेळी महाराष्ट्राच्या इतिहासाची साक्ष देणारे गड-किल्ले मात्र त्यापासून बिनकल राहत आहेत. त्यामुळे वडगाव मावळ येथील मावळ्यांनी हा गुढी उभारण्याचा उपक्रम हाती घेतला. 
 
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सर्व गडांवर वर्षभरातील सर्व सण व उत्सव मोठ्या आनंदाने व हर्ष-उल्लासाने साजरे होत असत. मात्र शिवकाळाबरोबर या सर्व सण-उत्सवांना जणू ग्रहणच लागलं. सगळे गड-किल्ले या उत्सवांच्या आठवणीत राहू लागले. सध्या बहुतांश गडांवर दगड व भिंतींशिवाय काहीही उरले नाही. त्यामुळे सध्या जे आहे, त्याचे रक्षण करणे ही प्रत्येक शिवप्रेमींचे प्रथम कर्तव्य आहे. या भावनेतून पाडव्यापूर्वी दोन दिवसांपासून गुढीपाडव्याची तयारी सुरु झाली. वडगाव मावळ येथील शिवरायांचे मित्र वीर नारो बापूजी देशपांडे यांच्या समाधीपूजनाने गुढी पाडवा उत्सवाची सुरुवात झाली. त्यानंतर श्रीमंत महादजी शिंदे यांच्या स्मारकाला दूध अभिषेक करण्यात आला. अभिषेकानंतर सर्व मावळ्यांनी तिकोना गडाकडे कूच केली. 
 
तिकोना गडावर चढताना मार्गातील वेताळ महाराज,  चपेटदान मारूतीराया, तळजाई माता यांचे पूजन करण्यात आले. गडाच्या माथ्यावरील वितंडेश्वर मंदिरात पूजा करून परंपरेप्रमाणे गुढी उभारण्यात आली. गडाच्या महादरवाजावर फुलांची सजावट करून फुलांच्या माळा तटबंदी बुरुजावरून खाली आल्या. काही वेळातच महादरवाजा बुरुजांसकट फुलांनी सजून गेला. रांगोळ्यांची आरास झाली. जय भवानी जय शिवाजीचा जयघोष झाला आणि तिकोनागडावर शिवशाही अवतरल्याचा अनुभव आला. स्वराज्याचा भगवा ध्वज बदलण्यात आला. श्रीनिवास कुलकर्णी यांच्या हस्ते गडाच्या महादरवाज्यात गुढी उभारण्यात आली. 
 
गूळ, कडुलिंबाची फुले यांचा प्रसाद वाटण्यात आला. तळजाई मंदिराच्या प्रांगणात सर्वांसाठी अल्पोपहाराची सोय करण्यात आली होती. तिकोनागड गुडीपाडवा उत्सवात सहभागी झालेल्या सर्वानी याचा लाभ घेतला. तसेच गडसंवर्धनाच्या कामात मदत करत गडावरील झाडांना पाणी घालण्यात आले. या आनंदी क्षणाचे साक्षीदार झाल्याचे समाधान प्रत्येकाच्या चेह-यावर तरळत होते. यावेळी  वडगाव मावळ येथील जाहिरात व्यवसायीक, दुर्गसेवक अतुल राऊत यांनी गडावर करण्यात येत असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कामासाठी पाच हजार रुपयांचा मदत निधी दिला.
 
18 Mar 2018
एमपीसी न्यूज - सर्व सामान्य नागरिकांची लाईफ लाईन समजली जाणा-या वडगाव स्वारगेट बससेवेचा शुभारंभ काल (शनिवार) मावळ तालुक्यात उपस्थितांच्या हस्ते नारळ फोडून बससेवेचा शुभारंभ करण्यात आला. 
 
यावेळी मावळ पंचायत समितीचे सभापती गुलाबराव म्हाळसकर, नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, ज्येष्ठ नगरसेवक गणेशराव भेगडे, महिला अध्यक्षा शोभा भेगडे, अविनाश बवरे, संभाजी म्हाळसकर, विनोद बंटी भेगडे, डॉ. परांजपे, अलका गायकवाड, शिवानी हुनुरे ज्येष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. 
 
मागील 3-4 महिने या विषयासाठी घेतलेल्या उषोषण, निवेदनासाठी वेळीवेळी पाठपुरावा करण्यात आला होता. आज अखेर सर्वांच्या पाठपुराव्याला यश प्राप्त झाले. जे गाव करीन ते राव काय करीन या म्हणीप्रमाणे या सामाजिक कामासाठी सर्वांनी सामाजिक बांधिलकी राखत स्वारगेट किंवा मंडई जाऊ इच्छिणाऱ्या आणि परतणाऱ्या मावळ नागरिकांसाठी आता पुणे महानगर परिवहन महामंडळाची (पीएमपीएमएल) बस सज्ज झाली आहे. वडगाव मावळ येथून या बससेवेचे उद्घाटन आमदार संजय बाळा भेगडे यांच्या हस्ते करण्यात आले. 
 
यावेळी आमदार म्हणाले की, वाहतूक कोंडी व वाहनांच्या प्रदुषणावर सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त वापर हाच उपाय असून, पुढील काळात मिनीबसचे व सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. अनेक दिवसापासून ज्येष्ठ नागरिकांच्या मागणी होती की वडगाव ते स्वारगेट बंद असलेली बससेवा पुन्हा सुरु व्हावी. यासाठी पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना पाठपुरावा करून बससेवा सुरु केली आणि 127 नंबरची स्वारगेट ते वडगाव मावळ (तळेगाव, निगडी, वाकडेवाडी, मंडई मार्गाने) बसचे उद्घाटन केले.  
 
कार्यक्रमाचे आभार मानव अधिकारचे सचिव व प्रदेश जागतिक समिती व माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी मानले.

17 Mar 2018

ग्रामपंचायत हद्दीतील मिळकतकर विहित मुदतीत न भरल्याने टाकवे ब्रु ग्रामपंचायतीच्या सदस्या अश्विनी शिवाजी असवले व मीना सुरेश असवले यांना सदस्य म्हणून राहण्यास अपात्र ठरवून त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याचा आदेश अप्पर आयुक्त सुभाष डुंबरे यांनी दिला आहे.

यासंदर्भात माजी उपसरपंच बाबाजी तुकाराम गायकवाड यांनी मा अप्पर आयुक्त यांचे न्यायालयात अपील दाखल केले होते. अप्पर आयुक्त डुंबरे यांनी 14 मार्च रोजी सुनावणी करताना अश्विनी असवले व मीना असवले यांना सदस्यपदी राहण्यास अपात्र ठरविले आहे.

अपात्र ठरलेल्या दोन्ही सदस्या दि 4 ऑगस्ट 2015 रोजी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी ग्रामपंचायत कराची थकबाकी नसल्याचा बोगस दाखला जोडला होता. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती.

दरम्यान करवसुली बिलाबाबतची स्थळप्रत ग्रामपंचायत दप्तरी नसल्याचे ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दिलेले पत्र गृहित धरून जिल्हाधिकाऱ्यांनी गायकवाड यांचा अर्ज फेटाळून असवले यांच्या बाजूने निकाल दिला होता.

यानंतर गायकवाड यांनी मा अप्पर आयुक्तांकडे अपील दाखल केले होते. परंतु ग्रामविकास अधिकाऱ्यांनी दि 21 मार्च 2014 रोजी पुणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सदस्य सचिव यांना दिलेल्या पत्रातील यादीमध्ये अश्विनी असवले यांचे पती शिवाजी असवले व मीना असवले यांचे नाव थकबाकीदार म्हणून समाविष्ट असून संबंधीतांनी स्वाक्षरी केली आहे.

यावरून दोघींनींही ग्रामपंचायत मिळकत कराचा भरणा विहीत मुदतीत भरला नसल्याचे सिद्ध होत असल्याने ग्रामपंचायत अधिनियम कायद्याचा भंग होत आहे. त्यामुळे अपिलार्थी गायकवाड यांचा अर्ज मान्य करून अप्पर आयुक्त डुंबरे यांनी जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला 'आदेश ' रद्द ठरवून दोन्ही सदस्यांना अपात्र ठरविले आहे.

17 Mar 2018

वडगाव शहर विकास समितीचे तहसीलदारांना निवेदन

एमपीसी न्यूज- वडगाव मावळ ग्रुपग्रामपंचायत (वडगाव- कातवी) ही शासनाने नगरपंचायत घोषीत केली आहे. ग्रामपंचायत बरखास्त होऊन या ठिकाणी प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु, या प्रक्रियेदरम्यान येथील कर्मचाऱ्यांचे पगार थकले असून दैनंदिन खर्चासाठी अडचणी येत आहेत. त्यामुळे या ठिकाणी पूर्ण वेळ कर्मचाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी वडगाव शहर विकास समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

याबाबत वडगाव मावळचे तहसीलदार रणजित देसाई यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 3 फेब्रुवारी 2018 रोजी शासनाने वडगाव मावळ ग्रुपग्रामपंचायत(वडगाव- कातवी) नगरपंचायत म्हणून घोषित केली आहे. त्यानंतर या ठिकाणी रणजित देसाई यांची प्रशासक म्हणून नेमणूक केली आहे. मात्र या प्रक्रियेदरम्यान मागील दीड- दोन महिन्यांपासून येथील कर्मचाऱ्यांचा पगार थकला असून नगरपंचायतला दैनंदिन खर्चासाठी खूप अडचणी येत आहेत.

शिवाय वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे जांभूळ पाणी योजना विस्कळीत झालेली आहे. त्याचबरोबर नागरिकांना आवश्यक असणाऱ्या दाखल्यासाठी व उतारे घेण्यासाठी हेलपाटे मारावे लागतात. ही गैरसोय दूर होण्यासाठी नगरपंचायत कार्यालयात पूर्णवेळ कर्मचाऱ्याची नेमणूक करावी. तसेच आगामी नगरपंचायत निवडणूक सोडत, वाॅर्ड रचना बाबत विश्वासात घेऊन कामकाज करावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

या निवेदनावर मावळ तालुका राष्टवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशअप्पा ढोरे यांच्या सहित मावळ तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, आंदरमावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मंगेशकाका ढोरे, मावळ तालुका खरेदी विक्री संघाचे उपाध्यक्ष पंढरीनाथ ढोरे, गंगाधर ढोरे, चंद्रकांत ढोरे, गणेश विनोदे, सुनील ढोरे, राजेश बाफना, हनुमंत म्हाळसकर, रोहिदास गराडे, चंद्रजीत वाघमारे, विलास दंडेल, प्रवीण ढोरे, मयूर ढोरे आदीं मान्यवरांच्या सह्या आहेत.

16 Mar 2018

एमपीसी न्यूज- मागील अनेक दिवसांपासून मागणी असलेल्या कात्रज ते वडगाव मावळ या पीएमपीएमएल बससेवेचा उद्या, शनिवारी शुभारंभ होत असून हा कार्यक्रम सकाळी साडेआठ वाजता वडगाव मावळ पंचायत समिती समोर होणार असल्याची माहिती माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी दिली आहे.

या कार्यक्रमाला आमदार बाळा भेगडे, युवा उद्योजक किशोर आवारे, माजी नगराध्यक्षा सुलोचनाताई अवारे, भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश भेगडे, साप्ताहिक अंबरचे संपादक सुरेश साखवळकर, सारिका संजय भेगडे, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, पत्रकार विजय सुराणा, गणेश विनोद, अतुल पवार, संकेत जगताप आदी उपस्थित राहणार आहेत.

16 Mar 2018

गणेश भेगडे यांचा माउली दाभाडे यांना टोला
वडगाव मावळ येथे मावळ विधानसभा बूथ प्रमुख व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर

एमपीसी न्यूज- मध्यंतरी सहकार क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ व्यक्तीने खालच्या स्तरावर टीका केली होती पक्षाच्या ध्येयधोरणावर जरूर टीका करा मात्र सुसंगत टीका करा असे सांगत गणेश भेगडे यांनी माउली दाभाडे यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला. वडगाव मावळ येथील भेगडे लाॅन्स कार्यालयामध्ये झालेल्या मावळ विधानसभा बूथ प्रमुख व कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिरात ते बोलत होते.

यावेळी आमदार बाळा भेगडे, प्रमुख मार्गदर्शक पश्चिम महाराष्ट्र पर्यटन संघटक मंत्री रवी अनासपुरे, अध्यक्ष प्रशांत ढोरे, सभापती गुलाबराव म्हाळसकर, उपसभापती शांताराम कदम, जिल्हा नियोजन समिती सदस्य अविनाश बवरे , ज्येष्ठ नगरसेवक गणेशराव भेगडे, युवा मोर्चा अध्यक्ष बाळासाहेब घोटकुले, जितेंद्र बोत्रे, सुरेखा जाधव, महिला अध्यक्षा नंदाताई सातकर, युवती अध्यक्षा राणी म्हाळसकर, सारिका नाईकनवरे, सुवर्णा कुंभार, रवींद्र आवारे, बाबा शेट्टी, अ‍ॅड. कैलाश पानसरे, संतोष हगवणे, नितीन मराठे, अजीत आगळे, यदुनाथ चोरघे, मावळातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व कार्यकर्ते व मान्यवर पदाधिकारी, जेष्ठ कार्यकर्ते, युवा कार्यकर्ते, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

यावेळी बोलताना आमदार भेगडे म्हणाले, " मावळ तालुक्यात "एक बूथ, 50 यूथ "ही संकल्पना पुर्ण झाली तर, सुमारे 17 हजार कार्यकर्ते सक्रिय राहतील, त्यामुळे भविष्यातही मावळात भाजपच्या गडाला कोणीच हलवू शकणार नाही. मावळ तालुक्यासारखे संघटन महाराष्ट्रात दुसऱ्या कोणत्याही पक्षाचे नाही. या कुशल संघटन कौशल्याचा उल्लेख राज्य पातळीवर नेहमी केला जातो. त्याचबरोबर पंचायत समिती, नगरपरिषद, कॅन्टोमेंट बोर्ड अशा प्रकारची सत्तास्थाने असलेला 'मावळ तालुका ' महाराष्ट्रात एकमेव आहे. त्यामुळे 340 बूथद्वारे प्रत्येकी 50 कार्यकर्ते सक्रिय झाल्यास 'कार्यकर्ता संघटन ' सर्वोत्तम होईल" असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

रविजी अनासपुरे यांनी केंद्र व राज्य सरकारने अमलात आणलेल्या विविध योजनांची माहिती देऊन सर्व योजना ' मोबाईल अॅपद्वारे " सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन कार्यकर्त्यांना केले. ते म्हणाले की, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पक्ष पोहोचला पाहिजे. पुणे जिल्ह्यातील 150 पंचायत समितीवर कार्यकर्त्यांना पाठविणे गरजेचे आहे. त्यामुळे राजकारण कमी समाजकारण जास्त करायचे आहे असे ते म्हणाले.

भाजपाचे जेष्ठ नेते गणेश भेगडे म्हणाले, "भाजपमध्ये खूप मोठी गटबाजी झाली असून; 2019 च्या विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय निश्चित मानला जातोय. अशी अफवा राष्ट्रवादीने सुरू केली आहे. मात्र भाजपमध्ये 'गटबाजी ' कधीच होत नाही. इच्छुकांची संख्या जास्त असली तरी पक्षाने दिलेल्या उमेदवाराचेच काम सर्वांना करावे लागते " राष्ट्रवादीतून काँग्रेसच्या वाटेवर असलेले माऊली दाभाडे यांनी मध्यंतरी भाजप वर टीका करताना हा भारतीय जनता पक्ष आहे की भेगडे पक्ष आहे अशी बोचरी टीका केली होती. त्याला प्रत्युत्तर देताना माउली दाभाडे यांचे नाव न घेता गणेश भेगडे म्हणाले की, सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे जेष्ठ नेते, त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे, परंतु त्यांनी केलेली टिका टिप्पणी खालच्या स्तराची होती. टीका असावी मात्र वैयक्तिक टीका करू नये. महाआरोग्य शिबिरात घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. यामध्ये घोटाळा होण्याचा प्रश्नच येत नाही. या शिबिरासाठी कार्यकर्त्यांकडून रोख रक्कम गोळा करण्यात आली होती. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पवना जलवाहिनी संदर्भात याचिका फेटाळल्याने मावळ तालुक्यात त्या विषयी गैरसमज पसरविले जात आहेत. परंतु कोणत्याही परिस्थितीत पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प होऊ देणार नाही असे भेगडे यांनी ठामपणे सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाबूलाल गराडे व अनंता कुडे यांनी केले. तर यदुनाथ चोरघे यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपा मावळ विधानसभा विस्तारक अ‍ॅड. सचिन सदावर्ते, सीएम वाँर रुम समन्वयक स्वतंत्र वर्मा, राजन भगत, हर्षल माने, राहुल सुडके, अविनाश राऊत यांचे सहकार्य लाभले.

15 Mar 2018

मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आढावा बैठक संपन्न
एमपीसी न्यूज- भाजप सरकारने सैनिक, शेतकरी, कामगार यांना देशोधडीला लावण्याचे काम केले असून महागाईने सर्वसामान्यांचे हाल झाले आहेत. पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅसच्या किमती दुपटीने वाढवल्या आहेत. मावळ तालुक्यातील शेतकरी आक्रोश व हल्लाबोल मोर्चा तीव्रपणे होण्यासाठी कार्यकर्त्यांनी भाजप सरकारने केलेली लूट जनतेला सांगून जनतेमध्ये जागृती निर्माण करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वक्ता प्रशिक्षण विभाग प्रमुख महाराष्ट्र प्रदेश प्रदीप साळुंके यांनी केले. वडगाव मावळ येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात आज, गुरुवार (दि.१५) रोजी आयोजित मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आढावा बैठकीत ते बोलत होते.

या प्रसंगी माजी आमदार कृष्णराव भेगडे, पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते, राष्ट्रवादी मावळ तालुका निरीक्षक राजेंद्र खांदवे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष अर्चना घारे, संचालक बाळासाहेब नेवाळे, राष्ट्रवादी महिला जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, नगरसेवक गणेश खांडगे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे, युवक तालुकाध्यक्ष रमेश गायकवाड, महिला तालुकाध्यक्ष शुभांगी राक्षे, माजी उपनगराध्यक्ष गणेश काकडे, अतिष परदेशी, नारायण पाळेकर, राजाराम राक्षे, सुभाष जाधव, काळूराम मालपोटे, दत्तात्रय शेवाळे, विठ्ठलराव शिंदे, सुनील ढोरे, सुनीता काळोखे, संभाजी टेमगिरे, प्रकाश पवार, कृष्णा दाभोळे, मिकी कोचर, राजू बोराटी, शीतल हगवणे, कल्पना सावंत, राजश्री राऊत, नीलिमा पाटील बहुसंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

साळुंके पुढे म्हणाले, " भाजप सरकारने प्रत्येक नागरिकांच्या डोक्यावर ६४ हजार रुपयांचे कर्ज केले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, फसवी शेतकरी कर्जमाफी त्याचप्रमाणे राज्यघटना मोडीत काढून मनुस्मृतीचे राज्य आणण्याचा प्रयत्न होत आहे. धनगर आरक्षण, शेतीमालाला हमीभाव नाही, महाराष्ट्रातील पुरोगामी विचार संपवण्याचे काम सुरु असून राज्याचा विकास करण्याऐवजी मुख्यमंत्री अभ्यासच करत आहेत. या देशाचा कृषिमंत्री कोण आहे हेच माहीत नाही. कुणाला विचारले तर ते सांगतात शरद पवार आहेत. शिवसेना म्हणते राजीनामा पत्र जवळ आहे पण देण्याची हिंमत नाही. राष्ट्रवादीतील नेते धडाडीचे असून त्यांचा दरारा आहे" छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम महाराज, शरदराव पवार या तीनच लोकांनी देशातील शेतकऱ्यांसाठी आतापर्यंत सरसकट कर्जमाफी केली आहे असे साळुंके म्हणाले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष गणेश ढोरे यांनी केले. ढोरे म्हणाले," आम्ही पक्षवाढीसाठी व पक्ष बांधणीसाठी प्रामाणिक प्रयत्न करूनही त्याचा काही उपयोग होत नाही. कारण बंडखोरांना वरिष्ठ मंडळींकडून ताकद दिली जाते अशी खंत ढोरे यांनी व्यक्त केली.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष विश्वास नाना देवकाते म्हणाले, "मावळ तालुक्याला अधिकचा निधी दिला असून भविष्यातही भरघोस निधी देणार असल्याचे त्यांनी सांगितले. मावळात राष्ट्रवादीचा आमदार निवडून आणण्याचे त्यांनी आवाहन केले. यावेळी वैशाली नागवडे, राजेंद्र खांदवे आदींनी भाषण केले.

सूत्रसंचालन किरण हुलावळे व राष्ट्रवादी विद्यार्थी तालुकाध्यक्ष अमोल केदारी यांनी केले. आभार ज्येष्ठ नेते सुभाष जाधव यांनी मानले.

Page 1 of 97

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares