• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
12 Sep 2017

Pune : रसिकांनी घेतली स्पॅनिश वीणेची सुरेल अनुभूती


शुद्धनाद संस्थेतर्फे छोटेखानी मैफलीचे आयोजन

एमपीसी न्यूज - स्पॅनिश वीणेतून झालेला कर्णमधुर नाद... सुरेल आवाजात सादर केलेले गायन आणि त्याला तबल्याची मिळालेली अप्रतिम साथ, या वादन आणि गायनाची सुरेल अनुभूती रसिकांनी घेतली. तेजस कोपरकर (गायन), पार्थ ताराबादकर (तबला), सौमित्र क्षिरसागर (हार्मोनिअम), सचिन पटवर्धन (स्पॅनीश वीणा) कलाकारांनी आपल्या तरल वादन आणि गायनातून मैफलीत अनोखे रंग भरले.

शुद्धनाद संस्थेतर्फे सदाशिव पेठेत राजाराम मंडळाजवळील अ‍ॅसेट गोल्ड येथे २४ व्या छोटेखानी मैफलीचे आयोजन करण्यात आले होते. नवोदित कलाकारांना आपली कला रसिकांसमोर सादर करता यावी, यासाठी प्रत्येक महिन्यात मैफलीचे आयोजन करण्यात येते. यावेळी कलाकारांनी आपली कला रसिकांसमोर सादर केली. शुद्धनाद संस्थेचे संस्थापक अश्विन गोडबोले, कपिल जगताप उपस्थित होते.

मैफलीच्या पहिल्या सत्राची सुरुवात तेजस कोपरकर यांनी पुरीया धनाश्री रागाने केली. टोनुआ माई कर देरे ही विलंबीत एकतालातील बंदीश त्याने सादर केली. मध्यलय रुपक तालात सादर केलेल्या मेहेरकी नजर या बंदीशीने रसिकांची विशेष पसंती मिळविली. तेजो निधी लोह गोल या प्रसिद्ध नाट्यगीताने पहिल्या सत्राची सांगता झाली. पार्थ ताराबादकर (तबला) आणि सौमित्र क्षिरसागर (हार्मोनिअम) यांनी अप्रतिम साथ दिली.

मैफलीच्या दुस-या सत्रात सचिन पटवर्धन यांनी किरवाणी रागाने सुरुवात केली. स्पॅनिश वीणेवर झालेल्या सादरीकरणाने रसिकांची मने जिंकली. प्रस्तुतीची सुरुवात आलाप जोड ने झाली. यानंतर रुपक तालात निबद्ध एक गत आणि द्रुत तीन तालातील एक गत सादर झाली. भैरवीत सादर केलेल्या धुन ने रसिकांची मने जिंकली. अभिजीत बारटक्के यांनी तबल्यावर साथ केली.

कपिल जगताप म्हणाले, शुद्धनाद हा उभरत्या कलाकारांसाठी असलेला एक खुला मंच आहे, जिथे कलाकार आपली कला रसिकांसमोर सादर करू शकतात. कलाकार आणि श्रोता यांच्यामध्ये असलेले अंतर कमी व्हावे, याउद्देशाने ही मासिक सभा २३ महिन्यांपासून आयोजित केली जात आहे. कलाकारांसाठी कलाकारांची कलाकारांनी सुरू केलेली मैफल म्हणजे शुद्धनाद. रिवाच्या सहकार्याने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यापुढील २५ वी मैफल १५ आॅक्टोबर रोजी सेनापती बापट रस्त्यावरील कलाछाया येथे होणार आहे.

Read 70 times