• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

लाल महालात सलग 12 तासांच्या कीर्तनरंगात वारकरी दंग


एमपीसी न्यूज - ज्ञानोबा माउली तुकाराम... विठुचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला... च्या गजरात टाळ आणि मृदुंगाच्या ठेक्यावर ताल धरत वारकरी कीर्तनरंगी रंगले. महाराष्ट्राच्या संत परंपरेतील संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत जनाबाईंच्या अभंगांचे सार सलग 12 तासांच्या कीर्तनातून ऐकताना वारकरी दंग झाले. तहान भूक विसरून विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारक-यांनी पुण्यामध्ये विसाव्याला असताना नारदीय कीर्तनाचा भक्तीमय आनंद लुटला.

निमित्त होते, शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी व पुणे पीपल्स को-ऑप बँक लि. तर्फे ह.भ.प. महाराष्ट्र शाहीर जंगम स्वामी स्मरणार्थ भक्ती शक्ती एकात्म नाम सोहळा अखंड कीर्तनमालेचे. सोहळ्याचे उद्घाटन पुणे पीपल्स बँकेचे ज्येष्ठ संचालक ह.भ.प.सुभाष नडे, पीयुष शहा, शाहीर हेमंत मावळे, लालमहालाचे रखवालदार शफी अब्दुल मोहम्मद यांच्या हस्ते झाले.

सकाळी कीर्तनकार ह.भ.प. दीपक बुवा रास्ते यांच्या कीर्तनाने सोहळ्याला सुरुवात झाली. त्यानंतर ह.भ.प. विश्वासराव कुलकर्णी यांनी भक्ती आणि शक्तीचे महत्त्व कीर्तनातून विशद केले. ते म्हणाले, समाजकंटकांचे निर्दालन व दुष्टांचा नित्पात करणे, याकरिता भगवान धर्माच्या रक्षणार्थ अवतार घेतात. आपणही संघटीतपणे दुष्ट शक्तीचा नाश करायला हवा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या न्यायव्यवस्थेमध्ये देखील चुकीचे कृत्य करणा-यांचे निर्दालन योग्य रितीने करण्यात आले होते, असेही त्यांनी सांगितले.

कीर्तनकार ह.भ.प. मानसी जोशी यांनी संत संगतीच्या परिणामाबाबत कीर्तनातून मार्गदर्शन केले. त्या म्हणाल्या, जीवनात संगती महत्त्वाची आहे. बाहेरील मायाजालामध्ये आपण सर्वजण गुरफटत चाललो आहोत. जीव, संसार, देव आणि संत या चार गोष्टींशी निगडीत आपले जीवन आहे. त्यामुळे हरिभक्ती करण्याकरिता संतसंगतीशिवाय पर्याय नाही, असेही त्या म्हणाल्या त्यानंतर युवाकीर्तनकार होनराज मावळे, किरण कुलकर्णी, चिन्मय देशपांडे, प्रणव देव, सुहास देशपांडे आदी सहभागी झाले होते.

हेमंतराजे मावळे म्हणाले की, गेल्या अनेक वर्षांपासून पंढरपूरला पायी चालत जाण्याची परंपरा वारकरी भक्तांनी अखंड चालू ठेवली आहे. टाळ-मृदुंगाच्या गजरात संतांच्या पालख्या देहू-आळंदी येथून प्रस्थान करतात आणि पुण्यात मुक्कामासाठी थांबतात. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही वारकरी भक्तांसाठी सलग 12 तास नारदीय कीर्तनमालेचे आयोजन केले होते.

Read 115 times Last modified on Monday, 19 June 2017 13:21
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start