• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Ravet : अभियांत्रिकीचे विद्यार्थी कमवू लागले इंटलेक्चुअल प्रॉपर्टी


पीसीसीओई च्या दोन विद्यार्थ्यांनी मिळवले संगणक सुरक्षेबाबत कॉपीराईट; पेटंटची नोंदणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्राच्या दोन विद्यार्थ्यांनी संगणक सुरक्षेबाबत महत्वाचा प्रोग्राम तयार केला असून त्यावर त्यांनी कॉपीराईटचा अधिकार प्राप्त केला आहे. तसेच त्यांनी आपल्या प्रकल्पाचे पेटंट मिळविण्यासाठी नोंदणी देखील केली आहे. इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मिळविण्यासाठी सध्या अभियांत्रिकीसह अन्य सर्वच क्षेत्रात सध्या होड निर्माण झाली आहे.

पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय व संशोधन केंद्रामध्ये अभियांत्रिकी संगणक शाखेच्या द्वितीय वर्षात शिकणारे प्रतीक खेडेकर आणि निधी हेगडे यांनी 'अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट कीबोर्ड' या विषयावर संशोधन करत संगणकातील डेटा सुरक्षित राहण्याच्या दृष्टीने स्वतंत्र प्रकल्प केला आहे. या प्रकल्पाचे कॉपीराईट देखील त्यांनी मिळविले आहेत.

आपल्याकडे असलेलं युनिक ज्ञान किंवा रचनात्मकता हेच सध्या महत्वाची संपत्ती मानली जात आहे. त्यामुळे इंटलेक्चुअल प्रॉपर्टी मिळविण्याकडे बहुतांश रचनात्मक लोकांचा कल वाढत आहे. शाळा, महाविद्यालयांमध्ये शिकणारे विद्यार्थी देखील याकडे वळलेले पाहायला मिळतात. या मालमत्तेला संरक्षण मिळण्याकरिता तसेच मूळ मालकाकडे त्याचे अधिकार राखण्याच्या उद्देशातून 1957 साली तयार झालेल्या आणि 1958 साली अंमलात आलेल्या कॉपीराईट कायद्याअंतर्गत शासनाकडून संरक्षण देखील दिले जाते. त्यामुळे मूळ रचनाकाराला आपल्या डिजिटल संपत्तीतून आर्थिक उत्पन्न मिळविण्यास देखील मोठी मदत होत आहे.

प्रतीक आणि निधीला आपल्या प्रकल्पाचे कॉपीराईट मिळण्यामागे छोटीशी रंजक कथा आहे. ती अशी की, प्रतीक एकदा कम्प्युटरवर काम करत होता. काम करता-करता त्याच्याकडून एका अकाउंटसाठी चुकीचा पासवर्ड दाबला गेला. त्यामुळे तो अकाउंट उघडू शकला नाही. पण आजकाल कोणतेही अकाउंट उघडण्यासाठी एकापेक्षा एक युक्त्या लढवल्या जात आहेत. त्यामुळे आपले अकाउंट आपल्यालाच उघडता यावे, यासाठी आणखी काय सुरक्षा करता येईल. असा विचार प्रतीकच्या मनात हळूच तरळून गेला.

त्याला अनेक प्रश्न पडू लागले. 'आपण योग्य विचार करतोय का? आपल्याला पडलेला प्रश्न आपल्या एकट्यालाच पडलाय का? असा प्रश्न इतर कुणाला पडला तर? आपले अकाउंट आपल्यालाच उघडता यावे, याकरिता ठोस उपाययोजना म्हणून काय करता येऊ शकेल?' असे एक ना अनेक प्रश्न येऊ लागले. त्याने आपल्या वर्गमैत्रिणीजवळ याचा खुलासा केला. आणि त्याला 'निधी हेगडे' ही समविचारी मैत्रीण सापडली. जे प्रश्न प्रतीकला पडले तेच निधीलाही पडत होते. दोघे वारंवार याविषयावर चर्चा करू लागले . शिक्षकांना भेटू लागले. काम करू लागले. ऑगस्ट, 2017 ला विचार आला आणि सप्टेंबर महिन्यात विचारांवर काम करून एक दर्जेदार प्रकल्प बनवला गेला. एका महिन्यात तो कॉपीराईट्स मिळण्याकरिता पाठवला सुद्धा. शासनाकडून त्यांना त्याबाबत अधिकार सुरक्षिततेचे प्रमाणपत्र सुद्धा मिळाले आहे.

एका प्रकल्पाचे कॉपीराईट आपल्या नावावर झाले. आता पुढे याचा नोकरीसाठी किंवा महाविद्यालयातील परीक्षांसाठी थोड्या अधिक प्रमाणात उपयोग होईल, असा विचार करत ही मंडळी इथेच थांबली नाहीत. त्यांनी आणखी एक प्रकल्प बनवायला घेतला. पहिल्या प्रकल्पाचे पेटंट मिळविण्याकरिता नोंदणी केली. 'प्रतीक आणि निधी' यांचा प्रकल्प एक उदाहरण आहे. पण या प्रकारचे लाखो कॉपीराईट आणि पेटंट भारतीयांच्या नावावर व्हायला हवे. आपल्या कॉपीराईट आणि पेटंटचा उपयोग देशहितासाठी व्हायला हवा, असे मत प्रतीक खेडेकर याने व्यक्त केले.

निधी हेगडे याबाबत बोलताना म्हणाली की, "आज प्रत्येक क्षेत्रात संगणकाचा वापर होत आहे. प्राथमिक शाळेपासूनच विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविले जात आहे. विद्यार्थ्यांना केवळ संगणक साक्षर न बनविता, त्याच्या सुरक्षा आणि विकासाबाबतचे शिक्षण देखील विद्यार्थ्यांना द्यायला हवे.

Read 233 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares