• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : वीजबिलांच्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणची धडक कारवाई सुरु


एमपीसी न्यूज - पुणे, कोल्हापुर, सांगली, सातारा, सोलापूर जिल्ह्यातील वीजबिलांच्या थकबाकीदारांविरुद्ध महावितरणने धडक कारवाई सुरु केली आहे. वारंवार आवाहन करूनही वीजबिलांचा भरणा न करणाऱ्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.


थकबाकीदार वीजग्राहकांविरोधात आक्रमक होत महावितरणने पुणे, सोलापूर, सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांत वीजपुरवठा खंडित करण्यासाठी 'शून्य थकबाकी' मोहीम नोव्हेंबरपासून सुरु केली आहे. ही मोहीम या महिन्यात आणखी तीव्र करण्याची सूचना प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी दिले आहे. थकीत वीजबिल भरा अन्यथा वीजपुरवठा खंडित होणारच हा संदेश वीजपुरवठा खंडित करण्याच्या धडक कारवाईतून देण्याचे निर्देश त्यांनी पाचही जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांना दिले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात थकीत वीजबिलांची वसुली आणखी वेगाने होण्यासाठी 'शून्य थकबाकी' मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करावी. थकबाकी वसुलीशिवाय अन्य कोणताही पर्याय राहिलेला नाही, याची महावितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी गांभिर्याने नोंद घ्यावी, असेही प्रादेशिक संचालक श्री. संजय ताकसांडे यांनी स्पष्ट केले.

तात्पुरता किंवा कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित केल्यानंतरही थकबाकीदार अनधिकृतपणे विजेचा वापर करीत असेल तर त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे किती रक्कम थकलेली आहे हे न पाहता नियमांच्या अधीन राहून या सर्वच थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे. ही कटू कारवाई टाळण्यासाठी थकीत वीजबिलांचा त्वरीत भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे. थकीत वीजबिल भरण्यासाठी स्थानिक वीजबील भरणा केद्गांसह व घरबसल्या 'ऑनलाईन' पेमेंटसाठी महावितरणची www.mahadiscom.inहीवेबसाईट तसेच मोबाईल अ‍ॅपचा पर्याय उपलब्ध आहे.

दि. 13 व 14 रोजी वीजबील भरणा केंद्र सुरु -पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्याच्या शहरी व ग्रामीण भागातील महावितरणचे सर्व अधिकृत वीजबील भरणा केंद्र वीजग्राहकांच्या सोयीसाठी शनिवारी (दि. 13) व रविवारी (ता. 14) सुरु राहणार आहेत. या दोन्ही दिवशी सार्वजनिक सुटी आहे. सद्यस्थितीत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची धडक मोहिम सुरु आहे. वीजग्राहकांना वीजबिलाचा व थकबाकीचा भरणा करणे सोयीचे व्हावे, यासाठी महावितरणचे अधिकृत वीजबील भरणा केंद्र त्यांच्या कार्यालयीन वेळेत सुरु राहणार आहेत.

Read 90 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares