• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : हिमालयातील पदभ्रमणासाठी मार्गदर्शनपर कार्यशाळा


एमपीसी न्यूज - पुण्यातील गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग तर्फे यंदाच्या मोसमात हिमालयात पदभ्रमणासाठी जाऊ इच्छीणाऱ्यांसाठी मार्गदर्शनपर कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. पुण्यातील आपटे रोड येथील विवेकानंद सभागृहामध्ये 21 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 1.30 या वेळात ही कार्यशाळा पार पडेल.


गेल्या काही वर्षांत पुण्यामुंबईतून हिमालयात पदभ्रमण, गिर्यारोहण, मोटारसायकल सफारी तसेच सहलींसाठी जाणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. जसजसा हिमालयन ट्रेकिंग चा हंगाम जवळ येतो तसतसे एव्हरेस्ट बेस, अन्नपूर्णा बेस, पिंढारी काफनी, तपोवन, रूपकुंड, ह्मता पास, लेह-लडाख या ठिकाणी जाण्यासाठी साहसप्रेमींची लगबग सुरु होते. ही सर्व ठिकाणे अतिउंचीवर वसलेली आहेत. त्यामुळे तेथील विरळ हवामान, थंडी, वारे, पाऊस, बर्फवृष्टी या सर्वांचा ट्रेकर्सना सामना करावा लागतो. प्रथमच इतक्या उंचीवर जाणाऱ्या मंडळीना तेथील परिस्थितीचा योग्य अंदाज नसल्याने अथवा अपुऱ्या तयारीमुळे गेल्याने अनेकवेळा अडचणींना व अपयशाला सामोरे जावे लागते. परंतु शारीरिक व मानसिकदृष्ट्या पूर्ण तयारीनिशी हिमालयात गेल्यास मनाला भुरळ पाडणारा विलोभनीय हिमालय आणि त्याच्या विविश छटा पाहण्याचा अनुभव हा नक्कीच सुंदर व स्मरणीय ठरतो.

अधिकाधिक साहसप्रेमींना हिमालयातील पदभ्रमणाचा हा सुंदर अनुभव सुरक्षितरीत्या घेता यावा या उद्देशाने गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनियरिंग तर्फे आयोजित केलेल्या या कार्यशाळेत तज्ञ व अनुभवी गिर्यारोहक आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

या कार्यशाळेत अतिउंचीवरील आजार व त्यासाठी घ्यावयाची काळजी, हिमालयन ट्रेकसाठीची शारीरिक व मानसिक पूर्वतयारी, अशा पदभ्रमणासाठी लागणारी साधनसामग्री आणि सुयोग्य व सकस आहाराचे नियोजन या चार विषयांवरील मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यशाळेसाठी वयोगटाची मर्यादा नसून या कार्यशाळेत भाग घेण्यासाठी पूर्वनोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणी करण्यासाठी www.ggim.in/introduction-high-altitude-trekking/ या संकेतस्थळाला भेट द्यावी अथवा ८९७५३९८८८६, ९७६९३०२९३४, ९८९०४९९९५५ या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Read 88 times

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares