• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
24 Sep 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी येथील लोकशाही संस्थेतर्फे बिहार येथील पूरग्रस्तांना 150 किलो चिवडा पाठवून मदत केली आहे.

लोकशाही संस्थेचे अध्यक्ष हनुमंत लोंढे व इतर सदस्यांनी संस्थेच्या वतीने नागरिकांना मदतीचे आवाहन केले होते. त्यानुसार नागरिकांनी सुमारे 150 किलो चिवडा जमा केला. संस्थेच्या वतीने ही मदत बिहार येथे सामाजिक कार्य   करणा-या नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धीस्ट युथ यांच्याकडे पाठविण्यात येणार आहे. ही संस्था पुरग्रस्तांना हा चिवडा वाटणार आहे.

तसेच येथील नागरिकांना ताडपत्री, सतरंजी, चटई अशा मदतीची आणखी गरज आहे तर इच्छुक नागरिक किंवा संस्थांनीही नॅशनल नेटवर्क ऑफ बुद्धीस्ट युथ यांच्याशी संपर्क साधून 8210081820 मदत करावी असे आवाहन लोकशाही संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

24 Sep 2017


एमपीसी न्यूज- थेरगाव येथील सिंधूलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये अध्यक्षपदी रामकृष्ण राणे यांची तर उपाध्यक्षपदी परशुराम प्रभू यांची बिनविरोध निवड झाली.

सिंधूलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेची ही निवडणूक 2017 ते 2022 या कालावधीपर्यंत ही निवड करण्यात आली आहे. संस्थेची सभासद संख्या 678 इतकी असून भाग भांडवल 12 लाख रुपये आहे. संस्थेने लेखापरीक्षण दर्जा ब कायम राखला असून सलग तीन वर्षे दहा टक्के लाभांश सभासदांना मिळाला आहे.

23 Sep 2017

`को-ऑप्टेक्स'चे व्यवस्थापकीय संचालक टी. एन. व्यंकटेश यांची माहिती; हातमाग कपड्यांचे प्रदर्शन

एमपीसी न्यूज - "भारतीय परंपरा आणि संस्कृतीचे दर्शन हातमाग, वीणकाम केलेल्या कापडांतून होते. हजारो विणकर आपल्या कलाकुसरीतून आकर्षक आणि स्वदेशी बनावटीच्या कापडाची निर्मिती करतात. कपड्यांमध्ये कलाकुसर आणणा-या या विणकरांच्या सन्मानासाठी तामिळनाडू सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे," अशी माहिती दि तमिळनाडू हॅन्डलूम विव्हर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे (को-ऑप्टेक्स) व्यवस्थापकीय संचालक आणि सनदी अधिकारी टी. एन. व्यंकटेश यांनी दिली.

दी तमिळनाडू हॅन्डलूम विव्हर्स को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने बाजीराव रस्त्यावरील अत्रे सभागृहात आयोजिलेल्या हातमाग कपड्यांच्या प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी व्यंकटेश बोलत होते. याप्रसंगी विभागीय व्यवस्थापक एम. व्हेट्रिवेल, को-ऑप्टेक्स, पुणेचे व्यवस्थापक प्रकाश नाडणकर, जेबराज आदी मान्यवर उपस्थित होते.

टी. एन. व्यंकटेश म्हणाले, "पारंपरिक पद्धतीने वीणकाम करणार्‍या या कामगारांना रोजगार मिळवून देण्यासाठी तामिळनाडू सरकार प्रयत्न करीत आहे. वर्षभर 1000 विणकरांना काम देऊन त्यांना उत्तम रोजगार दिला जातो. त्याचबरोबर त्यांना ओळख मिळावी, यासाठी विणलेल्या कपड्यांवर त्यांचे छायाचित्र व माहिती दिली जात आहे. यासाठी 22 कॉटन क्लस्टर आणि पाच सिल्क क्लस्टर उभारण्यात आले आहेत. विणलेल्या साड्यांची परंपरा जपण्याचा हा प्रयत्न आहे. झरी आणि थ्रेडवर्क असलेल्या साड्यांना पुणेकर महिलांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्याचबरोबर तीन पिढयांना जोडण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत."

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड धनगर समाज महासंघाच्यावतीने सामाजिक सुसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम काळभोरनगर येथे उद्या रविवारी सकाळी अकरा वाजता येथील महादेव मंदिर हॉलमध्ये होणार आहे.

यावेळी प्रमुख वक्ते म्हणून राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे असणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गिरीष प्रभुणे असणार आहेत तर महापौर नितीन काळजे, खासदार श्रीरंग बारणे, शिवाजीराव आढळराव पाटील, अमर साबळे, आमदार महेश लांडगे, आमदार गौतम चाबुकस्वार, माजी महापौर आझम पानसरे आदी उपस्थित असणार आहेत.

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - आयएनआयएफडीच्या डेक्कन केंद्रामध्ये फॅशन डिझायनिंग कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली. या कार्यशाळेत 60 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

डेकोपेज या फॅशन डिझायनिंगमधील उभरत्या संकल्पनेवर एक दिवसाची विशेष कार्यशाळा घेण्यात आली. कार्यशाळेत विद्यार्थ्यांना फॅब्रिकवरील पेपरवर्क करण्याची नवीन पद्धत शिवण्यात आली. फॅब्रिक डेकोपेज पद्धती फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात सध्या चांगलीच चर्चेत आहे. फॅब्रिक डेकोपेजचा वापर विविध मार्गांनी केला जाऊ शकतो. अगदी शर्टाच्या बटनांपासून ते पायातील बुटांपर्यंत तसेच घरातील खिडक्यांपासून ते टी-शर्ट, स्पोर्ट्स वेअर, पर्स, बॅग, स्लिंग बॅग, ट्रेंझिंग बॅग आणि फोनपर्यंत आकर्षक पेपरवर्क केले जाते. याकार्यशाळेतून फॅशन डिझायनिंगच्या क्षेत्रात आपले भविष्य निर्माण करू इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना मिळाली.

आयएनआयएफडी डेक्कन केंद्राच्या इंटीरियर डिझाईन विभागाच्या कीर्ती दरयाणी आणि कार्यशाळेचे सह-दिग्दर्शक सचिन जवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. वेषभूषा डिझायनिंग, थिएटर फॅशन आणि बॉलीवूड उद्योगांना या पद्धतीने चांगलीच भुरळ घातली आहे. चित्रपटांच्या, मालिकांच्या विविध सेटवर डेकोपेज डिझायनरची मागणी वाढत आहे. यामध्ये आणखी कल्पकतेने काम करता येण्यासारखे आहे. त्यामुळे भविष्यात या क्षेत्रात विद्यार्थ्यांना चांगला वाव आहे. असा विश्वास कीर्ती दरयाणी यांनी व्यक्त केला.

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - संविधानातील मुलभूत हक्क व अधिकाराची माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी संविधान जनजागरण अभियान शहरात राबविले जात आहे. या अभियानाला रविवार (दि. 24) रोजी प्रारंभ होत आहे.

पद्ययानी बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट व संविधान दिन सोहळा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने चिंचवड येथील सायन्स पार्कच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता जनजागरण अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

याप्रसंगी प्रा. डॉ. संजय गायकवाड यांचे ‘भारतीय संविधान प्रारूप समजून घेताना’ या विषयावर विशेष व्याख्यान होणार आहे. प्रा. डॉ. राजाभाऊ भैलुने कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत. यावेळी स्वराज अभियानाचे प्रदेश अध्यक्ष मानव कांबळे, ज्येष्ठ साहित्यिक प्रभाकर ओव्हाळ, महिला व बाल विकास खात्याचे उपायुक्त राहुल मोरे, अशोक स्तंभाचे प्रणेते डॉ. अशोक शिलवंत, लेखक विजय जगताप, दिग्दर्शक नागनाथ खरात आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून असणार आहेत. कार्यक्रमात दुष्काळानं होरपळलेले खेडयातलं जीवन टिपलेला आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘दिसाआड दिस’ हा नागनाथ खरात यांचा लघुपट दाखविण्यात येणार आहे.

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - कै. ज्ञानोबा चोंधे प्रतिष्ठाण व यशश्री महिला संस्था, महिला बचत गट यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रौत्सवानिमित्त विशालनगर, पिंपळेनिलख येथे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. अशी माहिती नगरसेविका आरती चोंधे यांनी दिली आहे. नवरात्र उत्सव साजरे करण्याचे यंदाचे रौप्यमहोत्सवी वर्ष आहे.

नवरात्र उत्सवानिमित्त विविध भजनी मंडळांचे भजन, डॉ. तेजस्विनी समीर भाले-बोरसे यांचे आरोग्य विषयक मार्गदर्शनपर व्याख्यान, कु. हर्षदा प्रदीप वाघ यांचा पोवाडागायन, गायत्री परिवारातर्फे कुंकुमार्जन विधी, हभप सुचेता सुरेश गटणे यांचे प्रवचन, हिंद चौक महिला मंडळातर्फे तोरणओत्सव, गायत्री परिवारातर्फे होमहवन, स्वरसंध्या रुपाली डावरे व मंजिरी जोशी यांचा भक्तीसंगीताचा कार्यक्रम, देवीची गाणी, जोगवा, जागर, महाभोंडला अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत गणेश मंदिर, गणपती चौक विशालनगर, पिंपळेनिलख येथे करण्यात आले आहे.

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या ड प्रभाग पिंपरी-चिंचवड शहर खजिनदारपदी सूरज बनकर यांची निवड करण्यात आलेली आहे

संघटनेचे राष्ट्रीय निरीक्षक रामराव नवघन यांचे हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अध्यक्ष जयवंत कुदळे, उपाध्यक्ष ओमकार शेरे, लक्ष्मण दवणे, भास्कर घोरपडे आदी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळातर्फे रविवारी (दि. 24) गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व माता उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे दुपारी चार ते सायंकाळी सात वाजेपर्यंत होणार आहे. त्यानंतर 16 कुलस्वामिनी व कानुबाई मातेचा उत्सव सायंकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत होणार आहे.

कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे डॉ. मिलिंद येवले व डॉ. सुचिता येवले उपस्थित राहणार आहेत. विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येणार आहे. कानुबाई मातेचे दर्शन व महाप्रसाद झाल्यानंतर शिरपूर येथील डोंगर हिरवागार ग्रुप कानुबाईमातेच्या गीत गायनाचा कार्यक्रम सादर करणार आहेत, अशी माहिती लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश वसंत वाणी, उपाध्यक्ष हेमंत पोटे, सचिव विजय बागडे, खजिनदार राजेंद्र शिरुडे यांनी दिली.

23 Sep 2017


एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघतर्फे (आरएसएस) उद्या (रविवारी) पिंपरी-चिंचवड शहरात 19 ठिकाणी शस्त्रपुजनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवड जिल्हा प्रचारप्रमुख अॅड. विलास कसबे यांनी दिली.


सायंकाळी साडेपाच ते साडेआठ दरम्यान शहरात विविध ठिकाणी शस्त्रपुजनाचा कार्यक्रम होणार आहे. देहू, निगडी, चिखली, भोसरी, इंद्रायणीनगर, पिंपरी, कासारवाडी, सांगवी, पिंपळेगुरव, चिंचवड, काळेवाडी, आकुर्डी, वाकड, हिंजवडी, रावेत या परिसरात रविवारी शस्त्रपुजनाचे आयोजन करण्यात आले आहे.

22 Sep 2017

एमपीसी न्यूज - मध्य रेल्वेचा विकास व प्रवाशांना मिळणा-या सुविधांमध्ये वाढ करण्याच्या उद्देशाने पुणे रेल्वे मंडळातर्फे महाप्रबंधक व लोकप्रतिनिधींची बैठक नुकतीच घेण्यात झाली.

पुणे मंडळ रेल्वे प्रबंधक कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत मध्य रेल्वेचे महाप्रबंधक देवेंद्र कुमार शर्मा, पुणे रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक बी. के. दादाभोय, सोलापूर मंडळ रेल्वे व्यवस्थापक अजय कुमार दुबे, खासदार अनिल शिरोळे, श्रीरंग बारणे, संजय पाटील, धनंजय महाडिक, शिवाजीराव आढळराव पाटील, अॅड. वंदना चव्हाण, रवींद्र गायकवाड, विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

बैठकीत रेल्वेच्या सुविधांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. प्रामुख्याने नवीन गाड्या सुरु करणे, त्या नियमित चालविणे, त्यांचे थांबे, नवीन रेल्वे मार्ग, फूट ओव्हर ब्रिज, प्लॅटफॉर्म कव्हर शेड यांसारख्या विषयांवर समस्या आणि सूचना अशा दोन्ही प्रकारे चर्चा झाली. बैठकीसाठी उपस्थित खासदारांनी रेल्वे प्रशासन ज्या ठिकाणी कमी पडत आहे, अशा बाबी समोर आणल्या. त्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन महाप्रबंधक देवेंद्र कुमार शर्मा यांनी दिले.

22 Sep 2017

कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या रयत क्रांती संघटनेवर निवड

एमपीसी न्यूज- कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर केलेल्या रयत क्रांती संघटनेच्या राज्य युवा आघाडी अध्यक्षपदी पुण्यातील न-हे येथील जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटचे उपाध्यक्ष अ‍ॅड. शार्दुल सुधाकरराव जाधवर यांची नियुक्ती झाली आहे.

शाहू सांस्कृतिक हॉल, कोल्हापूर येथे झालेल्या या कार्यक्रमात सदाभाऊ खोत, संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सुरेशदादा पाटील यांसह इतर मान्यवर उपस्थित होते. यावेळी संघटनेचा झेंडा, बिल्ला याचे अनावरण करुन कार्यकर्त्यांना शपथ देण्यात आली.

अतिशय कमी वयात युवा संसद या कार्यक्रमाच्या माध्यमातून युवकांना राजकारणात आणण्यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यामुळे राज्यभरातील ग्रामीण भागातील युवकांशी अ‍ॅड. शार्दुल जाधवर यांची नाळ जोडलेली आहे. तसेच शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी उल्लेखनीय कार्य करीत जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिट्यूटच्या विविध संस्थांचे काम उत्तमरित्या सुरु ठेवले आहे. त्यांच्या संकल्पनेतून या शैक्षणिक संस्थामध्ये अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहेत. यासोबतच राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांमध्ये देखील ते सक्रीय आहेत.

22 Sep 2017

एमपीसी न्यूज- ‘वनराई’ पुणे च्या वतीने ‘शाळा नूतनीकरण आणि सुधारणा : मॉडेल स्कूल’ या प्रकल्पांतर्गत जिल्हा पंचायत शाळांतील सुधारणा व नूतनीकरण प्रकल्प राबविण्यात येणार आहे. या प्रकल्पाची सुरूवात गुजरातमधील भरूच येथील जिल्हा पंचायत संचलित ’नवा पूनगाम प्राथमिक शाळे’पासून होणार आहे. बुधवार, दिनांक 27 सप्टेंबर 2017 रोजी सकाळी 11 वाजता या प्रकल्पाचा शुभारंभ होणार आहे. मिलिंद तलाठी (उत्पादन संचालक ‘एलांटास बेक इंडिया लि.’) यांच्या हस्ते आणि ’वनराई’चे प्रमुख रवींद्र धारिया यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पाचे उद्घाटन होणार आहे, अशी माहिती वनराई सीएसआर प्रकल्प संचालक प्रकाश जगताप यांनी दिली.

या प्रकल्पातंर्गत भरूच येथील जिल्हा पंचायत संचलित नवा पूनगाम प्राथमिक शाळेतील जेवणालयाची उभारणी व शेड घालणे, 8 वर्ग खोल्यांची सुधारणा, 2 वर्ग खोल्यांचे ​नव्याने ​बांधकाम, शाळेबाहेरील परिसरातील मोकळ्या अंगणात फरशी बसविणे अशा प्रकरची कामे करण्यात येणार आहेत.

’वनराई’चे मागील वर्षीपासून‘एलांटास बेक इंडिया लि.’बरोबर पुरंदर तालुकामधील भिवरी गावातील शाळांमध्ये नूतनीकरण, शाळांचा दर्जा सुधारण्याचे काम, शाळांमध्ये ई-लर्निंग सुविधा, शौचालय बांधणी अशा प्रकारच्या सुधारणांचे काम करणे चालू आहे. सदरचा प्रकल्प तीन वर्षाचा आहे. या प्रकल्पाच्या कामाची प्रगती पाहून ‘एलांटास बेक इंडिया लि.’ कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र कुमार यांनी ‘वनराई’ला गुजरातमध्ये हा प्रकल्प राबविण्यास प्रोत्साहन दिले.

लोकांचा खासगी शाळांपेक्षा जिल्हा पंचायत शाळांकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. जिल्हा पंचायत शाळांमध्ये मुक्तसंचार शिक्षणपद्धती असते. परंतु या शाळांमध्ये नूतनीकरण केल्यास, काही सुधारणा झाल्यास बघणार्‍यांची मानसिकता बदलून या शाळांचा दर्जा वाढण्यास मदत होईल, हा या प्रकल्पाचा प्रमुख हेतू आहे. या प्रकल्पाचा कालावधी सात महिने इतका आहे.

या कार्यक्रमाला ‘वनराई’चे रवींद्र धारिया, शिरीष डबीर (एव्हिपी एचआर, सचिव, एलांटास), सीमा अंकलकर (उपव्यवस्थापक), सुधीर मेकल (मुख्य वित्त अधिकारी, वनराई), प्रकाश जगताप (वनराई सीएसआर प्रकल्प संचालक), जिल्हा पंचायत प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी, गोमीबेन वरसावा (नवा पुनगामच्या सरपंच), मदनभाई वरसावा (जिल्हा पंचायत सदस्य), भरतभाई पटेल (तालुका पंचायत सभापती, अंकलेश्वर) ग्रामस्थ व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

22 Sep 2017


शिवसेना नगरसेविकेचा इशारा 

एमपीसी न्यूज - पवना धरण 'ओव्हारफ्लो' झाले आहे. तरीही, शहरातील नागरिकांना पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचा तुटवडा आहे. येत्या आठ दिवसात या परिसरातील पाणीपुरवठा सुरळीत करा.. अन्यथा पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना नगरसेविका मीनल यादव यांनी दिला आहे. 

याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडकरांची तहान भागविणारे पवना धरण 100 टक्के भरले आहे. धरण 'ओव्हारफ्लो' झाल्यामुळे पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. असे असताना देखील पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना मुबलक व पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. शहराच्या अनेक भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. 

मोहननगर, काळभोरनगर, आकुर्डी, दत्तवाडी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणी कमी दाबाने येत आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाच्या अधिका-यांकडे वारंवार तक्रारी केल्या आहेत. तरीही पाणीपुरवठा सुरळीत होत नाही. या परिसरातील पाणीपुरवठा येता आठ दिवसात सुरळीत करावा. अन्यथा  पालिका मुख्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा नगरसेविका मीनल यादव यांनी निवेदनातून दिला आहे.

21 Sep 2017

इंडो साइकलिस्ट क्लबतर्फे सिंहगड मॅरेथॉनचे आयोजन

एमपीसी न्यूज - इंडो साइकलिस्ट क्लबतर्फे पुण्यात प्रथमच सिंहगड मॅरॅथॉन या हिल मॅरॅथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. मॅरॅथॉनचा फ्लॅग ऑफ कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते होणार आहे.

मॅरॅथॉनची सुरुवात केंद्रीय विद्यालय, गिरी नगर येथून होणार आहे. पाच किलोमीटर प्रकारात केंद्रीय विद्यालय, गिरी नगर ते डोंजे गाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेपासून परत असा मार्ग असेल. दहा किलोमीटर प्रकारात केंद्रीय विद्यालय, गिरी नगर ते सिंहगड पायथा कमान पासून परत असा मार्ग असेल. 21 किलोमीटर प्रकारासाठी केंद्रीय विद्यालय, गिरी नगर ते सिंहगड रोडवरील शिवापूर फाटा पासून परत असा मार्ग असेल. तर 28 किलोमीटर प्रकारासाठी केंद्रीय विद्यालय, गिरी नगर ते सिंहगड पासून परत असा मार्ग असणार आहे.

28 किलोमीटर व 21 किलोमीटर या मॅरेथॉन स्पर्धात्मक पद्धतीने होणार आहेत. 28 किलोमीटर प्रकारासाठी सातशे रुपये, 21 किलोमीटरसाठी सहाशे रुपये, 10 किलोमीटरसाठी पाचशे रुपये आणि पाच किलोमीटरसाठी साडेतीनशे रुपये फी ठेवण्यात आली आहे. या फीमध्ये टायमिंग चिप, टी-शर्ट, फिनिशर मेडल, नाष्टा, प्रमाणपत्र, हायड्रेशन पॉईंट, उडी बॅग प्रत्येक सहभागी स्पर्धकाला देण्यात येणार आहे.

15 ऑक्टोबर रोजी होणा-या सिंहगड मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याकरिता ऑनलाईन नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी गजानन खैरे (9767056010), अभिजित लोंढे (9766269444), गणेश भुजबल (9422007067), अजय मुर्टेकर (7774006120), शंकर उणेचा (9822456595), विश्वकांत उपाध्याय, अजित पाटिल, यतीश भट्ट, अमित खरोटे किंवा www.iccgogreen.org या संकेतस्थळावर संपर्क करावा.

21 Sep 2017

एमपीसी न्यूज- पंडित दीनदयाळ उपाध्याय नागरी सहकारी पतसंस्थेच्या 22 व्या वर्धापनदिनानिमित्त समान नागरी कायद्याचे समर्थक सय्यदभाई आणि भारतीय किसान संघाचे ज्येष्ठ समाजसेवक शंकरराव शेलार यांना पं.दीनदयाळ उपाध्याय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. शिवाजीनगर येथील मॉडर्न कॉलेज शेजारील पी.ई.सोसायटीच्या हॉलमध्ये सोमवार, दिनांक 25 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी दिली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.ई.सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे हे असणार आहेत. तसेच महापौर मुक्ता टिळक, संस्थेचे उपाध्यक्ष दुर्गेश सावरगावकर, सचिव प्रकाश शेलार, खजिनदार अमृत लुणे यांसह सर्व संचालक उपस्थित राहणार आहेत. पुरस्काराचे हे 22 वे वर्ष असून शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरुप आहे.

पुरस्कार वितरण समारंभापूर्वी पं.तुषार रिठे आणि सहका-यांचा गीतरामायणाचा सुश्राव्य कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आला आहे.

21 Sep 2017

एमपीसी न्यूज - चिंचवड ते राजगुरूनगर अशी पीएमपीएमएलच्या वतीने बस सेवा सुरू करावी, अशी मागणी पर्यावरण संवर्धन समितीचे सचिव मदन जोशी यांनी केली आहे.

याबाबत जोशी यांनी पीएमपीएमएलचे मुख्य व्यवस्थापक तुकाराम मुंढे यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, चिंचवडगावातून व शहराच्या विविध भागातून चाकण परिसरातील कंपन्यांमध्ये नोकरीला जाणा-यांची संख्या लक्षणीय आहे. या कर्मचा-यांना दोन-दोन बस बदलून कामावार जावे लागते. त्यामुळे अधिकचे पैसे व वेळ वाया जातो.

चिंचवड स्टेशन, टेल्को, लांडेवाडी, भोसरी एमआयडीसी, मोशी, चाकण, अशी राजगुरूनगरला जाणारी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी जोशी यांनी निवेदनातून केली आहे.

21 Sep 2017

एमपीसी न्यूज - वेदांग आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिकतर्फे केस व त्वचा विकार मोफत तपासणी व औषधोपचार या एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पिंपरी मधील अजमेरा मासुळकर कॉलनी, वेदांग आयुर्वेद आणि पंचकर्म क्लिनिक येथे शनिवार (दि. 23) रोजी सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत शिबिर होणार आहे.

या शिबिरामध्ये केसांची वाढ न होणे, केस गळतीच्या समस्या, चाई येणे, टक्कल पडणे, तारुण्यपिटिका, खरूज, नायटा, डाग, सोरायसिस, इसब व विविध त्वचेच्या विकारांची तपासणी अत्याधुनिक तंत्राद्वारे करण्यात येणार आहे. तपासणी केल्यानंतर औषधांची गरज भासल्यास सात दिवसाची मोफत औषधे देखील देण्यात येणार आहेत. शिबिरात त्वचा व केस विकारांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्वचा व केस समस्याग्रस्त रुग्णांनी शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन डॉ. सचिन रोहानी यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी 9822592534 या क्रमांकावर संपर्क साधावा.

Page 1 of 82