• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
16 Jun 2017

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिकांच्या निरोगी व समाधानकारक आरोग्यासाठी माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने सवलतीच्या दरात वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याकरिता संपूर्ण मावळ तालुक्यातील 55 वर्ष व त्यावरील ज्येष्ठांची नावनोंदणी मोहीम महासंघाच्या वतीने सुरू करण्यात आली आहे.

माय माऊली महासंघाचे संस्थापक व तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या हस्ते लोणावळ्यातील रायवूड गणेश मंदिर लालटाकी या ठिकाणी उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, ज्येष्ठ नागरिक संघाचे तालुकाध्यक्ष नामदेव डफळ, लोणावळा अध्यक्ष बाबुलाल आगरवाल आदीसह लोणावळ्यातील सर्व आजी माजी नगरसेवक व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना सुनील शेळके म्हणाले ज्येष्ठ नागरिक आयुष्यभर आपल्या मुलांबाळांकरिता खस्ता खात जीवन जगतो, त्यांचे वृद्धापकाळाचे आयुष्य निरोगी व समाधानकारक जावे याकरिता मायमाऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वतीने मावळातील ज्येष्ठ नागरिकांची न‍वनोंदणी करून त्यांना सिनियर सिटिझन कार्ड वाटप करण्यात येणार आहे. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठांना आरोग्य विषयक सेवा, वैद्यकीय सेवा, मदत केंद्र, सहली, मनोरंजनात्मक कार्यक्रम, औषधे, अॅम्ब्युलन्स सेवा, बँक सेवा, समुपदेशन ही मदत देण्यात येणार आहे. तसेच वैद्यकीय सेवा 5 ते 50 टक्के सवलतीच्या दरात देण्यात येणार आहे.

नामदेव डफळ, धनंजय काळोखे, अशोक ढाकोळ यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले होते.

14 Jun 2017


पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

एमपीसी न्यूज - लोणावळा हे जगप्रसिद्ध पर्यटनस्थळ आहे. येथील पर्यटन विकासाचा आराखडा तयार करताना तो देखील जागतिक दर्जाचा बनवा, अशा सूचना पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. पावसाळ्यात लोणावळा येथे पर्यटकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात चर्चा करण्यासाठी मंत्रालयीन दालनात रावल यांनी नगरपरिषदेचे पदाधिकारी व अधिकारी यांच्या समवेत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी बोलताना लोणावळा हे पर्यटन शहर म्हणून नावारुपाला आणण्याचा विश्वासही मंत्री रावल यांनी व्यक्त केला. यावेळी मावळचे आमदार बाळा भेगडे, नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, पर्यटन विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, उपसचिव दिनेश दळवी, पोलीस उपविभागीय अधिकारी मुजावर, मुख्याधिकारी सचिन पवार, नगरसेवक राजेश बच्चे, बिंद्रा गणात्रा, प्रांत अधिकारी सुभाष भागडे, पर्यटन विकास महामंडळाच्या सरव्यवस्थापक स्वाती काळे, भाजपचे शहराध्यक्ष बाबा शेट्टी, शिक्षण मंडळाचे माजी सभापती विनय विद्वांस, नवीन भुरट, आशिष बुटाला आदींसह अधिकारी व आर्किटेक उपस्थित होते.

लोणावळा शहरात पर्यटनाच्या दृष्टीने करावयाच्या विविध कामांसाठी आराखडा बनविण्यासाठी मार्गदर्शकाची नियुक्ती करून त्याद्वारे पर्यटकांना आकर्षित करण्यासह विविध सुविधा पुरविल्या जातील व यातून पर्यटनाला मोठी चालना मिळेल, अशी माहिती यावेळी अधिकाऱ्यांनी बैठकीत दिली. पर्यटनमंत्री रावल पुढे म्हणाले पर्यटकांची सुरक्षा हा पर्यटनस्थळी महत्त्वाचा मुद्दा असून त्या दृष्टीने पोलीस विभागाने सुरक्षा यंत्रणा पुरवावी, तसेच पालिकेतर्फे त्यांना 50 सहाय्यक पुरवावेत यासह भुशी धरणावर पालिकेतर्फे प्रशिक्षण देऊन लाईफगार्ड नियुक्त करावे, अशा सूचनाही त्यांनी नगरपरिषदेला दिल्या आहे.

14 Jun 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र कुपोषण मुक्त अभियानाबाबत विविध सामाजिक संघटनांची बैठक नुकतीच लोणावळा शहरात पार पडली. या बैठकीमध्ये लोणावळा व खंडाळा लायन्स क्लबने कुपोषण मुक्त अभियानाला पाठिंबा दिला असून पुढील काळात समितीच्या समवेत लायन्स सदस्य वाड्या वस्त्यांवर जाऊन याबाबत मार्गदर्शन व जनजागृती करणार आहे.

डॉ. विजयकुमार भोर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडली. यावेळी लायन्स क्लब लोणावळा व खंडाळाच्या अध्यक्षा लायन उमा राजेश मेहता, कुपोषण मुक्त अभियानाचे प्रमुख बाबा सोनवणे, लायन रेखा पॉन, दीप्ती लुणावत, कल्पश मिरीकर, विद्या जौजेफ, सचिन त्रिभुवन यांच्यासह मुंबई, पुणे व अन्य भागातून आलेले प्रतिनिधी उपस्थित होते.

बाबा सोनवणे म्हणाले राज्य सरकारने ग्रामीण भागातील कुपोषण रोखण्यासाठी पूरक आहार योजना सुरू केली आहे. या योजनेवर राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही कुपोषणाचे प्रमाण कमी करण्यात प्रशासकीय यंत्रणेला यश येत नाही. प्रत्येक जिल्हात तालुक्यात पूरक आहार योजनेंतर्गत बालकांना अंगणवाड्यांमार्फत पूरक आहार दिला जातो. मात्र, कुपोषण कमी होण्याचे नाव घेत नसल्याने आम्ही काही सामाजिक संघटनांनी एकत्र येत महाराष्ट्र कुपोषण मुक्त अभियान सुरू केले आहे. यामध्ये कुपोषित व अतीकुपोषित बालकांचा शोध घेऊन वाड्या वस्त्यावर जाऊन त्यांची माहिती गोळा करत त्यांना स्थानिक वैद्यकीय संस्थेच्या मदतीने वैद्यकीय सुविधा तसेच पोषक आहार पुरविण्यात येणार आहे.

अहमदनगर, मुंबई, पुणे भागात अभियान सुरू केले असून मध्यवर्ती ठिकाण असलेल्या लोणावळा शहरात या सर्व भागातील सामाजिक संघटनांची बैठक घेत कामाची रुपरेषा ठरविण्यात आली. मावळ तालुका हा दुर्गम व डोंगराळ असल्याने अनेक वाड्या वस्त्यांवर आजही कुपोषणाचे प्रमाण मोठे आहे. मावळ हा कुपोषणमुक्त करण्यासाठी सामाजिक संस्थ‍ांनी या अभियानात सहयोग देण्यासाठी 9270671005 या हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधत सहभाग नोंदवावा, असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कुपोषण मुक्त अभियान हेल्पलाईनच्या विद्या जौजेफ यांनी प्रास्ताविक केले.

14 Jun 2017

एमपीसी न्यूज - शिलाटणे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संगीता गणपत भानुसघरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच भरत कोंडभर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी ही निवड करण्यात आली.

यावेळी मावळ तालुका सचिव संघटनेचे अध्यक्ष गणपत भानुसघरे, माजी सरपंच हेमंत भानुसघरे, सुरेखा कोंडभर, ज्ञानदेव भानुसघरे, ग्रामपंचायत सदस्य निलम अहिरे, माजी सरपंच शिवाजी भानुसघरे, मधुकर भानुसघरे, ज्ञानदेव मोरे, दत्ता कोंडभर, कार्ला सोसायटीचे माजी संचालक पांडुरंग भानुसघरे, संतोष कोंडभर, ग्रामसेवक आनंदा पोळ आदी उपस्थित होते.

14 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील बारमाही पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण व आकर्षण बिंदू असलेल्या लायन्स पॉईटला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरीच्या तोंडावर सर्वदूर लोखंडी रेलिंगचे सुरक्षा कठडे लावण्यात आले आहेत, अशी माहिती वन निरीक्षक वैभव बाबर यांनी दिली. 

लायन्स पॉईट, मोराडी शिखर, शिवलिंग पॉईट ते टायगरस लिप हा सर्व परिसर म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन आहे. आयएनएस शिवाजी जवळील घाट चढून एअर फोर्समार्गे जस जसे आपण अॅम्बे व्हॅलीच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतो तस तसे आपल्याला या परिसरातील निर्सगरम्य व अल्हाददायीपणा, डोंगर दर्‍यांमधून ऊन्हाळ्यात सुध्दा दिसणारी धुक्याची चादर, कोकण परिसराचे विहंगम दृष्य मनाला प्रसन्न करते. लायन्स पॉईटचा हा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असून तो हातवण व कुरवंडे गावांच्या सिमेवर असल्याने त्याचा हवा तसा विकास झालेला नाही. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून देखील शहरापासून दूर असलेला हा भाग पर्यटन विकासापासून कायम वंचित राहिला होता. मागील काही वर्षापासून हे ठिकाण नाईट लाईफचे ठिकाण बनले होते. 

पुणे व मुंबईकर तरुण तरुणी व हाय प्रोफाईल मंडळींची रात्र जागविण्यासाठी या ठिकाणी वाढलेली वर्दळ व सोबत मद्य व अंमली पदार्थांचा वापर यामुळे लायन्स पॉईट म्हणजे मद्यपींचा अड्डा अशी या ठिकाणाची ओळख होऊ लागली होती. हुल्लडबाजपणा व फाजिल आत्मविश्वासामुळे याठिकाणी अनेक तरुण तरुणींचे प्राण गेले आहेत. पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी वारंवार रात्री अपरात्री धाडी ठाकत कारवाई केली, अनेकांवर गुन्हे दाखल झाले. वन विभागाने देखील येथील गैरप्रकार रोखण्यासाठी लायन्स पॉईट परिसराला दगडाची सुरक्षा भिंत बांधत लोखंडी गेट बसविले तसेच सायंकाळी सातनंतर पॉईट पर्यटकांसाठी बंद केला आहे. मात्र स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता वन विभागाने काही दुकाने बनवून ती स्थानिकांना दिली आहेत. 

पॉईट परिसराची देखभाल व दुरुस्ती कामाकरिता संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात पॉईटवर पर्यटकांच्या सुविधेकरिता फिरते शौचालय लावण्यात येणार आहे. भिमाशंकरच्या धर्तीवर पॉईटवर लाकडी पॅगोड उभारण्यात आला आहे. याठिकाणी बसून विश्रांतीसोबत निर्सगाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता संपुर्ण पॉईटला दरीच्या बाजुने लोखंडी रेलिंग करण्यात आलेले आहे. तसेच भविष्यात लायन्स पॉईटवर आजुनही काही नवनविन सुविधा उपलब्ध करुन येथील पर्यटन वाढीसाठी वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पर्यटकांनो हुल्लडबाजीला आवर घाला !

लायन्स पॉईटच्या दरीला सर्वदूर लोखंडी रेलिंग लावून हा पॉईट वन विभागाने संरक्षित केला आहे. मात्र तरी देखील काही हुल्लडबाज पर्यटक रेलिंगच्या वरुन दरीच्या तोंडावर जाऊन सेल्फी काढताना दिसतात. तेव्हा पर्यटकांनो हुल्लडबाजीला आवर घाला असे म्हणावेच लागते. लायन्स पॉईटच्या दरीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेकरिता रेलिंग करण्यात आले. पर्यटकांनी देखील याचे भान ठेवत सुरक्षित पर्यटनांचा आनंद घ्यावा अशी माफक अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.

13 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात घडलेल्या दुहेरी हत्याकांडाचा शिताफिने उलगडा करत आरोपींना अटक केलेल्या लोणावळा ग्रामीणच्या पोलीस पथकाचा वेहेरगाव ग्रामस्त व नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

तपास पथकातील लोणावळा ग्रामीणचे पोलीस उपनिरीक्षक अनिरुध्द गिझे, पोलीस नाईक अमित ठोसर, मयुर अबनावे व जितेंद्र दिक्षित यांनी अतिशय शिताफिने आरोपींचा खबर्‍यांच्या  मार्फत मागमूस काढत दोन जणांना ताब्यात घेत अटक केली. त्याच्या या कार्याबद्दल वेहेरगाव ग्रामस्तांच्या वतीने माजी सरपंच गणपत पडवळ, तंटामुक्तीचे अध्यक्ष मधूकर पडवळ, माजी सरपंच संतोष रसाळ, उपसरपंच दत्तात्रय पडवळ, शंकर पडवळ, तानाजी पडवळ यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. मागील सव्वा दोन महिन्यांपासून जिल्ह्यातील सर्व पोलीस यंत्रणा या आरोपींच्या शोधासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत होते.

13 Jun 2017

 

एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने शहरातील झाडांचे जतन व संरक्षण करण्यासाठी गठित करण्यात आलेल्या वृक्ष प्राधिकरण समितीच्या सदस्यपदी भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष हर्षल भिमाजी होगले यांची नियुक्ती करण्यात आली.

नगराध्यक्षा सुरेखा जाधव, मुख्याधिकारी सचिन पवार, उप नगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या हस्ते होगले यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

13 Jun 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेचा आँनलाईन निकाल आज जाहिर झाला. यामध्ये लोणावळा विभागाचा निकाल हा 89.34 टक्के ऐवढा लागला. रायवुड विभागातील मुलीची शाळा असलेली आँक्झिलयम काँन्व्हेंट स्कूल, तुंगार्ली मधील डाँन बाँस्को हायस्कूल, तुंर्गी येथिल तुंग माध्यमिक विद्यालय व आँल सेंट चर्च स्वराज्यनगर या चार शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. लोणावळा विभागातील 19 शाळांमधून 1614 विद्यार्थ्यांनी दहावीची परिक्षा दिली होती यापैकी 1442 विद्यार्थी उत्तिर्ण झाले आहेत.

लोणावळा विभागाचा शाळा निहाय निकाल कंसात टक्केवारी

आँक्झिलियम काँन्व्हेंट हायस्कूल रायवुड (100), डाँन बाँस्को हायस्कूल तुंगार्ली (100), तुंग माध्यमिक विद्यालय तुंर्गी (100), आँल सेंट चर्च (100), व्हि.पी.एस हायस्कूल गवळीवाडा (92.34), गुरुकुल विद्यालय मराठी माध्यम तुंग‍ार्ली (88.52), डिसी हायस्कूल खंडाळा (87.09), डाँ. बी.एन.पुरंदरे विद्यालय बाजारपेठ (68.44), अँड. बापुसाहेब भोंडे हायस्कूल भांगरवाडी (93.06), लोणावळा नगरपरिषद खंडाळा माध्यमिक (79.16), लोणावळा नगरपरिषद लोणावळा माध्यमिक (88.88), लोणावळा नगरपरिषद उर्दु माध्यमिक (97.43), एकविरा विद्या मंदिर कार्ला (96.34), शांतीदेवी गोपीचंद गुप्ता विद्यालय मळवली (93.08), स्व. वामनराव हैबतराव देशमुख विद्यालय देवघर (84.31), शांतीसदन हायस्कूल रायवुड (76.47), सोजर माध्यमिक विद्यालय कुरवंडे (87.87), आंतरभारती बालग्राम भूशी (72.22), गुरुकुल इंग्रजी माध्यम तुंगार्ली (94.11).

12 Jun 2017

एमपीसी न्यूज - ज्यावेळेस सार्थक आणि श्रुती हे भुशी धरणाच्या टेकडीवर सांयकाळी सात वाजण्याच्या सुमारास बसले होते, तेव्हा आरोपींनी त्यांच्या जवळ येत त्यांना हटकले होते. त्यानंतर ते परत टेकडीच्या खाली निघून गेले होते. काही वेळाने  परत आल्यानंतर त्यांनी ही क्रूर घटना केली. दुस-यांदा जेव्हा आरोपी टेकडीच्या दिशेने येत होते. तेव्हाच सार्थक आणि श्रुती यांनी वेळीच धोका ओळखला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते, असे कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी सांगितले.

या घटनेतील दोन्ही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्यापैकी एकावर चोरीचे गुन्हे दाखल आहेत. तर दुस-याने एका मुलीला पळवून आणले आहे. घटनेच्या दिवशी सार्थक आणि श्रुती भुशी धरणाच्या टेकडीवर बसलेले असताना आरोपींनी त्यांना हटकले होते. त्यानंतर ते खाली गेले आणि थोड्या वेळाने त्यांनी खाली जाऊन जवळपास कुणी नाही याची खात्री केली आणि परत वर आले. टेकडीवर येताच त्यांनी चाकुच्या धाकाने दोघांनाही जवळच्याच झुडपात नेले. तेथे नेल्यानंतर त्यांनी सार्थकचे कपडे काढले. नंतर श्रुतीचे कपडे काढत असताना सार्थकने त्यांना विरोध करत चाकू पकडण्याचा प्रयत्न केला. या दरम्यान आरोपीने त्याच्या गळ्यावर चाकुचे वार केले आणि डोक्यावर दगडाने प्रहार केले. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, श्रुतीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केल्यानंतर आरोपीने सार्थकच्या शर्टाने तिचे हात बांधले आणि त्याच शर्टाने गळा आवळला. ती खाली कोसळल्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातला. यामध्ये ती गतप्राण झाली. नंतर आरोपींनी दोघांच्याही अंगावरील कपडे काढले आणि पुरावे नष्ट करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केला. हे सर्व करत असताना तेथील स्थानिक तरुणांनी या दोघांनाही पाहिले होते. ग्रामीण पोलीस अधिक्षक सुवेझ हक यांनी पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर केल्यानंतर या तरुणांनी पुढे येत पोलिसांना याची माहिती दिली आणि नंतर आरोपींचा सुगावा लागला.

तत्पूर्वी पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी अनेक प्रयत्न केले होते. पोलीस दलातीलच दोघांना प्रेमी युगूल बनवून त्याच ठिकाणी पाठवले होते. दोघांच्याही नातेवाईंकांकडे चौकशी केली होती. शिवाय हजारो फोन कॉल्स तपासले होते. दोघांच्याही मित्र-मैत्रिणीकडे चौकशी केली होती, परंतु हाती काही लागत नव्हते. पोलिसांनी याप्रकरणी माहिती देणा-यास पन्नास हजाराचे बक्षीस जाहीर केले होते. त्यामुळे या हत्याकांडाचा उलगडा होण्यास मदत झाली, असे नांगरे पाटील यांनी सांगितले. यावेळी नांगरे पाटील यांनी या हत्येचा छडा लावणा-या पथकास 40 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

घटनेच्या दुस-याच दिवशी आरोपींपैकी एकाला पोलिसांनी लोणावळ्यातूनच ताब्यात घेतले होते. परंतु आरोपीने चतुराई दाखवत सुटका करून घेतली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या मागावर राहत त्याचे फोन कॉल्स आणि इतर घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवले होते. यावेळी विश्वास नांगरे पाटील यांनी या हत्येचा छडा लावणा-या पोलीस सुवेझ हक यांच्यासह एसआयटी पथकातील पोलीस निरीक्षक दयानंद गावडे, सुनील पवार, सुनील पाटील, सहपोलीस निरीक्षक राजेश रामाघरे, अंकुश माने, अरविंद काटे, पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिजे, प्रकाश शितोळे पोलीस कर्मचारी अमित ठोसर, मयुर आबनावे, जितेंद्र दीक्षित, शैलेंद्र कंठोळी, कसबेकर सचिन गायकवाड, असलर आत्तर प्रदीप खिळे या सर्वांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. 

हत्येचा घटनाक्रम

:- 2 एप्रिल रोजी सायंकाळी सार्थक आणि श्रुती लोणावळ्यातील आयएनएस शिवाजीजवळ असलेल्या टेकडीवर फिरण्यासाठी गेले होते.

:- 3 एप्रिल रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास भुशी धरणाच्यावर असलेल्या डोंगरात दोघांचे मृतदेह आढळले.

:- 4 एप्रिलपासून पोलिसांनी हत्येचा तपास सुरू करत दोघांच्याही मित्र-मैत्रिणिची चौकशी सुरू झाली.

:- त्याच दिवशी घटना घडल्याच्या ठिकाणापासून काही अंतरावर सार्थकची दुचाकी आणि गॉगल सापडला.

:- 1 मे रोजी सार्थक आणि श्रुतीच्या नातेवाईकांनी पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचा आरोप केला. त्यांनी 20 दिवसात आरोपींना अटक न केल्यास रास्ता रोको करण्याचा इशारा दिला.

:- 3 मे रोजी सार्थकच्या आईने आत्मदहनाचा इशारा दिला.

:- 6 मे रोजी ग्रामीण पोलिसांनी तपासासाठी एसआयटी टीम स्थापन केल्याची घोषणा केली.

:- 11 जून रोजी पोलिसांनी लोणावळ्यातून एका आरोपीला अटक केली. तर अन्य एक फरार असल्याची माहिती समोर आली. आरोपीने दारूच्या नशेत काही लोकांजवळ ही हत्या केल्याचे सांगितले होते. हीच माहिती खबऱ्यांमार्फत लोणावळा ग्रामीण पोलिसांपर्यत पोहोचली आणि त्याला अटक करण्यात आली.

12 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील डबल मर्डर प्रकरणी पुणे ग्रामीण पोलीस व एलसीबीकडून रविवारी अटक करण्यात आलेला आरोपी सलीम उर्फ सॅन्डी शब्बीर शेख (वय 20, रा. रेल्वे पोर्टरचाळ, लोणावळा) यांची आज शहर पोलीस ठाण्यात चौकशी करत त्यांच्या घर परिसराची झडती घेण्यात आली. आज दुपारी सलीमला वडगाव मावळ न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

सिंहगड महाविद्यालयात मेकॅनिकल अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारा सार्थक दिलीप वाकचौरे (वय 22, रा. चणेगावरोड, सात्रळ राहुरी, सोनेगाव, जिल्हा अहमदनगर) व संगणकीय अभियांत्रिकीच्या तिसर्‍या वर्गात शिकणारी श्रुती संजय डुंबरे (वय 21, रा. ओतूर गेस्ट हाऊसजवळ, ता. जुन्नर, जिल्हा पुणे) हे दोघेजण दोन एप्रिलच्या रात्री लोणावळा आयएनएस शिवाजीसमोरील एस पॉईंट डोंगरावर दुचाकी गाडीने फिरायला गेलेले असताना रात्री साडेआठ नंतर घटनास्थळी आलेल्या सलीम शेख व त्यांचा सहकारी असिफ शेख यांनी किरकोळ पैशांसाठी सार्थक व श्रुती यांना अर्धनग्न करून दगडाने आणि अज्ञात हत्याराने त्यांच्या डोक्यात व शरीरावर वार करून खून केला होता. तीन एप्रिल रोजी दुपारी ही घटना उघडकीस आल्यानंतर लोणावळा शहरासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला होता.

Page 9 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start