• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
29 Jun 2017


एमपीसी न्यूज - क्रांतीनगर, ओळकाईवाडी येथे राहणारे बबन जयवंत धिंदळे (वय 38) यांना मानसिक त्रास देऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यापैकी दोन महिलांना अटक केली असून एक जण फरार आहे.

ताहिरा अजीज शेख (वय 40) व रजिया मेहबूब शेख (वय 37, दोघेही रा.क्रांतीनगर, ओळकाईवाडी, लोणावळा) यांना अटक केली असून मुबिन मेहबूब शेख हा आरोपी अद्यपी फरार आहे.

ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बबन धिंदळे यांच्या पत्नीचे शेजारी राहणाऱ्या मुबिन मेहबूब शेख या मुलासोबत प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून वरील तिनही आरोपींनी संगनमताने बबन धिंदळे आणि त्याची पत्नी दिपाली यांना मानसिक त्रास दिल्याने त्या त्रासाला कंटाळून बबन धिंदळे यांनी आत्महत्या केल्याची फिर्याद त्यांच्या भावाने दिली आहे. रविवार (दि. २५) रोजी धिंदळे यांनी राहत्या घरात पत्नी व मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करत स्वतः आत्महत्या केल्याची घटना घडली होती. धिंदळे यांच्या भावाच्या फिर्यादीवरुन वरील आरोपींवर भादंवी कलम 306, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणच्या प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड हे करीत आहे.

29 Jun 2017

एमपीसी न्यूज - महाविद्यालयीन शिक्षण घेताना वाईट गोष्टींपासून लांब रहा असा सल्ला लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी विद्यार्थ्यांना दिला.

आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दिनाच्या निमित्त पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने लोणावळा महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन केले होते. यावेळी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, प्रभारी प्राचार्य डॉ. जे.ओ.बच्छाव, कनिष्ठ विभागप्रमुख सविता पाटोळे, राहुल सलवदे, डी.आर. पाटील, अॅनी वर्गीस, रक्षा शेट्टी, शहनाज बेग, शशिकला ठाकर, सविता मिंढे, रोहन वर्तक, पोलीस हवालदार कामठे आदी उपस्थित होते. 

शिवथरे म्हणाले, समाज विघातक शक्ती पैशाच्या मोहात पाडून भारतातील तरुण पिढी बरबाद करतात यासाठी गैरकृत्यात सुधारणा करण्यासाठी महाविद्यालयीन युवकांना पुढाकार घ्यावा, सोशल मीडियाचा वापर कार्यालयीन वापरासाठी करावा. राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी पावसाळ्यात वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांना सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले. पोलीस निरीक्षक जाधव म्हणाले, विद्यार्थ्यांनी व्यसनापासून दूर रहावे तसेच समाजात काही चुकीची घटना घडत असल्यास त्याबाबत जागरुकपणे पोलिसांना माहिती द्यावी. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. निलेश काळे यांनी केले तर प्रा. दीपक तारे यांनी आभार मानले.

29 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात जुन महिन्याच्या शेवटच्या शनिवारपासून सुरु झालेली पावसाची संततधार आजही कायम आहे. शहरात मागील पाच दिवसात तब्बल 680 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पाच दिवस लोणावळ्यात सुरु असलेल्या पावसाने इंद्रायणी नदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. यावर्षी पावसाळा पुर्वीची नदीनाले सफाईची कामे वेळेवर न झाल्याने शहरात अनेक भागांमध्ये गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

लोणावळ्यात शनिवारी 150 मिमी, रविवार 57 मिमी, सोमवार 180 मिमी, मंगळवार 108 मिमी व बुधवार 185 मिमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाची संततधार आजही कायम आहे. मौसमी पावसामुळे लोणावळा व खंडाळा परिसरातील ओढे नाले वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण, टायगरर्स लिप्स जवळील घुबड तलाव भरुन वाहू लागले आहे. वलवण व तुंगार्ली धरणांच्या पाणीसाठ्यात च‍ांगली वाढ झाली आहे. लोणावळ्यात जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागल्याने शनिवार व रविवार सह आठवड्याचे सातही दिवस लोणावळ्यातील रस्ते व राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी व पर्यटकांची गर्दी पहायला मिळत आहे. 

दरम्यान, वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलीस आणि या कोंडीतून मार्ग काढताना स्थानिक नागरिक यांच्या मात्र नाकीनऊ येऊ लागल्याने सोशल मीडियावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून पावसासोबत हवादेखील मोठ्या प्रमाणात सुटू लागली आहे. लोणावळ्यात आज अखेर 1054 मिमी पाऊस झाला असून मागील वर्षीच्या तुलनेत तो खुप जास्त आहे. मागील वर्षी आज अखेर केवळ 250 मिमी पाऊस झाला होता.

27 Jun 2017


एमपीसी न्यूज - लोणावळा नगरपरिषदेतील भाजपाचे नगरसेवक व सभागृहाचे गटनेते भरत हारपुडे यांचे कुणबी जातीचे प्रमाणपत्र जिल्हा जात प्रमाणपत्र समितीने १९ जुन रोजी अवैध ठरविले होते. समितीच्या या निर्णया विरोधात हारपुडे यांनी मा. उच्च न्यायालयात दाखल केली असून आज न्यायालयाने समितीच्या निर्णयाला स्थगिती दिल्याने हारपुडे यांना दिलासा मिळाला आहे.

हारपुडे यांनी डिसेंबर २०१६ मध्ये झालेली लोणावळा नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक कुणबी या जात दाखल्यावर लढविली होती. हारपुडे हे कुणबी जातीचे नाहीत, त्यांचा हा दाखल बोगस असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांचे प्रतिस्पर्धी वसंत काळोखे व गणेश इरले यांनी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली होती. यावर कागदपत्रांची पडताळणी करुन निर्णय देताना समितीने हारपुडे यांचा कुणबी जातीचा दाखला अवैध ठरविल्याने हारपुडे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले होते. या निर्णयाच्या विरोधात हारपुडे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने हारपुडे यांची य‍ाचिका दाखल करुन घेत समितीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

27 Jun 2017


एमपीसी न्यूज - मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर लोणावळ्याजवळील दर्ग्यासमोर आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास दुचाकी व मध्य रेल्वेची आपत्कालिन ट्रक यांच्यात समोरासमोर झालेल्या भिषण अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार झाला.

गननजय निनाद घरत (वय 20, रा. गोंधळपाडा, अलिबाग) असे या मयत झालेल्या युवकाचे नाव असून तो पुण्यातील डीवाय पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. गननजय हा त्याच्या दुचाकीवरुन पुण्याला महाविद्यालयात जात असताना लोणावळ्याजवळील दर्ग्यासमोर त्याची समोरुन येणार्‍या ट्रकला समोरासमोर धडक बसली. यामध्ये डोक्याला गंभिर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला.

27 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावाळा शहरात शनिवारी जोरदार हजेरी लावत विसावलेल्या वरुण राजाने सोमवारी दुपारनंतर पुन्हा जोरदार वर्षाव केल्याने अवघ्या 24 तासात 180 मिमी पाऊस झाला. यावर्षातला हा सर्वांधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे.

मागील काही दिवसांपासून रिमझिम पडणार्‍या पावसाने शनिवारपासून चांगलाच जोर धरला आहे. शनिवारी 24 तासात 150 मिमी पाऊस झाल्यानंतर रविवार व सोमवारी दुपारपर्यंत पावसाने विश्रांती घेत दुपारी 3 नंतर पुन्हा जोरदार सरी सुरु झाल्या, रात्रभर जोरदार पाऊस झाल्याने सरासरी 24 तासात 180 पावसाची नोंद झाली. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरास सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. ओढे नाले दुथडी भरुन वाहत असून सकल भागात तसेच अनेक सोसायट्यांमध्ये पाणी साचले आहे. 

लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने यावर्षी नालेसफाई तसेच इंद्रायणी नदी सफाईची कामे योग्य प्रकारे न झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी तुंबण्याचे प्रकार झाले आहेत. ग्रामीण भागात विशेषतः महामार्गाच्या लगत बांधकाम व्यावसायिक व स्थानिकांनी बांधकाम करताना मोठ्या प्रमाणात भराव केल्याने पाण्याचे नौसर्गिक प्रवाह बाधित झाले आहेत. यामुळे रस्त्या लगतची भात शेती व परिसरात सर्वदूर पाणी पसरले आहे.

26 Jun 2017

एमपीसी न्यूज - पावसाळा म्हटले की, पुणे-मुंबईचे पर्यटक लोणावळ्यातील भुशी धरण कधी ओव्हर फ्लो होते याची वाट पहात असतात.यावर्षी भुशी धरण ईदच्या दिवशीच ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांना चांगलीच ट्रिट मिळाली आहे. पर्यटकांची पंढरी अशी ओळख असलेले भुशी धरण आज सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ओव्हर फ्लो झाले. धरणाच्या सांडव्यावरुन पायर्‍यांवर पाणी वाहू लागल्याने उपस्थित पर्यटकांनी एकच जल्लोष केला.


गेल्यावर्षी भुशी धरण 5 जुलै रोजी ओव्हर फ्लो झाले होते. यंदा तो 9 दिवस आधीच ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांमध्येही उत्साह पहायला मिळत आहे. मागील दोन दिवसांपासून लोण‍वळ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे केवळ दोन दिवसातच भुशी धरण ओव्हर फ्लो झाले आहे. डोंगरभागात जास्त पाऊस झाल्याने शनिवारी 40 टक्के असलेले धरण आज सकाळी ओव्हर फ्लो झाले आहे.

शनिवार रविवार व आज ईदची सुट्टी यामुळे पर्यटकांना सलग तीन दिवस सुट्टी आहे. त्यात भुशी धरण ओव्हर फ्लो झाल्याने पर्यटकांसाठी हा दुग्धशर्करा योगच म्हणावा लागेल. धरणाच्या पायर्‍यांवर बसून पावसात भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. धरण ओव्हर फ्लो झाल्याने स्थानिक विक्रेत्यांनी देखील आनंद व्यक्त केला.

25 Jun 2017
 

क्रांतीनगर येथील घटना

एमपीसी न्यूज - पत्नीच्या प्रेमसंबंधामुळे पतीने पत्नी आणि मुलीची दोरीने गळा आवळून हत्या करत गळफास घेऊन आत्महत्या केली. तसेच 11 वर्षाच्या मुलाचाही गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केला. परंतु, सुदैवाने तो बचावला आहे. ही धक्कादायक घटना आज (रविवारी) लोणावळ्याजवळील भांगरवाडी हनुमान टेकडी लगत असलेल्या क्रांतीनगर वसाहतीमध्ये घडली.

बबन जयवंत धिंदळे (वय 38 वर्ष) त्यांची पत्नी दीपाली (वय 30 वर्ष) आणि मुलगी दिप्ती (9 वर्ष) अशी या मृतांची नावे आहेत. बबनने त्याचा मुलगा रोहित (वय 11 वर्ष) याचीही हत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तो गळा आवळल्यानंतर बेशुद्ध पडल्याने बचावला. त्याच्यावर लोणावळ्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पत्नी दीपाली हिचे प्रेमप्रकरण उघड झाल्याने चिडून जाऊन बबन याने कुटुंबातील सर्वांना संपवून आत्महत्या केली असल्याचे वास्तव समोर आले आहे. या घटनेची माहिती समजताच क्रांतीनगर परिसरात शोककळा पसरली.

ओळकाईवाडीतील क्रांतीनगर येथे बबन धिंदळे आणि त्याचे कुटुंबीय राहत होते. बबन हा पेंटिंगचा व्यवसाय करत होता. काही दिवसांपूर्वी त्याला पत्नीचे बाहेरच्या एका व्यक्तीसोबत प्रेम संबंध असल्याचे समजल्याने रविवारी सकाळी पावणेआठ वाजण्यापूर्वी पत्नी दीपाली आणि दोन्ही मुलांचा दोरीने गळा आवळत खून केला. यावेळी मुलगा रोहित हा बेशुद्ध पडला. तिघेही मृत्यू पडल्याचे समजून बबनने स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. मात्र, यात दीपाली आणि दिप्तीचा मृत्यू झाला व रोहित हा बचावला आहे.

घटनेची माहिती समजताच लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी घटनास्थळाला भेट देत माहिती घेतली. या प्रकरणाचा अधिक तपास लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील या करत आहेत.
25 Jun 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात मागील २૪ तासात तब्बल १५० मिमी पावसाची नोंद झाली अाहे. पावसाची संततधार व ढगांचा गडगडाट आजही कायम आहे. महाराष्ट्रात मान्सून कधी सक्रिय होणार याचे वेध सर्वांना लागलेले असताना लोणावळ्याला मात्र पावसाने चांगलेच झोडपले आहे.

जुन महिन्यात आज अखेरपर्यंत ५२૪ मिमी पावसाची नोंद झाली आहे. शनिवारी दिवसभर व रात्री झालेल्या जोरदार पावसाने शहरातील नांगरगाव, भांगरवाडी, तुंगार्ली, गवळीवाडा, बाजारपेठ, खंडाळा या सर्वच भागात पाणी साचल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतआहे. 

लोणावळा शहर व ग्रामीण परिसरात शनिवारी रात्रीपासून ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी पहायला मिळत आहे. मागील काही दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले डोंगरभागातील धबधबे आज पुर्ण क्षमतेने वाहू लागले आहेत.शहरात अनेक ठिकाणी नाले सफाईची कामे पुर्ण न झाल्याने अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेले असून नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो आहे. शनिवारची आख्खी रात्र पावसाने परिसर झोडपून काढला.

पावसाचा जोर असाच दिवसभर कायम राहिल्यास पर्यटकांना आकर्षित करणारे भुशी धरण भरण्याची शक्यता आहे. सलग सुट्टयांमुळे लोणावळ्यात पर्यटकांची संख्या वाढली आहे. वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी शहरात आलेल्या पर्यटकांना हा पाऊस एक पर्वणी ठरला आहे.

24 Jun 2017

एमपीसी न्यूज - तीन दिवसांच्या सलग सुट्टयांमुळे लोणावळ्यातील पर्यटनस्थळांवर पर्यटकांची गर्दी वाढल्याने आज सर्वच पर्यटनस्थळे पर्यटकांच्या गर्दीने तुंडूब भरली होती. दिवसभर पावसाचा जोर देखील चांगला राहिल्याने पर्यटकांनी पावसात भिजण्याचा आनंद घेतला. सहारा पूल धबधबा, भूशी धरण व डोंगरातील धबधबा, लायन्स पॉईंट, शिवलिंग पॉईंट, गिधाड तलाव ही सर्वच ठिकाणे पर्यटकांनी गजबजली होती.

शनिवार व रविवार या सुट्टयांना जोडून सोमवारी ईदची सुट्टी आल्याने मोठ्या संख्येने पर्यटक घाटमाथ्यावरील मध्यवर्ती पर्यटनस्थळ असलेल्या लोणावळा शहरात कुटुंबीयांसमवेत दाखल झाले आहेत. सकाळपासून पर्यटकांची गर्दी वाढू लागल्याने राष्ट्रीय महामार्गासह शहरातील रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मागील पंधरा दिवसांपासून लोणा‍वळ्यात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाल्याने परिसर हिरवागार झाला आहे. या हिरव्यागार डोंगरातून आज दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे वाहणारे धबधबे पर्यटकांना आकर्षित करत होते.

या निसर्गरम्य परिसरात सेल्फी काढण्यासोबत कांदा भजी, मका भजी, चहा यांचा आस्वाद घेताना पर्यटक दिसत होते. काही ठिकाणी सर्रासपणे हुक्का पिणारे पर्यटक दिसत होते. भुशी धरण भरण्यास अद्याप काहीसा वेळ असला तरी धरणाच्या पायर्‍यांवर बसून पर्यटकांनी पावसाच्या सरी अंगावर घेतल्या. धरण परिसरात तसेच लायन्स पॉईंटवर पर्यटकांच्या सुरक्षेकरिता रेलिंग करण्यात आली आहेत. तरी देखील काही पर्यटक धोकादायकरित्या दरीच्या तोंडावर जाऊन फोटो काढताना, डोंगर माथ्यावर उंच ठिकाणी जाताना दिसत होते. लोणावळ्याप्रमाणेच खंडाळ्यात व पवनानगर परिसरात पर्यटकांनी गर्दी केली होती.

दिवसभरात 28 मिमी पाऊस

लोणावळा शहरात आज दिवसभरात 28 मिमी पाऊस झाला. शहरात यावर्षी आज अखेर 374 मिमी पाऊस झाला आहे. मागील वर्षी शहरात आज अखेर केवळ 94मिमी पाऊस झाला होता.

Page 7 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start