• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
14 Jul 2017

एमपीसी न्यूज- लोणावळा शहर व ग्रामीण परिसर‍ात गुरुवारी दुपार पासून जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. मागील 18 तासात शहरात तब्बल 213 मिमी पावसाची नोंद झाली असून नदी नाले दुथडी भरुन वाहू लागले आहेत.

जून महिन्यात जोरदार सरी बरसल्यानंतर मागील आठवडा भरापासून पावसाने विश्रांती घेतली होती. गुरुवारी (दि.१३) दुपारी दोन वाजल्यापासून लोण‍वळ्यात ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाला सुरुवात झाली ती संततधार अद्यापही कायम आहे.

गुरुवारी दुपारी २ ते शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यत 213 मिमी पावसाची नोंद झाली. लोणावळ्यात यावर्षी आज अखेरपर्यत 1978 मिमी पाऊस झाला आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून काही रस्ते जलमय झाले आहेत. डोंगरभागातून मोठ्या प्रमाणात धबधबे वाहू लागले आहेत. पवनाधरणाच्या पाणीसाठ्यात चांगली व‍ाढ झाली असून धरणांने 50 टक्क्याचा टप्पा ओलांडला आहे.

14 Jul 2017

देश पातळीवरील सुरक्षा अधिकार्‍यांचे लोणावळ्यात प्रशिक्षण शिबिर
एमपीसी न्यूज- कामगारांचे आयुष्य कामाच्या स्थळी सुरक्षित होण्यासाठी कंपनीमधील सुरक्षा अधिकार्‍यांना सुरक्षेसंदर्भातील सर्व घटकांची माहिती असणे नितांत गरजेची असल्याचे मत भारतीय व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संघटना (ओशिया) चे अध्यक्ष अवदेश मल्लया यांनी व्यक्त केले.

औद्योगिक क्षेत्रात काम करणार्‍या कामगारांचे आरोग्य कामाच्या ठिकाणी कसे सुरक्षित करता येईल याबाबत देश पातळीवरील विविध कंपन्यांच्या सुरक्षा अधिकार्‍यांचे दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिर लोणावळ्यात सुरु आहे. शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी अवदेश मल्लयां यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

भारतीय व्यावसायिक सुरक्षा व आरोग्य संघटना देश पातळीवर विविध संस्था व संघटना यांच्या माध्यमातून समाजाला सुरक्षे संदर्भात प्रशिक्षण व माहिती देण्याचे काम करत आहे. मुख्य प्रशिक्षक डाँ. मनजित सिंग म्हणाले, भारतामध्ये सुरक्षा साधनांचा वापर करण्याकडे दुर्लक्ष केले जाते मात्र असे करणे हे धोकादायक आहे. कामगारांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी मोठ्या कंपन्यांमध्ये सुरक्षा अधिकारी यांची नेमणूक केली जाते. मात्र बहुधां ते प्रशिक्षित नसल्याने कामगारांच्या सुरक्षेला बाधा निर्माण होते. याकरिता या सुरक्षा अधिकार्‍यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याचा उपक्रम ओशिया संस्थेने हाती घेतला आहे.

लहानपणापासून सुरक्षेची भावना प्रत्येकांच्या मनात रुजण्यासाठी ओशिया संस्था शाळा, मह‍विद्यालये, संस्थामध्ये जाऊन हे प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे. अपघात घडणे हे आपल्या हातात नसले तरी अपघात आपण टाळू शकतो, याकरिता दुर्घटना टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी याबाबतचे प्रशिक्षण या शिबिरांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
कौटुंबिक सुरक्षितता याविषयावर प्रथम सत्रात डॉ. विलास जोशी यांनी उपस्थित‍ांना मार्गदर्शन केले. डाँ. मनजिंत सिंग, कंपनीचे सरचिटणीस सुनील भालेराव, भारत लांडे व संपदा गायखे यांनी शिबिरात सहभागी झालेल्या सुरक्षा अधिकार्‍यांना शारीरिक, मानसिक व सामाजिक आरोग्य व सुरक्षा याविषयासह अपघात कसे रोखावेत यावर प्रशिक्षण दिले.

13 Jul 2017


एमपीसी न्यूज - वर्षाविहारासाठी भुशी धरणावर आलेल्या ठाणे येथील एका कुटुंबातील मुलीची छेड काढीत चार हुल्लडबाज तरुणांनी अपशब्द वापरीत त्यांच्यावर हल्ला करून जखमी केल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता घडली. याप्रकरणी लोणावळा पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे.

सचिन तुकाराम शिंदे (वय 22), शरद सखाराम शिंदे (वय 28, दोघेही रा.आंबोली, ता.खेड), महेश अंकुश शिंदे (वय 24, रा.पुणे) आणि गणेश गणपत साबळे (वय 25, रा.साबळेवाडी, ता.खेड), अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी मुलगी (रा. नालासोपारा, ठाणे) ही तिचा होणार पती, भाऊ आणि वहिनी यांच्यासह भुशी धरण येथे वर्षाविहारासाठी आली होती. ते भुशी धरणाच्या पायऱ्यांवर बसून पाण्यात खेळत असताना मागे बसलेल्या सचिन, शरद, महेश व गणेश या चार  हुल्लडबाज तरुणांनी फिर्यादीसह तिच्या कुटुंबातील व्यक्तींच्या अंगावर मुद्दामून पाणी उडविण्यास सुरुवात केली. याबाबत फिर्यादी तरुणीने सदर हुल्लडबाज तरुणांना तसे करण्याबाबत विचारणा केली असता, त्यापैकी एकाने अश्लील शद्ब वापरत तरुणीची छेड काढली.

यामुळे राग अनावर झालेल्या फिर्यादीने एका तरुणाच्या गालात चापट मारली. त्यानंतर सदर तरुणांनी फिर्यादी आणि तिच्या कुटुंबातील व्यक्तींना हाताने तसेच लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत अश्लील वक्तव्य केले. याबाबत लोणावळा शहर पोलिसांनी भादवी कलम 354, 323, 34 अन्वये गुन्हा दाखल केला असून  पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे हे करीत आहेत.

12 Jul 2017

एमपीसी न्यूज- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशान्वे महामार्गापासून पाचशे मीटर अंतरावर दारु विक्री करण्यास बंदी घालण्यात आलेली असताना गवळीवाडा नाका येथील बंद झालेले महाराष्ट्र वाईन शॉप नॅशनल चिक्कीलगत नव्याने सुरु करण्यात आले आहे. ते बंद करण्यात यावे अशी मागणी शिवसेनेच्या गटनेत्या शादान चौधरी यांनी केली आहे.

सदर दुकानाला कशाच्या आधारावर परवानगी दिली यांची माहिती मिळावी याकरिता लोणावळा शहर पोलीस स्टेशन, लोणावळा नगरपरिषद व राज्य उत्पादन विभागाकडे त्यांनी निवेदन दिले आहे.
सदर दुकान हे महामार्गापासून 500 मीटर अंतराच्या आत येत असून या वाईन शाँप जवळ बोहरी मस्जिद, मदरसा शाळा व पारसी देवस्थान आहे. तसेच हे दुकान मुख्य चौकात असल्यामुळे पार्किंगची समस्या निर्माण होऊ लागल्याने ते बंद करण्य‍ात यावे अशी मागणी चौधरी यांनी केली आहे.

12 Jul 2017

एमपीसी न्यूज- पावसाळी पर्यटनाचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या लोणावळा शहरातील दिवसेंदिवस जटिल होत चाललेली वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी मावळचे प्रांत अधिकारी सुभाष भांगडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या आढावा बैठकीत पर्यटकांना वाहने उभी करण्यासाठी शहरात व पर्यटनस्थळांवर मोठ्या प्रमाणात वाहनतळे उपलब्ध करुन देण्यावर सर्व शासकिय यंत्रणांचे एकमत झाले. याकरिता लोणावळा ते भुशी धरणापर्यत सरकारी व खाजगी मिळून 27 जागा निर्धारित करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्याधिकारी सचिन पवार यांनी दिली.

बैठकीला नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळचे तहसीलदार रणजित देसाई, लोण‍ावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, पोलीस निरीक्षक चंद्रकांत ज‍ाधव, सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील, विरोधी गटनेत्या शादान चौधरी, वन विभागाचे अधिकारी नाईकडे, ताकवले, टाटा कंपनीचे अधिकारी पाटील यांच्यासह नगरसेवक व भुशी धरण परिसरातील खाजगी जागांचे मालक आदी उपस्थित होते.

यावेळी लोणावळा ते भुशी धरण परिसरात दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या काळात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तातडीने करता येणार्‍या उपाययोजनांवर चर्चा झाली. भुशी धरण परिसरात मोठ्या प्रमाणात खाजगी जागा वाहनतळासाठी घेण्याचे ठरविण्यात आले तसेच गवळीवाडा परिसर ते मावळा पुतळा चौकापर्यत अनेक हाँटेल चालकांनी पार्किंगच्या जागांवर व्यवसाय सुरु केले आहेत काहींना पार्किंगच नाही. अशांवर कारवाई करुन पार्किंगच्या जागा मोकळ्या करण्यात येतील. तसेच वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून पर्यटकांची वाहने शहराबाहेर थांबवून त्यांना मिनी बस सारख्या सार्वजनिक वाहनांमधून पर्यटनस्थळांवर ने अाण करण्याची सोय करता येऊ शकते का यावर चर्चा झाली. 

लोणावळा शहरात कोठेही वाहने उभी करण्यासाठी जागा नाही. व्यावसायकांनी वाहनतळांच्या जागांवर व्यावसाय सुरु केल्याने वाहने सर्रास रस्त्यावर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत असल्याची बाब शादान चौधरी यांनी नगरपरिषदेच्या निदर्शनास आणुन दिली. पर्यटनस्थळांवर पर्यटकांच्या सुविधेसाठी आठ स्वच्छतागृहे लावणार असल्याचे तसेच शहर पोलिसांना पंधरा व‍ाँर्डन व वाहतूक नियंत्रणासाठी क्रेन देण्याचे नगरपरिषदेने मान्य केले. लोणावळा हे पर्यटनस्थळ असून येणार्‍या पर्यटक‍ांना व वाहतूक कोंडीला सामोरे जाण्याची जबाबदारी केवळ पोलीस प्रशासनाची नसून सर्व यंत्रणांनी याकरिता एकत्र प्रयत्न करण्याची गरज प्रांत अधिकारी सुभाष भांगडे यांनी व्यक्त केली. 

वलवण व खंडाळा परिसरात द्रुतगती महामार्गाच्या पुलाखाली वाहने उभी करुन पर्यटकांना पर्यटनस्थळांपर्यत घेऊन जाण्यासाठी साधने उपलब्ध करता येतील का यावर चर्चा करण्यात आली. दीड तास झालेल्या प्रदीर्घ चर्चेनंतर वाहतूक कोंडीची समस्य सोडविण्याला प्रथम प्राधान्य देण्याचे एकमताने मान्य करण्यात आले. प्रांत य‍ांच्यासह सर्व शासकिय अधिकार्‍य‍ांनी वाहनतळासाठी आवश्यक असलेल्या सरकारी व खाजगी जागांची प‍ाहणी केली. येणार्‍या शनिवार व रविवारी कमीत कमी वाहतूक कोंडी होऊन पर्यटन‍ाचा आनंद घेता येईल असे काम करु असा विश्वास सर्व विभागाच्या अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

शुटिंग प‍ाँईट व वलवण धरण बंद का ?

लोणावळा व खंडाळ्याची खरी ओळख असलेले वलवण धरण हे टाटा कंपनीने सुरक्षेच्या दृष्टीने तर खंडाळ्यातील शुटिंग पाँईट खाजगी विकासकाने बंद केले आहेत. हे दोन्ही पाँईट पर्यटकांसाठी खुले करण्यात यावेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी बैठकीत दिला.

11 Jul 2017

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने काढलेल्या आदेशान्वये कला व क्रीडाविषयाच्या तासिका कमी करण्यात आल्या आहेत. पूर्वी प्रत्येक विषयाला साप्ताहिक 4 तासिका होत्या त्या आता प्रयेकी 2 करण्यात आल्या आहेत. त्याच्या निषेधार्थ मावळ व मुळशी तालुक्यातील शारीरिक शिक्षण शिक्षकांनी लोणावळा येथे होणा-या क्रीडाशिक्षकांच्या बैठकीवर बहिष्कार टाकला.

लोणावळा येथील गुरुकुल हायस्कूल तुंगार्ली येथे क्रीडा स्पर्धा आयोजनासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या एकही शिक्षकाने बैठकीस सभागृहात हजेरी लावली नाही. सर्व शिक्षक सभागृहाबाहेर थांबले. कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका पूर्ववत कराव्यात यासंदर्भात सर्व शिक्षकांच्या वतीने तालुका क्रीडाधिकारी राजेश बागुल यांना निवेदन देण्यात आले.

महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर, शरद इसकांडे, सुनील मंडलिक, आनंद जांभुळकर, महिला आघाडीच्या सदस्या प्रतिभा डंबीर, मुख्याध्यापक बापूलाल तारे व दिपक तारे यांनी राजेश बागुल यांना निवेदन दिले.

कला शिक्षकाला कला व कार्यानुभव तासिका द्याव्यात, 5 वी ते 10 वी पर्यंतचे वर्ग असणा-या सर्व शाळांमध्ये कला शिक्षकाची नेमणूक व्हावी, कला शिक्षकाची पूर्वीप्रमाणे विशेष शिक्षक म्हणून नोंद व्हावी, कला-क्रीडा विषयाच्या तासिका पूर्वीप्रमाणे प्रत्येकी 4 प्रमाणे व्हाव्यात इत्यादी मागण्या यावेळी मांडण्यात आल्या.
05 Jul 2017


एमपीसी न्यूज - वर्षा विहारासाठी येणा-या पर्यटकांची वाहतूककोंडी व सुरक्षा लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी वाहतुकीमध्ये काही बदल केले आहेत. त्यानुसार भुशी धरणाकडे जाणारा मार्ग दुपारी तीननंतर सर्वच वाहनांसाठी बंद ठेण्यात येणार आहे, अशी माहिती लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांनी आज (बुधवारी) पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी लोणावळ्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव उपस्थित होते. पावसाळ्यात पर्यटकांचा वाढता ओघ, वाहतूक कोंडी तसेच अपुरे वाहनतळ लक्षात घेता लोणावळा पोलिसांनी शनिवारी, रविवारी तसेच इतर सुट्टीच्या दिवसांसाठी वाहतुकीचे नियोजन कले आहे. तसेच सुरक्षिततेसाठीही एकूण 47 अधिकारी, 231 पोलीस कर्मचारी व 63 महिला पोलिसांची एक स्ट्रायफिंग फोर्स असा बंदोबस्तही करण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केली आहे. दारू पिऊन गाडी चालवणा-यांवर वचक बसविण्यासाठी शहरात चेकिंग पॉईंटही बसविण्यात आले आहेत. तसेच गाडी रस्त्याच्या बाजूला लावून गाडीमध्ये मोठ-मोठ्याने गाणी लावून धिंगाणा घालणा-यांवरही मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.

तर लोणावळा व भूशी धरण परिसरात वाहतूक कोंडी होऊ नये. यासाठी पुढीलप्रमाणे नियम तयार केले आहेत.

तसेच वाहतुकीमध्ये पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.

# भुशी धरणाकडे जाणारा रस्ता दुपारी 3 नंतर रायवुड येथे बंद करणार

# शनिवार व रविवार अवजड वाहनांना लोणावळ्यात प्रवेश बंदी

# वळवण व खंडाळा एंट्री पॉईंटजवळ अवजड वाहने थांबविणार

# पोलिसिंगसाठी 12 सेक्टरमध्ये बंदोबस्त

# खंडाळा ते वलवण व भुशी धरण मार्ग सीसीटीव्हीच्या कक्षेत

#  जागोजागी मार्गाची माहिती देण्यासाठी सूचनाफलक

#  मुंबई पुणे जुन्या महामार्गावर गवळीवाडा परिसर ते भुशी धरण रस्त्यावर वाहने उभी करण्यास बंदी

# तसेच शहरात वाहनतळासाठीही दिशादर्शक फलक बसविण्यात येणार आहेत. त्यानुसार वाहनपार्किंग न केल्यास संबंधीत गाडीवर कारवाई करण्यात येणार आहे.

त्यामुळे पर्यटकांनी पर्यटनासाठी जाताना वरील नियमांचे पालन करावे व वर्षाविहाराचा विना अडथळा आनंद घ्यावा, असे आवाहन लोणावळा पोलिसांनी केले.

traffic


05 Jul 2017

वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सहकार्याने अजगराला जीवनदान

एमपीसी न्यूज -  मावळ तालुक्यातील बेडसे लेणीच्या पायथ्याशी आज (बुधवारी) सकाळी आठच्या सुमारास तेरा फूट लांबीच्या इंडियन रॉक पायथन जातीचा अजगर आढळला. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सहकार्याने अजगराला जीवनदान दिले. हे अजगर इंडियन रॉक पायथन जातीचे होते. ते साधारण 6 ते 7 वर्ष वयाचे नरजातीचे अजगर होते. त्याची लांबी 13 फूट व वजन 80 किलो वजनाचे होते.

बेडसे लेणीच्या पायथ्याशी सकाळी भात लावणी करणा-या शेतक-यांना अजगर एका भेकराला गिळत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने बेडसी लेणीचे सुरक्षा रक्षक संतोष दहिभाते यांना सांगितले. दहिभाते यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या पथकाला पाचारण केले. यावेळी वन्य विभगालाही याची माहिती देण्यात आली.

मात्र, आसपास जमलेल्या गर्दीमुळे भेदरलेल्या अजगराने गिळलेले भेकर बाहेर काढले. मात्र, भेकर मेले होते. यावेळी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या  निलेश गराडे, अनिल आंद्रे, गणेश फाळके, किरण मोकाशी यांनी त्या अजगराला ताब्यात घेतले व वनविभगाचे अधिकारी मंगेश सपकाळे, सोमनाथ ताकवले यांच्या स्वाधीन केले. यावेळी अजगरावर प्रथमोपचार करण्यात आले. तसेच त्याला जंगलामध्ये सोडून देण्यात आले.

05 Jul 2017


एमपीसी न्यूज - कामगारांच्या अस्तित्वावर कितीही संकटे उभी राहिली तरी त्या संकटांना सर्वशक्तीनिशी सामोरे जाऊन कामगारांचे अस्तित्व टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न करू. हा प्रयत्न करताना रस्त्यावर जरी उतरावे लागले तरी चालेल, असे मत कामगार नेते व माजी राज्यमंत्री सचिन अहिरे यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाचे पहिले राज्यस्तरीय अधिवेशन लोणावळा येथे पार पडले. या अधिवेशनात कामगारांना मार्गदर्शन करताना अहिरे बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक सुनील अहिर, निवृत्ती देसाई, शशिकांत हडकर, शिवाजी काळे, माजी नगराध्यक्ष राजू गवळी, विजय काळोखे, बजरंग चव्हाण, जी. बी. गावडे, उत्तम गीते, संजय कदम, संतोष बेंद्रे, लक्ष्मण तुपे, साईकुमार निकम आदी उपस्थित होते. नवी मुंबई, मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड, पुणे, कोल्हापूर इत्यादी शहरातील जवळपास 130 पेक्षा अधिक कारखान्यातील कामगार मेळाव्यासाठी उपस्थित होते.

गुजरातमध्ये कारखानदारी वाढावी यासाठी विविध स्तरावर सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. यामुळे महाराष्ट्रातील रोजंदारीवर गदा येण्याची मोठी भीती आहे. महाराष्ट्रातील रोजगार वाढीसाठी देखील विविध स्तरावर प्रयत्न व्हायला हवे. कामगार आपले कौशल्य पणाला लावून अस्तित्व टिकवत आहेत. आज परिस्थिती अशी आहे की कारखाना टिकला तर रोजी टिकेल आणि कामगार जगला तर युनियन टिकेल, असेही अहिरे म्हणाले.

देशातील केवळ 7 टक्के कामगार संघटित असून 93 टक्के कामगार असंघटित आहेत. हा विरोधाभास फार मोठा आहे. काही कंपन्यांमध्ये विविध कामगार संघटना अस्तित्वास असलेले चित्र दिसते आहे. परंतु या सर्व कामगार संघटनांनी कामगारांच्या अस्तित्वासाठी आपले झेंडे बाजूला ठेऊन एकत्र आले पाहिजे. या मेळाव्यात कामगारांचे वेतन ठरविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर वेतन आयोग लागू करावा, कामगार राज्य विमा योजना सर्व स्तरातील कामगारांना लागू करावी, असंघटित आणि घरेलू कामगारांसाठी बनविलेल्या सामाजिक सुरक्षा कायद्याची त्वरित अंमलबजावणी करावी, नव्याने येऊ घातलेल्या उद्योगांतील कामगारांना कारखान्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर 'वॉक टू वर्क' न्यायाने घरे देण्यात यावी आदी ठराव संमत करण्यात आले.

30 Jun 2017

मागील २૪ तासात लोणावळ्यात तब्बल २३७ मि.मी. पाऊस झाला आहे. गत सहा दिवसांपासून लोणावळ्यात सुरु असलेल्या जोरदार पावसाने शहरातून वाहणार्‍या इंद्रायणीला ग्रामीण परिसरात पुर आला आहे. सदापुर,वाकसई, डोंगरगाव, कार्ला, मळवळी परिसरात नदीचे पुराचेे पाणी परिसरात पसरले आहे. राष्ट्रीय महामार्गालगत अनेक ठिकाणी भराव झाल्याने मार्गालगत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.

शनिवार पासून सुरु झालेली पावसाची संततधार आजही कायम आहे. लोणावळ्यात मागील सहा दिवसात तब्बल ९१७ मि.मी. पावसाची नोंद करण्यात आली आहे. संततधार पावसामुळे भांगरवाडी, न‍ांगरगाव, सुमित्रा सभागृह परिसर, लोणावळा पवनानगर रस्ता, नांगरगाव रोड परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. लोणावळ्यात शनिवारी १५० मिमी, रविवार ५७ मि.मी., सोमवार १८० मि.मी., मंगळवार १०८ मि.मी., बुधवार १८५ मि.मी., गुरुवारी २३७ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

पावसाची संततधार अजूनही कायम आहे. मौसमी पावसामुळे लोणावळा व खंडाळा परिसरातील ओढे नाले वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण असलेले भुशी धरण, टायगरर्स लिप्स जवळील घुबड तलाव भरुन वाहू लागले आहे. वलवण व तुंगार्ली धरणांच्या पाणीसाठ्यात च‍ांगली वाढ झाली आहे. लोणावळा जोरदार पावसाला सुरुवात झाल्याने वर्षाविहाराचा आनंद घेण्यासाठी लाखोंच्या संख्येने पर्यटक लोणावळ्यात दाखल होऊ लागल्याने शनिवार व रविवार सह आठवड्याचे सातही दिवस लोणावळ्यातील रस्ते व राष्ट्रीय महामार्ग वाहतुक कोंडी व पर्यटकांची गर्दी पहायला मिळत अाहे.

वाहतुक कोंडी सोडविताना वाहतुक पोलीस व या कोंडीतून मार्ग काढताना स्थानिक नागरिक यांच्या मात्र नाकीनऊ येऊ लागल्याने सोशल मिडीयावर अनेक संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. गत दोन दिवसांपासून पावसासोबत हवादेखिल मोठ्या प्रमाणात सुटू लागली आहे. लोणावळ्यात आज अखेर १२९१ मिमी पाऊस झाला आहे.

Page 6 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start