• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
01 Aug 2017


एमपीसी न्यूज -
 लोणावळ्यातील खोंडगेवाडी येथे एक डेंग्यूचा रुग्ण आढळून आला आहे. याबाबतची माहिती समजल्यानंतर लोणावळा नगरपरिषदेच्या आरोग्य विभाग व पालिका कर्मचाऱ्यांनी खोंडगेवाडीत पहाणी करून परिसरात औषध फवारणी केली आहे. तसेच परिसरात कोठे डेंग्यूच्या आळ्या आहेत का याची पडताळणी सुरु केली आहे.

डेंग्युिचा प्रार्दभाव ठाळण्यासाठी नागरिकांनी कोठेही पाणी तुंबणार नाही याची दक्षता घ्यावी. साचलेल्या पाण्यात शक्यतो डेंग्यूच्या आळ्या तयार होतात याकरिता नागरिकांनी घर परिसरात कोठेही पाणी साचू देऊ नका असे आवाहन मुख्याधिकारी सचिन पवार यांनी केले आहे.

31 Jul 2017

एमपीसी न्यूज - लोणावळ्याचे माजी उपनगराध्यक्ष व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. धिरुभाई टेलर यांना विदर्भ कला साहित्य परिषदेच्या वतीने सामाजिक कार्याबद्दलचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन नागपूर येथे गौरविण्यात आले.

ऑक्सफर्ड स्पिकरर्स अॅकेडमीचे कार्यकारी संचालक डॉ. संजय रगातते, जितेंद्र दीक्षित, डॉ. वंदना बेन्झामिन, डॉ. मिलिंद वाचनेकर, बलिता अगरवाल यांच्या हस्ते कल्याणजी यांना सन्माचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी डॉ. पुरुषोत्तम भोंडे, डॉ. जयंत पानसरे, संयोजक बाळासाहेब धंदरे, डॉ. वीना सहित आदी मान्यवर उपस्थित होते. कल्याणजी यांना सामाजिक कार्यासाठी मिळालेला हा 124 वा पुरस्कार आहे.

31 Jul 2017

3 लाख 29 हजारांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वाहतूक विभागाने मागील दोन महिन्यात तब्बल 925 वाहनांवर कारवाई करत 3 लाख 29 हजार 400 रुपयांची दंड वसूली केली. यामध्ये विना हेल्मेट वाहने चालविणार्‍यांची संख्या सर्वाधिक आहे. तब्बल 287 दुचाकी चालकांवर कारवाई करत 1 लाख 44 हजार 800 रुपये दंड वसूल केला आहे.

अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या 46 वाहनांवर कारवाई करत 50 हजार दंड वसुली, विना परवाना वाहन चालविणार्‍या 39 वाहनांवर कारवाई करत 20 हजार 400 रुपये दंड, ट्रिपल सिट वाहने चालविणार्‍या 177 वाहनांवर कारवाई करत 36 हजार 200 रुपये दंड, परवाना जवळ न बाळगणे 125 वाहनांवर कारवाई व 25 हजार 400 रुपये दंड, मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे 11 जणांवर कारवाई करत 2200 रुपये दंड, फॅन्सी नंबर प्लेट असणार्‍या 16 वाहनांवर कारवाई व 4 हजार 700 रुपये दंड, नो पार्किंगमध्ये वाहने उभी करणार्‍या 184 वाहनांवर कारवाई करत 45 हजार 700 रुपये दंड तर दारू पिऊन वाहन चालविणार्‍या तब्बल 40 जणांवर खटले दाखल करण्यात आले.

लोणावळा शहराचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव व सहाय्यक पोलीस निरीक्षक अरविंद काटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुरेश माने, अनंत रावण, सुनील मुळे, पोलीस नाईक सामिल प्रकाश, जीवन गवारी, पोलीस मदतनीस दर्शन गुरव, सतिष ओव्हाळ, अंकूश गायखे, प्रकाश मराठे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

30 Jul 2017

एमपीसी न्यूज - शनिवार व रविवारी लोणावळ्यात पर्यटकांची संख्या घटल्याचे चित्र पाहायला मिळाले. दोन्ही दिवस वाहनांची व पर्यटकांची संख्या तुलनेने फारच कमी असल्याने लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग वाहतूक कोंडीमुक्त होता. धरणाकडे जाणारे मार्ग देखील मोकळे पाहायला मिळाले. पावसाने देखील चांगली उघडीप दिली आहे.

पावसाळा सुरु झाल्यापासून लोणावळ्यात दर शनिवार व रविवारी पर्यटकांची तुंबळ गर्दी होत होती. यामुळे शनिवार व रविवार स्थानिकांना घराबाहेर पडणे अवघड होत असल्याने संताप व्यक्त केला जायचा. भुशी धरण व लायन्स पाँईटकडे जाणार्‍या मार्गावर तब्बल चार ते पाच किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागत होत्या. आज मात्र या उलट परिस्थिती पाहायला मिळत होती. मागील दोन शनिवार व रविवार तर जोरदार पावसामुळे भुशी धरणाच्या पायर्‍य‍ांवर जाण्यास पर्यटकांना बंदी घालण्यात आली होती.

आता पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाच्या पायर्‍यांवर जाण्याचे निर्बंध उठवण्यात आल्याने पर्यटक धरणाच्या पायर्‍यांवर बसून भिजण्याचा मनसोक्त आनंद घेत होते. रस्ते वाहतूक कोंडीमुक्त असले तरी भुशी धरण व लायन्स पाँईट परिसरात पर्यटकांची चांगली गर्दी होती. पवन मावळ, ग्रामीण भागातील कार्ला, भाजे लेणी व धबधबा, लोहगड किल्ला परिसरात देखील पर्यटकांची संख्या आज तुलनेने कमी होती.

30 Jul 2017

एमपीसी न्यूज - भारतात राहून वंदे मातरम म्हणायला विरोध करणारे समाजवादी पक्षाचे आमदार आबु आझमी व एम आई एम पक्षाचे आमदार वारिस पठाण यांच्या विरोधात लोणावळा शिवसेनेच्या वतीने शनिवारी सायंकाळी शिवाजी महाराज चौकात निदर्शने करण्यात आली.

आझमी व पठाण हे दोन्ही नेते भारतात राहून कायम भारतीय संविधानाच्या विरोधात भुमिका घेतात. वंदे मातरम हे राष्ट्रीय गाण म्हणणार नाही असे जाहीर करुन ते समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. वंदे मातरण म्हण्याची ज्यांना लाज वाटते त्यांना भारतात राहण्याचा अधिकार नाही अशा शब्दात शिवसैनिकांनी यावेळी संताप व्यक्त केला.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी शहरप्रमुख बबन अनसुरकर, उपशहरप्रमुख मारुती खोले, संजय घोंगे, सुनील इंगुळकर, शामबाबु वाल्मिकी, हेमंत मेणे, युवा सेनेचे अजय ढम, यशोधन शिंगरे, नरेश काळवीट, एकनाथ जांभुळकर, सूर्यकांत ढाकोळ, उल्हास भांगरे, नरेश घोलप, अविनाश शिंदे, विशाल गोणते, संकेत भिवडे, दिनेश यादव, महेश यादव, नरेश ढम, अभिषेक इंगुळकर, विनायक खोलासे, अमित फाटक, दिपक जायगुडे, किरण जायगुडे, दत्ता काळवीट, अविनाश दळवी, सनी जाधव, अजय साखरे, विवेक साठे यांच्यासह शिवसैनिक व युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

27 Jul 2017


उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांची निवडणूक आयोगाकडे मागणी

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात आलेल्या तरुण व पात्र मतदार नोंदणी मोहिम अभियानाला अनुपस्थित राहिलेल्या लोणावळा नगरपरिषद शिक्षण विभागाच्या बी.एल.ओ. म्हणून नियुक्त केलेल्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी लोणावळा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.

निवडणूक आयोगाच्या वतीने तरुण व पात्र उमेदवारांची नावनोंदणी करण्यासाठी 1 जुलै ते 31 जुलै दरम्यान विशेष मोहिम राबवली होती.याकरिता लोणावळा नगरपरिषद शिक्षण विभागातील 14 शिक्षकांची बी.एल.ओ.म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.अभियान यशस्वी करण्य‍ाची जबाबदारी संबंधित शिक्षकांवर देण्यात आली होती. या शिक्षकांनी राष्ट्रीय कर्तव्य समजून तरुण व पात्र मतदारांचे अर्ज स्विकारणे अभिप्रेत असताना त्यांनी एकही अर्ज स्विकारला नाही व तो लोणावळा मंडल अधिकारी यांच्याकडे सादर केला नाही.यामुळे लोणावळ्यातील तरुण व पात्र मतदार नावनोंदणी पासून वंचित राहिले आहे. ही बाब अत्यंत गंभिर असल्याने कर्तव्यात कसूर करणे, वरिष्ठांच्या आदेशाचा अवमान करत सदर मोहिमेस अनुपस्थित राहिलेल्या शिक्षकांवर दंडात्मक कारवाई करण्याची मागणी पुजारी यांनी केली आहे.

पुजारी म्हणाले शिक्षकांनी कामे न केल्याने अनेक मतदार हे नोंदणीपासून वंचित राहिले आहे.याकरिता निवडणूक आयोगाने ही मोहिमेला पुन्हा मुदतवाढ देऊन अभियान सुरु ठेवावे.

      

27 Jul 2017


44 हजारांचा मुद्देमाल लंपास

एमपीसी न्यूज - लोहगड किल्ल्यांच्या पायथ्यालगत असलेल्या लोहगड निसर्ग या घरगुती हाँटेल मध्ये शनिवारी (दि.22) रात्री नऊ ते रविवारी (दि.23) दुपारी बारा दरम्यान अज्ञात चोरट्यांनी चोरी करत 44 हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. याप्रकरणी हाँटेल मालक सोमनाथ तुकाराम भालेराव यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार भालेराव हे बाहेर गावी असताना अज्ञात चोरट्यांनी लोहगड  निसर्ग या घरगुती हाँटेलचे खिडकीचे लोखंडी ग्रिल जाळी टिकावाने उचकटून त्या मधून हाँटेलात प्रवेश करत किर्लोस्कर कंपनीचा पंप, शासनाच्या विशेष योजनेतून मिळालेली शेतीची अवजारे, पाँलिकाँबच्या वायरचे बंडल, ड्रिल मशिन, संसार उपयोगी वस्तु, हाँटेलमधील  साहित्य व किराणा माल व सात हजार रुपये रोख असा सुमारे 44 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरुन नेहले आहेत.  तसेच हाँटेलमध्ये विष्टा करुन घाण केली आहे.

याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात भादंवी कलम 454, 457, 380, 427 अंतर्गंत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी.जे.जगताप हे तपास करत आहेत.

27 Jul 2017


एमपीसी न्यूज -  कुसगाव येथील क्रांतीनगर वसाहतीत एका अपंग युवकाने अज्ञात कारणांमुळे गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज गुरुवारी दुपारी अडीच सुमारास घडली आहे. 

समीर महादू ढाकोळ ( वय- ३५, रा. क्रांतीनगर, कुसगाव बुद्रुक, लोणावळा ) असे फाशी घेवून आत्महत्या केलेल्या अपंग युवकाचे नाव आहे. याबाबत समीर याचा भाचा शुभम दत्तात्रय दळवी (रा. ओळकाईवाडी, कुसगाव, लोणावळा) याने तक्रार दाखल केली आहे.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार समीर हा दोन्ही पाय व एका हाताने अपंग होता. तसेच अविवाहित होता. तो कुसगाव येथील ओळकाईवाडी येथे राहणारा असून, सध्या तो त्याच्या बहिणीकडे क्रांतीनगर येथे रहात होता.  त्याने गुरूवारी दुपारी अडीचच्या पूर्वी क्रांतीनगर येथील राहत्या घरातील सिलींनग फॅनला नायलॉन दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अद्याप आत्महत्ये चे कारण समजले नसून, या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे आर. एस. पलांडे हे करीत आहे.

23 Jul 2017

पावसाचा जोर ओसरला

एमपीसी न्यूज - दोन दिवस मुसळधार कोसळल्यानंतर पावसाचा जोर शनिवारी रात्रीपासून कमी झाला आहे. आज दिवसभर पावसाचा जोर कमीच राहिल्याने पर्यटकांसाठी बंद करण्यात आलेल्या भुशी धरणाच्या पायर्‍यांवर जाण्यास पर्यटकांना प्रवेश द्या, अशी मागणी करत नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांनी पोलीस प्रशासनाच्या बंदीला विरोध करत पर्यटकांना पायर्‍यांवर जाण्यास प्रवेश मोकळा करून दिला.

याविषयी बोलताना नगराध्यक्षा जाधव व पुजारी म्हणाले मागील 35 वर्षात भुशी धरणाच्या पायर्‍यांवर एकाही पर्यटकाचा अपघात झालेला नसताना पोलीस प्रशासन स्वतःची जबाबदारी टाळण्यासाठी पर्यटकांची अडवणूक करत आहे. 

लोणावळा शहरात दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे तसेच मागील आठवड्यात दोन पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर शनिवारी खबरदारीचा उपाय म्हणून पर्यटकांना भुशी धरण परिसरात जाण्यास बंदी केली होती. आज देखील धरणाच्या सांडव्यावरून वेगात पाणी वाहत असल्याने पायर्‍यांवर जाण्यास बंदी कायम ठेवत पायर्‍यांच्या खालील भागातील पाण्यात भिजण्यासाठी पर्यटकांना जाण्याची मुभा देण्यात आली होती. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास भुशी धरणावर गेलेल्या लोकप्रतिनिधींनी पोलिसांची बंदी झुगारून पर्यटकांना धरणाच्या पायर्‍यांवर घेऊन गेले व प्रवेश मोकळा करून दिला.

23 Jul 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे लोणावळ्यातील टाटा कंपनीचे लोणावळा धरण पुर्ण क्षमतेने भरल्याने पावसाचा अंदाज घेऊन धरणातील पाणी इंद्रायणी नदी पात्रात सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या गावांना व नागरिकांना सतर्कतेचा इशारा मावळचे तहसिलदार रणजिद देसाई यांनी दिला आहे.

टाटा कंपनीच्या लोणावळा धरणातून भिवपुरी येथिल विज निर्मिती केंद्राला पाणी सोडण्यात येते. मात्र खोपोली व रायगड जिल्ह्यात पडत असलेल्या मुसळधार पावसाने बहुतांश नद्यांना पुर आला असल्याने लोणावळा धरणातील पाणी रायगड जिल्ह्यात न सोडता लोणावळ्यातून वाहणार्‍या इंद्रायणी नदीत सोडण्यात येणार असल्याचे पत्र टाटा कंपनीने मावळ प्रशासनाला दिले आहे.

या पत्राचा हवाला देत तहसिलदार देसाई यांनी सर्व पोलीस व प्रशासकिय यंत्रणांना याबाबत सुचित करुन नदीकाठच्या घरांना व नागरिकांना सतर्क राहण्याबाबत कळविले असून पाणी सोडण्याचा निर्णय झाल्यास नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात यावे असे सुचित केले आहे. वास्तविक लोणावळ्यातून वाहणार्‍या इंद्रायणीला देखिल सर्वत्र पुल आला आहे. असे असताना या नदीपात्रात पाणी सोडल्यास लोणावळा शहरात पाणी घुसण्याची भिती वर्तवली जात आहे.

Page 4 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start