• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
11 Aug 2017

भारतीय पुरातत्व विभागाचे गडाच्या डागडुजीकडे दुलर्क्ष

एमपीसी न्यूज- लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या एकविरा देवीच्या गडाच्या पायर्‍या पावसाच्या पाण्यांमुळे वाहून गेल्यामुळे भाविकांसाठी मार्ग धोकादायक झाला आहे. मागील अनेक वर्षापासून भारतीय पुरातत्व विभागाचे गडाच्या पायर्‍या व सुरक्षा भिंतीकडे दुलर्क्ष झाल्यामुळे देवीच्या गडावर जाण्याचा प्रवास धोकादायक झाला आहे.

कोळी आग्री समाजाचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामीनी आई एकविरेचे मंदिर व बुध्दकालीन कार्ला लेणी वेहेरगावात आहे. ऊन वारा पावसामुळे या लेणी परिसराच्या सुरक्षा भिंती व पायर्‍या ठिसूळ होऊन ढासळू लागल्या आहेत. मागील तीन वर्षात चार वेळा गडावर दरड कोसळण्याचे प्रकार घडले असून सुरक्षा भिंती पडल्यामुळे गडावर फिरणे धोकादायक झाले आहे.

पायर्‍यांचा भराव खचल्याने पायर्‍यांवर चालणे अवघड झाले आहे. पाच पायरी मंदिराच्या खालील बाजूला पायरीचा केवळ एक दगड शिल्लक राहिला असून भराव खचल्याने मोठा खड्डा पडला आहे. लेणीच्या पायर्‍या देखील मागील दहा वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून तुटल्याने बंद करण्यात आल्या आहेत. गडावर येणार्‍या भाविकांकडून लेणी पाहण्यासाठी पैसे घेणारे पुरातत्व खाते कामांकडे मात्र दुलर्क्ष करत असल्याने पुरातन वास्तु नामशेष होऊ लागल्या आहेत. महिनाभरात देवीच्या गडावर शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात होणार आहे. लाखो भाविक देवीच्या दर्शनासाठी गडावर येणार असल्याने भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी तातडीने गडाच्या पायर्‍या दुरुस्त कराव्यात अशी मागणी वेहेरगावातील गणेश पवार, संदीप देशमुख, प्रविण देशमुख, दीपक देशमुख व ग्रामस्थांनी केली आहे.

वेहेरगावातील सामाजिक कार्यकर्ते व मनविसेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी गडाच्या पायर्‍यांची छायाचित्रे व निवेदन पुणे जिल्हाधिकारी यांना दिले आहे तर एकविरा देवस्थानचे अध्यक्ष अनंत तरे व शिवसेनेचे आमदार, खासदार यांनी भारतीय पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांना निवेदन दिले असूनही पुरातत्व विभाग या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याने सर्वत्र नाराजी व्यक्त होत आहे.

रस्त्यांवर मोठमोठे खड्डे

कार्ला फाटा तर गड पायथा व गडावर जाणारा मार्ग या सर्वच ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून पाण्याची डबकी तयार झाली आहेत. वारंवार तक्रारी व आंदोलन करुनही मावळचा सार्वजनिक बांधकाम विभाग कामाकडे दुलर्क्ष करत आहे. पावसाळ्यात वेहेरगाव व दहिवली ग्रामस्थांना पाण्यातून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सार्वजनिक ब‍ांधकाम विभागाने नवरात्रीपूर्वी रस्ते दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिक‍ांनी दिला आहे.

Steps 1

09 Aug 2017

एमपीसी न्यूज - सातव्या वेतन आयोगाच्या मुख्य मागणीसह नगरपरिषद कर्मचार्‍यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांनी आज एक दिवसीय काम बंद आंदोलन केले.

लोणावळा नगरपरिषदेच्या कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू करणे, वेतनवाढ, सहाय्यक अनुदान आदी 16 मागण्यांसाठी हे काम बंद आंदोलन करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून नगरपरिषद कर्मचारी वेळोवेळी शासनाकडे मागण्यांसाठी पाठपुरावा करत आहे. मात्र, शासन मागण्यांकडे गांभीर्याने पाहत नसल्याने आज हे एक दिवसीय काम बंद आंदोलन करण्यात आले.

कर्मचार्‍य‍ांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी काँग्रेसचे काही नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले होते. पुढिल आठ दिवस नगरपरिषद कर्मचारी हाताला काळ्या फिती लावून काम करणार आहेत. यानंतर देखील शासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास 21 ऑगस्टपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्यात येणार आहे.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज- मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर कोंबड्या वाहून नेणाऱ्या रिकाम्या टेम्पोला झालेल्या अपघातात चालक व क्लिनर जखमी झाले आहेत. आज दुपारी साडेबारा वाजता औंढे गावाजवळ हा अपघात झाला.

खंडाळा महामार्ग पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघालेला कोंबड्याचा रिकामा टेम्पो क्र. (MH 04 DS 8362) हा किमी 58/600 जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने द्रुतगती मार्गावरुन खाली झाडावर आदळल्याने हा अपघात झाला. यामध्ये चालक बिलाल अहमद वहाब फाकिरशा (वय 23) व क्लिनर मो. शब्बीर अख्तर इनामदार (वय 31, दोघेही रा. भिवंडी) हे जखमी झाले आहेत.

खंडाळा महामार्गचे पोलीस उपनिरीक्षक तांबिटकर, पोलीस हवालदार वसंत कदम व कर्मचारी यांनी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज- लोणावळा रेल्वे स्थानकाजवळ लोकमान्य टिळक टर्मिनस बिदर एक्सप्रेस खाली पडून रेल्वेमध्ये खाद्य पदार्थ विक्री करणाऱ्या एका फेरीवाल्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल, मंगळवारी दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास लोणावळा रेल्वे स्थानकाजवळील म्हसोबा मंदिर येथे घडली.

राजेश बेंस (वय-20, रा. खचरानगरा, उद्दीनमोड, इटावा, उत्तरप्रदेश) असे रेल्वेतून पडून मृत्यू झालेल्या फेरीवाल्याचे नाव आहे.

लोणावळा लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दर मंगळवारी सुटणारी लोकमान्य टिळक टर्मिनस बिदर एक्सप्रेस ही मंगळवारी दुपारी अडीच वाजता लोणावळा स्थानकात येते. एक्सप्रेस लोणावळ्यात आल्यावर राजेश हा त्या एक्सप्रेसमध्ये त्याच्याकडे असलेला माल नेहमीप्रमाणे विकण्यासाठी चढला होता. माल विकत असताना एक्सप्रेस सुरू होऊन पुण्याकडे रवाना झाली होती. लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म नंबर एक सोडताच राजेश धिम्यागतीने सुरू असलेल्या एक्सप्रेस मधून उतरत असताना त्याचा तोल जावून तो गाडीतून खाली पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

या घटनेचा पुढील तपास लोणावळा लोहमार्ग पोलीस करीत आहेत.

07 Aug 2017

एमपीसी न्यूज - भुशी धरणावर फिरायला येणाऱ्या पर्यटकांचे मोबाईल चोरणारे तीन चोरटे पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीचा माल हस्तगत करण्यात आला आहे.

जुलीयस अॅलेक्स फर्नांडीस (वय- 30), सागर नामदेव वाघमारे (वय- 26, दोघेही रा. गणेशनगर, येरवडा, पुणे), संदीप मुंजाळ (वय- 31, रा. कामराजनगर, येरवडा, पुणे), अशी या अटक करण्यात आलेल्या मोबाईल चोरांची नावे आहेत.

शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाकण भागातील पर्यटक रविवारी लोणावळ्यातील भुशी धरणावर फिरायला आले होते. ते वर्षा विहाराचा आनंद घेत असताना त्यांनी एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलेला तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल व 11 हजार 500 रुपयांची रोकड चोरून घेऊन जाताना लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी चोरट्यांना ताब्यात घेतले. चोरलेला मुद्देमाल त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस तपास करत असून आजून काही गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.

07 Aug 2017

एमपीसी न्यूज- एटीएम मशीन मधून पैसे काढण्यासाठी एका ज्येष्ठ नागरिकाने एटीएमसेंटर जवळ दोन अनोळखी इसमांची मदत घेतली मात्र तीच मदत त्यांच्या फसवणुकीला कारणीभूत ठरली. लोणावळ्यातील स्टेट बँकेमधून ग्रीन कँश काऊंटरचा वापर करत या दोन भामट्यांनी तब्बल तीन लाख 40 हजारांची रोकड व एक्सिस बँकेमधून 14 हजार रुपये काढत पोबारा केला आहे. शनिवारी (दि.5) सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.

याप्रकरणी सुशील धोंडिबा धनकवडे (वय 61 वर्ष, रा. जाखमाता मंदिराशेजारी, तुंगार्ली लोणावळा) यांनी फसवणूक झाल्याची फिर्याद लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. धनकवडे हे 31 मे रोजी रेल्वेमधून सेवानिवृत्त झाले आहे. त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेली ग्रँज्युटी व फंडाची रक्कम रुपये 13 लाख त्यांनी स्टेट बँक आँफ इंडिया लोणावळा शाखेत जमा केली होती. पैकी 10 लाख रुपये त्यांनी पत्नीच्या दुसर्‍या खात्यावर जमा केली होती तर पेन्शनची रक्कम धरुन 3 लाख 68 हजार 439 रुपये त्यांच्या स्टेट बँकेतील खात्यात जमा होते.

शनिवारी सकाळी त्यांनी कँनरा बँकेच्या एटीएम मधून 4 हजार रुपये काढले व स्टेट बँकेच्या एटीएम मधून 10 हजार रुपये काढण्यासाठी एटीएम मध्ये उभ्या असलेल्या दोन अनोळखी व्यक्तीची मदत घेतली. त्या व्यक्तींकडे पैसे काढण्यासाठी कार्ड व एटीएमचा पिन क्रमांक दिला. त्या व्यक्तीने धनकवडे यांना दहा हजार रुपये काढून दिले व सोबत धनकवडे यांच्या कार्ड सारखे दिसणारे दुसरेच कार्ड त्यांच्या हातात दिले.

धनकवडे गेल्यानंतर काही वेळांनी त्या कार्डच्या व पिन क्रमांकाच्या सहाय्याने आरोपींनी स्टेट बँक व एक्सिस बँकेच्या एटीएम मधून तब्बल 3 लाख 54 हजार रुपयांची रोकड काढून पोबारा केला आहे. एटीएम सेंटर मधील सीसीटीव्हीच्या फुटेज मधील त्या दोन अज्ञात चोरट्यांना धनकवडे यांनी ओळखले असून त्या आधारे लोणावळा शहर पोलीस तपास करत आहेत.

06 Aug 2017

एमपीसी न्यूज - दारुच्या नशेत आंबोलीतील कावळेशेत येथे 700 फूट खोल दरीत कोसळलेल्या दोन पर्यटकांचा मृतदेह लोणावळ्याच्या शिवदुर्ग टीमने काल (शनिवारी) दुपारी दोनच्या सुमारास बाहेर काढला.

दरीत पडलेल्या प्रताप उजगरे, बीड आणि इम्रान गारदी, गडहिंग्लज या दोन युवकांच्या मृतदेहांपैकी प्रताप उजगरे याचा मृतदेह गेल्या चार दिवसांच्या शोध कार्यानंतर स्थानिक शोध पथकाने बाहेर काढला.  मात्र, इम्रान गरदीचा मृतदेह धबधब्यात वाहून गेल्याने गेले पाच दिवस स्थानिक बचाव पथक इतर पथकांना शोधण्यात अपयश येत होते. त्यामुळे शनिवार (दि.5) शिवदुर्ग मित्र ,लोणावळाची टीम घटनास्थळी पोचली.

या टीमने 700 फूट खोल दरीत दोरीच्या साह्याने उतरून शोध कार्य सुरू केले, दाट धुके, पाऊस आणि कोसळणारा धबधबा या सगळ्या अडचणींवर मात करत सकाळी 11 च्या सुमारास मृतदेह शोधण्यास यश मिळाले आणि दुपारी दोन वाजता तंत्र शुद्ध पद्धतीने  मृतदेह वर काढून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला.

यावेळी  शिवदुर्गाच्या सुनील गायकवाड, अजय राउत, आनंद गावडे, राजेंद्र कडू, गणेश गिध, रोहित वर्तक व प्रवीण देशमुख यांनी ही कामगिरी केली.

amboli 1

06 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणारा एक अवजड कंटेनर अंमृतांजन ब्रिजजवळ उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. महामार्ग पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचा-यांनी कंटेनर बाजूला करुन वाहतूक सुरळीत केली. हि घटना आज सकाळी साडेसातच्या सुमारास घडली.

पुणे- मुंबई महामार्गावर आज सकाळी अंमृतांजन ब्रिज जवळ् कंटेनर उलटला. त्यामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीवेळ थांबवण्यात आली होती. हा कंटेनर अवजड असल्याने तो बाजूला करण्यास काहीवेळ लागला. त्यामुळे याठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या घटनेमुळे मुंबईकडे जाणा-या प्रवाशांना मात्र त्रास सहन करावा लागला.

महामार्ग पोलीस आणि आयआरबीच्या कर्मचा-यांनी क्रेनच्या सहायाने कंटेनर बाजूला काढून वाहतूक सुरळीत केली.

05 Aug 2017

एमपीसी न्यूज- सकल मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी नऊ आँगस्ट क्रांतीदिन या दिवशी मुंबईत काढण्यात येणार्‍या मराठा मूक मोर्चाबाबात जनजागृती करण्यासाठी लोणावळा शहर व ग्रामीण भागात आज दुचाकी रॅली काढून जनजागृती करण्यात आली.

मागील वर्षभर राज्यभरातील विविध शहरांमध्ये मराठा समाजाच्या वतीने लाखोंचे मूकमोर्चे काढत शासनाचे लक्ष सकल मराठा समाजाच्या मागण्याकडे वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र शासनाकडून अद्याप मागण्याची दखल घेण्यात आलेली नसल्याने मुंबईत न भुतो ना भविष्यती असा विराट मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात जास्तीत जास्त मराठा समाजाने हजर रहावे याकरिता लोणावळा शहरातील भांगरवाडी राम मंदिर येथून दुचाकी रॅली काढण्यात आली. शिवाजी महाराज चौक, जयचंद चौक, मावळा चौक, गवळीवाडा नाका, वलवण, वरसोली, वाकसई, कार्ला या परिसरात दुचाकीवरुन रँली काढून युवकांनी समाजाला एकत्र येऊन रॅलीत सहभागी होण्याचे आवाहन केले. दोन दिवसांपूर्वी कार्ला गावात सकल मराठा समाजाची नियोजनाची बैठक झाली होती.

03 Aug 2017


एमपीसी न्यूज - देशाला प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाण्याचे सामर्थ्य शिक्षणात असल्याने विद्यार्थी मित्रांनो खूप शिका व शिक्षणाचा चांगला उपयोग करा, असा सल्ला प्रसिद्ध सिने अभिनेत्री व माजी राज्यसभा खासदार शबाना आझमी यांनी दिला.

लोणावळा नगरपरिषदेच्या शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती तसेच महिला व बालकल्याण समितीच्या वतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी व मुख्याध्यापक पुरस्कार सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शबाना आझमी बोलत होत्या. यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती अर्पणा बुटाला, महिला व बालकल्याण समिती सभापती रचना सिनकर, उपसभापती जयश्री आहेर यांच्यासह नगरसेवक व नगरसेविका उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते दहावी व बारावीतील गुणवंत विद्यार्थी व शाळांच्या मुख्यध्यापकांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पुढे बोलताना शबाना आझमी म्हणाल्या की, मुलांनो शिक्षणाचा उपयोग आपण कसे करता यावर तुमचे भविष्य आधारित आहे. शिक्षणांमुळे तुमच्या विचारांना श्रीमंती मिळत असते.

अध्यक्षीय भाषणात बोलताना नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या  बक्षिसांमुळे विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळत असते याकरिता नगरपरिषदेच्या वतीने मुलांना सव्वालाख रुपयांची रोख बक्षिसे वितरित करण्यात आली आहेत. लोणा‍वळा शहरात सुरू असलेल्या स्वच्छता मोहिमेत सिने अभिनेते व राज्यसभेचे खासदार जावेद अख्तर व शबाना आझमी सहभाग घेणार आहे, असेही जाधव यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्पणा बुटाला यांनी केले तर प्रतिभा दरेकर व चित्रा जोशी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. रचना सिनकर यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Page 3 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start