• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
16 Aug 2017

लोणावळ्यात एक गाव एक दहिहंडी

एमपीसी न्यूज- जाखमाता गोविंदा दहिहंडी पथक तुंगार्ली यांनी सहा थरांचा मनोरा रचत लोणावळा शहरातील मानाची पहिली व एकमेव हंडी मंगळवारी रात्री 9.55 वाजता फोडली. त्यांना प्रथम क्रमांकाचे 51 हजार रुपये रोख व चषक देण्यात आले तसेच वैयक्तिक बक्षिसे देखील देण्यात आली. 

मावळ वार्ता फाऊंडेशन, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्स, लोणावळा शहर पत्रकार संघ, स्पेसलिंक केबल नेटवर्क व सर्व राजकीय पक्ष यांच्या वतीने मागील अनेक वर्षापासून शिवाजी महाराज चौकात लोणावळा शहर दहिहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी भांगरवाडी येथील मानाची हंडी व शहरात मागील वर्षी नव्याने सुरु झालेल्या दोन हंड्या यावर्षी रद्द झाल्याने शहरात पुन्हा एकदा एक गाव एक दहिहंडी महोत्सव झाल्याने नागरिकांनी व गोविंदा पथकांनी जल्लोष केला.

दुपारी दोन वाजता नगराध्यक्षा सुरेखा जाधव व आयोजन समितीच्या सदस्यांच्या हस्ते दहीहंडीचे पूजन करून महोत्सवाला सुरुवात करण्यात आली. मुंबई, ठाणे, घाटकोपर, पनवेल, वडाळा, पाचपाखडी भागातून आलेल्या तब्बल 47 गोविंदा पथकांनी या मानाच्या हंडीला सलामी दिली तर लोणावळा शहर व ग्रामीण भागातील 14 संघांनी सल‍ामी देत महोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. समितीच्या वतीने 5 लाख 55 हजार 555 रुपयांची बक्षिसे वाटप करण्यात आली.

मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय तथा बाळा भेगडे, तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनील शेळके, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत वाघमारे, उद्योजक सुधाकर शेळके, नारायण मालपोटे यांनी महोत्सवाला भेट देऊन शुभेच्छा दिल्या. लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव, उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी, मावळ पत्रकार संघाचे अध्यक्ष दत्तात्रय गवळी, नगरसेवक नितीन आगरवाल, संजय घोणे, दिलीप दामोदरे, सुधीर शिर्के, रचना सिनकर, संध्या खंडेलवाल, मंदा सोनवणे, उमा मेहता, मावळ वार्ता फाऊंडेशनचे अध्यक्ष विनय विद्वांस, कार्यक्रमाचे अध्यक्ष राजेंद्र चौहान, श्री स्वामी समर्थ प्रमोटर्सचे डाँ. किरण गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश शितोळे, मावळ वार्ताचे संचालक संजय आडसुळे आदी मान्यवर सोहळ्यात उपस्थित होते.
सातव्या थरावर मानाची हंडी फोडण्यासाठी रात्री साडेआठ नंतर सुरुवात झाली. प्रथम तेरा संघांचे लॉट पाडण्यात आले. मात्र त्या फेरीत कोणत्याही संघाली हंडी फोडता न आल्याने हंडी एक टप्पा खाली घेत कार्यक्रमस्थळी उपस्थित असलेल्या चार स्थानिक संघांचे लॉट पाडण्यात आले. यामध्ये प्रथम क्रमांक‍ाची चिठ्ठी निघालेल्या तुंगार्ली गावातील जाखमाता गोविंदा पथकाने सहाव्या थरावर हंडी फोडली. यानंतर चौकात जाखमाता पथकाने जल्लोष साजरा केला. आता पर्यत सहा वेळा जाखमाता संघाने मानाची हंडी फोडण्याचा मान मिळविला आहे. मावळ वार्ता फाऊंडेशन व लोणावळा शहर पत्रकार संघाचे सदस्य यांनी महोत्सवाचे संयोजन केले होते.

Dahi 1

14 Aug 2017एमपीसी न्यूज - पर्यटकांची आकर्षणस्थळे असलेल्या लोणावळ्यातील भुशी धरण व मळवली जवळील भाजे धबधबा याठिकाणी अज्ञात चोरट्यांनी पर्यटकांच्या बॅगा चोरल्याच्या घटना रविवारी घडल्या आहेत.

भुशी धरणाजवळ झालेल्या चोरी प्रकरणी योगेश सतिष गुरई (वय 26, रा. अंधेरी ईस्ट, मुंबई) यांनी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. योगेश व त्यांचे सहकारी यांनी भुशी धरणाजवळील हॉटेल लेक साईट व्ह्यू समोर रस्त्यावर लावलेल्या कारची काच तोडून गाडीतील कपडे असणारी बॅग पळविण्यात आली आहे. यामध्ये रोख रक्कम व कागदपत्रे, ओळखपत्रे अशी 6 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव तपास करत आहेत.

भाजे धबधबा येथील चोरी प्रकरणी पर्यटक नेहा शिवाजी पाटील (वय 24, रा. पिंपळेगुरव, महाराजा हॉटेलजवळ पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. नेहा पाटील व त्यांचे सहकारी भाजे धबधब्याखाली वर्षाविहाराचा आनंद घेताना बाजूला कोरड्या जागेवर एका बॅगमध्ये 4 मोबाईल, रोख रक्कम व ओळखपत्रे ठेवली होती. ती बॅग अज्ञात चोरट्यांनी पळवली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील तपास करत आहेत.

14 Aug 2017एमपीसी न्यूज - कुणबी या जातीच्या दाखल्यावर लोणावळा नगरपरिषदेची निवडणूक लढविलेले भाजपचे नगरसेवक सत्ताधारी गटाचे गटनेते भरत मारुती हारपुडे यांनी जात पडताळणी समितीच्या व उच्च न्यायालयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात मिळविलेली स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने उठविल्याने हारपुडे यांचे नगरसेवक पद धोक्यात आले आहे.

हारपुडे यांनी लोणावळा नगरपरिषदेची डिसेंबर 2016 मध्ये झालेली सार्वत्रिक निवडणूक कुणबी या जातीच्या दाखल्यावर लढवली होती. विजयी झाल्यानंतर सहा महिन्याच्या आत त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करायचे होते. मात्र, जात पडताळणी समितीने हारपुडे यांनी सादर केलेला जातीचा दाखला बोगस असल्याचा ठपका ठेवल्याने हारपुडे यांचे पद धोक्यात आले होते. 

समितीच्या या निर्णया विरोधात त्यांनी उच्च न्यायालयात स्थगिती घेतली होती. न्यायालयाच्या सुनावणीनंतर ती स्थगिती उठल्याने हारपुडे यांनी सर्वोच्च न्यायालयात स्थगिती घेतली होती. मात्र, ती देखील उठविण्यात आल्याने हारपुडे यांचे पद धोक्यात आले आहे. याबाबत पुणे जिल्हाधिकारी आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

14 Aug 2017एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सहारा समूहाच्या अॅम्बी व्हॅलीच्या लिलाव प्रक्रियेला सुरुवात झाली असून 37 हजार कोटी रुपये ही किमान बोली असणार आहे. अॅम्बी व्हॅलीच्या लिलावासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या परिसमापक अधिका-याने यासंदर्भात लिलावाची नोटीस प्रसिद्ध केली आहे. 

सहाराचे प्रमुख सुब्रतो रॉय यांना गुंतवणूकदारांचे एकूण 5 हजार 92.6 करोड रुपये सेबी सहारा रिफंड खात्यात जमा करावयाचे होते. त्यासाठी सर्वोच्च न्यायालयाकडून एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र या मुदतीत ही रक्कम सेबीकडे जमा न केल्याने अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहे.

लोणावळ्या जवळील सहाराचा अॅम्बी व्हॅली सिटी हा एकूण आठ हजार 900 एकर जागेवर राबविलेला प्रोजेक्ट आहे. याची एकूण किंमत 39 हजार करोड इतकी आहे. याबाबत अनेक दिवसांपासून गुंतवणूकदारांसोबत सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू होता. गुंतवणूकदारांचे 5 हजार 92.6 करोड रुपये सेबीकडे जमा करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. यासाठी सहारा प्रमुखांना एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, रॉय यांनी पैसे भरण्यास असमर्थता दर्शविल्याने सर्वोच्च न्यायालयाने अॅम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश दिले होते. 

त्यानंतर सहाराच्या वकिलांनी न्यायालयात 15 हजार करोड रुपये भरण्याचा प्रस्ताव न्यायालयासमोर मांडण्यात आला होता. त्यावर न्यायालयाने लिलावाची प्रक्रिया ठरल्याप्रमाणे सुरू राहील. मात्र सहाराने सेबीच्या सहारा रिफंड अकाऊंटमध्ये 7 सप्टेंबरपर्यंत भरल्यास न्यायालय त्याप्रमाणे पुढील आदेश देईल, असे न्यायालयाने सुनावले आहे.

14 Aug 2017

आदिवासी कोळी समाजाच्या राज्यव्यापी मेळाव्यात सरकारला दिला इशारा

एमपीसीन्यूज- कायदा बदला अन्यथा कायदे करणाऱ्यांना आम्ही बदलू. 2019 ची निवडणूक जिंकायची असेल तर आदिवासी कोळी समाजाला न्याय द्यावाच लागेल असा सज्जड इशारा महाराष्ट्र शासनाला महाराष्ट्र कोळी समाज संघाचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे यांनी येथे दिला.

आदिवासी महादेव कोळी समाजा संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय आणि मराठवाड्यातील आदिवासी महादेव कोळी बांधवांचे वैधता जात प्रमाणपत्र पुन्हा तपासणीसाठी स्थापन झालेल्या एस.आय.टी. (विशेष तपासणी चौकशी) च्या माध्यमातून निर्माण झालेले संकट आदिवासी कोळी समाजावर आले आहे. त्या संदर्भात दिशा आणि धोरण ठरविण्यासाठी लोणावळ्यात आयोजित करण्यात आलेल्या राज्यव्यापी बैठकीत अनंत तरे  बोलत होते.

यावेळी कोळी महासंघाचे कार्याध्यक्ष अॅड.चेतन पाटील, मुंबईच्या उपमहापौर हेमांगी वरळीकर, अॅड.रामचंद्र मेंदाडकर, सिद्धार्थ कोळी, मोहन कडू, शिवाजी नागटीलक, अरविंद कोळी, नरेंद्र निकम, भारती कोळी, जयवंत ठोकळे, मदन भोई, संजय गोविलकर, नवनाथ देशमुख, काळूराम देशमुख, विलास कुटे यांच्यासह मान्यवर आणि कोळी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कोळी समाजातून पुढे आलेले भारताचे नवनिर्वाचित राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा तसेच उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला.

तरे म्हणाले की, समाज ज्या ठिकाणी एकत्र येण्याचा प्रयत्न करतो तेथे आम्ही पक्षभेद बाजूला ठवून जातो. समाजासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याचा आमचा प्रयत्न असतो, त्यासाठी ज्याला यायचं तो आमच्या सोबत येईल, अन्यथा आम्ही सोबत आलेल्यांबरोबर पुढे जाऊ. आम्ही समाजाला न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही असे ठाम मत त्यांनी व्यक्त केले.

राज्यव्यापी बैठकीच्या माध्यमातून एकत्र आलेल्या सर्व कोळी संघटनांनी आपापसातील मतभेद विसरून राजकीय स्तरावर पाठपुरावा करून समाजाच्या मानगुटीवर बसलेले एस.आय.टी. (विशेष तपासणी चौकशी )चे भूत उतरावा. अन्यथा सर्वांनी एकत्र येऊन रस्त्यावर उतरावे आणि आपली ताकत दाखवून द्यावी अशा प्रतिक्रिया यावेळी कोळी समाजातील कार्यकर्त्यांनी मांडल्या.

अॅड.चेतन पाटील यांनी कोळी समाजाच्या न्यायालयीन लढाईमध्ये राज्य शासन कोळी समाजाच्या मागे उभे राहिले नाही तर आगामी 2019 ला सरकारच्या विरोधात कोळी समाज उतरेल असा इशारा दिला. तर अॅड. रामचंद्र मेंदाडकर यांनी आदिवासी कोळी समाजाबाबत न्यायालयाने दिलेले निर्णय दुर्दैवी असून तपासणी समितीला सर्व अधिकार असताना त्यावर पुन्हा एस.आय.टी. (विशेष तपासणी चौकशी)ची आवश्यकताच काय आहे असा प्रश्न उपस्थित केला. समाजाच्या प्रश्नांबाबत न्यायालयात पुढील लढाई लढण्यासाठी देशातील सर्वोत्तम विधिज्ञाची मदत घेतली जाईल असे त्यांनी सांगितले.

14 Aug 2017

एमपीसी न्यूज- पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गिकेवर खंडाळा घाट संपल्यानंतर खोपोलीच्या हद्दीत किमी 38 जवळ भरधाव वेगातील इको कार समोर रस्त्यात बंद स्थितीत उभ्या असलेल्या ट्रेलरवर मागून धडकल्याने झालेल्या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात एवढा भयंकर होता की गाडीमधील एक महिला वगळता सर्व जखमी गाडीत अडकले होते.

अपघाताची माहिती समजल्यानंतर तातडीने घटनास्थळी दाखल झालेले खोपोली पोलीस, आर्यन देवदूत बचाव पथक, आयआरबी व डेल्टाचे कर्मचारी, अपघातग्रस्तांच्या मदतीला या रेस्कू पथकाचे प्रतिनिधी या सर्वांनी मिळून गाडीचा पत्रा कापून सर्व जखमींना गाडीतून बाहेर काढले. अपघात एवढा गंभीर होता की  इको कारमध्ये असलेली एक महिला वगळता एक लहान मुलगी, लहान मुलगा आणि तीन पुरुष गाडीत गंभीर जखमी अवस्थेत अडकून पडले होते. पुढच्या सीटवर बसलेल्या दोघाना खूप प्रयत्न करून आयआरबी पेट्रोलिंग आणि देवदूत यंत्रणेने पत्रा कापून बाहेर काढले.

उपचारासाठी त्यांना पवनेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. जखमींमधील दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेच्या वेळी रात्रपाळीला असलेले खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप त्या ठिकाणी मदतीसाठी धावले.  पोलीस कॉन्स्टेबल सुतार आणि कुथे यांनीही मदत केली.

12 Aug 2017

एमपीसे न्यूज- पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर पुण्याहून मुंबईकडे जाणार्‍या मार्गावर दोन कंटेनर, ट्रक व कार असा चार वाहनांचा विचित्र अपघात होऊन ट्रक व कंटेनर एकमेकासोबत ढेकू पुलावरून आडोशी मार्गावर कोसळले. या अपघातात दोन जण जखमी झाले असून त्याना उपचारासाठी एम जी एम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज सकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान 35/600 कि.मी.जवळ घडला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आज, शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास द्रुतगती मार्गावरून पुण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या कंटेनर क्र.(एम एच 46 ए,एफ. 5577) चालकाचा ताबा सुटल्याने कंटेनर सुसाट वेगात त्याच्या पुढे प्रवास करणाऱ्या (एम एच 12 के वाय 2908) या कारला धडकला. ही कार रस्त्याच्या बाजूला फेकली गेली व त्यानंतर त्या कंटेनरने पुढे असणाऱ्या दुसऱ्या ट्रेलर क्र. (एम.एच. बी जी 2095) याला धडक दिली.
त्याच्या पाठीमागून भरधाव वेगात ओव्हरटेक करून तिसऱ्या ट्रकची (एम एच 46 बी जी 3498) कंटेनरला जोरदार धडक बसल्याने ढेकू गावाजवळील आडोशी मार्गाच्या पुलावरून कंटेनर व ट्रक दोन्ही एकदम खाली कोसळले.

या अपघातातील कार चालक सागर हनुमंत महामुनी यांनी ही माहिती पोलिसांना दिली. या अपघातात ट्रक व कंटेनर मधील चालक असे दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने एमजीएम रूग्णालयात उपचाराकरिता नेण्यात आले. दरम्यान हा विचित्र अपघात पाहण्यास‍ाठी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.

11 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - मागील काही दिवसांपासून उघडलेल्या पावसाने पुन्हा लोणावळ्यात सरीत बरसण्यास सुरुवात केली आहे. दोन दिवस लोणावळ्यात दुपारच्या व पहाटेच्या सत्रात पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.

जून महिन्याचा शेवटचा आठवडा व जुलै महिन्यात जोरदार कोसळलेल्या पावसाने ऑगस्ट महिन्यात चांगलीच उघडीप घेतली होती. श्रावण सरीप्रमाणे ऊन पावसाचा लपंडाव खेळणार्‍या पावसाच्या दोन तीन दिवसांपासून लोणावळ्यात सरी कोसळण्याला सुरुवात केली आहे. लोणावळा शहरात या मौसमात आज अखेर 3 हजार 798 मिमी (149.53 इंच) पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या तुलनेने यावर्षी जास्त पाऊस झाला आहे.

11 Aug 2017

एमपीसी न्यूज- अपंग व्यक्तीना शासकीय योजनांचा लाभ मिळावा याकरिता त्यांना अपंग प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी वाकसई पंचायत समिती गणात विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. याबाबतची माहिती पंचायत समिती सदस्य महादू उघडे यांनी दिली.

उघडे यांनी सांगितले की, वाकसई गणातील कुणेनामा या गावात मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज आहे. या गावात सात अपंग लाभार्थी आहेत मात्र त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र नसल्याने त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. वाकसई गणातील काही गावांमध्ये अपंग लाभार्थी आहेत त्यांच्याकडे अपंग प्रमाणपत्र नसल्याने ते योजनांपासून वंचित आहेत.

या सर्व लाभार्थ्यांना सरकारी योजनांचा व सवलतीचा लाभ मिळावा याकरिता कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असून गणातील सर्व ग्रामपंचायतींना याबाबत सूचना देण्यात येणात असल्याचे पंचायत समिती सदस्य उघडे यांनी सांगितले.

11 Aug 2017

एमपीसी न्यूज- लोणावळ्यातील गणेश विसर्जन मार्गावरील लोंबलेल्या विजेच्या तारा वीज वितरण कंपनीने अनंत चतुर्थीपूर्वी काढून घ्याव्यात अशी मागणी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी केली आहे. आगामी पंधरा अॉगस्ट, दहीहंडी, गणेशोत्सव व ईदच्या पार्श्वभूमीवर लोणावळा शहर पोलीस ठाण्याच्या वतीने शहरातील पदाधिकारी व गणेश मंडळाचे कार्यकर्ते यांच्या बैठकीचे आयोजन केले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

यावेळी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे, नायब तहसीलदार आर.एल.कांबळे, मुख्याधिकारी सचिन पवार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव, वीज वितरणचे उप कार्यकारी अभियंता मुकुंद तेलके व्यासपीठावर उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपविभागीय पोलीस अधिकारी शिवथरे यांनी गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांना जमा झालेल्या निधीचा विनियोग समाज कार्यासाठी करा असा सल्ला दिला. वीज वितरणचे अधिकारी तेलके यांनी गणेश उत्सवात दहा दिवस शहरात कोठेही वीजबंदचे विघ्न येणार नाही याची पुर्ण दक्षता घेऊ असे आश्वासन दिले .

मुख्याधिकारी सचिन पवार म्हणाले, "गणेश विसर्जन मिरवणूक मार्गावरील अतिक्रमणे काढणे, नदीपात्रावर व मार्गावर पुरेशी वीज व्यवस्था, आपत्कालीन पथक, रस्ते दुरुस्ती ही सर्व कामे पूर्ण केली जातील असे सांगितले. गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी देखील चर्चेत सहभाग घेत दरवर्षी भेडसावणार्‍या प्रश्नांची आठवण अधिकार्‍य‍ांना करुन दिली.

गणेश मंडळांनी सीसीटीवी बसवावेत

पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सर्व गणेश मंडळांनी सीसीटीवी कँमेरे बसविण्याची आग्रही सूचना केली. तसेच मंडळांनी धर्मदाय आयुक्तांकडे नोंदणी करणे, वाहतुकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने मंडप उभारणे, ध्वनी प्रदूषण होणार नाही यांची दक्षता घेत स्पिकरचा आवाज ठेवावा, डीजे व डाँल्बीला बंदी असल्याने कोणी डीजे डाँल्बीचा वापर करु नये. लहान गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करावी, विसर्जन मिरवणुकीत सुस्थितीमधील वाहने वापरावीत, मानाच्या गणेश मंडळांनी रांगेतील इतर मंडळांचे बाप्पा देखील रात्री बारा वाजण्यापूर्वी विसर्जित होतील याची खबरदारी घ्यावी. स्वंयसेवकांना ओळखपत्र द्यावीत, बाप्पाच्या मूर्तीची सर्वतोपरी काळजी घ्यावी, मिरवणुकीत गुलाल उधळू नये व उधळल्यास दुसर्‍याला त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केल्या आहेत.

Page 2 of 21
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start