• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
14 Jun 2017

पर्यटकांच्या सुरक्षेकरिता लायन्स पॉईटच्या दरीला रेलिंगचे सुरक्षा कठडे

एमपीसी न्यूज - लोणावळा शहरातील बारमाही पर्यटनाचे महत्वाचे ठिकाण व आकर्षण बिंदू असलेल्या लायन्स पॉईटला पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने दरीच्या तोंडावर सर्वदूर लोखंडी रेलिंगचे सुरक्षा कठडे लावण्यात आले आहेत, अशी माहिती वन निरीक्षक वैभव बाबर यांनी दिली. 

लायन्स पॉईट, मोराडी शिखर, शिवलिंग पॉईट ते टायगरस लिप हा सर्व परिसर म्हणजे पर्यटकांसाठी नंदनवन आहे. आयएनएस शिवाजी जवळील घाट चढून एअर फोर्समार्गे जस जसे आपण अॅम्बे व्हॅलीच्या दिशेने जाण्यास सुरुवात करतो तस तसे आपल्याला या परिसरातील निर्सगरम्य व अल्हाददायीपणा, डोंगर दर्‍यांमधून ऊन्हाळ्यात सुध्दा दिसणारी धुक्याची चादर, कोकण परिसराचे विहंगम दृष्य मनाला प्रसन्न करते. लायन्स पॉईटचा हा परिसर वन विभागाच्या अखत्यारित असून तो हातवण व कुरवंडे गावांच्या सिमेवर असल्याने त्याचा हवा तसा विकास झालेला नाही. पर्यटकांचे आकर्षण केंद्र असून देखील शहरापासून दूर असलेला हा भाग पर्यटन विकासापासून कायम वंचित राहिला होता. मागील काही वर्षापासून हे ठिकाण नाईट लाईफचे ठिकाण बनले होते. 

पुणे व मुंबईकर तरुण तरुणी व हाय प्रोफाईल मंडळींची रात्र जागविण्यासाठी या ठिकाणी वाढलेली वर्दळ व सोबत मद्य व अंमली पदार्थांचा वापर यामुळे लायन्स पॉईट म्हणजे मद्यपींचा अड्डा अशी या ठिकाणाची ओळख होऊ लागली होती. हुल्लडबाजपणा व फाजिल आत्मविश्वासामुळे याठिकाणी अनेक तरुण तरुणींचे प्राण गेले आहेत. पोलीस प्रशासनाने देखील या ठिकाणी वारंवार रात्री अपरात्री धाडी ठाकत कारवाई केली, अनेकांवर गुन्हे दाखल झाले. वन विभागाने देखील येथील गैरप्रकार रोखण्यासाठी लायन्स पॉईट परिसराला दगडाची सुरक्षा भिंत बांधत लोखंडी गेट बसविले तसेच सायंकाळी सातनंतर पॉईट पर्यटकांसाठी बंद केला आहे. मात्र स्थानिकांना रोजगार मिळावा याकरिता वन विभागाने काही दुकाने बनवून ती स्थानिकांना दिली आहेत. 

पॉईट परिसराची देखभाल व दुरुस्ती कामाकरिता संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून सशुल्क पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. येत्या महिनाभरात पॉईटवर पर्यटकांच्या सुविधेकरिता फिरते शौचालय लावण्यात येणार आहे. भिमाशंकरच्या धर्तीवर पॉईटवर लाकडी पॅगोड उभारण्यात आला आहे. याठिकाणी बसून विश्रांतीसोबत निर्सगाचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता संपुर्ण पॉईटला दरीच्या बाजुने लोखंडी रेलिंग करण्यात आलेले आहे. तसेच भविष्यात लायन्स पॉईटवर आजुनही काही नवनविन सुविधा उपलब्ध करुन येथील पर्यटन वाढीसाठी वन व्यवस्थापनाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वन विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पर्यटकांनो हुल्लडबाजीला आवर घाला !

लायन्स पॉईटच्या दरीला सर्वदूर लोखंडी रेलिंग लावून हा पॉईट वन विभागाने संरक्षित केला आहे. मात्र तरी देखील काही हुल्लडबाज पर्यटक रेलिंगच्या वरुन दरीच्या तोंडावर जाऊन सेल्फी काढताना दिसतात. तेव्हा पर्यटकांनो हुल्लडबाजीला आवर घाला असे म्हणावेच लागते. लायन्स पॉईटच्या दरीत पडून अनेकांचे जीव गेले आहेत. म्हणून पर्यटकांच्या सुरक्षेकरिता रेलिंग करण्यात आले. पर्यटकांनी देखील याचे भान ठेवत सुरक्षित पर्यटनांचा आनंद घ्यावा अशी माफक अपेक्षा स्थानिक व्यक्त करत आहेत.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start