• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
23 Aug 2017

एमपीसी न्यूज - सुरक्षिततेच्या कारणास्तव पर्यटकांना प्रवेश बंद करण्यात आलेले वलवण धरण पुन्हा पर्यटकांसाठी खुले करा, अशी मागणी लोणावळ्याच्या नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी टाटा कंपनीच्या प्रशासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे. 

लोणावळा हे पर्यटनस्थळ असून राज्यभरातून तसेच परराज्यांमधून मोठ्या संख्येने पर्यटक लोणावळ्याला भेट देतात. टाटा कंपनीचे वलवण धरण व उद्यान पूर्वी पर्यटकांसाठी खुले होते. मात्र मागील काही वर्षांपासून सुरक्षिततेच्या कारणास्तव टाटा कंपनीने अचानक हे धरण व उद्यान पर्यटकांसाठी बंद केले असून त्या परिसरात जाण्यास सर्वांनाच बंदी घालण्यात आली आहे.

जाधव म्हणाल्या की, याबाबत आम्ही लोणावळा शहर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला असता त्यांनी टाटा कंपनीला धरण बंद करण्याबाबत कसल्याही सूचना दिल्या नसल्याचे सांगितले. असे असताना टाटा कंपनी जाणीवपूर्वक सुरक्षेचा मुद्दा पुढे करत पर्यटकांना या पर्यटनस्थळांवर जाण्यास मज्जाव करत आहे. टाटा कंपनीने हे आडमुठेपणाचे धोरण तातडीने सोडावे आणि धरण परिसरात फिरण्यास पर्यटकांना परवानगी द्यावी. अन्यथा मावळचे आमदार बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली टाटा कंपनीच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा नगराध्यक्षा जाधव यांनी दिला आहे.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - नारायण राणे हाच आमचा पक्ष असून जेथे राणे तेथे आम्ही असा पवित्र घेत राणे समर्थकांनी आज माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना पाठिंबा दर्शविला.

स्वाभिमान संघटनेच्या वतीने शौकत शेख यांनी लोणावळ्यात पत्रकार परिषद घेत नारायण राणे यांना पाठिंबा दर्शविला. शौकत शेख म्हणाले मागील काही दिवसांपासून राणे हे भाजपामध्ये प्रवेश करणार याबाबत सोशल मिडियामधून बातम्या पसरविल्या जात आहेत. खरं तर नारायण राणे किंवा त्यांच्या परिवारामधील कोणीही अद्याप पक्ष बदलण्याची अधिकृत भुमिका जाहिर केलेली नाही. आम्ही सर्व नारायण राणे यांचे समर्थक असून त्यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी रस्त्यावर उतरलो आहे. नारायण राणे जी भुमिका घेतील ती आमची भुमिका असणार आहे. आमच्यासाठी काँग्रेस किंवा भाजपा हे पक्ष नसून नारायण राणे हाच आमचा पक्ष असल्याचे सांगितले.

यावेळी स्वाभिमान संघटनेचे अविनाश बारसे, मंगेश कदम, सागर बेलुरे, साजित शेख, फरिदा बेपारी, लहू पवार, अमोल कदम, अल्पेश शेख, अर्जुन गुप्ता, अजय गुप्ता, सुरज परदेशी, सचिन शिंदे, सोहेल खान, वाईद शेख, सादिक शेख, समीर शेख, आदिल खान यांनी पाठिंबा दर्शविला आहे.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - खंडाळा घाटात हुबळी-लोकमान्य टिळक एक्सप्रेसवर मंकीहिलजवळ दरड कोसळली. ही दुर्घटना आज (सोमवारी) सकाळी 6.00 वाजता घडली.

सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबईच्या दिशेने जाणार्‍या हुबळी एक्सप्रेस या गाडीवर आज सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास लोहमार्गावरील मंकीहिल या ठिकाणी डोंगरावरून दगड गाडीच्या एस 6 बोगीवर. हा दगड थेट डब्याचे छत फाडून आत आल्याने चार प्रवासी जखमी झाले आहेत. त्यापैकी एक किरकोळ तर तीन प्रवाशांना गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना कल्याण रेल्वे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेमुळे गाडी एक तास उशिराने धावली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. 

darad kosalai

20 Aug 2017

हॉटेल मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

एमपीसी न्यूज - सिंहगड इन्स्टिट्युट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अॅण्ड केटरिंग टेक्नोलॉजीच्या विद्यार्थ्यांनी एक स्तुत्य उपक्रम राबवत मळवली येथील संपर्क बालग्राम या अनाथ आश्रमातील मुलांना रुचकर जेवणाची मेजवाणी दिली.

याविषयी बोलताना सिंहगडचे विद्यार्थी म्हणाले हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करताना विविध प्रकारचे खाद्य पदार्थ बनविण्याचे शिक्षण मिळाले आहे. याचा उपयोग करत बी.एस.सी.एच.एसच्या तिसर्‍या वर्षातील विद्यार्थ्यांनी संपर्कच्या मुलांसाठी अनोखा उपक्रम राबविण्याचा मानस मनाशी बाळगत रुचकर जेवणाची ही अनोखी भेट मुलांना दिली. त्याचप्रमाणे मुलांना दैनंदिन गरजेच्या वस्तूही त्यांनी भेट दिल्या. या उपक्रमासाठी बी.एस.सी.एच.एसच्या मुख्यध्यापिका डॉ. आयेशा सिद्दिकी, प्रोफेसर अभिजित जाधव, शैलेष निगम यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

20 Aug 2017

एमपीसी न्यूज - लोणावळा शहर व परिसरात मागील 24 तासापासून पावसाचे दमदार पुनरागमन झाले आहे. मागील दोन दिवस पावसाची संततधार सुरू असल्याने लोणावळा परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

घाट माथ्यावरील लोणावळा व खंडाळा परिसरात या वर्षी जून महिन्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लोणावळा परिसरातील सर्व धरणे तसेच मावळ व पिंपरी-चिंचवडला पाणी पुरवठा करणारे पवना धरण व मावळातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत.

जमिनीमध्ये पाणी मुरण्यास वाव नसल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी परिसर जलमय होत असल्याने रस्ते व सखल भागात सर्वत्र पाणीच पाणी असे चित्र पाहायला मिळते. मागील 24 तासात शहरात 51 मिमी पाऊस झाला असून मोसमात आज अखेर 4040 मिमी (159 इंच) पाऊस झाला आहे. मागील वर्षी हे प्रमाण 3440 मिमी (135.43 इंच) होते. पावसाची संततधार थांबण्याचे नाव घेत नसल्याने नागरिकांना घराच्या बाहेर पडणे अवघड झाले आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेच्या निमित्त महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा संचालक डॉ. सतिश पवार यांनी आज कार्ला प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देत मोहिमेची माहिती घेत मार्गदर्शक सूचना केल्या. तसेच प्राथमिक शाळा व अंगणवाड्यांना भेटी दिल्या.

यावेळी त्यांच्या समवेत आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. संजय देशमुख, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. शेळके, जिल्हा प्रशिक्षण केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. तनुजा कुलकर्णी, मावळ तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहार उपस्थित होते. सदर टिमने कार्ला गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व अंगणवाडीला भेट देत जंतनाशक मोहिमेची पाहणी केली.

बालकांना जंतनाशक गोळ्यांचा डोस

राष्ट्रीय जंतनाशक दिनाच्या निमित्त प्राथमिक आरोग्य केंद्र कार्ला अंतर्गत देवघर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व दोन अंगणवाड्यांमधील मुलांना जंतनाशक गोळीचे डोस देण्यात आले. जिल्हा परिषद सदस्या कुसुम काशिकर यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.

यावेळी बोलताना पुणे जिल्हा परिषदेचे आयुष अधिकारी बी. पी. गावडे म्हणाले की जंतनाशक गोळीमुळे मुलांमधील कुपोषण, रक्ताक्षय, भूक न लागणे, अशक्तपणा, शौचावाटे रक्त पडणे आदी आजारांना प्रतिबंध केला जातो. याकरिता सर्व बालकांनी हा डोस घ्यावा.

या मोहिमेत कार्ला आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आर. आर. चव्हाण, जिल्हास्तर पर्यवेक्षक दत्तात्रय शिनकर, आरोग्यसेवक पी.एम. काटे, एस.ए. चव्हाण, अंगणवाडी सेविका देशमुख, जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक सुहास विटे, टिंगळे व जगताप, उषा आहेर हे उपस्थित होते.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - माहेरवाशिनीकरिता आयोजित करण्यात आलेल्या खेळ रंगला मंगळागौरीचा या कार्यक्रमात भांगरवाडी येथील झिम पोरी झिम या संघाने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित लोणावळा शहर महिलाध्यक्षा मंजुश्री वाघ यांनी श्रावण मासानिमित्त महिलांकरिता खेळ रंगला मंगळागौरीचा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या चूल आणि मूल सांभाळणार्‍या महिला आज राजकीय व्यवस्थेचा भाग बनल्या आहेत. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिलांना पंन्नास टक्के आरक्षण मिळवून दिल्याने महिला सक्षमपणे पायावर उभ्या राहिल्या आहेत. भविष्यात महिलांना विविध क्षेत्रात मोठ्या संधी असल्याने महिलांनी सुशिक्षित व्हावे, असे आवाहन यावेळी चित्रा वाघ यांनी केले.

कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक बाळासाहेब नेवाळे, सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष दीपक मानकर, महिला अध्यक्षा मंजूश्री वाघ, मावळ राष्ट्रवादीच्या महिला तालुकाध्यक्षा शुभांगी राक्षे, जिल्हा परिषद सदस्य शोभा कदम, गंगाताई कोकरे, राजश्री राऊत, निलम घाडगे, शितल हागवणे, सुनीता काळोखे, नगरसेविका अंजना कडू, रंजना दुर्गे, अरुणा लोखंडे, शिला बनकर, माधवी हाळवे, रुपाली दाभाडे, लोणावळा शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष राजू बोराटी, साहेबराव टकले, बाळासाहेब कडू, जीवन गायकवाड, खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रकाश पवार, मधुकर पवार, रवी पोटफोडे, नारायण पाळेकर, अनिल पानसरे, सनी पाळेकर, यश रिले, रमेश दळवी, संतोष राऊत आदी उपस्थित होते.

स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक झिम पोरी झिम संघ भांगरवाडी, द्वितीय क्रमांक जय मल्हार ग्रुप खंडाळा व तिसरा क्रमांक संस्कृती महिला ग्रुप खंडाळा यांनी पटकाविला. एक मिनिट गेम व प्रश्नावली स्पर्धेत धनश्री साबळे पैठणीच्या मानकरी ठरल्या, स्पर्धेच्या दरम्यान उत्कृष्ट नृत्य सादर करणार्‍या विजया कनिजिया यांना चांदीची जोडवी व लांबलचक उखाणा घेणार्‍या आशा जाधव यांना सोन्याची नथ देण्यात आली.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - देशात रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध असताना देखील बेरोजगारांची संख्या वाढत आहे. याकरिता आजच्या तरुणांना रोजगारक्षम शिक्षण देण्याची गरज आहे, असे मत बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे (बी.एम.सी.सी) प्राचार्य चंद्रकांत रावळ यांनी व्यक्त केले.

शहर व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पदवी व पदवीत्तर शिक्षणाची सोय व्हावी याकरिता 1983 साली लोणावळा एज्युकेशन ट्रस्टच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेल्या डॉ. बी. एन. पुरंदरे कला, श्रीमती एस. जी. गुप्ता वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या 35 व्या वर्धापनदिन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात रावळ यांनी उपस्थितांना बाजार व्यवस्थापन व अर्थव्यवस्थेचे धडे दिले. यावेळी लोणावळा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष रमेशचंद्र नय्यर, सचिव दत्तात्रय पाळेकर, खजिनदार विजय दर्यानानी, प्राचार्य डॉ. बी. एन. पवार, उप प्राचार्य डॉ. व्हि. ए. पाटील, डॉ. जे. ओ. बच्छाव आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना रावळ म्हणाले की तरुणांना रोजगार व उद्यमशील बनविण्यासाठी अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन विद्यार्थी घडविण्याची आज खर्‍या अर्थाने गरज आहे.

अध्यक्षीय भाषणात रमेशचंद्र नय्यर यांनी यापुढील काळात शिक्षणाचा दर्जा वाढविण्यावर सर्वाधिक भर देणार असल्याचे सांगितले. दत्तात्रय पाळेकर म्हणाले विद्यार्थी प्रथम हे धोरण संस्थेने अवलंबिले असून विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण देत त्यांना उद्योगक्षम बनविण्याचा आमचा मानस आहे. तसेच पुढील वर्षीपासून उत्कृष्ट अध्यापन कार्य करणार्‍या प्राध्यापकांना सेवारत्न पुरस्कार देण्याचे जाहीर केले.

18 Aug 2017एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर बोरज गावाजवळ किमी 64/700 जवळ भरधाव वेगातील स्विफ्ट कार चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्यामध्ये उलटून झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाले. आज दुपारी 12.25 वाजण्याच्या सुमारास मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या लेनवर हा अपघात झाला.

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर मुंबईहून पुण्याकडे जाणार्‍या लेनवर भरधाव वेगातील स्विफ्ट कार (MH 03 AR 3760) च्या चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी दोन्ही रस्त्याच्यामधील जागेत पलटी झाली. यामध्ये गाडीत असलेल्या दोन व्यक्ती किरकोळ जखमी झाल्या आहेत. खंडाळा महामार्ग पोलीस व आयआरबीच्या कर्मचार्‍यांनी जखमींना बाहेर काढत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले व अपघातग्रस्त कार बाजूला करत वाहतूक तातडीने सुरळीत केली.

18 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील मळवली येथील भाजे धबधबा आणि लेणी परिसरात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांच्या बॅगा लंपास करून त्यातील मोबाईल आणि पैसे चोरणाऱ्या अल्पवयीन मुलांच्या एका टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांना जेरबंद केले आहे.

भाजे धबधबा आणि लेणी परिसरात मागील काही दिवसात मोबाईल तसेच बॅगांची चोरी झाल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या. या घटनांमागे टोळी असण्याची शक्यता ध्यानात घेत लोणावळा ग्रामीणच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक साधना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली साध्या वेशात या परिसरात गस्त घालणारे पोलीस कर्मचारी शरद जाधवर व गणेश होळकर यांनी तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. 

त्या मुलांकडून 9 चोरीचे मोबाईल जप्त करण्यात आले असून अजूनही काही मोबाईल मिळण्याची शक्यता आहे. याप्रकरणी पुढील तपास पोलीस नाईक आशिष काळे हे करीत असून ज्या लोकांचे मोबाईल या परिसरातून चोरीला गेलेत त्यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनला संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Page 1 of 22
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start