• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
16 Aug 2017एमपीसी न्यूज - पुणे महापालिका कॅशलेस व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी तसेच अनुदानित वस्तुखरेदीसाठी होणारा विलंब टाळण्यासाठी आता महापालिकेच्या भांडार विभागामार्फत करण्यात येणारी खरेदी बंद करून थेट लाभ हस्तांतरण (डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर-डीबीटी) कार्डाच्या माध्यमातून प्रत्येक खरेदी करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. यासाठी नव्याने संगणक प्रणाली विकसित करण्यासाठी 42 लाख रुपये देण्याच्या प्रस्तावाला आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. 

महापालिकेतील विविध श्रेणीतील अधिकारी आणि कर्मचार्‍यांना दिले जाणारे सुमारे 432 विविध प्रकारचे साहित्यही डीबीटी कार्डाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. यासाठी संगणक प्रणालीची आवश्यकता आहे. त्याची निर्मिती करण्यात येत आहे.  या प्रणालीच्या माध्यमातून साहित्याचे पैसे थेट लाभार्थी कर्मचार्‍यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.

हे पैसे जमा करताना लाभार्थ्यांचा आधार क्रमांक त्याच्या बँक खात्याशी जोडला जाणार आहे. त्यामुळे कल्याणकारी योजनांचे लाभ थेट आणि विनाविलंब होणार आहे. या सर्व अनुदानावर होणार्‍या खर्चाचा ताळमेळ राखण्यासाठी बेंचमार्क आयटी सोल्यूशन्स इंडिया प्रा.लि. या कंपनीकडून बेनिफिट मॅनेजमेंट प्रणाली विकसित केली जाणार आहे.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेने गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहेत. या कार्यक्रमांसाठी महापालिकेच्या जनसंपर्क कार्यालयाऐवजी खासगी जनसंपर्क एजन्सीला नेमण्यात आले आहे. या एजन्सीकडून शनिवारवाड्यावर झालेल्या महोत्सवाच्या शुभारंभाच्या झालेल्या कार्यक्रमाच्या दिलेल्या प्रेसनोटमध्ये 'चौकटीच्या बातम्या' या उल्लेखाखाली 'पदाधिकाऱ्यांना बावळट खासदार आणि आम्ही तुम्हाला आमचे नेते मानत नाही,' असे म्हणणारे पदाधिकारी शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवाच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावर' अशा ओळी दिल्या आहेत. याबाबत पत्रकार परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केल्यानंतर महापौरांनी देखील उत्तर देणे टाळले. त्यामुळे हा बावळट खासदार नक्की कोण याबाबत पालिका वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

शुभारंभाच्या कार्यक्रमाला खासदार अनिल शिरोळे उपस्थित नव्हते. केवळ खासदार संजय काकडे उपस्थित होते. त्यामुळे एजन्सीने 'बावळट खासदार' कोणाला म्हटले याविषयी प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. तसेच एजन्सीचा खासदार विरोधी बोलवता धनी कोण याविषयी चर्चा रंगली आहे. तसेच याबाबत पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांच्या प्रश्नामुळे तोंडघशी पडलेल्या महापौरांनी तातडीची बैठक घेत या एजन्सीचे काम काढून घेतल्याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र, याबाबत कोणताही पालिका पदाधिकारी बोलण्यास तयार नाही.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विविध विकास विषयक कामे करण्यासाठी येणा-या दोन कोटी 13 लाख 48 हजार रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत आज (बुधवारी) मान्यता देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड पालिका स्थायी समितीची साप्ताहिक सभा बुधवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी सीमा सावळे होत्या. विषयपत्रिकेवर 15 विषय होते. त्यापैकी एक विषय प्रशासनाने मागे घेतला आहे.

वायसीएम रुग्णालयाच्या इमारतीमधील कॉरीडॉर, इनडोअर, संडास, बाथरुम, मुता-या व रुग्णालयाच्या बाह्य परिसराचे (रस्ते व पार्किंग सह गार्डन) व रुग्णालयातील डक्ट ड्रेनेज लाईन साफसफाईचे व स्वच्छतेविषयक कामे करण्यासाठी दरमहा सुमारे 22 लाख 61 हजार रुपयांप्रमाणे येणा-या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली. भोसरी येथील विद्युतदाहिनी चालन देखभाल, दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे 37 लाख 95 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपरीगावात स्थापत्य विषयक देखभाल दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे सहा लाख 44 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. जिजामाता हॉस्पिटल येथील रस्त्यांवरील चरांची, खड्ड्यांची खडी मुरुमाने व बी.बी.एम पद्धतीने दुरुस्तीची कामे करण्यासाठी येणा-या सुमारे सात लाख 46 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.

पिंपळेगुरव, वैदुवस्ती येथील विविध रस्त्यांवरील चरांची, खड्ड्यांची खडी मुरुमाने व बी.बी.एम पद्धतीने दुरुस्ती करण्यासाठी येणा-या सुमारे पाच लाख 81 हजार रुपयांच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. अशुद्ध जलउपसा केंद्र रावेत येथे टप्पा क्रमांक तीन व चार योजनेअंतर्गत 30 दशलक्ष लीटर क्षमतेच्या पंपाकरिता न्युट्रल सॉफ्ट स्टार्टर बसविण्यासाठी येणा-या सुमारे 70 लाख 71 हजार रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.

16 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - आगामी दीड वर्षात पीएमपीएमएलच्या ताफ्यात ऑटोमॅटिक अशा 800 बस येणार आहेत. यातील 400 बस सीएनजीवर तर उर्वरीत 400 बस डिझेलवर चालणा-या असतील. या बसचे गिअर ऑटोमॅटिक असतील तर इतरही विविध सुविधांनी या बस सज्ज असतील. या बस ताफ्यात आल्यानंतर पीएमपीएमएलच्या ताफ्यातील एकूण बसची संख्या 2 हजार 490 च्या घरात पोहचणार आहे.

आज (16 ऑगस्ट) झालेल्या पीएमपीएमएल संचालक मंडळाच्या बैठकीत बस खरेदीचा निर्णय घेण्यात आला असून येत्या तीन महिन्यात बस खरेदीची टेंडर प्रक्रिया राबवली जाणार आहे. येत्या दीड वर्षात या बस पीएमपीएमएलच्या ताफ्यात असतील, अशी माहिती पीएमपीएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष तुकाराम मुंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पीएमपीएमएलमध्ये नव्याने दाखल होणा-या बसेस अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त असतील. या बस ऑटोमॉटिक गिअरच्या असणार आहेत. जेणेकरून चालकाबरोबरच सर्व प्रवाशांनाही आरामदायी प्रवास करता येईल. तसेच बसमध्ये पॅसेंजर काऊंटर, सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहेत. प्रत्येक बस बीआरटी मार्गावर चालण्याच्या सर्व नियमांमध्ये बसणारी असणार आहे, असे मुंढे यांनी सांगितले.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या हद्दीस लागून असलेला हिंजवडी हा भाग माहिती तंत्रज्ञान (आयटी) उद्योगासाठी देशात प्रसिद्ध आहे. तेथील बहुराष्ट्रीय कंपन्यांनी हिंजवडी या नावाचा अपभ्रंश करून हिंजेवाडी असा उच्चार आणि वापर सुरू केला आहे. त्याचबरोबर पालिकेने नाशिक फाटा येथे हिंजेवाडी असा फलक लावला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या चांगभले ग्रुपने या फलकास आज (बुधवारी) काळे फासले आहे.

हिंजवडी हे गावाचे  नाव असताना बहुराष्ट्रीय कंपन्या आणि बहुभाषिक अभियंत्यांकडून हिंजवडी असा उल्लेख न होता तो हिंजेवाडी असा सर्रासपणे केला जात आहे. पुणे महापालिकेने हिंजेवाडी असा उल्लेख केलेले फलक उभारले आहेत. त्यास स्थानिक नागरिक व कार्यकर्त्यांनी विरोध दर्शविला आहे. त्यातच पिंपरी-चिंचवड महापालिकेने कासारवाडीतील नाशिक फाटा चौकातील एक रॅम्प नुकताच वाहतुकीस खुला केला आहे. येथून पिंपळे गुरव, पिंपळे सौदागर, हिंजवडीला जाता येते. त्या रॅम्पजवळ लावलेल्या दिशादर्शक फलकावर हिंजवडी असे न लिहता हिंजेवाडी, असे मराठी व इंग्रजी भाषेत स्पष्टपणे लिहिले आहे.

त्यामुळे संतप्त झालेल्या चांगभले ग्रुपने' बुधवारी नाशिक फाटा येथील या फलकास काळे फासले आहे.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील कोणत्याही बांधकाम साईटला परवाना देताना, बांधकाम कामगार नोंदणी बंधनकारक असल्याचे लेखी कळवावे. यामध्ये बांधकाम व्यावसायिकांचा सक्रीय सहभाग घेण्यासाठी कामगार विभागाने नोंदणीसाठी पुढाकार घ्यावा, असे आदेश महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.


संघटनेचे अध्यक्ष धर्मपाल तंतरपाळे, राष्ट्रवादीच्या सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद कांबळे, दस्तगीर शेख, किरण कांबळे, दीपक ओव्हाळ, सचिन सकटे, लक्ष्मण कांबळे, सहशहर अभियंता अयुबखान पठाण, कामगार कल्याण अधिकारी चंद्रकांत इंदलकर आदी उपस्थित होते.

बांधकाम कामगारांविषयी आस्था नसलेल्या महापालिकेच्या गलथान कारभाराविरोधात बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर धरणे आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर संघटनेच्या शिष्टमंडळाने आयुक्त हर्डीकर यांची भेट घेत विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. यावेळी संघटनेच्या पदाधिका-यांशी त्यांनी या विषयावर चर्चा केली.

16 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेतर्फे यंदा शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सव साजरा करत आहे. यानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये 1000 दुचाकी सहभागी होणार असून या माध्यमातून पर्यावरण विषयक संदेश देणार आहे, असे महापौरांनी सांगितले. मात्र, एवढ्या मोठया प्रमाणात दुचाकी रस्त्यावर उतरल्याने होणार्‍या प्रदुषणाला जबाबदार कोण या प्रश्नाला उत्तर देणे टाळत महापौरांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला. 


यंदाचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 125 वे वर्ष असून यानिमित्त महिना भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून 20 तारखेला दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीच्या माध्यमातून बेटी बचाव बेटी पढाव, स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, आरोग्य, पर्यावरण आदीबाबतीत संदेश देण्यात येणार आहे. मात्र, महापालिकेने नुकताच जाहीर केलेल्या पर्यावरण अहवालातून दुचाकीचे प्रमाण वाढल्याने प्रदूषणात वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे. असे असताना दुचाकी रॅलीकडून प्रदुषणात भर टाकून कशा प्रकारे प्रदुषणाबाबत संदेश दिला जाणार आहे, असे प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केल्यानंतर या प्रश्नावर उत्तर देणे टाळत महापौरांनी पत्रकार परिषदेमधून काढता पाय घेतला. 

तरीही पत्रकारांचा प्रश्नाचा भडीमार सुरूच होता. तरी देखील त्या प्रश्नांना उत्तर देणे टाळत महापौर पत्रकार परिषदेमधून निघून गेल्या यामुळे अशा प्रकारच्या आयोजनातून गणेशोत्सव देशविदेशात कसा पोचणार हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे.

16 Aug 2017


जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करण्यास राहिले पाच दिवस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या सहा नगरसेवकांनी अद्यापपर्यंत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले असून त्याच्या आत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद्द रद्द होण्याची शक्यता आहे. 

पिंपरी-चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत 64 नगरसेवक राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. या नगरसेवकांना निवडून आल्यापासून सहा महिन्याच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करणे बंधनकारक आहे. जुलै महिन्यात 22 जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला आहे. त्यामध्ये वाढ होऊन आजपर्यंत 58 जणांनी दाखला जमा केला आहे. तर, सहा नगरसेवकांनी अद्यापही दाखला जमा केला नाही.

23 फेब्रुवारीला नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. दाखला जमा करण्यासाठी 22 ऑगस्ट अंतिम तारिख आहे. त्यामुळे दाखला जमा करण्यासाठी अवघे पाच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्याच्या आत दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद्द रद्द होण्याची शक्यता आहे. त्यामध्ये भाजपचे कुंदन अंबादास गायकवाड (प्रभाग एक, चिखली), यशोदा बोईनवाड (प्रभाग सहा धावडेवस्ती), शैलेंद्र मोरे (प्रभाग 19, आनंदनगर, दळवीनगर), मनिषा प्रमोद पवार (प्रभाग 23 थेरगाव), कमल घोलप (प्रभाग 13, निगडी) आणि शशिकांत कदम (प्रभाग 29 पिंपळेगुरुव) यांचे प्रमाणपत्र बाकी राहिले आहे. यापैकी कुंदन गायकवाड यांनी उच्च न्यायालयातून जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा करण्यासाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवून घेतली आहे.

बुलढाणा, औरंगाबाद, सांगली, अहमदनगर, उस्मानाबाद, पुणे या जात पडताळणी समित्यांकडून या नगरसेवकांची जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला येणे बाकी आहे. पालिकेने प्रमाणपत्र दाखला देण्यासाठी या समित्यांना स्मरणपत्र देखील पाठविले आहे. पाच नगरसेवकांनी 22 ऑगस्टच्या आत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा न केल्यास त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांचे पद रद्द झाल्यास भाजपाला मोठा धक्का बसू शकतो.

16 Aug 2017

1000 दुचाकींचा रॅलीत सहभाग; हेल्मेट सक्ती नाही

एमपीसी न्यूज - शतकोत्तर रौप्य महोत्सवी गणेशोत्सवानिमित्त पुणे महापालिकेतर्फे रविवारी (दि.20) भव्य दुचाकी रॅली काढण्यात येणार आहे.

ही रॅली पुणे महापालिका ते रमणबागेपर्यंत काढण्यात येणार आहे. रॅलीत एक हजार दुचाकी सहभागी होणार असून महिला पारंपारिक नव्वारी साडीत, तर पुरुष पारंपारिक पोषाखात सहभागी होणार आहेत. रॅलीच्या सुरुवातीला मनपा भवन येथे व समाप्तीला म्हणजेच रमणबाग येथे मंडप उभारण्यात येणार आहे. रॅलीत नागरिकांना स्मार्ट सिटी, स्वच्छ भारत, आरोग्य, पर्यावरण आदीबाबतीत संदेश देण्यात येणार आहे.

या रॅलीत जास्तीत जास्त पुणेकरांनी सहभागी व्हावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

16 Aug 2017


आठवड्याचा पास रद्द

एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलने दररोज प्रवास करणा-या प्रवाशांच्या खिशाला दरवाढीचा फटका बसणार आहे. कारण पीएमपीएमएलचा मासिक पासचा दर 1200 रुपयांवरून 1400 रुपयांवर करण्यात आला आहे. हा बदल करताना हद्दीतील व हद्दीबाहेरील असे दोन प्रकार रद्द करण्यात आले असून आता संपूर्ण पुण्यासाठी एकच पास ठेवण्यात येणार आहे. याचा दर 1400 रुपये ठेवण्यात आला आहे, अशी माहिती पीएमपीएमएलचे अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

येत्या 1 सप्टेंबरपासून सर्वांसाठी 1400 रुपये भरून महिनाभर प्रवास करण्यासाठी पास उपलब्ध करून दिला जाणार असून  हे नवीन बदल समाविष्ट केले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. मोफत पासच्या सवलतींमध्ये बाकी सवलती पूर्वीच्याच असल्या तरी यंदापासून पहिल्यांदाच एड्सबाधित रुग्णांनाही मोफत प्रवास करता येणार आहे, असेही ते म्हणाले. याशिवाय विनातिकीट प्रवास करणाऱ्यांच्या दंडाच्या रकमेमध्येही मोठी वाढ केली जाणार असून हा दंड 21 ऑगस्टपासून 100 रुपयांवरून 300 रुपये इतका आकारण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले. याशिवाय दैनंदीन पासचा गैरवापर करणा-या प्रवाशांकडून 500 रुपयांचा दंड आकारण्यात येईल; यापूर्वी हाच दंड 250 रुपये होता.


pmpml press

Page 8 of 290
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start