• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
18 Aug 2017


एमपीसी न्यूज - धुके पाहण्यासाठी पहाटे उठावे लागते असे ब-याचवेळा घरातील मोठ्या माणसांनी बोलताना तुम्ही ऐकले असेल. मात्र पिंपरी-चिंचवडच्या निगडी परिसरात नागरिकांनी दुपारी अकरा वाजता हे धुके अनुभवले आहे.

गुरुवारी दुपारी अकराच्या सुमारास हे धुके पसरले. मात्र, 15 मिनिटात हे धुके गायबही झाले. मात्र, या धुक्याचा आनंद नागरिकांनी मनमुराद लुटला सोशल माध्यमांवर फोटो व व्हिडिओही अपलोड झाले. जादू झाल्यासारखे अचानक येणारे धुके हे अनपेक्षित असल्याने नागरिकांमधये उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे.

याविषयी एमपीसी न्यूजशी बोलताना पुण्यातील ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ रामचंद्र साबळे म्हणाले की, मुळात धुके हे तापमान, आर्द्रता व हवा यांच्यावर अधारीत असते. हिवाळ्यात सकाळी तापमान 17 ते 18 अंशापर्यंत येते त्यावेळी आपणास हे धुके पाहावयास मिळते. मात्र, ते सकाळी आठ वाजेपर्यंतच. निगडी येथे घडलेली घटना ही दुर्मिळ आहे पण अशक्य नाही. हवेतील आर्द्रता वाढल्यामुळे, तसेच हवेचा वेग मंदावला, हवा एकाच ठिकाणी साठून राहिल्याने अशी स्थिती निर्माण होऊ शकते. 

जिथे धुळीचे किंवा प्रदुषणाचे कण साठू शकतात. किंवा जमिनीच्या काही उंचीवर तापमान अचानक घसरल्यानेही धुके निर्माण होऊ शकते. मात्र, ही स्थिती काही काळापुरतीच मर्यादीत असते. त्यामुळे निगडी परिसरात ते केवळ 15 मिनिटे टिकले व नाहीसे झाले. पावसाळ्यात असे धुके निर्माण होणे ही दुर्मिळच घटना आहे. मात्र, अशी स्थिती वारंवार झाली तर साथीचे रोगही परिसरात पसरू शकतात, असेही साबळे यांनी स्पष्ट केले. 

त्यामुळे निगडीतील भर दुपारी पडलेले धुके हे आपल्या छोट्या-छोट्या गोष्टींचा निसर्गावर कसा परिणाम होतो. याचेच एक उत्तम उदाहरण आहे.
fog 1503050537

18 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे रेल्वे स्थानकावरून सकाळी 7:15 वाजता सुटणारी डेक्कन क्विन (गाडी क्रमांक 12124) आणि सायंकाळी 5:15 वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनन्स मुंबई रेल्वे स्थानकावरून सुटणारी डेक्कन क्विन (गाडी क्रमांक 12123) येत्या रविवारी (दि. 20) धावणार नाही. तसेच दिवसभरात धावणा-या मेल आणि एक्सप्रेस छत्रपती शिवाजी टर्मिनन्स मुंबईला उशिराच पोहोचणार आहेत.

मध्य रेल्वेच्या ठाकुर्ली रेल्वे स्थानकाजवळ सकाळी 09.15 ते दुपारी 12.45 दरम्यान सहा रेल्वेलाईन वरून जाणा-या एका पुलावरील तुळई (गर्डर) बसविण्याचे काम करण्यात येणार आहे. कामासाठी साडेतीन तासांचा अवधी लागणार असल्याने रविवारी दोन्ही मार्गावर धावणारी डेक्कन क्विन रद्द करण्यात आली आहे.

पुणेकडून मुंबईकडे जाणा-या मेल आणि एक्सप्रेस गाड्या कर्जत-पनवेल-दिवा मार्गे धावणार असल्याने गंतव्य स्थळी पोहोचण्यासाठी प्रवाशांना 10 ते 40 मिनिटांपर्यंत विलंब होऊ शकतो. कल्याणकडे जाणा-या प्रवाशांसाठी कोल्हापूर-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई सह्याद्री एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11024), हैद्राबाद-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई एक्सप्रेस (गाडी क्रमांक 17032), चेन्नई-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11042) या गाड्या दिवा रेल्वे स्थानकावर थांबणार आहेत.

मुंबईकडून पुण्याकडे जाणा-या मेल आणि एक्सप्रेस गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे धावणार आहेत. कल्याण स्टेशनवरून प्रवास करणा-या प्रवाशांसाठी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स मुंबई-कोल्हापूर कोयना एक्सप्रेस (गाडी क्रमांक 11029) दिवा स्थानकावर थांबणार आहे.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव परिसरातून जाणा-या प्रस्तावित रिंगरोडवर पिंपरी पालिकेच्या उद्या (शनिवारी) होणा-या सर्वसाधारण सभेत चर्चा करण्याची तयारी आहे. नगरसेवकांनी चर्चेची मागणी केल्यास चर्चा करण्यात येईल, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी आज (शुक्रवारी) पत्रकारांशी बोलताना सांगितले. तसेच रिंगरोडवर चर्चेची मागणी करणा-यांनी पुन्हा एकदाही चर्चा करण्याची मागणी केली नाही, असे सांगत त्यांनी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांच्यावर टीका केली.

पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. या कारवाईला बाधित नागरिकांनी विरोध केला आहे. रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून आपले हक्काचे घर वाचविण्यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

जुलै महिन्याच्या सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी रिंगरोडवर चर्चा करण्याची मागणी केली होती. महापौर नितीन काळजे यांनी विषयपत्रिकेवरील विषय संपल्यानंतर चर्चा करण्यात येईल, असे आश्वासन राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना दिले.  मात्र, सर्वसाधारण सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राडा झाला. त्यामुळे महापौरांनी सभा गुंडाळली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना महापौर काळजे यांनी रिंगरोडवर चर्चा करण्यासाठी पुन्हा विशेष सभा घेण्यात येईल, असे सांगितले होते. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी देखील ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात रिंगरोडवर चर्चा करण्यासाठी सभा घेण्यात येईल, असे पत्रकारांशी बोलताना सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात सभा घेतली नाही.

दरम्यान, भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे नाट्यगृहात महापालिकेच्या विविध विकास कामांच्या 'ई' उद्‌घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी (दि.12) आले होते. त्यावेळी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी रिंगरोड बाधित नागरिक दिवसभर ताटकळत बसले होते. कार्यक्रम झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस रिंगरोड बाधित नागरिक शिष्टमंडळाला न भेटता जाऊ लागले. त्यानंतर संतापलेल्या आंदोलकांनी प्रवेशद्वार अडवले होते. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी रिंगरोड बाधितांचे निवेदन स्वीकारले. मात्र, कोणतेही आश्वासन दिले नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या बाधित नागरिकांनी तीव्र आंदोलन केले होते. आंदोलकांना पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीचार देखील केला होता.

एकनाथ पवार म्हणाले की, सर्वसाधारण सभेत रिंगरोडवर चर्चा करण्याची तयारी आहे. नगरसेवकांनी चर्चेची मागणी केल्यास चर्चा करण्यात येईल. मात्र, रिंगरोडवर चर्चेची मागणी करून नगरसेवक भाऊसाहेब भोईर बाहेरगावी गेले होते. त्यानंतर देखील भोईर यांनी रिंगरोडवर चर्चेची मागणी केली नाही, असेही पवार म्हणाले.

18 Aug 2017

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लूमुळे हिंजवडी येथे राहणा-या 33 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 260 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 211 रुग्णांना बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे.
 
हिंजवडी येथील 33 वर्षीय महिलेला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून 3 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने तिला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना बुधवार (दि. 16) रोजी तिचा मृत्यू झाला.

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात. अजूनही 16 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडी आणि यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय (वायसीएम) यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी येथील अर्टेक वेल्डर्स-इंप्रो इंडस्ट्रीजमध्ये नुकतेच रक्तदान शिबिर संपन्न झाले. शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून 49 बाटल्यांचे रक्त संकलन करण्यात आले.

रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष रो. हेमंत कुलकर्णी, सचिव रो. प्रवीण घाणेगावकर, रो. श्रीकृष्ण करकरे, रो. जगमोहन सिंह भूर्जी, रो. सुहास धमाले, रो. डॉ. रंजना कदम, डॉ. रवींद्र कदम, रो. अॅन अल्का करकरे आदी उपस्थित होते. यावेळी रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष रो. हेमंत कुलकर्णी, रो. अॅन अल्का करकरे, रो. श्रीकृष्ण करकरे, रो. जगमोहन सिंह भूर्जी या सदस्यांनी रक्तदान केले.

रक्तदान करणे काळाची गरज आहे. ही गरज ओळखून प्रत्येकाने रक्तदान करायला हवे. रक्तदान केल्याने एखाद्याचा प्राण वाचवला जाणार आहे. आपल्या रक्त देण्याने एखाद्या व्यक्तीचे जीवन वाचत असेल तर त्यापेक्षा अधिक आनंद दुसरा नाही. असे रोटरी क्लब ऑफ निगडीचे अध्यक्ष रो. हेमंत कुलकर्णी म्हणाले. यापुढे देखील वेळोवेळी अशा प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलने केलेल्या पास दरवाढी विरोधात पुणे महापालिकेत राष्ट्रवादीने आज तीव्र आंदोलन केले. तर विद्यार्थ्यांना गणवेश मिळण्याबाबत शिवसेनेने पुणे महापालिका सभेत आज आंदोलन केले. 


पीएमपीएमएलने मासिक पासमध्ये 200 रुपयांची दरवाढ केली आहे. याच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसने आज पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत निषेध व्यक्त करत आंदोलन केले. यावेळी दरवाढ मागे घ्या, अशा प्रकारची जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

तर 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवणार असल्याचे प्रशासनाकडून  सांगण्यात आले होते. मात्र, 15 ऑगस्टनंतरही  महापालिका शाळातील विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाहीत. याच्या निषेधार्थ शिवसेनेतर्फे मुखसभेत आंदोलन करण्यात आले. यावेळी इतर पक्ष शांत झाल्यानंतरही शिवसेनेची नारेबाजी सुरूच होती.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - मराठा साम्राज्याचे सरसेनापती श्रीमंत बाजीराव पेशव्यांची आज जयंती आहे. मात्र पुणे महापालिकेचे त्यांच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे, असे दिसून येत आहे. आज जयंतीचा दिवस असून देखील शनिवारवाड्यासमोरील पेशव्यांच्या अश्वारूढ पुतळ्यांची ना स्वछता करण्यात अली आहे ना महापौर अथवा इतर महापालिका पदाधिकाऱ्यांनी आज पुतळ्याला भेट देऊन पुष्पहार अर्पण केला. त्यामुळे अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या वतीने महापालिकेचा निषेध करण्यात आला आहे.

पहिल्या बाजीराव पेशव्यांची आज, शुक्रवारी 317 वी जयंती आहे. मराठ्यांचे साम्राज्य उत्तरेत दिल्लीपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आणि अवघ्या 40 वर्षांच्या आयुष्यात एकाही लढाईत पराजित न झालेल्या बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याकडे लक्ष देण्यास पालिकेला वेळ नसल्याचे चित्र आहे. पुतळ्याची झालेली दुरावस्था पाहून काही संघटनांनी सकाळी आक्षेप नोंदवल्यानंतर त्यावर पांघरून घालण्यासाठी दुपारनंतर पांढरे कापड टाकून दुरावस्था झाकण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे.    

दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर दुपारी महापौर मुक्त टिळक, जगन्नाथ लडकत, डॉ. वि.वि. तथा उदयसिंह पेशवे, एअरमार्शल  भूषण गोखले, रमेश भागवत, उदय कुल कर्णी, मोहन शेटे, सुनील शितोळे, सुलभा कोकाटे यांनी श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण केले.

18 Aug 2017


एक सप्टेंबरपासून सुरू होणार ई-टोल

एमपीसी न्यूज - नरेंद्र मोदी यांच्या कॅशलेस इंडियाची संकल्पना देशातील प्रयेक क्षेत्रात उतरत आहे. टोलनाक्याच्या गर्दी आणि इतर त्रासातून मुक्त होण्यासाठी ई-टोल आकारणीची सुरुवात करण्यात येत आहे. येत्या एक सप्टेंबरपासून 'फास्टटॅग' हे 6 तंत्रज्ञान वापरून तयार करण्यात आलेली ई-टोल सुविधा सुरू करण्यात येत आहे.

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचआय) फास्टटॅग हे तंत्रज्ञान उपलब्ध केले आहे. त्यासाठी एनएचआयने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ची मदत घेतली जाणार आहे. फास्टटॅगच्या ऑनलाईन विक्रीसाठी प्रयत्न केले जात असून प्रत्येक टोलनाक्याजवळ कॉमन सर्व्हिस सेंटर (सीएसई) उभारण्यात येत आहे. त्यामुळे टोलनाक्यावरील वाहनांच्या लागणा-या लांब रांगा आणि सुट्ट्या पैशांसाठी करावी लागणारी तणतण आता कमी होणार आहे. कारण येत्या एक सप्टेंबरपासून देशातील सर्व टोलनाके कॅशलेस होणार आहेत. त्यामुळे टोलनाक्यावर रांगेत थांबण्याचा वेळ वाचणार आहे.

फास्टटॅग हे तंत्रज्ञान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात आले आहे. एनएचएआय, आयएचएमसीएल यांच्या संकेतस्थळांवरून फास्टटॅगची ऑनलाईन खरेदी करता येईल आणि कुरिअरने ते ग्राहकांच्या घरी पोहोचवले जाईल. यामुळे फास्टटॅग अधिक सुलभपणे उपलब्ध होऊन विक्रीत वाढ होईल. तसेच आज (दि. 18 ऑगस्ट) पासून सर्व टोलनाक्यांच्या कॉमन सर्व्हिस सेंटरवर विक्रीसाठी उपलब्ध आहे.

फास्टटॅग हे छोटे स्टिकर असून, ते वाहनाच्या काचेवर चिकटविण्यात येणार आहे. फास्टटॅग रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानावर आधारित असून त्यामध्ये वाहनाविषयी सर्व माहिती इलेक्ट्रिक पद्धतीने साठविण्यात येते. त्यामुळे फास्टटॅगचे स्टिकर असलेले वाहन टोलनाक्यावरून जाताना टोल आपोआप कापून घेतला जाईल. टोल भरण्यासाठी खास वाहन थांबवण्याची तसदी वाहनचालकांना घ्यावी लागणार नाही.

रेडिओ फ्रिक्वेन्सीद्वारे फास्टटॅगचे वाचन करण्यासाठी देशातील सर्व टोल नाक्यांवर आयएफआयडी बसविण्याचे काम जोरात सुरु आहे. हे काम ऑक्टोबर महिन्यापर्यंत पूर्ण होणार आहे. प्रत्येक टोलनाक्यावर एक लेन खास फास्टटॅग वाहनांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहे.

फास्टटॅग ही सेवा अधिक जलद गतीने देण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून दोन अॅप्लिकेशनची निर्मिती करण्यात आली आहे. मायफास्टटॅग व फास्टटॅगपार्टनर अशी या अॅप्लिकेशनची नावे आहेत. यामुळे टोलचे इलेक्ट्रिक पेमेंट करण्यासाठी वाहनचालकांना सुविधा होणार आहे.

18 Aug 2017

एमपीसी न्यूज - विचारवंत प्रा.ग.प्र.प्रधान यांनी त्यांची 'वसुधा मनोविकास प्रतिष्ठान'ची सर्व मालमत्ता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या नावे केल्याचा जबाब दाभोलकरांनी 2012 मध्ये दिला आहे. प्रत्यक्षात ही सर्व मालमत्ता अंनिसच्या ट्रस्टने कुठेच दाखविली नाही. ही मालमत्ता गेली कुठे? ही मालमत्ता गिळंकृत करण्याच्या वादातून तर डॉ. दाभोळकरांची हत्या झाली नाही ना? असा प्रश्न सनातन संस्थेने आज (18 ऑगस्ट) पत्रकार परिषदेत उपस्थित केला.

यावेळी सनातन संस्थेचे प्रवक्ते अभय वर्तक, अखिल भारतीय ब्राम्हण महासंघाचे जिल्हाध्यक्ष आनंद दवे, हिंदू जनजागृती समितीचे पराग गोखले आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अभय वर्तक म्हणाले की,  दाभोलकरांच्या हत्येच्या तपासावर दबाव निर्माण करण्यासाठी राज्यभर 'जवाब दो' ची दवंडी पिटणारे अंनिसवाले त्यांच्या ट्रस्टने केलेल्या घोट्याळ्याविषयी गप्प का आहेत? याशिवाय दाभोलकर हत्येतील पिस्तूल ज्या खंडेलवाल आणि नागोरी यांच्याकडे सापडले त्यांना शिक्षा व्हावी याकरीता अंनिस का प्रयत्न करत नाही? दाभोळकरांचे खरे खूनी सापडावेत ही इच्छा आहे की, सनातनच्या साधकांना त्रास व्हावा हा हेतू आहे? या सर्व प्रश्नांच्या उत्तरासाठी आम्हीच अंनिसला 'जवाब दो' असे आवाहन करत असल्याचे ते म्हणाले.

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टमध्ये घोटाळे कोणी केले?,  प्रा. ग.प. प्रधान यांनी अंनिसला दान केलेली मालमत्ता कुठे गायब झाली?, नागोरी खंडेलवाल यांच्या जामीनाला विरोध नाही, पण डॉ. तावडेंच्या जामीनाला विरोध का? आणि दाभोलकर-पानसरे हत्येप्रकरणी न्यायालयात खटला चालू नये, यासाठीच सगळे प्रयत्न का? असे प्रश्न उपस्थित करत अंनिसने याची उत्तरे द्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

18 Aug 2017

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त केली होती. परंतु सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे पाहता राज ठाकरे आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) शहरात स्वतः थांबून महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत.

पुणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मनसेची वाताहत झाली. 2012 च्या निवडणुकीत मनसेने 27 जागा जिंकून नाशिक नंतर पुण्यात मोठे यश संपादन केले होते. मात्र पुणेकरांच्या प्रश्नांवर नेहमीच तटस्थ भूमिका घेतल्याने मनसेला पुणेकरांचा विश्वास टिकवता आला नाही. त्यामुळे 2017 च्या निवडणुकीत पक्षाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.

महानगरपालिका निवडणूकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाताहत झाल्यानंतर तळापासून पुन्हा नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी राज ठाकरे हे स्वत: संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेणार आहेत. त्यासाठी आज राज ठाकरे पुण्यात आले असून इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती स्वत: ठाकरे घेणार आहेत. शहरातील पक्षाच्या नव्याने होणाऱ्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्‍त्या महापालिकेच्या प्रभागनिहाय करण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक सदस्यांची मुलाखत घेऊन स्वत: ठाकरे या संदर्भातील नियुक्‍त्या करणार असल्याचे पक्षाचे शहराध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले आहे. सदरची बैठक शिवाजीनगर येथे सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत होणार आहे.

Page 4 of 290
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start