• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Aug 2017

एमपीसी न्यूज- टिळक-रंगारी वाद म्हणजे मूर्खपणा असून लोकमान्य टिळकांचं योगदान विसरता येणार नाही असे स्पष्ट मत मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यात व्यक्त केले. सध्या पुण्यात भाऊ रंगारी गणेश मंडळाचे विश्वस्तांनी सार्वजनिक गणेशोत्सवाचे जनक लोकमान्य टिळक नसून भाऊ रंगारी आहेत असा दावा केला आहे. त्या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते.

पुणे महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यासंदर्भात ते पुण्यात दाखल झाले असून त्यासाठी प्रत्येक सदस्यांची मुलाखत घेऊन स्वत: ठाकरे या संदर्भातील नियुक्‍त्या करणार आहेत. मनसेचा मुंबईत 21 सप्टेंबरला मेळावा आयोजित करण्यात आला असून त्यावेळी पक्षाची कार्यकारिणी जाहीर करणार असल्याचे ठाकरे म्हणाले. त्यावेळी सविस्तरपणे चर्चा करेन असे ते म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसापूर्वी पदाधिकाऱ्यांची कार्यकारणी बरखास्त केली होती. परंतु सध्या मध्यावधी निवडणुकांचे वारे पाहता राज ठाकरे आज (शुक्रवार) आणि उद्या (शनिवार) शहरात स्वतः थांबून महापालिकेच्या प्रभागनिहाय पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करणार आहेत.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - जुनी सांगवीतील पवनानदी घाटाजवळील स्मशानभूमीचे काम सध्या संथगतीने होत आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात नागरिकाना अंत्यविधी व इतर धार्मिक विधी करण्यासाठी त्रासाला सामोरे जावे लागत आहे. स्मशानभूमीचे काम वेगात करण्याची मागणी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी महापालिकेकडे केली आहे.

याबाबत पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, स्मशानभूमीचे संथ गतीने सुरू असलेले काम वेगात पूर्ण करून गॅस शवदाहिनीची परिस्थिती सुधारण्यात यावी. पिंपरी-चिंचवड शहरातील जुनी सांगवी येथील ही पहिली पर्यावरणपूरक गॅस शवदाहिनी आहे.

निवडणुकीपूर्वी केवळ सत्तेसाठी आरोप करत या शवदाहीनीचे राजकारण करण्यात आले. मात्र सत्ताबदलानंतरही सत्ताधारी मंडळी व पालिका प्रशासनाने येथील गैरसोयी बाबत आजवर कुठलीही सक्षम उपाययोजना केली नाही. ही शवदाहीनी महिना महिना बंद ठेवण्यात येत आहे, असे शितोळे यांनी निवेदनात म्हटले आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुरुषाला गर्भाशय असते का हो ? या प्रश्नाचे उत्तर आता कदाचित 'हो' असेच द्यावे लागेल. कारण पोटदुखीवर उपचार घेण्यासाठी गेलेल्या पुण्यातील सागर गायकवाड या तरुणाला प्रसिध्द दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने चक्क गर्भाशय असल्याचा धक्कादायक अहवाल दिला. हा अहवाल पाहून चक्रावलेल्या सागर गायकवाड यांनी थेट फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतल्यानंतर हा अहवाल चुकीचा असल्याचे उघड आले. या घडलेल्या अजब प्रकारामुळे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचा अजब कारभार समोर आला आहे.

पोटदुखीने त्रस्त असलेल्या सागर गायकवाड यांनी सात मे रोजी फॅमिली डॉक्टरकडे धाव घेतली. मात्र पोटदुखीचा त्रास जास्त असल्याने डॉक्टरांनी त्यांना दीनानाथ रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर गायकवाड यांनी दीनानाथ रुग्णालयात जाऊन सोनोग्राफी केली असता त्यांना चक्क गर्भाशय असल्याचा अहवाल रुग्णालय प्रशासनाने हातात दिला. या प्रकाराने चक्रावलेल्या गायकवाड यांनी दुस-या डॉक्टरांचा सल्ला घेणे पसंत केले. दुस-यांदा केलेल्या तपासणीत मात्र दीनानाथ रुग्णालयाने दिलेला अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाले.

या सर्व प्रकारामुळे गायकवाड याना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून या प्रकारामुळे गायकवाड यांनी तब्बल दोन महिने तणावाखाली घालवले. झाला प्रकार त्यांनी मित्रमंडळींच्या कानावर घातला असता त्यांनाही हा सर्व प्रकार हास्यास्पद वाटला. हा अहवाल चुकीचा असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर मात्र गायकवाड यांचा जीव भांड्यात पडला.

याबाबत रुग्णालयाचे संपर्क अधिकारी येडकीकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याविषयी चौकशी करून माहिती देणार असल्याचे सांगितले. हा प्रकार हास्यास्पद वाटत असला तरी तो तितकाच गंभीर आहे. या सर्व प्रकारामुळे रुग्णालय कर्मचा-यांच्या छोट्या चुकीमुळे एखाद्याच्या आयुष्यात वादळ निर्माण निर्माण होऊ शकते. ही एक गंभीर घटना असून अशी चूक एखाद्याच्या जिवावरही बेतू शकते, त्यामुळे अशा घटना टाळण्यासाठी रुग्णालयांनी काळजीपूर्वक काम करणे आवश्यक आहे.

18 Aug 2017एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणाऱ्या शाळातील विद्यार्थ्यांना महापालिकेकडून गणवेश पुरवण्यात येतात. मात्र, शाळा सुरू होऊन दोन महिने उलटून देखील अद्याप विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात आले नाही. या विरोधात आज झालेल्या मुख्यसभेत शिवसेनेने आंदोलन केले.

पुणे महापालिकेच्या अंतर्गत येणार्‍या शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय गणवेश पुरवण्याची जबाबदारी  महापलिका प्रशासनाची असून त्यामध्ये दिरंगाई होत असल्याचे चित्र आहे. 15 ऑगस्टपूर्वी विद्यार्थ्यांना गणवेश पुरवण्यात येतील, असे प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले होते. मात्र स्वातंत्र्यादिना दिवशी देखील बर्‍याच विद्यार्थ्यांनी मागच्या वर्षीचे गणवेश घेतले होते. तर काही विद्यार्थ्यांनी गणवेशाविनाच होते. या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. तसेच लवकरात लवकर विद्यार्थ्यांना  गणवेश देण्याची मागणी करण्यात आली. 

18 Aug 2017भोसरीतील प्रकारामुळे नागरिकांची नाराजी; पिंपरी-चिंचवड शहर भाजपमधील कुरघोड्यांचा फटका

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोसरी येथे नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात रिंगरोड बाधित नागरिकांचा उद्रेक झाला. भोसरी मतदार संघातील कार्यक्रमात गोंधळ झाल्यामुळे त्याचे खापर आता आमदार महेश लांडगे यांच्यावर फुटण्याची शक्यता आहे. तसेच शहरातील रिंगरोड बाधितांच्या रोषालाही आमदार लांडगे यांना सामोरे जावे लागणार आहे.

पिंपरी पालिकेत पहिल्यांदाच भाजपची एकहाती सत्ता आली. सत्ता येऊन पाच महिन्याचा काळ उलटून गेला आहे. सत्ता आल्यानंतर विकास कामाचे उद्‌घाटन, भूमिपूजन या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच शहरात आले. त्यावेळी रिंगरोड बाधित नागरिकांचे ‘विघ्न’ येणार याची जाणीव शहर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना होती. त्यामुळे शहर पातळीवर विकासकामांच्या उद्घघाटनाचा कार्यक्रम भोसरीत घेण्याचे ठरविण्यात आले. कारण, रिंगरोड बाधित नागरिकांनी आंदोलन केलेच, तर त्याची जबाबदारी आमदार लांडगे यांची राहणार होती. कार्यक्रमाची तयारी जय्यत करण्यात आली होती.

मात्र, रिंगरोड बाधितांनी रास्ता रोको आणि मुख्यमंत्र्यांना घेराव घालण्याचा प्रयत्न केल्यामुळे कार्यक्रम ‘फेल’ झाला. प्रत्येक कार्यक्रमाचे अचूक ‘मॅनेजमेंट’ करून भाजपचे प्रभावी ‘मार्केटिंग’ करण्यात तरबेज असलेल्या आमदार लांडगे यांना मुख्यमंत्र्यांसमोर अवघडल्यासारखे झाले. कारण, कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्याची जबाबदारी भोसरीतील नगरसेवक आणि स्वत: आमदार लांडगे यांची होती.

रिंगरोड बाधित नागरिकांमध्ये सुमारे दोन ते अडीच हजार मतदान आहे. रिंगरोडचा तिढा सुटला नाही, तर या मतदारांची नाराजी ओढावून घ्यावी लागणार आहे. पिंपरी-चिंचवड भाजपमधील निर्णायक नेता म्हणून आमदार लांडगे यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रिंगरोड बांधितांच्या प्रश्नासंदर्भात आमदार लांडगे काय भूमिका घेणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

चिंचवड, थेरगाव, वाल्हेकरवाडी परिसरातील नागरिकांनी प्रस्तावित रिंगरोडला विरोध केला आहे. हा रिंगरोड रद्द करावा, यासाठी रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दीड महिन्यापासून विविध मार्गाने आंदोलन करत आहेत. रिंगरोड बाधित नागरिकांचा सत्ताधा-यांवर रोष आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शहरात येणार असल्यामुळे 11 ऑगस्ट रोजी घर बचाओ समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात येणार होते.

यावेळी आमदार लांडगे यांनी मुख्यमंत्री येण्यापूर्वीच रिंगरोड बाधित नागरिकांना विश्वास दिला. ‘मी मुख्यमंत्र्यांची आणि तुमची भेट घडवून आणतो. आपण केवळ शांतता ठेवा. कार्यक्रम निर्विघ्न पार पाडण्यासाठी मदत करा’ यानंतर संबंधित नागरिकांच्या शिष्टमंडळाला एका कार्यालयात थांबविण्यात आले. लांडगे यांच्या शब्दावर विश्वास नागरिकांनी ठेवला. पण, ऐनवेळी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली. त्यामुळे भोसरीतील ‘त्या’ कार्यक्रमाला गालबोट लागले.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - जम्मू काश्मीरमधील पम्पोर येथे दहशतवाद्यांशी लढताना वीरगती प्राप्त झालेले शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ स्मारक उभारण्यासाठी महापालिकेने तातडीने जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी काँग्रेसने केली आहे.

हडपसरमधील फुरसुंगी येथील भारतीय सैन्यातील जवान सौरभ फराटे यांना 17 डिसेंबर 2016 रोजी पम्पोर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात कर्तव्य बजावताना वीरमरण आले. त्यांच्या अंत्यविधीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार, पालकमंत्री गिरीश बापट, स्थानिक खासदार, आमदार, तत्कालीन महापौर आणि नगरसेवक उपस्थित होते. त्यावेळी फराटे यांचे स्मारक उभारण्यात येईल, असे आश्‍वासन शासनातर्फे देण्यात आले. त्यानुसार नुकत्याच पार पडलेल्या महापालिकेतील पक्षनेत्यांच्या बैठकीत फुरसुंगी येथे शहीद जवान सौरभ फराटे यांचे स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, त्यासाठी अद्याप कोणतीही तरतूद अथवा प्रयत्न करण्यात आलेले नाहीत.

या पार्श्‍वभूमीवर शहीद जवान सौरभ फराटे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ हडपसर गाडीतळ चौकात पुलाखाली वीर शहीद स्मृती स्मारक आणि कै. रामचंद्र बनकर शाळेत शहीद सौरभ फराटे यांचा पुतळा उभारण्यात यावा, अन्यथा 17 डिसेंबरपासून आंदोलन करण्यात येईल, अशा मागणीचे निवेदन पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव प्रशांत सुरसे यांनी महापौर मुक्ता टिळक यांना दिले आहे.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड या विशेष उद्देश वाहन (स्पेशल पर्पज व्हेइकल) कंपनीच्या नवनियुक्त संचालक मंडळाची पहिली सभा आज (शुक्रवारी) पार पडली. ही सभा अवघ्या 25 मिनिटात गुंडाळण्यात आली. बैठकीचे केवळ  सोपस्कार पार पडले. या बैठकीत कंपनी स्थापनेसह विविध 20 विषयांना मंजुरी देण्यात आली आहे.


नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करिर सायंकाळी सहा वाजून 25 मिनिटांनी पिंपरी पालिका मुख्यालयात आले. त्यानंतर बैठकीला सुरुवात झाली आणि सात वाजता तर करिर बैठक संपून निघूनही गेले. ही सभा केवळ 25 मिनिटात गुंडाळण्यात आली. या सभेला स्मार्ट सिटीचे संचालक महापौर नितीन काळजे, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती अध्यक्षा सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, नगरसेवक प्रमोद कुटे, सचिन चिखले, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, पीएमपीएमएलचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक तुकाराम मुंढे यांच्यासह केंद्रीय गृहनिर्माण विभागाचे सहसचिव आर. एस. सिंग उपस्थित होते.

स्मार्ट सिटीच्या विषय पत्रिकेवर 20 विषय होते. त्यात प्रामुख्याने स्वाक्षरीचे अधिकार बहाल करणे, शिक्क्याला मंजुरी देणे, कार्यालयीन पत्ता अधिकृत करणे, कंपनी सचिव, कंपनी चार्टडअकाऊंटंटची (सीए) नेमणूक करणे, एरिया बेस डेव्हलपमेंट आणि पॅनसिटी प्रकल्पासाठी सल्लागार नेमणे या प्रमुख प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. तसेच शिवसेनेचे नगरसेवक प्रमोद कुटे आणि मनसेचे सचिन चिखले यांचा संचालक मंडळात समावेश करण्यात आला. 

स्मार्ट सिटीच्या पहिली सभा चांगल्या वातावरण पार पडली. पॅनसिटी आणि मॉडेल वॉर्डचा पुढील दोन महिन्यात सर्वे करण्यात येणार असून त्याचा सर्वंकष प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्यात येईल.  पहिल्या टप्प्यांत नागरिकांसाठी उपयोगी पडणा-या सुविधा करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामध्ये स्वच्छतागृह, सीसीटीव्ही कॅमेरे, पार्किंगची सुविधा करण्यात येणार आहे. तसेच हॉकर्स झोनसाठी धोरण करण्यात येणार असून सर्व समावेशक स्मार्ट सिटी करण्यावर भर देण्यात येणार आहे, असे सभागृह नेते एकनाथ पवार यांनी सांगितले.

18 Aug 2017


एमपीसी न्यूज - पीएमपीएमएलच्या संचालक मंडळाच्या 16 ऑगस्टला झालेल्या बैठकीत विद्यार्थी पास आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पास दरात करण्यात आलेली वाढ ही अन्यायकारक असून हा निर्णय जरी पीएमपीएमएल प्रशासनाचा आहे, असे भासवण्यात येत असले तरी त्यांचे कर्तेकरविते हे पुणे आणि पिंपरी-चिंचवाड महापालिकेतील भाजपचे पदाधिकारी आहे, असा आरोप पुणे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते चेतन तुपे यांनी केला. या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने  मुख्यसभेत आंदोलन करण्यात आले.


पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) वतीने देण्यात येणाऱ्या विद्यार्थी पासेसच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या पासच्या किमतीमध्ये येत्या 21 तारखेपासून दरवाढ करण्यात येणार आहे, अशी घोषणा पीएमपी प्रशासनातर्फे बुधवारी करण्यात आली आहे. या विरोधात आज झालेल्या मुख्यसभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच ही दरवाढ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. दरवाढ मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा  इशारा देखील यावेळी देण्यात आला.

या  आंदोलनानंतर आयोजित पत्रकार परिषदेमध्ये चेतन तुपे म्हणाले की, संचालक मंडळाच्या बैठकीत पास दरवाढीचा घेण्यात आलेला निर्णय हा अन्यायकारक असून यातून पुणेकरांची लूट करण्यात येत आहे. महापालिका विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध योजना राबवून सोयीसुविधा पुरवण्याचा  प्रयत्न करत तर दुसरीकडे अशा प्रकारची अन्याकारक दरवाढ त्यांच्यावर थोपली जात आहे. 

हा निर्णय जरी प्रशासनाचा आहे, असे सांगितले जात असले तरी पीएमपीएमएल ही एक कंपनी आणि आहे. त्यात पुणे महापालिकेची 60 टक्के तर पिंपरी-चिंचवड महापालिकेची 40 टक्के मालकी आहे. आणि या दोन्ही महापालिकेत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मालकी हक्कानुसार कोणतेही निर्णय करण्याचा अधिकार भाजप पदाधिकाऱ्यांकडे आहे. त्यामुळे हा निर्णय भाजप पदाधिका-यांनीच घेतला आहे, असा आरोप तुपे यांनी केला आहे.

18 Aug 2017


22 ऑगस्टला देशव्यापी संप तर 15 सप्टेंबरला लोकसभेवर महामोर्चा

एमपीसी न्यूज - आपल्या विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशच्या वतीने देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत 22 ऑगस्टला बँक कर्मचा-यांनी देशव्यापी संप पुकारला असून 15 सप्टेंबरला लोकसभेवर महामोर्चा काढणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य बँक कर्मचारी फेडरेशनचे जनरल सेक्रेटरी देविदास तुळजापूरकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी पुणे जिल्हा बँक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष दीपक पाटील, नंदकुमार चव्हाण, ललीता जोशी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना तुळजापूरकर म्हणाले की, बँकांचे खासगिकरण, विलिनिकरण व बचत खात्यावरील व्याजदराला लावलेली कात्री हे निर्णय सर्वसामान्यांच्या हितासाठी योग्य नाहीत. याशिवाय हेतुतः थकित कर्जदारावर गुन्हा दाखल करावा, त्यांना बँकांच्या नाहरकतीशिवाय निवडणुका लढवण्याची परवानगी देऊ नये, अशा विविध मागण्यांसाठी ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनच्या वतीने देशव्यापी मोहीम राबविण्यात येत आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियनच्या नेतृत्वाखाली 22 ऑगस्ट रोजी संघटित दहा लाख कर्मचारी एक दिवसीय संपावर जाणार आहेत. तर 15 सप्टेंबर रोजी दिल्ली येथे लोकसभेवर महामोर्चा काढणार आहेत.

निश्चलनीकरणानंतर बँकातील ठेवींमध्ये प्रचंड वाढ झाली.  त्यामुळे बँकांना ठेवींची गरज कमी होत गेली आहे. त्याचाच फायदा घेत बँकांनी सामान्यांच्या बचत खात्यावरील व्याजदर कमी करण्याचा डाव खेळला. तर दुस-या बाजूला अर्थव्यवस्थेतील अवरुद्धीमुळे व मोठ्या पायाभूत उद्योगांना झालेल्या तोट्यामुळे अनेक मोठी कर्जे थकली आहेत. नवीन कर्जाला मागणीच नाही. त्यामुळे बँका अडचणीत आल्या आहेत.

सर्वच बँकांचा एनपीए प्रचंढ वाढला आहे. थकीत कर्जापोटी कराव्या लागणाऱ्या तरतुदीत खूप मोठी वाढ झाली आहे. प्रयत्न करूनही थकीत कर्जाची वसूली होत नाही. हे पाहून बँका मोठ्या प्रमाणात कर्जे राईट ऑफ करत आहेत. त्यातील जवळपास 86 टक्के थकीत बड्या कॉर्पोरेट कंपन्यांकडे आहेत. त्यांची प्रभावी वसूली न करता त्याचा बोजा सामान्य ग्राहकांवर टाकत आहेत. त्यामुळे सामान्य ग्राहकांना न्याय मिळावा म्हणून आम्ही हा संप करत असल्याचे तुळजापूरकर यांनी सांगितले.

बड्या थकित कर्जदारांच्या घरासमोर आंदोलन

सरकार सार्वजनिक बँकांच्या खासगिकरणाचा अजेंडा राबवत आहे. त्याला आमचा विरोध आहे. सरकारने बड्या थकीत कर्जदारांची नावे घोषित करावीत. त्यांना निवडणूक लढवण्यापासून मजाव करावा. तसेच महाराष्ट्रातील 100 बड्या थकीत कर्जदारांच्या विरोधात त्यांच्या घर किंवा ऑफिससमोर आम्ही सप्टेंबरमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशारा तुळजापूरकर यांनी यावेळी दिला.

18 Aug 2017

विस्तारक योजना गांभीर्याने घेण्याची आमदारांची पिंपरी पालिकेतील नगरसेवकांना तंबी

एमपीसी न्यूज - विधानसभा, महापालिका आणि नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढणा-या भाजपने आता आगामी लोकसभा निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी 'वन बूथ टेन यूथ' हा उपक्रम सुरू केला असून पिंपरी-चिंचवड शहरातील 1300 मतदान केंद्रावर प्रत्येकी दहा कार्यकर्त्यांची नेमणूक करण्यात येणार आहे. शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाच्या सूत्रानुसार सध्या मावळ व शिरूर लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे आहेत. हे मतदार संघ खेचून घेण्यासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी दोन दिवसांपूर्वी प्रमुख नेत्यांची दिल्लीत बैठक घेतली होती. त्यामध्ये आगामी 2019 मध्ये होणा-या लोकसभा निवडणुकीत देशभरातून भाजपचे 350 खासदार निवडून आणण्याचे लक्ष त्यांनी ठेवले आहे. यासाठी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड शहर मावळ आणि शिरूर या दोन लोकसभा मतदार संघात येते. शिवसेनेचे श्रीरंग बारणे मावळचे तर शिवाजीराव आढळराव पाटील शिरूर लोकसभा मतदार संघाचे विद्यमान खासदार आहेत. भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे दोघेही खासदारकीसाठी इच्छुक आहेत. मावळ मतदार संघातून जगताप तर शिरूरमधून लांडगे भाजपकडून प्रबळ दावेदार असणार आहेत. त्यासाठी त्या दोघांनीही आत्तापासून मशागत सुरू केली आहे.

आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी आज (शुक्रवारी) पिंपरी पालिकेतील नगरसेवकांची बैठक घेतली. भाजपने पंडित दीनदयाळ उपाध्याय विस्तारक योजना सुरू केली आहे. ही योजना नगरसेवकांनी गांभीर्याने घ्यावी. नगरसेवकांनी पाच सप्टेंबरपर्यंत आपल्या प्रभागात बूथ गठीत करावेत. ज्यांना काम शक्य नाही. त्यांनी कार्यमुक्त व्हावे, अशी तंबी आमदारांनी नगरसेवकांना दिली आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात 1300 मतदान केंद्र आहेत. एका मतदान केंद्रावर दहा कार्यकर्ते देण्यात येणार आहेत. पाच सप्टेंबरपर्यंत प्रत्येक नगरसेवकांनी आपल्या प्रभागात बूथ गठीत करणे गरजेचे आहे. मतदार यादीचे एक पान एक कार्यकर्त्याला देण्यात येणार आहे. या कार्यकर्त्याने त्या प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. केंद्र, राज्य सरकारने केलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती कार्यकर्ते नागरिकांना देणार आहेत, अशी माहिती एकनाथ पवार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Page 3 of 290
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start