• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
13 May 2017

एमपीसी न्यूज - फेडरेशन ऑफ ऑल महाराष्ट्र पेट्रोल डीलर्स असोसिएशन  (फामपेडा) या पेट्रोल पंप चालकांच्या संघटनेने विविध मागण्यांसाठी उद्यापासून (14 मे) पुकारलेले दर रविवारी पेट्रोलपंप बंदचे आंदोलन स्थगित केले. जर पेट्रोलपंप चालक ठरल्याप्रमाणे संपावर गेले तर त्यांच्यावर मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. अखेर पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हे आंदोलन स्थगित केल्याची माहिती पुणे पेट्रोल डीलर असोसिएशनचे अध्यक्ष समीर लडकत, उपाध्यक्ष सागर रुकारी यांनी दिली.

यावेळी बोलताना पालकमंत्री गिरीश बापट म्हणाले की, पेट्रोलपंप बंदचे आंदोलन करणा-यांना मेस्मा कायद्यांतर्गत कारवाई करण्याचा इशारा सरकारने दिला होता. परंतू त्यापूर्वीच त्यांनी आंदोलन स्थगित करत असल्याचे सांगितले. परंतु यापुढील काळात अशी परिस्थिती उद्भवू नये यासाठी सरकार पेट्रोलपंप चालक आणि तेल कंपन्या यांच्यात मध्यस्थी करून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचे त्यांनी सांगितले. यासंदर्भात आज रात्री केंद्रीय पेट्रोलियममंत्र्याशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पुणे पेट्रोल डिलर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर रूकारी म्हणाले, गेल्या चार वर्षांपासून तेल कंपन्यांनी अपुर्वाचंद्रा कमिटीने दर सहा महिन्यांनी वाढ देण्याच्या दिलेल्या आदेशाचे पालन केले नाही. त्यामुळे 14 मे पासून सर्व पंपचालक सामुहिक सुटी घेत दर रविवारी पेट्रोल पंप बंद असा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. परंतु सरकारच्या मेस्मा कायद्याविषयी आम्हाला अधिक माहितीच नव्हती. त्यामुळे या कायद्याचा अभ्यास करून आणि 17 मे रोजी होणा-या बैठकीनंतर या आंदोलनाची पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

13 May 2017
स्वीकृत नगरसेवक निवडीवरुन पिंपरी-चिंचवड भाजपमध्ये राडा
 
एमपीसी न्यूज - पक्ष विरोधी काम करणा-यांची स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिफारस केल्याचा आरोप करत भाजपच्या नाराज कार्यकर्त्यांनी राज्यसभा खासदार अमर साबळे आणि राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्या छायाचित्राला आज (शनिवारी) काळे फासले. तसेच त्यांचे पुतळेही जाळले.
 
पिंपरी, मोरवाडी येथे पिंपरी-चिंचवड शहर भाजपचे मध्यवर्ती कार्यालय आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह शहरातील नेत्यांचे छायाचित्र असलेला फलक घेऊन युवा मोर्चाचे उपाध्यक्ष निलेश अष्टेकर, मिथून मधुरे यांच्यासह कार्यकर्ते कार्यालयासमोर आले. फलकावरील राज्यसभा खासदार अमर साबळे आणि लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन यांच्या छायाचित्राला शनिवारी त्यांनी काळे फासले. तसेच दोघांचेही पुतळे करून त्याचे दहन केले.
निलेश अष्टेकर म्हणाले की, माऊली थोरात यांनी महापालिका निवडणुकीत पक्षविरोधी काम केले आहे. त्यांचे सामाजिक कार्य काहीच नाही. फक्त नेत्यांच्या मागे पुढे करणा-यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधी दिली आहे. खासदार अमर साबळे यांनी पक्षविरोधी काम करणा-यांची स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिफारस केल्याने आपण त्यांच्या प्रतिमेला काळे फासले आणि पुतळा जाळला आहे.  मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला आपला विरोध नसून चुकीच्या शिफारशी विरोध आहे. 
 
राजेश पिल्ले म्हणाले की, पक्ष सत्तेत असताना न्याय देण्याची वेळ आल्यावर ज्यांनी पक्षासाठी काहीच काम केले नाही, अशा लोकांना स्वीकृत नगरसेवकपदाची संधी दिली आहे. ते कार्यकर्त्यांसाठी कधीही उपलब्ध नसतात. 
 
साबळे, पटवर्धन यांनी पक्षाच्या जुन्या आणि प्रामाणिक कार्यकर्त्यांचा विचार करायला हवा होता. शिफारस करा पंरतु पक्षासाठी काम करणा-यांची शिफारस करा, असेही ते म्हणाले.
माऊली थोरात यांनी आपण पक्षासाठी किती काम केले, याचे स्वत: आत्मपरीक्षण करावे, असे प्रमोद निसळ म्हणाले. पक्षविरोधी काम करणा-यांची स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिफारस करण्यात आल्याचेही ते म्हणाले.
 
स्वीकृत नगरसेवकपदाची नावे प्रदेश नेतृत्वाने निश्चित केली आहेत. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. त्या पक्ष नेतृत्वापर्यंत पोहचविल्या जातील, असे सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले.
 
p12
 
putale jalale
 
 
13 May 2017

30 जणांची नवी कार्यकारिणी जाहीर 

एमपीसी न्यूज - अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या पिंपरी-चिंचवड अध्यक्षपदी दिलीप कुलकर्णी यांची नुकतीच निवड करण्यात आली. त्यांच्यासह 30 जणांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे.

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या कार्यकारिणीची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गोविंद कुलकर्णी, महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष विश्वजीत देशपांडे, राष्ट्रीय महिला सरचिटणीस संजीवनी पांडे, प्रदेश सरचिटणीस जितेंद्र कुलकर्णी, श्रीकृष्ण कुलकर्णी आदी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहर कार्यकारिणी पुढीलप्रमाणे : - अध्यक्ष दिलीप कुलकर्णी, उपाध्यक्ष पुष्कराज गोवर्धन, राजन बुडुख, सुहास फोफळे, संघटन सरचिटणीस सुनील देशपांडे, कार्यालयीन सरचिटणीस महेश बारसावडे, खजिनदार मुकुंद कुलकर्णी, अर्थ सल्लागार पियुष अवटी, चिटणीस दिलीप गोसावी, उज्वला केळकर, अविनाश नाईक, महिला आघाडी अध्यक्षा माधुरी ओक, उद्योजक आघाडी अध्यक्ष संदीप बेलसरे, ज्येष्ठ नागरिक आघाडी अध्यक्ष गोपाळ कळमकर, पुरोहित आघाडी अध्यक्ष उपेंद्र पाठक, इव्हेंट आघाडी अध्यक्ष अनंत कुलकर्णी, प्रवक्ता अशोक पारखी, सल्लागार महेश कुलकर्णी यांचा समावेश आहे. 

कार्यकारिणी सदस्य अनुपमा कुलकर्णी, अनुराधा कुलकर्णी, शंकर कुलकर्णी, शामकांत कुलकर्णी, मंगला एकबोटे, निता वैद्य, शशिकांत जुन्नरे, कमलाकर कुलकर्णी, सुहास जाऊळकर, धुंडिराज ओक, प्रवीण कुलकर्णी, मधुकर रामदासी, अजित देशपांडे, राजाभाऊ कुलकर्णी, नंदू भोगले, प्रशांत कुलकर्णी, उषा गर्भे, मोहन साठे, विजय नाईक, अनंत बडवे, प्रमोद ठोसर, गणेश कुलकर्णी, अभय अशोक जोशी, नरेश कुलकर्णी, अभय  वामन जोशी, अर्चना देशपांडे, वैभव गोडसे, सुनील कुलकर्णी, प्रशांत जोशी यांचा समावेश आहे.

13 May 2017

एमपीसी न्यूज - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना उस्मानबादमध्ये जाऊन शेतक-यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, त्यांनी दौ-याकडे पाठ फिरवली. त्यांच्या अनुपस्थितीत उस्मानाबादच्या शिवसेनेच्या पदाधिका-यांनी आमदार चाबूकस्वार म्हणून मुंबईचे माजी नगरसेवक यशोधर फणसे यांची ओळख करून दिली. शिवसैनिकांनी 'डमी' आमदार उभा केल्याने शेतक-यांनी नाराजी व्यक्त केली.  

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदारांना मराठवाड्यातील शेतक-यांच्या भेटी घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतक-यांना कर्ज माफी मिळावी, म्हणून शिवसेनेच्या वतीने मराठवाड्यामध्ये शिवसंपर्क अभियान सुरू करण्यात आले होते. यासाठी पिंपरी विधानसभेचे आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांची निवड मराठवाड्यातील उस्मानाबाद आणि कळंब मतदारसंघांसाठी करण्यात आली होती.

गौतम चाबुकस्वार यांनी त्या ठिकाणी जाऊन थेट शेतक-यांशी संवाद साधायचा होता. मात्र, त्यांच्याऐवजी मुंबई महापालिकेतील शिवसेनेचे माजी नगरसेवक यशोधर फणसे आमदार गौतम चाबुकस्वार म्हणून उस्मानाबादमध्ये दाखल झाले.

उस्मानाबाद येथील चिखली गावात माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांनी फणसे यांच्याकडे हातवारे करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आपल्याशी चर्चा करायला आमदार चाबुकस्वार साहेब यांना पाठवण्यात आले आहे, असे सांगितले. त्यावेळी हा सर्व खोटा प्रकार समोर आला.

याबाबत बोलताना आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार म्हणाले की, हा दौरा जाहीर होण्याच्या अगोदर मी महाराष्ट्रात नव्हतो. त्यामुळे मला या दौ-याबद्दल कोणतीही माहिती नव्हती. हा प्रकार गैरसमजातून झाला आहे. माजी आमदार ओमराजे निंबाळकर यांची आणि माझी ओळख नाही. दौ-यामध्ये माझ्यासोबत यशोधर फणसे यांचेही नाव होते. त्यामुळे कार्यक्रम पत्रिकेवरील नाव वाचून निंबाळकर यांनी चाबूकस्वार म्हणून फणसे यांची ओळख करून दिली आहे. हा  सर्व प्रकार गैरसमजातून घडला. याविषयी मी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची येत्या एक दोन दिवसात भेट घेणार आहे, असेही ते 'एमपीसी' न्यूजशी बोलताना म्हणाले.

13 May 2017

एमपीसी न्यूज - अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी-चिंचवड शाखेच्या वतीने आज (शनिवारी) सकाळी 6.00 वाजता निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले. लोकमान्य हॉस्पिटलपासून गंगानगर संभाजी चौक, भेळ चौक व परत लोकमान्य हॉस्पिटल अशा साधारण 4 कि.मी. च्या वॉकमध्ये समविचारी संघटनांसह परिसरातील नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

यामध्ये चाहूल विचारमंचचे सुरेश विवि, गणेश दराडे, तक्षशिला बुद्धविहारचे डॉ. जनार्दन मुनेश्वर, वैष्णव चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त श्रीराम नलावडे, माजी आरोग्य अधिकारी हेमंत चिखलीकर, सुहास माटे आदी उपस्थित होते.  

डोक्यावर दुधाची बाटली घेऊन 13 मे, 1993 रोजी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या कार्यास सुरुवात झाली. नरेंद्र दाभोळकर, गोविंद पानसरे आणि कुलबुर्गी यांच्या हत्या सकाळच्या वेळीच करण्यात आल्या. घटना घडून बराच कालावधी उलटून गेला तरी मारेकरी अद्याप मोकाटच आहेत. म्हणून सकाळच्या वेळी निर्भय वॉकचे आयोजन करण्यात आले. वॉकची सुरुवात होताच पावसाने हजेरी लावली परंतु कार्यकर्त्यांनी न डगमगता 'फुले शाहू आंबेडकर, आम्ही सारे दाभोळकर' अशा घोषणांचा कार्यक्रम सुरूच ठेवला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र कांकरिया, सूत्रसंचालन विवेक कांबरे, आभार अरुणा यशवंते यांनी व्यक्त केले तर कार्यक्रमाचे संयोजन देविदास इंगळे, विश्वास पेंडसे यांनी केले.

13 May 2017

एमपीसी न्यूज - घोरपडीमध्ये दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या बिकट होत आहे. त्यामुळे अपघातांची संख्या वाढतच आहे. त्याकरिता घोरपडीमधून जाणा-या कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गालगत भुयारी मार्ग बनवण्याची मागणी शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट उपविभागप्रमुख चंद्रकांत खुणेकरी यांनी केली.

मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावरील घोरपडी येथील स्वामी विवेकानंद प्राथमिक शाळेपासून ते घोरपडी गावामधील विकासनगर येथपर्यंत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा तसेच सोलापूर रेल्वेमार्गालगत असणा-या पंचशील नगरपासून कोरेगाव पार्क येथपर्यंत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा. बी. टी. कवडे रोडवरून सरळ मुंढवा रोड लगत असणा-या सोलापूर रेल्वेमार्गालगत भुयारी मार्ग तयार करण्यात यावा. हा भुयारी मार्ग मुंढवा रोडवरील बिडकर मळा येथे काढण्यात यावा, अशा प्रकारच्या मागण्यांबाबत मागील दोन वर्षांपासून रेल्वे प्रशासन आणि महानगरपालिकेला निवेदने सादर करण्यात आली होती.

वेळोवेळी याबाबत प्रशासनाला विचारले असता केवळ चालढकल केली जाते. यामुळे यामार्गे येणा-या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या परिसरातील अपघातांमध्ये देखील वाढ झालेली आहे. घोरपडी गावामध्ये अनंत टॉकीजसमोरील श्रीनाथ म्हस्कोबा भाजी मार्केटयेथून वाहणा-या भैरोबानालावरील अरुंद पूल रुंद करण्यात यावा. यामुळे घोरपडीमधील वाहतूक कोंडी दूर होण्यास मदत होईल, असे शिवसेना पुणे कॅन्टोन्मेंट उपविभागप्रमुख चंद्रकांत खुणेकरी यांनी सांगितले. यापुढेही या कामांना चालढकल करण्यात आली तर आंदोलन करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

13 May 2017

एमपीसी न्यूज - महापालिकेच्या 2017-18 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकाला सर्वधारण सभेत मंजुरी मिळणे बाकी आहे. त्यानंतर विकास कामांना सुरुवात होणार आहे, असे असताना भाजपचे सांगवीतील नगरसेवक राष्ट्रवादीच्या कार्यकाळात झालेल्या विकास कामांचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप, स्थायी समितीचे माजी सभापती अतुल शितोळे यांनी केला आहे.

सांगवीतील पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 59 मध्ये सिमेंटच्या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळून काम सुरू झाले होते. परंतु, निवडणूक आचारसंहितेमुळे रस्त्याचे काम थांबले होते. मधूबन सोसायटी येथील कामाचे पुन्हा भुमिपूजन करून भाजपच्या स्थानिक नगरसेवकांचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न असल्याचा, शितोळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

स्थायी समिती सभापती असताना आपण सांगवीतील पूर्वीच्या प्रभाग क्रमांक 59 मध्ये तब्बल 40 कोटींची विकास कामे केली आहेत. प्रभाग एक आदर्श करण्याचा प्रयत्न केला. सिमेंटच्या रस्त्याचेही काम ब-यापैकी पूर्ण झाले आहे. परंतु, महापालिका निवडणुकीच्या कामकाजामुळे प्रशासकीय यंत्रणा निवडणूक कामात व्यस्त होती. त्यामुळे कामकाज होऊ शकले नाही. निवडणूक होऊन अडीच महिन्यानंतरही मधुबन सोसायटीमधील रस्त्याचे काम महापालिका प्रशासन जाणून-बुजून सुरू करत नसल्याचा आरोप शितोळे यांनी केला आहे. पावसाळा पंधरा दिवसावर आला आहे. त्यामुळे हे काम तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, असेही त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.

13 May 2017

एमपीसी न्यूज - मी देखील पंधरा वर्षे आमदार राहिलो आहे, त्यामुळे राज्यमंत्र्यांना काय अधिकार असतात हे मला चांगलेच माहित आहे, असे सांगत खासदार राजू शेट्टी यांनी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यावर निशाना साधला. आगामी आत्मक्लेश यात्रेसंदर्भात पुण्यात आयोजित एका पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

आत्मक्लेश यात्रेऐवजी तुम्ही सत्तेतून बाहेर का पडत नाही, असा प्रश्न विचारल्यानंतर उत्तर देताना ते बोलत होते. ते म्हणाले आमचा सत्तेतील सहभाग अतिशय सूक्ष्म आहे. त्यामुळे सत्तेत असल्याने काही फरक पडणार नाही. आणि मुळातच आमच्यातील एकजण जरी राज्यमंत्री असला तरी देखील पंधरा वर्षापासून मी आमदार असल्याने राज्यमंत्र्याला काय अधिकार असतात हे मला चांगलेच माहित आहे. त्यामुळे त्याने काही फरक पडणार नाही, असे सांगत त्यांनी सदाभाऊंना टोला लगावला.

शेतक-यांच्या आत्महत्येसाठी शेतकरी नेतेही जबाबदार

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या रोख्यण्यासाठी आमच्यासारखे शेतकरी नेतेही कमी पडले, असे सांगत याला कुठेतरी समाजसुद्धा जबाबदार आहे. त्यामुळे समाजातील नागरिकांनी एखादा दिवस शेतकऱ्यांसोबत काढावा, त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात आणि मग त्यांच्या प्रश्नाविषयी आपले मत मांडावे, असे आवाहन त्यांनी यानिमित्ताने जनतेला केले.

रावसाहेब दानवे यांचे वक्तव्य चुकीचे

रावसाहेब दानवे यांनी जालना येथे जाहीर सभेत शेतकऱ्यांबाबत आक्षेपार्ह भाषेचा वापर  केलेले वक्तव्य चुकीचे असल्याचे सांगत त्यांनी, असे बोलायला नको होते.

13 May 2017

एमपीसी न्यूज - शेतक-यांच्या कर्जमुक्तीसाठी आतापर्यंत विरोधी पक्षांनी एकत्र येत संघर्ष यात्रा काढली, आमदार बच्चू कडू यांनी आसुड यात्रा काढली. या दोन्ही यात्रेतून शेतक-यांना अजूनतरी कुठलाही फायदा झाला नाही. उलट या यात्रेनंतरही तुर खरेदीचे संकट शेतक-यांसमोर उभे राहीले आहे. राज्य सरकारचाच एक घटक पक्ष असलेल्या स्वाभिमानी संघटनेने आता शेतक-यांचा सातबारा कोरा व्हावा या जुन्याच मागणीसाठी आत्मक्लेश यात्रा काढण्याचे ठरवले आहे. याची सुरवात 22 मे रोजी पुण्यातील महात्मा फुले वाड्यातून होणार असून मुंबईपर्यंत पायी चालत जाऊन राज्यपालांना निवेदन देणार असल्याची माहिती खासदार राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

 

ही आत्मक्लेश यात्रा जुन्या पुणे-मुंबई महामार्गाने जाणार आहे. 30 मे पर्यंत मुंबईत पोहोचून राज्यपालांना भेटून शेतकऱ्याच्या कर्जमुक्तीसाठी निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या यात्रेत अनेक शेतकरी सहभागी होणार असून यात्रेच्या काळात महामार्गालगत असलेल्या गावांमध्ये यात्रेत सहभागी असलेल्यांची राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्यात आल्याचे ते म्हणाले.

 

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतक-यांना हमीभाव देण्याचे वचन दिले होते. ते पूर्ण करण्यासाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतमालासाठी हमीभाव लागू करा आणि शेतक-यांना कर्जमुक्त करा. शेती हा जरी राज्य सरकराशी निगडीत विषय असला तरी शेतमालाच्या किमतीवर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने या प्रश्नाकडे कडे दुर्लक्ष करू नये असे त्यांनी सांगितले.

 

तुर खरेदीचे अपयश राज्यसरकारच्या निष्काळजीपणामुळेच


तुरीचे पीक चांगले होणार असल्याची माहिती असतानाही सरकारने साठवणुकीची व्यवस्था केली नाही. सरकारला शेजारील राज्यातील गोडाऊन, काही खाजगी गोडाऊन भाड्याने घेऊन तूर खरेदी करता आली असती परंतु सरकारकडून याबाबतीत काहीही हालचाल झाल्या नाही. त्यामुळे तुर खरेदीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे तुर खरेदीचे प्रश्न राज्यसरकारच्या निष्काळजीपणामुळेच झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

13 May 2017

एमपीसी न्यूज - पाणीटंचाई व जुन्या पाईपलाइनच्या गळतीमुळे निगडी, यमुनानगर येथील चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रोजेक्ट सध्या तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. तो प्रकल्प पुन्हा चालू करण्यासाठी आपण प्रयत्न करत असून लवकरच पायलट प्रोजेक्ट सुरु होणार असल्याची माहिती, नगरसेवक उत्तम केंदळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

 

"सुवेझ'' या फ्रान्स येथील कंपनीमार्फत सन 2011 ला पिंपरी- चिंचवड शहरात चोवीस तास पाणीपुरवठ्याच्या पायलट प्रोजेक्टसाठी सर्व्हे करण्यात आला होता. या प्रकल्पासाठी यमुनानगरची निवड केली होती. यमुनानगरची जमीन पातळी उंचीवर असल्यामुळे दुस-या मजल्यावर सुद्धा पाणी चढत नाही.

 

यमुनानगरमधील काही सोसायट्यांमधे पाणी साठविण्यासाठी टाक्यांची व्यवस्था नाही. पाणीच मिळत नसल्यामुळे तेथील नागरिकांच्या खुप तक्रारी येत होत्या. त्यामुळे पाणीपुरवठा विभागाने सुवेझ कंपनीला यमुनानगरला हा प्रोजेक्ट राबविण्याबाबत सूचना दिल्या होत्या. त्यानंतर सुवेझने 'हिलेनिअम' सिस्टीमद्वारे याठिकाणी काम करून हा पायलट प्रोजेक्ट यशस्वी केला होता.

 

पाणीटंचाई व जुन्या पाईपलाइनच्या गळतीमुळे हा प्रोजेक्ट सध्या तात्पुरत्या कालावधीसाठी बंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्या बाबत नागरिकांच्या तक्रारी वाढत होत्या. याबाबत पाणीपुरवठा विभागाशी आपली चर्चा झाली असून लवकरच पायलट प्रोजेक्ट सुरु होणार असल्याचे, नगरसेवक केंदळे यांनी सांगितले.

 


यमुनानगरमधील पायलट प्रोजेक्ट कुठल्या नगरसेवकांच्या मागणीनुसार करण्यात आला नव्हता. त्यामुळे पाण्याच्या मुद्यावरुन राजकरण करणे योग्य नाही. शहरात पाणीटंचाई सुरु आहे. चोवीस तास पाणीपुरवठ्याचा पायलट प्रोजेक्ट सुरु होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. जुन्या लीकेज पाइपलाइन बदलून नव्याने काही नवीन उपाययोजना करून लवकर हा प्रोजेक्ट सुरु करून यमुनानगर सोबत इतरही भागांना याचा कसा फायदा होईल याकडे लक्ष देणार आहे, असल्याचे नगरसेविका सुमन पवळे यांनी सांगितले.

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start