• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Pimpri : घरोघरचा कचरा गोळा करणा-या संस्थांना पुन्हा मुदतवाढ


458 कर्मचा-यांवर पावणेतीन कोटी होणार खर्च

एमपीसी न्यूज - घरोघरचा कचरा गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी नेमण्यात येणा-या दोन स्वंयरोजगार संस्थांना पुन्हा चार महिने मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. तीन क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कचरा गोळा करण्यासाठी एकूण दोन कोटी 19 लाख रूपयांचा खर्च होणार आहे.

महापालिकेच्या 'अ', 'फ' आणि 'ड' क्षेत्रीय कार्यालयातील महापालिकेच्या 'टाटा एसीई' वाहनांमार्फत घरोघरचा कचरा गोळा करून तो संकलन केंद्रापर्यंत वाहून नेण्याच्या कामासाठी आरोग्य मुख्य कार्यालयामार्फत सन 2014-15 मध्ये एक वर्षे कालावधीकरता निविदा मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये कामगारांच्या वेतन व भत्त्यापोटी 'अ' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत एक कोटी 78 लाख 65 हजार रुपये एवढी निविदेची अर्थसंकल्पीय किंमत होती.

'फ' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत दोन कोटी नऊ लाख 69 हजार रुपये एवढी निविदेची अर्थसंकल्पीय किंमत होती. प्राप्त निविदाधारकांपैकी भारतीय महिला स्वंयरोजगार सेवा सहकारी संस्थेने 'अ' आणि 'फ' या दोन्ही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत निविदा रकमेच्या कमी दराने निविदा सादर केल्याने त्यांची एक वर्ष कालावधीकरिता नेमणूक करण्यात आली.

'ड' क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत कामगारांच्या वेतन व भत्त्यापोटी एक कोटी 86 लाख 41 हजार रूपये एवढी निविदेची अर्थसंकल्पीय किंमत ठरविण्यात आली. प्राप्त निविदाधारकांपैकी सावित्री महिला स्वयंरोजगार सेवा सहकारी संस्थेला कचरा गोळा करण्याचे काम देण्यात आले. गेल्या दीड वर्षांपासून या तीनही संस्थांना वेळोवेळी मुदतवाढ देण्यात येत आहे. सुरूवातीला त्यांना साडेपाच महिने मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर पुन्हा चार-चार महिने मुदतवाढ दिली. 

या कामासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवणे गरजेचे असताना महापालिकेने मुदतवाढीचा सपाटा लावला आहे. त्यानुसार 30 नोव्हेंबर 2017 पर्यंत मुदतवाढ दिली जाणार आहे. तीनही क्षेत्रीय कार्यालय हद्दीतील कचरा गोळा करण्यासाठी दोन संस्थांमधील 458 कर्मचा-यांवर चार महिन्यांसाठी एकूण दोन कोटी 19 लाख 10  हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे.