• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pimpri : आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या अनन्या पाटीलचा महापौरांच्या हस्ते सत्कार

एमपीसी न्यूज - शहरातील सुवर्णकन्या अनन्या पाटील हिने आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून पिंपरी-चिंचवड शहराचे नांव जागतिक पातळीवर पोहोचविले आहे, असे मत महापौर नितीन काळजे यांनी केले.


सन 2024 मध्ये होणा-या ऑलम्पिक स्पर्धेसाठी निवडण्यात आलेल्या देशभरातून 21 खेळाडूंमध्ये अनन्या पाटील हिची पूर्वतयारी करण्यासाठी निवड झाली आहे. त्यानिमित्त महापौर काळजे यांच्या हस्ते अनन्या पाटील हिचा सन्मान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

सभागृह नेते एकनाथ पवार, कला, क्रीडा, साहित्य व सांस्कृतिक समिती सभापती लक्ष्मण सस्ते, 'ह' प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ कांबळे, नगरसेवक नामदेव ढाके, क्रीडा अधिकारी रज्जाक पानसरे, क्रीडा पर्यवेक्षक ज्ञानदेव भिसे, राजू कोतवाल, प्रशिक्षक राजेंद्र पाटोळे, चंदन गंगावणे, तुकाराम गायकवाड, अनन्याचे आई वडील माधुरी पाटील व विजय पाटील आदी उपस्थित होते.

16 वर्षीय अनन्या पाटील हिने मेहनतीच्या जोरावर ऑस्ट्रेलिया येथे पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारोतोल्लन स्पर्धेत घवघवीत यश मिळविले आहे. तिने क्लीन अॅण्ड जर्क प्रकरात 80 किलोग्रॅम व स्नॅचमध्ये 66 किलो ग्रॅम असे एकूण 146 किलो ग्रॅम वजन उचलत 17 वर्षाखालील स्पर्धेत सुवर्णपदक तर ज्युनिअर विभागत ब्राँझपदक पटकाविले आहे.

आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणारी पिंपरी-चिंचवड शहरातील पहिली सुवर्णकन्या अनन्या पाटील ठरली आहे. तिच्या क्रीडा प्राविण्यातूनच पिंपरी-चिंचवड शहराचे नांव जागतिक पातळीवर पोहोचले आहे. सध्या ती महापालिकेच्या अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील वेटलिफ्टींग सेंटर येथे सराव करीत आहे. सन 2013 मध्ये तिने पहिल्यांदा आतंरशालेय स्पर्धेतून सुरुवात करीत 17 वर्षाखालील 44 किलो ग्रॅम वजनगटात ब्राँझपदकाची कमाई केली. त्यानंतर तेलंगणा येथे शालेय राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक, फेडरेशन स्पर्धेत चमकदार कामगिरी केली, दोन आंतरराष्ट्रीय पदकाबरोबरच एकूण 34 पदकाची कमाई तिने केली आहे.

भारतासाठी ऑलम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविणे हे ध्येय असलेल्या अनन्या पाटील या क्रीडापट्टुला तिच्या भावी करियरसाठी महापालिकेच्या वतीने सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे यावेळी महापौर नितीन काळजे यांनी सांगितले.

Facebook Google Plus Twitter LinkedIn