• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
13 Sep 2017

Pune : एकात्मिक सायकल योजना कचऱ्यात

योजनेच्या निधी वापर झाडणकामांसाठी

एमपीसी न्यूज - पुणे शहरातील रस्त्यांच्या झाडणकामांसाठी शहरातील सर्व क्षेत्रीय कार्यालयांना दहा कोटी रुपयांचा निधी वर्गीकरणाद्वारे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीमार्फत मुख्य सभेपुढे ठेवण्यात आला आहे. मात्र, विशेष म्हणजे एकात्मिक सायकल योजनेसाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेल्या तरतुदीतून हे वर्गीकरण केले जाणार आहे. त्यामुळे मोठा गाजावाजा करत आणलेल्या महत्त्वाकांक्षी एकात्मिक सायकल योजनेचे काय होणार? असा सवाल उपस्थित केला जात असून सत्ताधार्‍यांचे अंदाजपत्रकाचे नियोजन कोलमडल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

सायकलींचे शहर हा पुण्याचा लौकिक कायम ठेवण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला महत्त्वाकांक्षी एकात्मिक सायकल आराखडा अंमलबजावणीच्या अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. या आराखड्यामध्ये १४५ किमीचे सायकल ट्रॅक प्रस्तावित आहेत. गर्दीच्या रस्त्यांवर स्वतंत्र सायकल ट्रॅक, अरुंद रस्त्यांवर एकत्रित सायकल ट्रॅक, स्वतंत्र ट्रॅक करणे शक्य नाही अशा रस्त्यांवर रंगीत सायकल ट्रॅक तयार केले जाणार आहेत. याखेरीज पब्लिक बायसिकल शेअरिंग सिस्टीम कार्यान्वित केली जाणार असून त्यामध्ये ६८० ठिकाणी अत्याधुनिक सायकल स्थानके उभारण्यात येणार आहेत. 

या योजनेअंतर्गत पालिकेमार्फत भाडेतत्त्वावर सायकल उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सायकल वापराला प्रोत्साहन देऊन प्रदूषणाची समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचा दावा सत्ताधारी भाजपने केला होता. त्यासाठी यंदाच्या अंदाजपत्रकात घसघशीत तरतूदही करण्यात आली होती. मात्र, या तरतुदीतील दहा कोटींची रक्कम वर्गीकरणाद्वारे झाडणकामांसाठी देण्याचा प्रस्ताव आता स्थायी समितीमार्फत मुख्य सभेपुढे आला आहे. 

या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास एकात्मिक सायकल योजनाच गुंडाळली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंदाजपत्रकाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सत्ताधार्‍यांची घोषणा पुन्हा हवेतच विरल्याचे दिसून येत आहे.
Facebook Google Plus Twitter LinkedIn