• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

पिंपरी पालिकेच्या नगरसेवकांना खरच 'ड्रेसकोड'ची गरज आहे का?

विरोधकांना ड्रेसकोड अमान्य; महापालिकेला खर्चात टाकणार नसल्याची भूमिका

हाच का भाजपचा 'पारदर्शक' कारभार; विरोधकांचा सवाल

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्तारुढ भाजपने आता सर्वच नगरसेवकांना गणवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, हा निर्णय किती नगरसेवकांना रुचतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. दरम्यान, विरोधकांनी या निर्णयावरुन सत्ताधारी भाजपवर कडाडून टीका केली आहे.

महाराष्ट्रात 26 महापालिका आहेत. यापैकी कुठल्याच महापालिकेत नगरसेवकांना ड्रेसकोड नाही. परंतु, पिंपरी महापालिकेने नगरसेवकांना ड्रेसकोड देण्याचा निर्णय घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीतून निवडून आलेले बहुतांश नगरसेवक सदन कुटुंबातील आहेत. लखपती, करोडपती अशी त्यांची ख्याती आहे. दररोज किमती भरझरी उंची वस्त्रे परिधान करणा-या नगरसेवकांना ड्रेसकोड 'परवडेल' काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या ड्रेसकोडची रंग संगती, पुरुष नगरसेवक, महिला नगरसेविकांसाठी कुठला निकष असणार आहे, हा पेच कायम आहे. 

महिला अधिका-यांनाही 'पोशाख' देण्याचा आणि क्लास वन अधिका-यांना ब्लेझर देऊन त्यावर 'नेमप्लेट' लावण्याचाही निर्णय स्थायी समितीने घेतला आहे. दरम्यान, असा निर्णय झाला नसल्याचा दावा स्थायी समितीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी तीन दिवसांपूर्वी पत्रकारांशी बोलताना केला होता. त्यावेळी स्थायी समितीमध्ये ठराव क्रमांक 469 झाल्याचे त्यांना दाखविताच त्या 'अवाक' झाल्या होत्या.

याबाबत बोलताना विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, महापालिकेला आम्ही खर्चात टाकणार नाहीत. ड्रेसकोड आम्हाला मान्य नाही. पालिका काय शाळा, महाविद्यालय आहे काय?. अधिकारी, कर्मचारी गणवेश परिधान करत नाहीत. भाजपच्या नगरसेवकांनी गणवेश घालावा. त्यांच्या गणवेशाचे पैसे आम्ही देऊ. गणवेश घातल्याने माणसांची प्रवृत्ती बदलत नाही. भाजपने अगोदर आपली प्रवृत्ती बदलावी. लोकशाही मार्गाने कामकाज करावे. तीन ते चार नगरसेवकच महापालिका चालवत आहेत. त्यामुळे भाजपच्या नगरसेवकांना गणवेश घालून शाळेत पाठविणे गरजेचे असल्याचा, टोलाही बहल यांनी लगावला.

शिवसेनेचे शहरप्रमुख व पालिकेतील गटनेते राहुल कलाटे म्हणाले, शिवसेनेचा याला विरोध आहे. आम्ही गणवेश स्वीकारणार नाहीत. नगरसेवकांकडे काही कपडे नाहीत का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच दादागिरी करुन भाजप सर्वांना गणवेश परिधान करायला लावेल. करदात्या नागरिकांचा पैशांचा अपव्यय करण्याचा हा प्रकार आहे असेही ते म्हणाले. 

माजी महापौर व ज्येष्ठ नगरसेविका मंगला कदम म्हणाल्या, भाजपने त्यांच्या नगरसेवकांसाठी गणवेश घ्यावा. राष्ट्रवादीचे नगरसेवक गणवेश स्वीकारणार नाहीत. कोणी काही घालायचे हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. 

मनसेचे गटनेते सचिन चिखले म्हणाले, आम्ही काय परिधान करावे हे सांगण्याचा भाजपला कोणी अधिकार दिला. भाजपने त्यांचे निर्णय आमच्यावर लादू नयेत. विरोधकांचे मत जाणून न घेता पालिकेचा तब्बल 4 हजार 805 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर केला जातो आणि नगरसेवकांसाठी 'ड्रेसकोड'चा निर्णय घेता, हे कशाचे धोतक आहे. हा निर्णय अत्यंत चुकीचा असून मनसेचा याला विरोध आहे. 

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नगरसेवक दत्ता साने म्हणाले, पिंपरी-चिंचवड महापालिका विकणे आहे? असा ठराव आणला तर चालेल का ? नगरसेवकांसाठी ड्रेसकोड घालणे हा कुठे नियम आहे का? सत्ताधारी भाजपने मस्करी सुरु केली आहे. त्यांना सभागृह चालविता येत नाही. 4 हजार 805 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प चर्चेविना मंजूर केला जातो. भाजपच्या पदाधिका-यांना सभाशास्त्र माहित नसेल तर ड्रेसकोड लांबच राहिले आहे. भाजपच्या नगरसेवकांना कोण ओळखत नाही. त्यामुळे त्यांची ओळख निर्माण करण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. भाजपने 'मी नगरसेवक' आहे असा लिहिलेला बेल्ट आपल्या नगरसेवकांच्या कपाळावर लावावा. ड्रेसकोड सारखे मस्करीचे विषय हाती घेऊन चर्चेत राहण्यापेक्षा लोकहिताची कामे करण्याचे आपल्या नगरसेवकांना शिकवावे, असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला आहे. 

शिवसेनेच्या शहर संघटिका व माजी नगरसेविका सुलभा उबाळे म्हणाल्या, नगरसेवकांना 'ड्रेसकोड' करणे म्हणजे अतिशोयक्ती असून टक्केवारीसाठी हा एक मार्ग शोधला आहे. भाजपचा हाच का तो पारदर्शक कारभार? नगरसेवक काही पालिकेचे कर्मचारी नाहीत. भाजपने प्रतिष्ठेसाठी काहीही करु नये. जिथे शिस्त लावायची आहे, तिथे जरुर लावावी. पालिकेत येणा-या करदात्या नागरिकांनाही ड्रेसकोड करणार आहात का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. तसेच कर्मचा-यांच्या गणवेशासाठी कोट्यावधी रुपये खर्च केले गेले असून कर्मचाऱ्यांना अगोदर गणवेश परिधान करायला लावावे असेही, उबाळे म्हणाल्या. 

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे म्हणाले, गणवेश बदलला म्हणजे प्रतिमा बदलत नाही. नगरसेवकांपेक्षा अनाथ, गरजुंना कपडे द्यावीत. गणवेशापेक्षा भाजपने आचारणात बदल करण्याचा, सल्लाही साठे यांनी दिला आहे.

सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर म्हणाले, भाजपने स्वच्छ, पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त कारभार करुन दाखवावा. शहरात मोठ-मोठे प्रकल्प राबवावेत. नगरसेवकांना 'ड्रेसकोड'ची काही गरज नाही.

Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start