• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : गुन्हेगारी व दहशतवाद रोखण्यात शिक्षकांची भूमिका महत्वाची - डॉ.सत्यपाल सिंग

दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसचा समारोप

एमपीसी न्यूज - “समाजातील गुन्हेगारी, दहशतवाद रोखण्यासाठी समाजाला चांगले शिक्षण मिळणे गरजेचे आहे. नैतिक शिक्षण मिळालेला नागरिक कधीही दहशतवादी होणार नाही. ही जबाबदारी शिक्षकच अधिक प्रभावीपणे पार पाडू शकतो. प्रामाणिक, चारित्र्यवान नागरिक घडवून समाज बांधणी करण्याचे दायित्व शिक्षकांच्या खांद्यावर आहे. समाजाला दिशा देणार्‍या शिक्षकांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे”, असे मत केंद्रीय मनुष्यबळ विकास राज्यमंत्री डॉ.सत्यपाल सिंग यांनी व्यक्त केले. दुसर्‍या नॅशनल टीचर्स काँग्रेसच्या समारोपप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

यावेळी केंद्रीय लोकसेवा आयोगाचे माजी चेअरमन डी. पी. अगरवाल यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी एशियन हेरिटेज फाउंडेशनचे संस्थापक पद्मभूषण राजीव सेठी, सौ. अलका सिंग, एमआयटी विश्‍वशांती विद्यापीठाचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. विश्‍वनाथ दा. कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल विश्‍वनाथ कराड, शास्त्रज्ञ डॉ.अशोक जोशी, प्रा. दीपक आपटे, आदी उपस्थित होते. 

डॉ. सत्यपाल सिंग म्हणाले, “डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक, पत्रकार यांसारखी समाजाचे आरोग्य सांभाळणारी माणसे आजकाल आत्महत्या करताहेत, गुन्हे करताहेत. हे सगळे पाहिल्यानंतर समाजाचे आरोग्य धोक्यात आल्याचे जाणवते. मोदींनी स्वच्छ अभियानाच्या माध्यमातून अंतर्मनाची स्वच्छता करण्यावरही भर दिला आहे. जीवनात नैतिक मूल्ये रुजविण्यात शिक्षकांनी पुढाकार घ्यावा. चाणक्यांनी सांगितल्याप्रमाणे शिक्षक हा विध्वंसक आणि विधायक अशा दोन्ही भूमिका बजावतो.”

“भारत तरुणांचा देश आहे. या तरुणांना दिशा देण्यासाठी दर्जेदार शिक्षक आणि शिक्षणव्यवस्था असली पाहिजे. आज केवळ दहा टक्के संस्था उत्कृष्ट कामगिरी करीत आहेत. 40 टक्क्यांपेक्षा अधिक संस्था भ्रष्टाचाराने बरबटलेल्या आहेत. शिक्षणातून भ्रष्टाचार हद्दपार करण्यासाठी आपण सर्वानी पुढे यावे. 2023 पर्यंत संकल्पसिद्धीच्या माध्यमातून भ्रष्टाचार व भयमुक्त, स्वच्छ, सुशिक्षित भारताची निर्मिती केली जाणार आहे, असेही सत्यपाल सिंग यांनी नमूद केले.”

जीवन गौरव पुरस्काराला उत्तर देतांना अगरवाल म्हणाले, आपल्या सर्वांसमोर विद्यार्थ्यांशी संवाद, सौहार्दाचे संबंध आणि त्यांच्याप्रती बांधिलकी शिक्षकांनी जपली पाहिजे. नाविन्यपूर्ण, कल्पक आणि संशोधनात्मक ज्ञान देण्याचा आपला प्रयत्न असला पाहिजे.”

प्रा. डॉ. विश्‍वनाथ कराड म्हणाले, “विद्यार्थ्यांमध्ये भारतीय अस्मिता रुजविण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करावेत. स्वामी विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे एकविसावे शतक हे भारताचे आहे. भारत ज्ञानाचे दालन म्हणून जगासमोर येत आहे. अशावेळी आपण भारतीय संस्कृती, अस्मिता आणि पारंपरिक शिक्षणपद्धतीचा प्रसार जगभर केला पाहिजे. जगातील अनेक देश वैदिक शिक्षणाकडे वळत आहेत. त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आपण तत्पर असले पाहिजे. सर्व प्रकारच्या शिक्षकांसाठी एखादी संस्था असली पाहिजे. त्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत.”

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares