• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pune : सेन्सॉर ही चित्रपटांसाठी नेहमीच समस्या राहिली आहे - रमेश सिप्पी

एमपीसी न्यूज - ‘चित्रपट बनवणाऱ्यांसाठी ‘सेन्सॉर’ ही नेहमीच समस्या राहिली आहे. चित्रपट करणाऱ्याला नेहमी आणखी स्वातंत्र्य हवे असते. शोले चित्रपट तयार झाला तेव्हा देशात आणीबाणी होती. शोलेच्या शेवटी ठाकूर खलनायक गब्बरला पायांनी मारतो असे आधी दाखवण्यात आले होते. परंतु चित्रपटात फार हिंसा असल्याचे कारण देत मला शेवट बदलण्यास सांगण्यात आले. मला ते नाखुशीने करावे लागले. आताही ज्या चित्रपटांच्या विरोधात निर्णय गेला असेल ते लोक त्यासाठी लढा देतील,’’ असे प्रतिपादन हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक गाजलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी केले. 


‘पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त (पिफ) आयोजित करण्यात आलेल्या ‘पिफ फोरम’मध्ये आज राज कपूर यांचे पुत्र प्रसिद्ध अभिनेते ऋषी कपूर, रणधीर कपूर आणि राजीव कपूर यांच्या हस्ते ‘राज कपूर पॅव्हिलियन या मंचाचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर रमेश सिप्पी यांच्याशी गप्पांचे आयोजन करण्यात आले होते. पिफचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी सिप्पी यांची मुलाखत घेतली. या वेळी सिप्पी बोलत होते.

‘‘चित्रपटात अति हिंसा किंवा अति बीभत्सता दाखवली असेल तर असा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालणार नाही. चांगले दिग्दर्शक हे जाणतात. ज्यांना कुणाची तरी नक्कल करायची आहे असे लोक या गोष्टी दाखवतात,’’ असे सिप्पी यांनी सांगितले. ‘चित्रपट परीनिरीक्षण मंडळा’पलीकडच्या ‘सेन्सॉरशिप’बद्दल बोलताना सिप्पी म्हणाले, ‘‘प्रसारमाध्यमांनी केवळ लोकांना रस वाटेल अशा स्वरूपात चित्रपटांबाबतची एखादी गोष्ट विपर्यस्त स्वरूपात प्रसिद्ध केल्यास काही लोक ती उचलून धरतात आणि समस्या निर्माण होते. त्यामुळे समाजाच्या सेन्सॉरशिपबद्दल बोलताना प्रसारमाध्यमांचीही काही जबाबदारी आहे हे लक्षात घ्यायला हवे.’’

‘आज ४२ वर्षांनंतरही ‘शोले’ हा चित्रपट आजच्या काळाशी सुसंगत वाटेत अस मला अजिबात वाटले नव्हते,’ असे सांगत सिप्पी यांनी ‘शोले’संबंधीच्या काही आठवणी उलगडल्या. ‘अंदाज’ आणि ‘सीता और गीता’ या दोन चित्रपटांनंतर मला एखादा ‘अॅक्शन-अॅडव्हेंचर’ चित्रपट करायचा होता. सलीम-जावेद यांनी रचलेले संवाद अतिशय साधे-सोपे होते. त्यातील बारकाव्यांवर काम केल्यानंतर ते साधे संवाद लक्षात राहिले. उत्तर प्रदेशातील बोलीभाषेचा लहेजा वापरून अमजद खान यांनी म्हटलेल्या गब्बर सिंगच्या संवादांमध्ये एक लय आली.’’

‘पिफ फोरम’मध्ये उद्या- १३ जानेवारी २०१८ रोजी होणारे कार्यक्रम खालीलप्रमाणे-

सकाळी- ११.१५ वा. - व्याख्यान- ‘काँट्रीब्यूशन ऑफ न अॅक्टर टू सिनेमा’- वक्ते- ऋषी कपूर, रणधीर कपूर

दुपारी- १२.१५ वा.- ‘कँडीड टॉक्स’- चित्रपट प्रतिनिधी

दुपारी- २.३० वा.- ‘ट्रेन्ड्स इन सिनेमा अँड मल्टीप्लेक्स बिझनेस’- वक्ते- राहुल पुरी

दुपारी- ३.१५ वा.- ‘डिजिटल पोस्ट प्रॉडक्शन अॅन ओव्हरव्ह्यू’- वक्ते- मोहन कृष्णन

दुपारी- ४.३० वा.- ‘म्यूझिक अँड राज कपूर साहब’- सुश्रुत वैद्य

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares