• mahesh_kale_1250by200.jpg
12 Jan 2018

Pimpri : निगडीपर्यंतच्या मेट्रोचा आर्थिक भार पालिकेवर नको; खासदार, आमदारांनी सरकारकडून निधी आणावा
सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांची मागणी 

एमपीसी न्यूज - पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेणे आवश्यक आहे. निगडीपर्यंत मेट्रो नेण्यास आमचा विरोध नाही. परंतु, यासाठी कुठलाही आर्थिक भूर्दंड पिंपरी-चिंचवडकरांना पडला नाही पाहिजे. कारण, दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप सत्तेत असून त्यांना निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी निधी खेचून आणणे गरजेचे आहे. खासदार, आमदारांनी निधी खेचून आणावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केली आहे. 

याबाबत महापौर नितीन काळजे यांना निवेदन दिले आहे. त्यात भापकर यांनी म्हटले आहे की, पुणे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्यात यावा यासाठी विरोधी पक्ष, विविध सामाजिक संस्थानी आक्रमक होत आंदोलने सुरु केली. पिंपरी-चिंचवड शहराचा समग्र वाहतुकीच्या सोयीचा विचार करता व नागरिकांच्या गरजा लक्षात घेता पुणे मेट्रोच्या पहिल्याच टप्यात निगडी-पिंपरी व पिंपरी-स्वारगेट या प्रकल्पाची सुरुवात करावी. चिंचवड, आकुर्डी या भागात मोठ्या औद्योगिक कंपन्या आहेत. तर, निगडी हे शहराचे प्रवेशद्वार आहे. यामुळे चिंचवड, आकुर्डी, निगडी या परिसरात नागरिकांचा जास्त राबता असतो. 

पीएमपीएमएलचा निगडीत मुख्य बस डेपो आहे. पिक अवर्समध्ये निगडी डेपोतून सुटणा-या बस 150 टक्के गर्दीने खचाखच भरलेल्या असतात. तर, नॉन पिकअवर्समध्ये 75 टक्के भरलेल्या असतात. त्यामुळे ख-या अर्थाने निगडीपर्यंत मेट्रोची आवश्यकता आहे. पिंपरीपर्यंतच्या मेट्रोचा शहरवासियांना काहीच फायदा होणार नाही. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत नेण्याची मागणी वाढली. त्यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी निगडीपर्यंत मेट्रो प्रकल्पाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करण्याच्या सूचना महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनला केल्या. 

आता डीपीआर बनविण्याचे काम वेगात सुरु आहे. तसेच निगडीपर्यंतच्या मेट्रोच्या खर्चाचा भार पेलण्यास पालिका सक्षम असल्याचे आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे मेट्रो पहिल्याच टप्प्यात निगडीपर्यंत धावण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. परंतु, याचा आर्थिक भार पालिकेवर पडला नाही पाहिजे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप सत्तेत असून त्यांना निगडीपर्यंतच्या मेट्रोसाठी निधी खेचून आणणे गरजेचे आहे. खासदार, आमदारांनी निधी खेचून आणावा, अशी मागणी भापकर यांनी निवेदनातून केली आहे.

Like what you see?

Close

Hit the buttons below to follow us

0
Shares