• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
24 Sep 2017

एमपीसी न्यूज : राज्यातील विरोधीपक्ष नेतेपद कोणाकडे ठेवायचे याचा निर्णय नारायण राणे रिमोट कंट्रोलने करतील, असे वक्तव्य आमदार नितेश राणे यांनी पुण्यामध्ये केले आहे. नितेश राणे यांनी आज दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेतले यावेळी ते बोलत होते. काँग्रेस पक्षाला सोडचिट्ठी दिल्यानंतर  नारायण राणे यांच्या पुढील भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नितेश राणे यांनी केलेले विधान अनेकांसाठी सूचक असे मानले जात आहे.

विरोधी पक्षनेतेपदाचा निर्णय नारायण राणेंवर अवलंबून आहे. राणे हे रिमोट कंट्रोल असून ते योग्य वेळ येईल तेव्हा चॅनेल बदलतील, असे नितेश राणे म्हणाले. देव जो आशीर्वाद देईल, तो मान्य करू असं सांगत पुढील राजकीय वाटचालीबद्दल लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचेही नितेश यांनी सांगितले. महाराष्ट्राचे आणि जनतेचे संरक्षण करण्यासाठी आम्हाला शक्ती दे, असे साकडे देवाला घातल्याचे ते म्हणाले. 25 तारखेला नारायण राणे त्यांची पुढील भूमिका जाहीर करणार, अशी कुठलीही बातमी आमच्यापर्यंत पोहोचली नसल्याचेही नितेश राणेंनी स्पष्ट केले. भाजपच्या कोअर कमिटीचा निर्णय ही अंतर्गत भूमिका असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

काँग्रेसवर नाराज झालेल्या नारायण राणेंनी घटस्थापनेच्या मुहूर्तावर काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. मात्र, आता ते नवा पक्ष स्थापन करणार की भाजपमध्ये प्रवेश करणार, याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह कायम आहे. “तुम्ही काय माझी हकालपट्टी करता, मीच काँग्रेस सोडतो,” अशा शब्दात नारायण राणे यांनी विधानपरिषद आमदारकी आणि काँग्रेसच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. कुडाळमधील पत्रकार परिषदेत त्यांनी ही घोषणा केली होती.

या पत्रकार परिषदेत राणेंसोबत फक्त त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नितेश हेच उपस्थित होते. त्यांचे दुसरे चिरंजीव आणि काँग्रेसचे आमदार निलेश राणे मात्र गैरहजर होते. त्यामुळे नितेश राणेंची नेमकी भूमिका काय? राजीनामा कधी देणार यावरून सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

24 Sep 2017

 

एमपीसी न्यूज : रामटेकडी हडपसर येथे महापालिकेतर्फे उभारण्यात येणाऱ्या कचरा प्रकल्पाविरोधात शिवसेनेच्या वतीने आज जनजागृती पदयात्रा व महाजागर करण्यात आला.

हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. भाजप वगळता सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी कचरा प्रकल्पास विरोध दर्शवला आहे. या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी आज शिवसेनेकडून ससाणेनगर रेल्वे क्रॉसिंग येथून पदयात्रेस सुरुवात करून पदयात्रेचा समारोप गांधी चौक, हडपसर गाव येथे करण्यात आले. सत्ताधाऱ्यांना सद्बुद्धी मिळो, यासाठी गांधी चौक येथे आदिशक्‍तीचा जागर घालण्यात आला.

येथील स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही रामटेकडी येथे बायोएनर्जी सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड हा कचरा प्रकल्प उभारण्यासाठी सत्ताधारी भाजप ठाम आहे. भाजप व्यतिरिक्‍त सर्वपक्षीयांचा या कचरा प्रकल्पाला विरोध आहे. गेले अनेक दिवस येथील नागरिक या प्रकल्पास विरोध करीत आहेत. शिवसेनेच्या वतीने महानगरपालिकेच्या सभागृहात व स्थानिक पातळीवर कायम विरोध केला आहे. या कचरा प्रकल्पाविरोधात जनजागृती करण्यासाठी या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. 

WhatsApp Image 2017 09 24 at 1.52.21 PM 1

24 Sep 2017

शहरसुधारणा समितीकडे राष्ट्रवादी नगरसेवकांचा प्रस्ताव

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या महापौर, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच सर्व खाते प्रमुखांच्या सदनिका रोकेम कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी आरक्षित जागेत बांधाव्यात म्हणजे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या समस्या आयुक्तांना आणि महापौरांना समजातील आणि कचरा प्रकल्पाबाबत संयुक्तिक निर्णय घेणे सोपे जाईल, अशा स्वरुपाचा प्रस्ताव राष्ट्रवादी नगरसेवक योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव यांनी शहर सुधारणा समितीला दिला आहे.


हडपसरमध्ये रामटेकडी येथे महापालिकेच्या वतीने ७०० टनाचा मिश्र कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू केला जात आहे. त्याचे काम सुरू होताच हडपसरमधील स्थानिक नगरसेवकांनी नागरिकांच्या माध्यमातून या प्रकल्पाला विरोध सुरू केला आहे. असे असताना देखील प्रशासन आणि सत्ताधारी तिथेच प्रकल्प उभारण्यावर ठाम आहे. त्यामुळे स्थानिक राष्ट्रवादीचे नगरसेवक योगेश ससाणे यांनी हडपसर कचरा डेपो शेजारील प्लॉट नंबर १०४ या आरक्षित जागेवर महापौर, आयुक्त आणि सर्व खातेप्रमुखांची सदनिका बांधाव्यात तसेच या सर्वांच्या मुलांची शैक्षणिक व्यवस्था कचरा डेपो समोरील न्यू इंग्लिश स्कूल या ठिकाणी करावी म्हणजे कचरा प्रकल्पाशेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या समस्यांचे आकलन होईल आणि कचरा प्रकल्प सुरु करण्याबाबत निर्णय घेणे संयुक्तिक होईल, असा प्रस्ताव राष्ट्रवादी नगरसेवक योगेश ससाणे, भैय्यासाहेब जाधव यांनी शहर सुधारणा समितीला दिला आहे.

24 Sep 2017


महापारेषणच्या 132 केव्ही वीजवाहिनीची आज दुरुस्ती पूर्ण होणार

एमपीसी न्यूज : दांडेकर पुलानजीक फरशी पूल येथे जेसीबीने तोडलेल्या महापारेषण कंपनीच्या १३२ केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीचे काम शनिवारी सुरू झाले असून आज सायंकाळपर्यंत ते पूर्ण होणार आहे.

नादुरुस्त वीजवाहिनीमुळे बाधित शहराच्या मध्यवर्ती व इतर परिसरातील भागात पर्यायी व्यवस्थेद्वारे वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. परंतु भारव्यवस्थापन शक्‍य न झाल्याने पोलीस लाइन (समर्थ पोलीस ठाण्यामागील परिसर), सिटी अपोलो (अपोलो टॉकीज परिसर) व अग्यारी (पासोड्या विठोबा मंदिर परिसर) या तीन 11 केव्ही वीजवाहिन्यांवर शनिवारी प्रत्येकी एक तासाचे भारनियमन करण्यात आले.

जेसीबीने तोडलेल्या महापारेषणच्या 132 केव्ही भूमिगत वीजवाहिनीच्या दुरुस्तीसाठी तज्ञ कर्मचारी व ‘जॉईंट’ शुक्रवारी दाखल झाले. या वीजवाहिनीची चार ठिकाणी दुरुस्ती करण्याची गरज असल्याचे दिसून आले. त्यानुसार दुरुस्ती कामाला सुरूवात झाली असून रविवारी सायंकाळपर्यंत दुरुस्तीचे काम पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात आले.

सध्या ‘महावितरण’कडून शहरातील मध्यवर्ती भागातील सर्व पेठांसह लुल्लानगर, कोंढवा, मुकुंदनगर, गुलटेकडी, लक्ष्मीरोड, सिंहगड रोड, कॅम्प, मार्केटयार्ड, स्वारगेट या परिसराला पर्यायी व्यवस्थेतून वीजपुरवठा करण्यात येत आहे. त्यासाठी सुमारे ८० मेगावॉट विजेचे भारव्यवस्थापन करण्यात येत आहे. परंतु विजेची मागणी वाढल्यास व भारव्यवस्थापन शक्य न झाल्यास नाइलाजाने काही भागांत चक्राकार पद्धतीने भारनियमन करावे लागण्याची शक्यता आहे.

23 Sep 2017

राष्ट्रवादीच्या नगरसेवकाने केला अनोख्या पद्धतीने निषेध

एमपीसी न्यूज - भोसरी, इंद्रायणीनगर प्रभाग क्रमांक आठमधील श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून संकुलात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ आज (शनिवारी) संकुलात म्हशी सोडून राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा आणि सत्ताधा-यांचा निषेध केला.

भोसरी, इंद्रायणीनगर येथे श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुल आहे. कोट्यवधी रुपये खर्च करुन या संकुलाची निर्मिती केली आहे. याठिकाणी आंतरराष्ट्रीय स्‍तरावरील सिंथेटिक ट्रॅक अंथरली. त्याचबरोबर गोळाफेक, थाळीफेक, लांब उडी या खेळाबरोबर इनडोअर गेमचाही या संकुलात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, राज्य, जिल्हा पातळीवरील खेळाडू या ठिकाणी सराव करण्यासाठी येतात.

परंतु या क्रीडा संकुलाची दुरावस्था झाली असून संकुलात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे. त्यामुळे खेळाडूंना सराव करण्यासाठी अडचणी येत आहेत. याबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा करुनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. त्याच्या निषेधार्थ आज (शनिवारी) संकुलात म्हशी सोडून राष्ट्रवादीचे नगरसेवक विक्रांत लांडे यांनी अनोख्या पद्धतीने प्रशासनाचा आणि सत्ताधा-यांचा निषेध केला.

याबाबत बोलताना नगरसेवक विक्रांत लांडे म्हणाले की, श्री संत ज्ञानेश्वर क्रीडा संकुलाची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. मैदानात गवत वाढले आहे. मैदानातील गवत काढावे, यासाठी आपण आठ दिवसांपूर्वीच पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आणि क्रीडा विभागाकडे पाठपुरावा केला होता. मात्र, तरीही मैदानातील गवत काढण्यात आले नाही. प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे.

महापालिका एकीकडे स्वच्छता अभियान राबवित आहे. मात्र, ज्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. त्याठिकाणी राबविले जात नाही, ही मोठी शोकांतिका आहे. क्रीडा विभागाकडे गवत कापण्याच्या दोन मशिन होत्या. त्या नादुरुस्त झाल्याचे सांगितले जात आहे, असे नगरसेवक लांडे म्हणाले. तसेच शहरातील सर्वच क्रीडा मैदानाची दुरावस्था झाली असल्याचेही, ते म्हणाले.

23 Sep 2017

शिवदर्शन येथील श्री लक्ष्मी माता मंदिराला शरद पवार यांची भेट

एमपीसी न्यूज- विकासकामे कोणतीही असू द्या, त्यात पक्षभेद बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येण्याची नितांत गरज आहे. नगरसेवक आबा बागुल यांची कल्पकता आणि सातत्याने राबविलेले विकासाचे प्रकल्प हे आदर्शवत आहेत. 30 वर्षे लोकप्रतिनिधी असलेल्या आबा बागुल यांना आता मुंबईत पाठविण्याची गरज आहे. अशा शब्दात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरदचंद्रजी पवार यांनी बागुल यांच्या कार्याचा गौरव केला.

पुणे नवरात्रौ महोत्सवांतर्गत शिवदर्शन येथील प्रसिद्ध श्री लक्ष्मी माता मंदिराला शरद पवार यांनी शनिवारी भेट दिली. त्यानंतर उपस्थितांशी संवाद साधताना ते बोलत होते. यावेळी उद्योजक विठ्ठलशेठ मणियार, माजी आमदार उल्हास पवार, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, चेतन तुपे, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक व अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी शरद पवार म्हणाले, " आबा बागुल यांच्या कल्पकतेला दाद दिलीच पाहिजे. लोकप्रतिनिधी या नात्याने परिसराचा सर्वांगीण विकास करताना जनतेच्या हिताला दिलेले प्राधान्य हे सर्वांसाठी आदर्शवत आहेत. सातत्याने विकासाच्या प्रकल्पासाठी पाठपुरावा करून ते यशस्वी कसे होतील याकडे सदैव लक्ष असणारे आबा बागुल हे एक दक्ष लोकप्रतिनिधी आहेत. आज 30 वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून आबा कार्यरत आहेत. आणखी 20 वर्षे झाली की ते माझ्या रांगेत येऊन बसतील त्यामुळे आता आबा बागुलांना मुंबईला पाठवलेच पाहिजे " असेही पवार म्हणाले.

आबा बागुल यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन घनश्याम सावंत यांनी केले. आभार अमित बागुल यांनी मानले

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ अभिनेते व रंगकर्मी डॉ. श्रीराम लागू यांना यंदाचा महर्षी पुरस्कार जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या बुधवारी (दि. 27 सप्टेंबर) सायंकाळी साडेपाच वाजता माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती नवरात्रौ महोत्सव समितीचे अध्यक्ष व माजी उपमहापौर आबा बागुल यांनी दिली.

गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या पुणे नवरात्रौ महोत्सवात हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल. यावेळी मराठमोळे ज्येष्ठ अभिनेते प्रदीप वेलणकर यांचाही विशेष सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधानसभेचे विरोधीपक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील हे असणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार उल्हास पवार, वास्तु विशारद महेश नामपूरकर, माजी आमदार मोहन जोशी हे उपस्थित राहणार आहेत.

हा पुरस्कार पुणे नवरात्रौ महोत्सव समितीतर्फे दर वर्षी दिला जातो. यापूर्वी भारतरत्न पं. भीमसेन जोशी, डॉ. रघुनाथ माशेलकर, ह.भ. प. बाबा महाराज सातारकर, किशोरी आमोणकर, पं. हृदयनाथ मंगेशकर, डॉ. विजय भटकर, लीला पुनावाला यांच्यासह मान्यवरांना महर्षी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - चिंचवड नवरात्र महोत्सावअंतर्गत उद्या (रविवारी) पिंपरी- चिंचवड येथे पारंपरिक वाद्यांच्या महावादनाच्या ताल घोष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी दिली.

चिंचवड बस स्टॉप जवळील चापेकर चौकाजवळील प्रांगणात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता वादनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे. 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान चिंचवड नवरात्र महोत्सवाअंतर्गत विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

यामध्ये पिंपरी-चिंचवड शहरातील शिवाज्ञा ढोल-ताशा पथक, शिवसाम्राज्य वाद्य पथक, पुण्यातील नुमवि वाद्यपथक, श्री शिव दुर्गा ढोल-ताशा पथक, एक दिल ताशा पथक सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमासाठी ज्ञानप्रबोधिनीचे उत्कृष्ट ताशावादक, ताशाशिक्षक राजण घाणेकर, ढोल-ताशांचे व्यापारी जीवन काकडे आदी उपस्थित राहणार आहेत.

ढोल-ताशा वादनाच्या स्पर्धेबाबत अधिक माहिसाठी गणेश गोलांडे यांच्याशी 8888293567 यांच्याशी संपर्क साधावा. ढोल-ताशा वादनाच्या कार्यक्रमाचा शहरातील नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केली आहे.

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - मागील 185 वर्षांपासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेल्या पी.एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् च्या चिंचवड येथील सराफी पेढीचा 14 वा वर्धापनदिन आज (शनिवारी) ग्राहक व विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या शुभेच्छांच्या वर्षात मोठ्या उत्साहात पार पडला. 

पी. एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् च्या सराफी पेढीने गेल्या 175 वर्षांपासून गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा यांची उज्ज्वल परंपरा राखली आहे. ग्राहकांच्या सोयी-सुविधांचा विचार करून अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम या पेढीकडून सातत्याने सादर केले जात असतात. गाडगीळ ज्वेलर्सच्या महाराष्ट्रासह कर्नाटक, गुजरात या तीन राज्यात 19 शाखा आहेत. कालच शुक्रवारी कोथरुड येथे एका नव्या शाखेचे उद्‌घाटन झाले आहे. 

गेल्या 14 वर्षांपूर्वी चिंचवड येथील चापेकर चौकात  पी.एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् ची सराफी पेढी  सुरु करण्यात आली होती. या सराफी पेढीत ग्राहकांना पारंपरिक दागिने उपलब्ध करुन दिले जातात. ग्राहकांच्या बदलत्या रुचिनुसार वेगवेगळे दागिने उपलब्ध करुन दिले जातात. लाईटवेटचे  सर्व प्रकारची दागिने, डायमंडच्या अंगठ्या, चांदीचे दागिने उपलब्ध करुन दिले जात आहेत. ग्राहकांना काय हवे आहे ते देण्याचा आमचा प्रयत्न असतो, असे  पी.एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् चे सर्वेसर्वा अजित गाडगीळ यांनी सांगितले. 

वर्धापनदिनानिमित्त विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या महिलांना बोलावून त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला. सुंदर रांगोळी काढण्यात परिचित असलेल्या राजश्री जुन्नरकर, वायसीएमच्या फिजीओथेरपी विभागाच्या प्रमुख जयश्री कोतवाल, योगासन स्पर्धेत पदक मिळविलेल्या नुपुर मोरे, आद्या कशाळीकर, रुपाली तरवडे, मरणोत्तर 'पद्मश्री' पुरस्कार विजेते डॉ.सुहास मापूसकर यांच्या कन्या डॉ. शिल्पा नारायण- मापूसकर, पत्रकार अश्विनी सातव-डोके या उपस्थित होत्या. या सगळ्यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. 

यावेळी  पी.एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् चे अजित गाडगीळ, रेणु गाडगीळ, चिंचवड शाखेचे रिजन हेड समीर परांजपे, व्यवस्थापिका स्मिता मुधोळ आदी उपस्थित होते. 

स्मिता मुधोळ म्हणाल्या, पी. एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् वर ग्राहकांचा प्रचंड विश्वास आहे. त्यामुळे पी. एन. गाडगीळ अॅन्ड सन्स्  ला ग्राहकांचा उंदड प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांच्या सहकार्याने  पी. एन. गाडगीळ अॅन्ड सन्स् च्या चिंचवड येथील सराफी पेढीने दमदारपणे 15 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यापुढेही ग्राहकांना अशीच दर्जेदार सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.

Gadgil 1

23 Sep 2017

एमपीसी न्यूज - पुण्याची ग्रामदेवता असलेल्या तांबडी जोगेश्वरी मंदिरामध्ये नवरात्र उत्सव उत्साहात आणि धार्मिक वातावरणात साजरा होत आहे. पारंपरिक पद्धतीने षोडशोपचार पूजा करून देवीची घटस्थापना करण्यात आल्यानंतर भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली आहे. एमपीसी न्यूजचे छायाचित्रकार भानुदास हिवराळे यांनी काढलेली छायाचित्रे....

Gramdevata Shree Tambali Jogeshvari Devi 0

Gramdevata Shree Tambali Jogeshvari Devi 01

Gramdevata Shree Tambali Jogeshvari Devi06

Gramdevata Shree Tambali Jogeshvari Devi 04

Gramdevata Shree Tambali Jogeshvari Devi07

Page 1 of 358