• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
09 Aug 2017

एमपीसी न्यूज- हडपसर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या.

सूरज संभाजी बागल (वय 35, रा. भेकराईनगरमध्ये, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सूरज  बागल यांचा प्रेमविवाह झालेला आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. बागल कुटुंबीय फुरसुंगी परिसरात एका सोसायटीमध्ये राहते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत सूरज यांनी वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

दुसर्‍या घटनेत बिपीन शिंदे (वय 48, रा. गंगानगर, फुरुसुंगी, हडपसर) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.बिपीन यांना किडनीचा आजार होता. या आजाराला कंटाळून त्यांनी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

08 Aug 2017

खडकवासला धरणात आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली

एमपीसी न्यूज -  खडकवासला धरणाच्या जलाशयात आज (मंगळवार)  दुपारच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाची ओळख पटली असून मनिषा प्रकाश दवे (वय. 40 रा. आनंद नगर, सिंहगड रस्ता, पुणे), असे त्या महिलेचे नाव आहे.

आज दुपारच्या सुमारास खडकवासला चौपाटीजवळ पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळला होता. त्या महिलेच्या हातात राखी बांधलेली होती. त्यामुळे नैराश्यातून त्या महिलेने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता.

याप्रकरणी मयत मनिषा दवे यांचा भाऊ करण ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राखीपौर्णिमा होती. परंतु दवे यांच्या कुटुंबात काल सुतक आले आणि चंद्रग्रहणही होते. त्यामुळे मयत मनिषा यांना भाऊ करण याला राखी बांधता आली नाही. त्यामुळे मनिषा यांनी भावासाठी घेतलेली राखी स्वत:च्या हातावर बांधून जीवन संपवले असावे, असा अंदाज करण ओझा यांनी वर्तवला आहे.

मयत मनिषा या आज (मंगळवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरातून आंघोळ करून बाहेर पडल्या होत्या, असे त्यांच्या कुटूंबीयांनी सांगितले. हवेली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - इंदोरी येथील इंद्रायणी नदीपात्राच्या जवळ  एका मजुराचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचे नाव सुलतान शेख (वय 35 रा. इंदोरी) असे आहे.

पोलिसांना अद्याप मयताची पूर्ण ओळख पटलेली नाही. त्याच्या खिशात डायरी मिळाली त्यावरून त्याचे सुलतान शेख एवढेच नाव कळाले आहे. गावात चौकशी केली असता तो त्याच्या बायकोसोबत इंदोरी येथे भाड्याने  राहत होता. परिसरात जे काम मिळेल तो काम तो करत होता. शेजा-यांनी सांगितल्यानुसार त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्या दिवसापासून तो घरातून गेला होता. त्याची बायकोही गावी गेली आहे.

मात्र, त्याचे मूळ गाव काय किंवा त्याचे पूर्ण नाव काय अद्याप कळू शकलेले नाही. मृतदेह पूर्णपणे कुजला असून तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र तो अपघात होता, आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी अंबी पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे विमानतळावरून दुबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा प्रवाशाजवळ असलेल्या खाद्यपदार्थांच्या डब्यातून एक कोटी 30 लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली. ही कारवाई 6 ऑगस्ट रोजी करण्यात आली. निशांत येताम (रायगड) आणि हर्षा रंग्लानी (चेंबुर, मुंबई), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमानतळावरील सुरक्षा दलाच्या अधिका-यांना निशांत येताम हा संशयास्पद वाटल्याने त्यांनी सीमाशुल्क विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या जवळील खाद्यपदार्थाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात उपमा असल्याचे आढळले. त्यावर अधिक संशय बळावल्याने पुन्हा त्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 86 हजार 600 अमेरिकन डॉलर तर 15 हजार युरो आढळले.

त्याच विमानाने दुबईला निघालेल्या हर्षा रंग्लानी या संशयित महिलेची माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी तिच्याजवळील बॅगची झडती घेतली असता त्यातही उपमा आढळला. त्यानंतर परत एकदा या महिलेची बॅग तपासली असता त्यातही 86 हजार 600 अमेरिकन डॉलर आणि 15 हजार युरो आढळले.

पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमध्ये आज (मंगळवारी) एकाच दिवशी तीन आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. दापोडी येथे एका 16 वर्षीय मुलीने, चिखली येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर ताथवडे येथे एका उच्चशिक्षित महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

अनिषा नंदकुमार ठाकुरे (वय.16, रा. विठ्ठ्ल मंदिराच्या पाठीमागे, दापोडी), असे दापोडी येथे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. केवळ महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही या निराशेतून या मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमरास घडली.

अनिषा जवळ कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही. मात्र, तिच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला अकरावीसाठी महाविद्यालयात प्रवेश हवा होता. दहावीत तिला 67 टक्के पडले होते. तिच्या सोबतच्या मैत्रीणींचे महाविद्यालयील प्रवेश प्रक्रियेचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे घरात ती गेली काही दिवस निराश दिसत होती. याच निराशेतून तिने ही आत्महत्या केली असल्याचे पालकांनी सांगितले.

तर भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील तळेगाव दाभाडे येथे कामाला आहेत. ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. तर आई घराजवळील वाण्याच्या दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. यावेळी अनिषा घरात एकटीच होती. आई दुकानातून परतली असता अनिषाने घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे आईला दिसले. ही घटना अवघ्या 15 ते 20 मिनिटात झाली.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणात महाविद्यालयीन किचकट प्रवेश प्रक्रिया व त्याला दिले जाणारे अवाजवी महत्त्व कितपत महत्वाचे आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुस-या घटनेत ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीवरून उडी मारून एक विवाहित महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली.

चेतल पाटील (वय 25, रा.ताथवडे), असे महिलेचे नाव आहे.  महिलेने एमई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतले असून ती नोकरी शोधत होती.

घटनेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चेतलने फ्लॅट केबल नेटवर्क समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून टेरेसची चावी घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील इतर सदस्य बाहेर आले. त्यावेळी चेतल जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे पाहून तिला तात्काळ उपचारासाठी वाकड येथील लाईफ पॉईंट खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेने 11 व्या मजल्यावरून उडी घेतली होती.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

तर तिसरी घटनेत चिखलीतील जाधववाडी येथे एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

स्वप्नील माने (वय 28 रा. जाधववाडी, चिखली), असे मयत मुलाचे नाव असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणण्यात आला आहे.

स्वप्नील हा जाधववाडी येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. ते दोघे आज कामाला गेले असताना त्याने घरातील छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. शेजा-यांना घर बराच वेळापासून बंद असल्याने संशय आला व त्यांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कोणतीही नोकरी नव्हती तो मिळेल ते काम करत होता. 


मात्र, मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील मेझा नाईन ते लक्ष्मी चौकाकडे जाणा-या मार्गावर एका ट्रकने पायी जाणा-या तरुणाला जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (सोमवारी) सकाळी घडली.

विष्णुदास अंबादास शिंदे (वय.26 रा. भोईरवाडी,माण) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर ट्रक चालक आरोपीचे नाव शिवाजी नानासाहेब पाटील (वय.33 रा. भोईरवाडी, माण) असे आहे.

मयताचा भाऊ आकाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णुदास हा पायी जात असताना ट्रक चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत शिंदे याला जोरदार धडक दिली. यामध्ये शिंदेचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला अद्याप अटक नसून हिंडवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - अवघ्या वर्षभराच्या कालावधीत तिचे अपहरण होते काय, ससून रुग्णालयात ती सापडते काय, पुढे तिला दत्तक घेण्याच्या दिवशीच तिचे खरे आईबाबा सापडतात काय.... खेळ कुणाला दैवाचा कळला...या गाण्याच्या ओळीप्रमाणे चार वर्षाच्या तनिष्काचे आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाचे कथानकच...

तनिष्का ही चार वर्षाची मुलगी 29 मार्च 2016 रोजी तिच्या आजीसोबत पुणे रेल्वे स्थानकावर कोल्हापूरला जाण्यासाठी थांबली होती. होळीचा सण उरकून त्या दोघीजणी गाडीची वाट पाहत थांबल्या होत्या. वाट पाहता पाहता तिच्या आजीला आणि तिला कधी डोळा लागला हे कळलंच नाही. त्याचाच फायदा घेत एका अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले. घाबरलेल्या आजीने रल्वे पोलिसांमध्ये तक्रार केली. मात्र तनिष्काचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

पुढे अचानकपणे दोन महिन्याच्या कालावधीनंतर ती ससून हॉस्पिटलच्या वॉर्डक्रमांक तीनमध्ये आढळून आली. यावेळी तिच्या जवळ एक प्लॅस्टीकची कॅरीबॅग व दुधाची रिकामी बाटली होती. तिला विचारले असता ती केवळ तिचे नाव सांगत होती. ससूनच्या कर्मच्या-यांनी तिला सोसायटी ऑफ फ्रेंडस ऑफ द ससून हॉस्पिटल (एसओएफएसएच) यांच्याद्वारे चालवल्या जाणा-या श्रीवत्स चाईल्ड केअर सेंटरकडे दिले.

दरम्यान विविध स्थानिक वर्तमानपत्रात तिच्याबद्दल जाहिरात दिली. मात्र कोणाचाही प्रतिसाद आला नाही. सप्टेंबर 2016 पासून पोलीस तनिष्काचा विविध सामाजिक संस्था, अनाथालये यामधून शोध घेत होते. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एन.बी. मुंतोडे यांच्याकडे तनिष्काच्या तपासाची सूत्रे होती. अखेर एक वर्षानंतर एक जून 2017 रोजी एसओएफएसएच च्या कर्मच्या-यांनी तिला कायदेशीर दत्तक देण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात केली होती. एका गरजू व योग्य दांपत्याने तिच्यासाठी अर्ज केला. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर तनिष्काला दत्तक द्यायचे ठरले. तनिष्काच्या दत्तक प्रक्रीयेची सर्व कागदपत्रे तयार करण्यात आली.

आणि इथेच अनपेक्षितपणे तनिष्काच्या नशिबाला कलाटणी मिळाली. तिला घेण्यासाठी तिचे नवीन पालक 27 जुलै रोजी येणार होते त्याच्या आदल्या दिवशी, 26 जुलै रोजी रल्वे पोलीस चाईल्ड केअर सेंटरवर तनिष्काचा फो़टो येऊन धडकला. तपासाची चक्रे पुन्हा फिरली आणि पोलिसांना श्रीवत्समध्ये तनिष्का सापडली. तनिष्काच्या आईवडिलांचा शोध लागला आहे हे कळताच श्रीवत्सच्या कर्मच्या-यांनी तातडीने तिची दत्तक प्रक्रीया थांबवली.

तातडीने कोल्हापूरहून तिच्या ख-या पालकांना पुण्याला बोलवण्यात आले. तनिष्काच्या त्यांनी ओळखले. तनिष्काचे वडील सचिन कांबळे व आई प्रियंका हे मजुरीचे काम करतात. तिची आई सात महिन्याची गर्भवती असून त्यांना आणखी एक सहा वर्षाची छोटी मुलगी आहे. तनिष्का दिसताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एक वर्षानंतर त्याचा पोटचा गोळा त्यांना सहीसलामत मिळाला होता. त्याचा आनंद आई वडिलांशिवाय कोण जणू शकते ?

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपहरणकर्त्यांची ओळख पटवली आहे. त्याचा शोध चालू आहे. तनिष्काची वैद्यकीय चाचणी झाली असून तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाल्याचे समोर आलेले नाही. या साऱ्या नाट्यपूर्ण घटनांची माहिती तिला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना देण्यात आली. तनिष्काने त्यांनाही लळा लावला होता. एकीकडे तिला सोडून जाणे त्यांना खूप जड गेले, तर दुसरीकडे तनिष्काला तिचे खरे आईवडील मिळाल्याचा आनंदही होता. दत्तक घेण्यासाठी त्यांनी तनिष्कासाठी खरेदी केलेले केलेले कपडे, खाऊ, खेळणी तिला देऊ केली व तिच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तनिष्का आपल्या आईवडिलांच्या कुशीत विसावली खरी, पण त्या दोन महिन्याच्या कालावधीत तनिष्कासोबत सोबत काय घडले हे अद्याप कोडेच आहे. हे कोडे आता आरोपी हाती लागल्यानंतरच सुटणार आहे.

08 Aug 2017

कोणतीही हानी नाही; दोन तासानंतर वाहतूक सुरळीत

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) एक स्पिरीटचा टँकर उलटला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधून होणारी स्पिरिटची गळती आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने त्वरित बंद केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) सकाळी एक स्पिरीटचा (एमएच 04 सीपी 4132) टँकर उलटला. यावेळी टॅँकर मधून स्पिरीटची गळती होत होती. मात्र आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने स्पिरिटवर पाण्याचा फवारा मारून गळती थांबवली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातामुळे सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

07 Aug 2017

एमपीसी न्यूज - चिंचवड येथील लिंकरोड परिसरात एका अज्ञात कारने दुचाकीला पाठीमागून दिलेल्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.5) सायंकाळी सव्वासहा वाजता घडली.

जयप्रकाश शिवनारायण तोतले (वय 66 रा.मोरया गोसावी, राजपार्क, चिंचवड गाव), असे मयत ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याप्रकरणी तोतले यांचा मुलगा सुहास तोतले यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तोतले हे त्यांच्या दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात कार चालकाने वाहतुकीच्या नियमांना मोडत बेदरकारपणे गाडी चालवत तोतले यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये तोतले गंभीर जखमी झाले.

त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात अज्ञात कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

07 Aug 2017

एमपीसी न्यूज - रास्ता पेठेतील एका सराफाच्या दुकानातून दोन महिलांनी सोन्याचे मंगळसूत्र लांबवल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी आनंद परमार यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दोन अनोळखी महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.20 मिनिटांनी घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आनंद परमार यांचे रास्ता पेठेतील अपोलो टॉकीजजवळ परमार ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी (5 ऑगस्ट) रोजी दोन महिला मंगळसूत्र खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात शिरल्या आणि खोटे नाव आणि पत्ता सांगून दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन कामगारांची नजर चुकवून 71 हजार 117 रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून घेऊन गेल्या. सीसीटीव्हीत या दोन्हीही महिला कैद झाल्या असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

07 Aug 2017

जीएसटीसाठी कोणतीही गोपनीय माहिती देऊ नका- जीएसटी प्रशासन

एमपीसी न्यूज -  आत्तापर्यंत एटीएम कार्ड किंवा ऑनलाईन शॉपिंगच्या नावाने फसवल्याचे तुम्ही ऐकले असेल मात्र ऑनलाईन फसवणूक करणारेही आत्ता अपडेट झाले असून त्यांनी चक्क जीएसटीच्या नावाने फसवणूक करण्यास सुरुवात केली आहे. भोसरी येथे एका महिलेची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली आहे.

वैशाली कदम (वय 27 रा. केशवनगर कासारवाडी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात अज्ञात मोबाईल धारकाविरुद्ध ही तक्रार दिली आहे. त्यानुसार कदम यांना तुमच्या जीएसटीचे अपडेशन करायचे आहे. त्यासाठी तुमच्या बँकेच्या एटीएम कार्डचा व पॅनकार्डचा गोपनीय सांकेतांक (पासवर्ड) हवा आहे, असे सांगितले. त्यानुसार त्यांच्या खात्यावरून आरोपीने ऑनलाईन पद्धतीने चक्क 73 हजार 984 रुपयांची खरेदी केली. हा प्रकार फिर्यादीच्या लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली व मोबाईल धारकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

जीएसटीची नोंदणी व अपडेशनसाठी करदात्याची गोपनीय माहिती आवश्यक नाही- जीएसटीचे अतिरीक्त आयुक्त मानकोसकर

याविषयी एमपीसी न्यूजने जीएसटीचे पुणे विभागाचे अतिरीक्त आयुक्त सुरेंद्र मानकोसकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की, करदात्यांनी अशा फोन कॉल व ईमेलला बळी पडू नये. जीएसटी नोंदणी किंवा अपडेशन फोनद्वारे होत नाही. त्यासाठी करदात्याला आमच्या संकेतस्थळाला भेट द्यावी लागते. दुसरी महत्वाची बाब म्हणजे या नोंदणीसाठी फक्त करदात्याचे नाव, त्याचा पत्ता व पॅन क्रमांक घेतला जातो. त्यासाठी एटीएम कार्डचा क्रमांक किंवा बँक खाते विचारत नाही. एवढेच नाही तर तुमच्या पॅन कार्डची माहितीही आम्ही परस्पर तपासतो. त्यासाठीही आम्ही करदात्यांना त्रास देत नाही.

त्यामुळे तुम्हाला असा गोपनीय माहिती मागणारा फोन किंवा ईमेल आला तर त्याला माहिती देऊ नका, असे स्पष्ट आवाहन मानकोसकर यांनी एमपीसी न्यूजच्या माध्यमातून केले. त्यामुळे नागरिकांनी अशा भूलथापांना बळी न पडता असा फोन क्रमांक किंवा ईमेल आयडी संबंधीत पोलिसांना कळवावा.

07 Aug 2017

ओळख पटली मात्र मृत्यूचे कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज - रावेत येथील पुलाजवळील पवना नदीपात्रात एका पुरुषाचा मृतदेह सापडला आहे. ही घटना आज (सोमवारी) चारच्या सुमारास उघडकीस आली. मृताची ओळख पटली असून मृत्यूचे कारण मात्र स्पष्ट झालेले नाही.

दिनेश भिमराव पाटील (वय 30, रा. चिखली), असे मयत इसमाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागरिकांनी नदीपात्रात मृतदेह दिसत आहे, अशी खबर देहूरोड पोलीस ठाण्यात दिली. माहिती मिळताच तातडीने पोलीस तेथे दाखल झाले व त्यांनी तो मृतदेह बोटीच्या सहाय्याने बाहेर काढला. पाच दिवसांपूर्वी संबंधीत इसम बेपत्ता असल्याची तक्रार देहूरोड पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानुसार देहूरोड पोलिसांनी नातेवाईकांना बोलावले असता त्याची ओळख पटली.

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पिंपरीच्या वायसीएम रुग्णालयात दाखल केला असून प्राथमिक माहितीनुसार तो मनोरुग्ण असल्याचे समोर येत आहे. मात्र, त्याच्या मृत्यूचे कारण काय व हा अपघात होता की हत्या हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी देहूरोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

07 Aug 2017

प्रतिकारामुळे पीडिता थोडक्यात बचावली

एमपीसी न्यूज - स्वारगेट परिसरात एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी जबरदस्तीने अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (6 ऑगस्ट) सायंकाळी सहा वाजण्याचा सुमारास घडली. संबंधित मुलीने जोरदार प्रतिकार केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. पोलिसांनी याप्रकरणी अल्पवयीन मुलासह दोघांना ताब्यात घेतले.

कुणाल राजू वाघमारे (वय 19) अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली. तर त्याच्या अल्पवयीन साथीदारालाही पोलिसांनी ताब्यात घेतले. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेची अल्पवयीन मुलगी काम आटोपल्यानंतर सॅलीसबरी पार्क येथील मिशन कंपाऊंड परिसरातून जात असताना आरोपी कुणालने तिचा हात पकडून जबरदस्तीने दूर गवतात नेऊन तिला खाली पाडले. यावेळी आरोपीसोबत असलेल्या अल्पवयीन युवकाने पीडित मुलीचे दोन्ही हात पकडले आणि तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. मात्र, संबंधित मुलीने त्यास विरोध करून आरोपीस लाथ मारून तेथून पळ काढला व स्वतःची सुटका करून घेतली.

त्यानंतर ती तिच्या घरी गेल्यांनतर वडिलांशी बोलत असताना आरोपींनी तिच्या वडिलांनाही शिवीगाळ करून मारहाण केली. पीडित मुलीच्या आईने तक्रार दिल्यानंतर स्वारगेट पोलिसांनी आरोपींना अटक केली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.

07 Aug 2017

विवस्त्र फोटो कुटूंबीयांना दाखवण्याची दिली धमकी

एमपीसी न्यूज - सहकारनगरमध्ये ओळखीच्याच दोन तरुणांकडून एका अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विवस्त्र फोटो आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देत सतत सहा महिने हा प्रकार सुरू होता. 11 मार्च ते ऑगस्ट 2017 दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी सहकारनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आकाश प्रशांत वाघ (वय 22, रा. दत्तवाडी), निखील श्रीकांत गोडसे (वय 20, रा. धनकवडी) व त्यांच्या आणखी एका मित्रावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 17 वर्षीय मुलीने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी सिंहगड रोड परिसरात राहण्यास आहे. पीडित मुलीची व आरोपी क्रमांक तीन यांची शाळेपासून मैत्री आहे. त्याच्या ओळखीतून आकाश वाघ व निखील गोडसे यांच्यासोबत पीडित मुलीची ओळख झाली होती. त्यानंतर आकाश व निखिल यांनी पीडित अल्पवयीन मुलीला तिचे स्वतःचे विवस्त्र फोटो या दोघांना पाठवण्यास भाग पाडले. फोटो मिळताच, हे फोटो पीडित मुलीच्या आई-वडिलांना दाखवण्याची धमकी देऊन तिला निखिल गोडसे याच्या बंगल्यावर बोलवून घेतले. त्यानंतर दोघांनी तिच्यावर अत्याचार केले. गेल्या सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु आहे. अधिक तपास सहकारनगर पोलीस करत आहेत.

07 Aug 2017

एमपीसी न्यूज- वाहतुकीचे नियम हे वाहनचालकाच्या सुरक्षेसाठी असतात. पण काही लोकांच्या हे डोक्यात शिरत नाही. अपघात झाल्यानंतर त्यांचे डोळे उघडतात पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते. शनिवारी ( ता. 5 ) असाच एक प्रकार देहूरोडजवळ जुन्या पुणे मुंबई महामार्गावर पाहायला मिळाला. महाविद्यालयीन 10 तरुणांचे एक टोळके तीन दुचाक्यांवरून इतर वाहनचालकांना हुलकावणी देत आरडा ओरड करीत निघालेले पाहायला मिळाले.

देहूरोडजवळ घोरावडेश्वर डोंगरापासून कात्रज बायपास रस्त्यापर्यंत सकाळी साडेनऊच्या सुमारास तीन दुचाक्यांवर दहा महाविद्यालयीन तरुणांचे एक टोळके डोक्यात उन्माद शिरल्यासारखे आरडा ओरडा करीत निघालेले पाहायला मिळाले. दोन दुचाक्यांवे ट्रीपल सीट तर एका दुचाकीवर( एमएच 14 डी वी 9414) चक्क चार जण बसून निघाले होते. त्यापैकी एकजण त्या गाडीवर उभा राहून स्टंट करीत इतर वाहनचालकांना हुलकावण्या देत निघाला होता. त्यांना अन्य वाहनचालकांनी हटकण्याचा प्रयत्न केला असता त्याकडे दुर्लक्ष करून ते सर्वजण आणखीनच चेकाळल्यासारखे करू लागले. रस्ता आपल्यासाठीच आहे अशा अविर्भावात ते सर्वजण आरडा ओरड करीत निघाले होते.

अशा उन्मादी वाहनचालकांना कोण आवर घालणार ? यांचे डोळे अपघात झाल्यानंतरच उघडायचे. त्यांच्या अशा बेदरकार वागण्यामुळे ते आपल्या जीवाशी खेळतातच पण त्यापेक्षाही त्यांच्या या जीवघेण्या चाळ्यांमुळे इतरांचा जीव धोक्यात येतो त्याचे काय ?

Tolke 1

07 Aug 2017

एमपीसी न्यूज- आपल्या बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या रागातून मित्रांच्या मदतीने एका भावाने तरुणावर कोयत्याने वार केले. ही घटना काल (रविवारी) दुपारी चार वाजता घडली.

ज्ञानेश्वर दशरथ शिंदे (वय 18. रा बिजलीनगर झोपडपट्टी चिंचवड) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. किट्या ऊर्फ कृष्णा घंटेश्वर (वय 24), पाप्या (पूर्ण नाव माहीत नाही वय.23) शंकऱ्या गायकवाड(वय.23) सर्व राहणार नागसेननगर, बिजलीनगर झोपडपट्टी चिंचवड अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी कृष्णा व शंक-या या दोन्ही आरोपींना पोलिसांनी चिंचवड परिसरातून अटक केली असून त्यांना उद्या न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

आपल्या बहिणीसोबत ज्ञान्या ऊर्फ ज्ञानेश्वर दशरथ शिंदे याचे प्रेमसंबंध आहेत असा समज झाल्याने त्याचा राग मनात धरून साथीदाराच्या मदतीने किट्याने ज्ञानेश्वरशी भांडण करून त्याच्या डोक्यावर व दोन्ही पायावर कोयत्याने वार केले. ही घटना काल (रविवारी) दुपारी चार वाजता घडली.

याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात ज्ञानेश्वरचे वडील दशरथ शिंदे यांनी फिर्याद दिली असून आरोपी विरुद्ध मारहाण व जीवे मारण्याचा प्रयत्न असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

06 Aug 2017

एमपीसी न्यूज - नोकरी लावतो, असे सांगून चिंचवड येथील दोघांनी हिंजवडीच्या युवतीला 80 हजाराचा गंडा घातला आहे.

याप्रकरणी राजू चव्हाण व राहुल अनवले या दोघांविरुद्ध निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

रेणू गुप्ता (वय 30) यांनी निगडी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार सप्टेंबर 2016 पासून मल्टी अॅक्सेस या कंपनीच्या  (कुणाल प्लाझा, चिंचवड स्टेशन जवळ, चिंचवड) नावाखाली दोन्ही आरोपींनी गुप्ता यांना फसवले आहे. नोकरी लावतो, असे सांगत त्यांच्याकडून वेळो-वेळी असे 80 हजार रुपये घेतले. मात्र, नोकरी लावली नाही तसेच त्यांचे पैसेही परत केले नाहीत.

याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

06 Aug 2017

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संश्यावरून पत्नीला भेटायला बोलवून पतीनेच चाकूने पत्नीवर वार केले आहेत. ही घटना काल (शनिवारी) दुपारी चारच्या सुमारास घडली. यामध्ये पत्नी जखमी झाली आहे.

फिरोज अली शेख (वय 30 रा. वास्तू उद्योग सोसायटी, अजमेरा, पिंपरी), असे आरोपीचे नाव आहे.

फिरोज व फरहाना शेख (वय 26) यांचा 8 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. त्यांना दोन मुले व एक मुलगी असा परिवारही आहे. फिरोज पोटापाण्यासाठी कॅब चालवतो. त्यांच्यामध्ये यापूर्वीही भांडणे झाली होती. त्यानुसार फरहाना हिने पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर फरहाना तिच्या आईकडे मुंबईला गेली होती. काही दिवसांपूर्वी ती पुन्हा पिंपरीत तिच्या सासूकडे राहण्यास आली.

यावेळी फरहानने तिला भेटण्यासाठी म्हणून काल बोलावले. तिला घेऊन तो मोशी प्राधिकरण येथील आरटीओच्या पासिंगच्या गाड्या लागतात. त्या मोकळ्या जागेत घेऊन गेला. तिथे त्याने तिच्याशी वाद घातला. तिला शिवीगाळ केली. हाताने मारहाण केली व त्यांनतर तिच्या चेह-यावर व पोटावर त्याच्या जवळील चाकूने वार केले. यामध्ये फिरोजने त्याचा वेळीच हात धरला. तसेच आसपासच्या नारगरिकांनी धाव घेतल्याने मोठा अनर्थ टळला.

यामध्ये फरहाना थोडी जखमी झाली असून तिनेच भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात जाऊन पती विरुद्ध तक्रार दिली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Page 4 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start