• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
09 Aug 2017

एमपीसी न्यूज - पेट्रोलपंप लुटण्याच्या तयारीतील गुन्हेगारांना मोठ्या शस्त्रसाठ्यासह ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत त्यांनी मुळशीतील एका राष्ट्रवादी नेत्याच्या हत्येचा कट रचल्याचे निष्प्पन झाले आहे. हत्या करणा-यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्यासाठी पेट्रोलपंप लुटण्याची योजना आरोपींनी आखली होती. पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपीसह 9 जणांना अटक केली आहे.

उमेश रघुनाथ वाघुलकर (वय-38, रा.माण, ता.मुळशी, जि.पुणे), योगेश भाऊ गुरव (वय-32, रा.कर्वेनगर,पुणे), योगेश वेताळ (वय-23, रा.मलठण, ता.शिरूर), विशाल नवनाथ वेताळ (वय-23, रा.मलठण), विशाल आनंदा कळसकर (वय-19, रा.मलठण), चंद्रकांत दोरसिंग थापा (वय-35, रा.कासारवाडी, पुणे), फिरोज आयुब खान (वय-40, रा. दळवीनगर, चिंचवड, पुणे), अन्वर मुलानी (वय-40, रा.रावेतगाव, पुणे) आणि आकाश प्रकाश रेणुसे (वय-22. रा.पाबे, वेल्हा, पुणे) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, गुन्हे शाखा 2 चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख यांना हिंजवडी माण रोडवरील लक्ष्मी पेट्रोलपंप लुटण्यासाठी काही व्यक्ती येणार असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेच्या टिमच्या 21 कर्मचा-यांनी त्या परिसरात सापळा रचला होता. त्यानंतर काही वेळातच त्या ठिकाणी एक कार आणि दोन दुचाकीवर 7 ते 8 व्यक्ती आल्या. त्यांच्यात चाललेल्या संभाषणावरून ते आरोपी असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी छापा टाकून त्यांना ताब्यात घेतले. त्यांची तपासणी केली असता त्यांच्या ताब्यातून 5 पिस्टल, 1 रिव्हॉल्वर, 28 राऊंड आणि 5 कोयते असा शस्त्रसाठा सापडला. पोलिसांनी गुन्ह्यात वापरलेली एक कार, दोन दुचाकी असा 12 लाख 26 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

आरोपीला ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत मुख्य आरोपी उमेश वाघुलकर याने त्याच्या इतर सहका-यांच्या मदतीने मुळशी पंचायत समितीचे उपसभापती पांडुरंग वझरकर यांना ठार मारण्याचा कट रचला होता. आरोपी वाघुलकर आणि पांडुरंग वझरकर यांच्यात राजकीय वैर होते. यातूनच त्यांना संपवण्याचा कट त्याने रचला होता. यासाठी त्याने इतर सहका-यांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याचे कबूल केले होते. त्यासाठी लागणारी रक्कम जमा करण्यासाठी त्यांनी लक्ष्मी पेट्रोलपंपावरील रक्कम लुटण्याचे ठरवले होते.

अटक आरोपीपैकी पाच जण सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत. यातील योगेश गुरव हा आरोपी शरद मोहोळ टोळीचा सदस्य आहे. गणेश मारणे खून खटल्यात तो सध्या शिक्षा भोगत आहे. 5 मे रोजी तो 30 दिवसांच्या पॅरोलवर बाहेर पडला होता. पॅरोल संपल्यानंतरही हजर न होता तो फरार झाला होता.

ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उप आयुक्त सुधीर हिरेमठ आणि सहाय्यक पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट दोनचे पोलीस निरीक्षक सतिश निकम, सहाय्यक पोलीस निरीक्षक अन्सार शेख, खंडणी विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल शेलार, गणेश पाटील, युनिट दोन मधील कर्मचारी मोरे, तांबे, गडाकुंश, खराडे, शेख, पठाण, अहिवळे, अभंगे, वाघवले, मोमान, खडके, मचे, दळे, आवटे, शेख, हिरळकर यांनी केली.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज - परिसरातील विविध वाहनचोरी प्रकरणात एका नामांकित इंग्रजी माध्यमातील शाळेच्या चार विद्यार्थ्यांना फरासखाना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विशेष म्हणजे हे सर्व विद्यार्थी उच्चभ्रू घरातील आहेत. त्यांच्याकडून तीन दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.

आरोपी मुले ही नववी व दहावीच्या वर्गात शिकत आहे. सर्वांचे वडील व्यावसायिक असून उच्चभ्रू घरातील आहे. घरातील आर्थिक परिस्थिती चांगली असूनही ही मुले चोरी करीत होते हे विशेष. तपासात त्यांनी डीएसएलआर कॅमेरे, महागड्या सायकल्स, संगणकाचे मदर बोर्ड व रॅम चोरी केल्याचेही समोर आले आहे.

फरासखाना पोलीस अधिक तपास करीत आहे.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे-नाशिक रोडवर इंद्रायणीपुलावर चुकीच्या दिशेने दुचाकी चालवून झालेल्या अपघातात कुरुडी येथील 26 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 23 जुलै रोजी रात्री एक वाजता घडली.

आकाश शंकर हापसे (वय 26 रा. कुरुडी, खेड), असे मयत तरुणाचे नाव आहे.

कुरळीकडून मोशी टोलनाक्याकडे जात असताना दुचाकी चुकीच्या बाजूने चालवत असताना समोरून येणा-या गाडीला धडकून झालेल्या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज - शिवाजीनगर न्यायालयात एका दिवाणी खटल्याचे कामकाज सुरू असताना उलट तपासणीत विचारलेल्या प्रश्नांचा राग आल्याने माजी नगरसेवक कैलास गायकवाड यांनी वकीलाला तपासणी सुरू असतानाच धमकी दिली. तसेच कामकाज संपल्यानंतर न्यायालयाच्या आवारातच वकिलांना मारहाण केली. याप्रकरणी वकिलांनी शिवाजीनगर पोलिसात तक्रार नोंदविली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, शिवाजीनगर न्यायालयातील वकील राजेंद्र विटणकर (वय-63, रा.वृंदावन अपार्टमेंट, कर्वेनगर, पुणे) हे एक खटला लढवत आहेत. या खटल्यासंदर्भात उलट तपासणी घेत असताना त्यांनी कैलास गायकवाड यांना काही प्रश्न विचारले. त्याचाच राग आल्याने गायकवाड यांनी विटणकर यांना साक्ष चालू असतानाच 'मी तुझ्याकडे बघून घेतो, तु मला ओळखत नाही का, बाहेर चल अशी तीन-चार वेळा धमकी दिली.' त्यानंतर सुनावणीचे कामकाज संपल्यानंतर विटणकर न्यायालयीन कक्षाच्या बाहेर आल्यानंतर गायकवाड यांनी आणि त्यांच्यासोबत असलेल्या 4-5 लोकांनी कॉलर धरून बाहेर नेले आणि तीन क्रमांकाच्या गेटने बाहेर नेत त्यांना मारहाण केली.

या मारहाणीत विटणकर यांचा चष्मा तुटला असून त्यांच्या उजव्या डोळ्याला दुखापत झाली आहे. कैलास गायकवाड यांनी त्यांच्याजवळील रिव्हॉल्वर विटणकर यांच्यावर रोखून त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. त्यावेळी गायकवाड यांच्यासोबत असलेल्यांनी विटणकर यांच्या खिशातील 15 हजार रुपये काढून घेतले व त्यांना गाडीत बसवून पळवून नेण्याचा प्रयत्न केला. विटणकर यांनी आरडाओरडा केल्याने इतर वकील धावून आल्याने त्यांना सोडून बाकीच्यांनी पळ काढला, अशी माहिती विटणकर यांनी दिली. 

09 Aug 2017

एमपीसी न्यूज- चित्रपटाच्या ऑडीशनसाठी आलेल्या 19 वर्षीय तरुणीचा दिग्दर्शकानेच विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार काळेवाडी येथे रविवारी (6 ऑगस्ट) घडला आहे.

अप्पा पवार असे आरोपीचे नाव असून त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. संबंधित तरुणी पुण्यामध्ये शिकत असून तिला वॉट्सअप वरून काळेवाडी तापकीर चौक येथे चित्रपटाची ऑडीशन असल्याचे समजले. त्या माहितीवरून तिने संपर्क केला असता आजची ऑडिशन रद्द झाली असून तू उद्या ये असा एसएमएस पाठवण्यात आला. 

त्यानुसार संबंधित मुलगी रविवारी (6 ऑगस्ट) रोजी ऑडिशनला आली असता दिग्दर्शकाने तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली. तसेच तिला इतर चित्रपटात काम देतो असे ही आमिष दाखवले. या प्रकरणी मुलीने वाकड पोलीस ठाण्यात अप्पा पवार विरुद्ध विनयभंगाची तक्रार दिली असून वाकड पोलीस अधिक तपास करत आहेत.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज - निगडी पोलिसांनी तीन वेगवेगळ्या कारवाईमध्ये घऱफोडी वाहनचोरीचे असे एकूण 16 गुन्हे उघडकीस आणले असून याप्रकरणी चौघांना अटक केली आहे. यामध्ये पोलिसांनी सहा लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

संतोष मदनराव देशमुख (वय 23 रा. जाधववाडी चिखली, मुळ- मुलावागाव, उमरखेड जि. यवतमाळ) याच्याकडून दहा दुचाकीचे गुन्हे उघडकीस आले आहेत तर गौरव अनिल सरोदे (वय 20 रा,दळवीनगर, निगडी) मनोज जनार्दन सरोदे (वय19 रा. दळवीनगर निगडी) या दोघांकडून घरफोडी व वाहनचोरी असे पाच गुन्हे तर सलीम मुख्तार अहमद शेख (वय 23 रा. राजनगर ओटा स्कीम) याच्याकडूनही चोरीचा एक गुन्हा उघडकीस आला आहे.

निगडी परिसरात घरफोडी व वाहनचोरीचा वाढत्या घटनांना पायबंद घालण्यासाठी निगडी पोलिसांनी अॅक्शन प्लॅन राबवला. त्याअंतर्गत ही कारवाई करण्यात आली. संतोष देशमुख याच्याकडून पिंपरी, निगडी, चाकण, भोसरी, हडपसर, देहुरोड येथील दहा गुन्हे उघडकीस आले. त्याच्याकडून चार लाख 50 हजार रुपयांच्या 12 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. गौरव सरोदे व मनोज सरोदे यांच्याकडून निगडी, पिंपरी, खडकी येथील पाच घरफोडी व वहान चोरीचे गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून एक लाख 10 हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तर शेख याच्याकडून निगडी येथील एक चोरीचा गुन्हा उघडकीस आला. त्याच्याकडून 70 हजार रुपयांचा माल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, प्रशांत अहिरे, तात्या तापकीर,फारुक मुल्ला, नितीन बहिरट, नारायण जाधव, आनंद चव्हाण,किरण खेडकर, रमेश मावस्कर शरीफ मुलाणी, जमीर तांबोळी, मच्छिद्र घनवट, अशोक जगताप यांनी केली.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज- दरोड्याचा तयारीत असलेल्या सात जणांच्या टोळीला गुन्हे शाखेच्या पथकाने हिंजवडीमधून परिसरातून अटक केली. अटक केलेल्यांमध्ये कुख्यात शरद मोहोळ टोळीतील सराईत गुन्हेगार उमेश वाघोलीकर याचा समावेश आहे. आरोपींकडून 5 पिस्तुल, 23 जिवंत काडतुसे, 2 कार, मोटारसायकली आणि घातक हत्त्यारे जप्त केली आहेत. एका उच्चपदस्थ व्यक्तीच्या खुनाची सुपारी घेतल्याची माहिती त्यांच्याकडून मिळाल्याचे समजते. सहाय्यक आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. 

09 Aug 2017

एमपीसी न्यूज - निगडीतील त्रिवेणीनगर येथून एका तडीपार गुंडाला त्याच्या साथीदरासह निगडी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून दोन कोयते जप्त करण्यात आले आहेत.

रवी शंकर लोंढे (वय 23 रा. विजयनगर चिंचवड गाव), गणेश लक्ष्मण औकिरे (वय.22 रा. जाधववाडी, चिखली) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

निगडी पेलिसांना खबर मिळालीकी, चिंचवड पोलीस ठाण्याचा तडीपार आरोपी रवी लोंढे हा शस्त्रासह त्रिवेणीनगर चौकात येणार असल्याची खबर निगडी पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून लोंढे आणि त्याचा साथीादार औकिरे याला अटक केली. यावेळी त्यांच्याडून दोन लोखंडी कोयते व एक दुचाकी असा एकूण 15 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ही  कामगिरी  निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, पोलीस निरीक्षक गुन्हे शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण, तात्या तापकीर, सुनील शिंदे, चेतन सावंत, रमेश मावसकर, विश्वास नाणेकर, संजय मरगळे, शरीफ मुलाणी, जमीर तांबोळी, मंच्छिद्र घनवट, मंगेश गायकवाड यांनी केली.

09 Aug 2017

२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

एमपीसी न्यूज - काळभोरनगर येथील राष्ट्रवादीचे नगरेवक जावेद रमजान शेख यांना तामीळनाडू प्रिमीअर लीग क्रिेकेटवर सट्टा लावत असताना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. चिखली येथील साने बिल्डींगमध्ये हा सट्टा चालू होता. काल (मंगळवारी) रात्री निगडी पोलिसांनी छापा टाकत शेख यांच्यासह पाच आरोपींना अटक केली. यामध्ये आरोपींकडून दोन लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जावेद रमजान शेख (वय. 47 रा. विठ्ठलवाडी, आकुर्डी), नवीन भगवान मित्तल (वय 43 रा. मित्तल बिल्डींग, चिखली), राकेश नेमिचंद मेहता (वय 37 रा. बालाजीनगर धनकवडी), प्रवीण शिवाजी पवार (वय 36 रा. दत्तवाडी आकुर्डी) जाकीर मस्तान शेख (वय 29 रा. विद्यानगर चिंचवड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

चिखलीच्या मित्तल बिल्डींग मधील एका फ्लॅटमध्ये सट्टा लावण्याचे काम सुरु असल्याची खबर पोलिसांना मिळाली. खबर मिळताच पोलिसांनी मंगळवारी रात्री छापा टाकून पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य, लॅपटॉप,मोबाईल, रोख 53 हजार 500 रुपये असा एकूण 2 लाख 77 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

याप्रकरणी पाचही जणांवर निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सहायक पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण अधिक तपास करत आहेत.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज- जुनवणेवस्ती किवळे येथील एका गोठ्यातून अनोळखी चोरट्याने दोन म्हशी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्रथम परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधील रेकॉर्डिंग पाहून नंतर गुन्हा दाखल करण्यात येईल असे देहूरोड पोलिसांनी सबंधित म्हशींच्या मालकास सांगितले आहे.

पिंपरी-चिंचवड हद्दीतील किवळे भागातील जुनवणेवस्ती चारही बाजूने घरांनी वेढली आहे.या वस्तीवर आजही शेती,आणि दुग्धव्यवसाय केला जातो. या ठिकाणी राजू जुनवणे यांच्या गोठ्यात बांधलेल्या दोन म्हशी मध्यरात्री चोरट्यांनी चोरून नेल्या. या म्हशींची किंमत प्रत्येकी 20 हजार रुपये आहे.

या घटनेबाबत माहिती देताना राजू जुनावणे यांनी सांगितले की, अनेक वर्ष संभाळलेल्या वृद्ध म्हशींच्या या दोन पारड्या असून एक अलीकडेच गाभण राहिली होती. दुसरीची गर्भधारणेची वेळ जवळ आली होती. रात्री परिसरात कुत्री भुंकत असतात. मात्र म्हशी नेताना कुत्री भुंकण्याचा आवाज आला नाही याबद्दल जुनावणे यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

म्हशी चोरीस गेल्याने कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. जुनावणे यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्या नंतर प्रथम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे कैद झाले आहेत का याचा शोध घेऊ असे पोलसांनी सांगितले.

09 Aug 2017

एमपीसी न्यूज- हडपसर परिसरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या दोन वेगवेगळ्या घटना मंगळवारी उघडकीस आल्या.

सूरज संभाजी बागल (वय 35, रा. भेकराईनगरमध्ये, हडपसर) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. सूरज  बागल यांचा प्रेमविवाह झालेला आहे. त्यांची पत्नी शिक्षिका आहे. बागल कुटुंबीय फुरसुंगी परिसरात एका सोसायटीमध्ये राहते. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिट्ठीत सूरज यांनी वैयक्तिक कारणामुळे आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे.

दुसर्‍या घटनेत बिपीन शिंदे (वय 48, रा. गंगानगर, फुरुसुंगी, हडपसर) या इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केली.बिपीन यांना किडनीचा आजार होता. या आजाराला कंटाळून त्यांनी दुपारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

08 Aug 2017

खडकवासला धरणात आत्महत्या केलेल्या महिलेची ओळख पटली

एमपीसी न्यूज -  खडकवासला धरणाच्या जलाशयात आज (मंगळवार)  दुपारच्या सुमारास महिलेचा मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाची ओळख पटली असून मनिषा प्रकाश दवे (वय. 40 रा. आनंद नगर, सिंहगड रस्ता, पुणे), असे त्या महिलेचे नाव आहे.

आज दुपारच्या सुमारास खडकवासला चौपाटीजवळ पाण्यात एका महिलेचा मृतदेह तरंगताना स्थानिकांना आढळला होता. त्या महिलेच्या हातात राखी बांधलेली होती. त्यामुळे नैराश्यातून त्या महिलेने आत्महत्या केली असावी, असा अंदाज वर्तवला जात होता.

याप्रकरणी मयत मनिषा दवे यांचा भाऊ करण ओझा यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल राखीपौर्णिमा होती. परंतु दवे यांच्या कुटुंबात काल सुतक आले आणि चंद्रग्रहणही होते. त्यामुळे मयत मनिषा यांना भाऊ करण याला राखी बांधता आली नाही. त्यामुळे मनिषा यांनी भावासाठी घेतलेली राखी स्वत:च्या हातावर बांधून जीवन संपवले असावे, असा अंदाज करण ओझा यांनी वर्तवला आहे.

मयत मनिषा या आज (मंगळवार) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास घरातून आंघोळ करून बाहेर पडल्या होत्या, असे त्यांच्या कुटूंबीयांनी सांगितले. हवेली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वंभर गोल्डे यांच्या मार्गदर्शनाखाली हवेली पोलीस तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - इंदोरी येथील इंद्रायणी नदीपात्राच्या जवळ  एका मजुराचा मृतदेह आढळला आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी उघडकीस आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयताचे नाव सुलतान शेख (वय 35 रा. इंदोरी) असे आहे.

पोलिसांना अद्याप मयताची पूर्ण ओळख पटलेली नाही. त्याच्या खिशात डायरी मिळाली त्यावरून त्याचे सुलतान शेख एवढेच नाव कळाले आहे. गावात चौकशी केली असता तो त्याच्या बायकोसोबत इंदोरी येथे भाड्याने  राहत होता. परिसरात जे काम मिळेल तो काम तो करत होता. शेजा-यांनी सांगितल्यानुसार त्या दोघांमध्ये भांडण झाले होते. त्या दिवसापासून तो घरातून गेला होता. त्याची बायकोही गावी गेली आहे.

मात्र, त्याचे मूळ गाव काय किंवा त्याचे पूर्ण नाव काय अद्याप कळू शकलेले नाही. मृतदेह पूर्णपणे कुजला असून तीन ते चार दिवसांपूर्वी त्याचा बुडून मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. मात्र तो अपघात होता, आत्महत्या की घातपात हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. याप्रकरणी अंबी पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे विमानतळावरून दुबईला जाण्याच्या तयारीत असलेल्या दोघा प्रवाशाजवळ असलेल्या खाद्यपदार्थांच्या डब्यातून एक कोटी 30 लाख रुपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी एका महिलेसह दोघांना अटक केली असून 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत त्यांची रवानगी करण्यात आली. ही कारवाई 6 ऑगस्ट रोजी करण्यात आली. निशांत येताम (रायगड) आणि हर्षा रंग्लानी (चेंबुर, मुंबई), अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, विमानतळावरील सुरक्षा दलाच्या अधिका-यांना निशांत येताम हा संशयास्पद वाटल्याने त्यांनी सीमाशुल्क विभागाला अलर्ट राहण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी त्याच्या सामानाची तपासणी केली असता त्याच्या जवळील खाद्यपदार्थाच्या बॅगेत मोठ्या प्रमाणात उपमा असल्याचे आढळले. त्यावर अधिक संशय बळावल्याने पुन्हा त्या बॅगची तपासणी केली असता त्यामध्ये 86 हजार 600 अमेरिकन डॉलर तर 15 हजार युरो आढळले.

त्याच विमानाने दुबईला निघालेल्या हर्षा रंग्लानी या संशयित महिलेची माहिती मिळाल्यानंतर सीमाशुल्क विभागाच्या अधिका-यांनी तिच्याजवळील बॅगची झडती घेतली असता त्यातही उपमा आढळला. त्यानंतर परत एकदा या महिलेची बॅग तपासली असता त्यातही 86 हजार 600 अमेरिकन डॉलर आणि 15 हजार युरो आढळले.

पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमध्ये आज (मंगळवारी) एकाच दिवशी तीन आत्महत्या करण्याच्या घटना घडल्या आहेत. दापोडी येथे एका 16 वर्षीय मुलीने, चिखली येथे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तर ताथवडे येथे एका उच्चशिक्षित महिलेने इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली आहे.

अनिषा नंदकुमार ठाकुरे (वय.16, रा. विठ्ठ्ल मंदिराच्या पाठीमागे, दापोडी), असे दापोडी येथे आत्महत्या केलेल्या मुलीचे नाव आहे. केवळ महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही या निराशेतून या मुलीने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी एकच्या सुमरास घडली.

अनिषा जवळ कोणतीही चिठ्ठी मिळाली नाही. मात्र, तिच्या आई वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, तिला अकरावीसाठी महाविद्यालयात प्रवेश हवा होता. दहावीत तिला 67 टक्के पडले होते. तिच्या सोबतच्या मैत्रीणींचे महाविद्यालयील प्रवेश प्रक्रियेचे काम पूर्ण झाले होते. त्यामुळे घरात ती गेली काही दिवस निराश दिसत होती. याच निराशेतून तिने ही आत्महत्या केली असल्याचे पालकांनी सांगितले.

तर भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तिचे वडील तळेगाव दाभाडे येथे कामाला आहेत. ते नेहमीप्रमाणे कामाला गेले होते. तर आई घराजवळील वाण्याच्या दुकानात सामान आणण्यासाठी गेली होती. यावेळी अनिषा घरात एकटीच होती. आई दुकानातून परतली असता अनिषाने घरातील पंख्याला ओढणीने गळफास घेतल्याचे आईला दिसले. ही घटना अवघ्या 15 ते 20 मिनिटात झाली.

याप्रकरणी भोसरी पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून पोलीस अधिक तपास करत आहेत. मात्र, या प्रकरणात महाविद्यालयीन किचकट प्रवेश प्रक्रिया व त्याला दिले जाणारे अवाजवी महत्त्व कितपत महत्वाचे आहे, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

दुस-या घटनेत ताथवडे येथील सेंटोसा पर्ल या सोयटीच्या इमारतीवरून उडी मारून एक विवाहित महिलेने आत्महत्या केली. ही घटना आज दुपारी एकच्या सुमारास घडली.

चेतल पाटील (वय 25, रा.ताथवडे), असे महिलेचे नाव आहे.  महिलेने एमई इलेक्ट्रॉनिक्सचे शिक्षण घेतले असून ती नोकरी शोधत होती.

घटनेत प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, चेतलने फ्लॅट केबल नेटवर्क समस्या असल्याचे कारण सांगून सुरक्षारक्षकाकडून टेरेसची चावी घेतली. त्यानंतर काही वेळातच जमिनीवर जोरात काहीतरी आदळल्याचा आवाज आल्याने सोसायटीतील इतर सदस्य बाहेर आले. त्यावेळी चेतल जखमी अवस्थेत विव्हळत पडल्याचे पाहून तिला तात्काळ उपचारासाठी वाकड येथील लाईफ पॉईंट खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. महिलेने 11 व्या मजल्यावरून उडी घेतली होती.

आत्महत्येचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

तर तिसरी घटनेत चिखलीतील जाधववाडी येथे एका 28 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना आज (मंगळवारी) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली.

स्वप्नील माने (वय 28 रा. जाधववाडी, चिखली), असे मयत मुलाचे नाव असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पिंपरी येथून यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात आणण्यात आला आहे.

स्वप्नील हा जाधववाडी येथे आपल्या बहिणीच्या घरी राहत होता. ते दोघे आज कामाला गेले असताना त्याने घरातील छताच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. शेजा-यांना घर बराच वेळापासून बंद असल्याने संशय आला व त्यांनी दरवाजा तोडला असता हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार त्याला कोणतीही नोकरी नव्हती तो मिळेल ते काम करत होता. 


मात्र, मृत्यूचे कारण अद्याप कळू शकलेले नाही. या प्रकरणी निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील मेझा नाईन ते लक्ष्मी चौकाकडे जाणा-या मार्गावर एका ट्रकने पायी जाणा-या तरुणाला जोरदार धडक दिली. यामध्ये तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना काल (सोमवारी) सकाळी घडली.

विष्णुदास अंबादास शिंदे (वय.26 रा. भोईरवाडी,माण) असे मयत तरुणाचे नाव आहे. तर ट्रक चालक आरोपीचे नाव शिवाजी नानासाहेब पाटील (वय.33 रा. भोईरवाडी, माण) असे आहे.

मयताचा भाऊ आकाश शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विष्णुदास हा पायी जात असताना ट्रक चालकाने बेदरकारपणे गाडी चालवत शिंदे याला जोरदार धडक दिली. यामध्ये शिंदेचा जागीच मृत्यू झाला. आरोपीला अद्याप अटक नसून हिंडवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

08 Aug 2017

एमपीसी न्यूज - अवघ्या वर्षभराच्या कालावधीत तिचे अपहरण होते काय, ससून रुग्णालयात ती सापडते काय, पुढे तिला दत्तक घेण्याच्या दिवशीच तिचे खरे आईबाबा सापडतात काय.... खेळ कुणाला दैवाचा कळला...या गाण्याच्या ओळीप्रमाणे चार वर्षाच्या तनिष्काचे आयुष्य म्हणजे एखाद्या चित्रपटाचे कथानकच...

तनिष्का ही चार वर्षाची मुलगी 29 मार्च 2016 रोजी तिच्या आजीसोबत पुणे रेल्वे स्थानकावर कोल्हापूरला जाण्यासाठी थांबली होती. होळीचा सण उरकून त्या दोघीजणी गाडीची वाट पाहत थांबल्या होत्या. वाट पाहता पाहता तिच्या आजीला आणि तिला कधी डोळा लागला हे कळलंच नाही. त्याचाच फायदा घेत एका अज्ञात इसमाने तिचे अपहरण केले. घाबरलेल्या आजीने रल्वे पोलिसांमध्ये तक्रार केली. मात्र तनिष्काचा काहीही ठावठिकाणा लागला नाही.

पुढे अचानकपणे दोन महिन्याच्या कालावधीनंतर ती ससून हॉस्पिटलच्या वॉर्डक्रमांक तीनमध्ये आढळून आली. यावेळी तिच्या जवळ एक प्लॅस्टीकची कॅरीबॅग व दुधाची रिकामी बाटली होती. तिला विचारले असता ती केवळ तिचे नाव सांगत होती. ससूनच्या कर्मच्या-यांनी तिला सोसायटी ऑफ फ्रेंडस ऑफ द ससून हॉस्पिटल (एसओएफएसएच) यांच्याद्वारे चालवल्या जाणा-या श्रीवत्स चाईल्ड केअर सेंटरकडे दिले.

दरम्यान विविध स्थानिक वर्तमानपत्रात तिच्याबद्दल जाहिरात दिली. मात्र कोणाचाही प्रतिसाद आला नाही. सप्टेंबर 2016 पासून पोलीस तनिष्काचा विविध सामाजिक संस्था, अनाथालये यामधून शोध घेत होते. रेल्वे पोलीस उपनिरीक्षक एन.बी. मुंतोडे यांच्याकडे तनिष्काच्या तपासाची सूत्रे होती. अखेर एक वर्षानंतर एक जून 2017 रोजी एसओएफएसएच च्या कर्मच्या-यांनी तिला कायदेशीर दत्तक देण्याच्या प्रक्रीयेला सुरुवात केली होती. एका गरजू व योग्य दांपत्याने तिच्यासाठी अर्ज केला. सर्व बाबींची पडताळणी केल्यानंतर तनिष्काला दत्तक द्यायचे ठरले. तनिष्काच्या दत्तक प्रक्रीयेची सर्व कागदपत्रे तयार करण्यात आली.

आणि इथेच अनपेक्षितपणे तनिष्काच्या नशिबाला कलाटणी मिळाली. तिला घेण्यासाठी तिचे नवीन पालक 27 जुलै रोजी येणार होते त्याच्या आदल्या दिवशी, 26 जुलै रोजी रल्वे पोलीस चाईल्ड केअर सेंटरवर तनिष्काचा फो़टो येऊन धडकला. तपासाची चक्रे पुन्हा फिरली आणि पोलिसांना श्रीवत्समध्ये तनिष्का सापडली. तनिष्काच्या आईवडिलांचा शोध लागला आहे हे कळताच श्रीवत्सच्या कर्मच्या-यांनी तातडीने तिची दत्तक प्रक्रीया थांबवली.

तातडीने कोल्हापूरहून तिच्या ख-या पालकांना पुण्याला बोलवण्यात आले. तनिष्काच्या त्यांनी ओळखले. तनिष्काचे वडील सचिन कांबळे व आई प्रियंका हे मजुरीचे काम करतात. तिची आई सात महिन्याची गर्भवती असून त्यांना आणखी एक सहा वर्षाची छोटी मुलगी आहे. तनिष्का दिसताच त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला. एक वर्षानंतर त्याचा पोटचा गोळा त्यांना सहीसलामत मिळाला होता. त्याचा आनंद आई वडिलांशिवाय कोण जणू शकते ?

दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्हीच्या माध्यमातून अपहरणकर्त्यांची ओळख पटवली आहे. त्याचा शोध चालू आहे. तनिष्काची वैद्यकीय चाचणी झाली असून तिच्यासोबत कोणताही गैरप्रकार झाल्याचे समोर आलेले नाही. या साऱ्या नाट्यपूर्ण घटनांची माहिती तिला दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांना देण्यात आली. तनिष्काने त्यांनाही लळा लावला होता. एकीकडे तिला सोडून जाणे त्यांना खूप जड गेले, तर दुसरीकडे तनिष्काला तिचे खरे आईवडील मिळाल्याचा आनंदही होता. दत्तक घेण्यासाठी त्यांनी तनिष्कासाठी खरेदी केलेले केलेले कपडे, खाऊ, खेळणी तिला देऊ केली व तिच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

तनिष्का आपल्या आईवडिलांच्या कुशीत विसावली खरी, पण त्या दोन महिन्याच्या कालावधीत तनिष्कासोबत सोबत काय घडले हे अद्याप कोडेच आहे. हे कोडे आता आरोपी हाती लागल्यानंतरच सुटणार आहे.

08 Aug 2017

कोणतीही हानी नाही; दोन तासानंतर वाहतूक सुरळीत

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) एक स्पिरीटचा टँकर उलटला. या अपघातामुळे पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दोन तास ठप्प झाली होती. यावेळी टँकरमधून होणारी स्पिरिटची गळती आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने त्वरित बंद केल्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

कामशेत बोगद्याजवळ आज (मंगळवारी) सकाळी एक स्पिरीटचा (एमएच 04 सीपी 4132) टँकर उलटला. यावेळी टॅँकर मधून स्पिरीटची गळती होत होती. मात्र आयआरबी व आयएनएसच्या फायर फायटर टीमने स्पिरिटवर पाण्याचा फवारा मारून गळती थांबवली. त्यामुळे पुढील दुर्घटना टळली. या अपघातामुळे सकाळी साडेसात ते साडेनऊ यावेळेत मुंबईकडे जाणारी वाहतूक ठप्प झाली होती.क्रेनच्या सहाय्याने टँकर बाजूला काढण्यात आल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.

Page 3 of 64
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start