• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
05 Jun 2017


एमपीसी न्यूज -  देहूरोड परिसरात 2 जून ते 4 जून या दोन दिवसाच्या कालावधीत दोन घरफोड्या झाल्या असून यामध्ये 14 लाख 37 हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.


पहिल्या घटनेत विकासनगर किवळे परिसरातील दांगडवस्तीतील सोनिगरा पर्ल या दुकानाची घोरफोडी करून चोरट्यांनी परदेशी चलन चोरले आहे. यामध्ये 6000 चायनीज आर.एम.बी चलन, भारतीय मूल्य दराचे 300 मॅक्सीकम पिसो चलन, भारतीय मूल्य दराचे 300 मॅक्सीकम पिसो चलन, एक सोनेरी रंगाचे टायमॅक्स कंपनीचे लेडीज घड्याळ असा एकूण 29 हजार 126 रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

याबाबत दुकान मालक अहमद मुबाकर तस्लीम (वय 32 रा. विकासनगर, किवळे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात तक्रार  दिली आहे.

दुस-या एका घटनेत देहूरोड हद्दीतील येथील एक कंपनी चे कुलूप उचकटून तेथील 14 लाख 8 हजार 559 रुपयांची चोरी करण्यात आली आहे. यामध्ये 315 एमएम लांबीचे, 410 एमएम रुंदीचे व 2.8 जाडीचे लोखंडी शीट असा एकूण 3 हजार 991 किलो वजनाचा माल कंपनीतून चोरीला गेला आहे.

याबाबत फिर्यादी दत्तात्रय विठोबा शेळके (वय.45, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी महादेव मंच्छिंद्र पारखे (रा, संत तुकारामनगर, तळवडे) व त्याचे इतर चार साथीदार यांच्यावर देहूरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

या दोन्ही गुन्ह्यामध्ये अद्याप कोणासही अटक नसून पोलीस अधिक तपास करत आहेत.

05 Jun 2017

1 कोटी 40 लाखाचा मुद्देमाल जप्त, गुन्हेशाखा युनिट 5 ची कारवाई

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सोनसाखळी, वाहन चोरी, घरफोडी करणा-या आंतरराज्यीय टोळीतील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांनी सापळा रचून पाठलाग करत कोंढवा येथून अटक केली. कारवाईत त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 40 लाख, 69 हजार, 464 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन किलो सोन्याचे दागिने, 66 लाख रुपये रोख, याशिवाय परकीय चलनातील 3 लाखावर रक्कमेचा समावेश आहे. चौकशीत पुणे शहरातील सोनसाखळी चोरीचे 18, फसवणुकीचे 18, घरफोडीचे 05, वाहन चोरीचा एक आणि इतर चोरीचे नऊ, असे एकूण 51 गुन्हे उघडकीस आले आहेत.

जफर शाहजमान इराणी (वय 38, रा. पठारे वस्ती, लोणी काळभोर ता. हवेली, सध्या रा. वाखरी, ता. दौंड), अमजद रमजान पठाण (वय 35, रा. टाटा मोबाईल टॉवरजवळ टि.पी.एस. रोड, शिवाजीनगर, परळी वैजनाथ, जि. बीड, मूळ रा. मुझफ्फरनगर, उत्तरप्रदेश), अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहर परिसरातील वाढत्या सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पेट्रोलिंग करीत असताना, गुन्हे शाखा युनिट पाचच्या पोलिसांना त्यांच्या खब-यामार्फत सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यातील रेकॉर्डवरील गुन्हेगार जफर इराणी त्याच्या साथीदारासह उंड्रीमार्गे कोंढवा येथे काळ्या रंगाच्या होंडा युनिकॉर्नवर येणार आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाली होती.

त्यानुसार पोलिसांनी उंड्री चौकाजवळ सापळा रचला. यावेळी हेल्मेट घातलेल्या दोन संशयितांना थांबण्यास सांगितले असता त्यांनी पळ काढण्याच प्रयत्न केला असता त्यांचा पाठलाग करून त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कसून चौकशी केली असता कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यामध्ये अतुरनगर भागात महिलेची सोनसाखळी चोरल्याचे कबूल केल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. यावेळी अंगझडतीत त्यांच्याकडून चार हजार रुपयांची रोख रक्कम व सॅमसंगचा चोरीचा मोबाईल मिळून आला. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना सोमवार (दि. 5) पर्यंतची पोलीस कस्टडी रिमांड देण्यात आली.

या दरम्यान सखोल तपास व चौकशीत आरोपींकडून केवळ पुण्यातच नव्हे तर परराज्यातही विविध गुन्हे केल्याची कबुली त्यांनी दिली. तसेच यावेळी पुणे शहरातील एकूण सोनसाखळी चोरीचे 18, फसवणुकीचे 18, घरफोडीचे 05, वाहन चोरीचा एक आणि इतर चोरीचे नऊ, असे एकूण 51 गुन्हे उघडकीस आले आहेत. कारवाईत त्यांच्याकडून एकूण 1 कोटी 40 लाख, 69 हजार, 464 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

आरोपी हा सराईत गुन्हेगार असून यापूर्वीही त्याला चोरीच्याच गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. आरोपी जफर इराणी हा इराणी संघ स्थापन केला आहे. यामार्फत त्याची बड्या लोकांमध्ये उठबस होती. तो लोणीकाळभोर येथे पत्नी आणि दोन मुलासह राहत होता. याशिवाय त्याने दौंड कंजारी वस्ती येथे दीड एकर परिसरात घर बांधले होते. जप्त केलेला मुद्देमाल त्याच्या दौंड येथील घरातून हस्तगत केला आहे. आरोपीकडे पुणे ग्रामीण पोलिसांचे ओळखपत्र आढळले आहे. याचा आधार घेऊन त्याने पुणे ग्रामीण परिसरात अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. न्यायालयाने त्याला आणखी सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. या दरम्यान आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

05 Jun 2017

एमपीसी न्यूज - धायरीत प्रेमसंबंधातून एका तेवीस वर्षीय युवकाची धारधार शस्त्राचे वार करून निर्घृण हत्या करण्यात आली. ही घटना काल (4 जून) दुपारी दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास धायरीतील रायकर मळा येथे घडली. एका महिलेशी असलेल्या प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपींनी मयताच्या गळ्यावर, चेह-यावर व डोक्यात धारधार शस्त्राचे व दगडाचे घाव घालून हत्या केली.

अविनाश निळू आखाडे (वय-23, रा.सणसवाडी, नांदोशी गाव, ता.हवेली, जि.पुणे), असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी प्रवीण सणस, रोशन नामदेव सणस आणि त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला. मयत तरुणाचे वडील निळु आखाडे (वय-52) यांनी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक डी.एस.शिंदे अधिक तपास करत आहेत.

05 Jun 2017

एमपीसी न्यूज - सर्वोच्च न्यायालयाने 3 ऑगस्ट 2012 च्या दिलेल्या आदेशानुसार चारचाकी गाड्यांच्या काचांवर टेन्डेड फिल्म किंवा इतर कोणतीही गोष्ट चिटकवता येणार नाही. त्यानुसार पुणे शहर आणि परिसरात 31 मे 3 जून या चार दिवसाच्या कालावधीत एकूण साडेतीन हजार गाड्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

 

सुरक्षिततेचा भाग म्हणून न्यालयाने हे आदेश वाहतूक पोलिसांना दिले आहेत. त्यानुसार संबंधित गाडीच्या काचाला लावलेल्या काळ्या फिल्म काढून टाकण्यात येतात व दंडात्मक रक्कमही वसूल करण्यात येते. त्यानुसार राबवलेल्या विशेष मोहिमेमध्ये एकट्या पुणे शहरात चार दिवसात 3 हजार 588 गाड्यांवर कारवाई करत 7 लाख 31 हजार 200 रुपयांची तडजोड रक्कमही आकारण्यात आली.

 

ही कारावाई पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातही प्रभावीपणे चालू आहे. त्यामुळे नागरिकांनी त्वरीत आपल्या गाडीच्या काचांवर लावलेल्या काळ्या फिल्म काढून टाक्याव्यात कारण हे वाहतूक नियमांचे एक प्रकारे उल्लंघन आहे. अन्यथा त्यांना दंडात्मक रक्कम आकारण्यात येईल. त्यामुळे कारवाईपुर्वीच गाड्यांच्या काळ्या फिल्म काढण्याचे आवाहन पुणे वाहतूक पोलिसांनी केले आहे.

04 Jun 2017


एमपीसी न्यूज - काळेवाडी येथील ज्योतिबानगर परिसरात घराचे कुलूप तोडून घरातील दागिने व रोख रक्कम, असा एकूण चार लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. ही घटना काल (दि.3) दुपारी पावणेबाराच्या सुमारास घडली.


काळेवाडीतील ज्योतिबानगरमधील वाटिका आपार्टमेंटमध्ये राहणा-या संतोष माळशिकारे (वय 33) यांच्या घराचे भरदिवसा कुलूप तोडून कपाटातील रोख दीड लाख व सोन्या चांदीचे दागिने, असा एकूण चार लाख तीन हजार 300 रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे.

याबाबत वाकड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

04 Jun 2017


एमपीसी न्यूज -  शिवाजीनगर येथील कोटनीस दवाखान्यासमोर एका अज्ञात इसमाचा पीएमपीएमएलखाली आल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना आज (रविवारी) दुपारी 4 च्या सुमारास झाली.

शिवाजीनगर-सहकारनगर या बसच्या पाठीमागच्या चाकाखाली आल्याने अज्ञात इसमाचा मृत्यू झाला आहे. इसमाची ओळख अद्याप पटलेली नाही. मात्र, प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार या इसमाने स्वतः गाडीच्या पाठीमागे उडी घेतली, त्याच्या अंगावरचेही कपडे फाटले होते. त्यामुळे अपघात कसा झाला हे तुर्तास सांगणे कठीण आहे. याबाबत तपास चालू आहे, असे शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) व्ही.एच. दरेकर यांनी सांगितले.

मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

04 Jun 2017


घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस; आठ वाहने जप्त

एमपीसी न्यूज - हडपसर परिसरातील घरफोडी वाहन चोरीच्या विविध गुन्ह्यात एका अल्पवयीन बालकासह दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तीन घरफोड्या उघडकीस आणल्या असून त्यांच्याकडून तीन तोळे सोने, सोन्याचे दागिने, आठ वाहने व रोख रक्कम हडपसर पोलिसांनी हस्तगत केली आहे.


अक्षय पोपटराव पांडूळे (वय 22, वडकीनाला, ता. हवेली, जी. पुणे) व गणेश अभिमान जावळे (वय 23, रा. वैदवाडी, हडपसर), अशी वाहनचोरीच्या गुन्ह्यांतील अटक आरोपींची नावे असून घरफोडीच्या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले.

हडपसर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरीक्षक अंजूम बागवान यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन कृष्णानंद नाईक (वय 29, काळेपडळ, हडपसर) यांची हिरो होन्डा पॅशन प्लस मोटार सायकल मगरपट्टा सिटी येथून पे अॅण्ड पार्कमधून चोरीला गेली होती. या गुन्ह्याचा तपास करताना पोलीस शिपाई अमित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अक्षय व गणेश या दोघांना ताब्यात घेऊन नाईक यांच्या मोटारीसह अन्य चोरीच्या तीन गाडया अशा एकूण चार मोटारसायकली जप्त केल्या.

तसेच दुस-या गुन्हयात नजीर गुलाम शेख (वय 49, रा. हिंगणेमळा, हडपसर) यांनी राहत्या घरासमोर त्यांची होन्डा शाईन मोटार सायकल पार्क केली होती. या गुन्ह्याचा तपास करत असताना अमित कांबळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून चोरलेल्या एकूण 3 मोटार सायकली व येरवडा परिसरातून चोरलेले एक चारचाकी वाहन तसेच हडपसर परिसरातील तीन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले. तसेच घरफोडीतील तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दहा हजार हस्तगत करण्यात आली आहे.

04 Jun 2017


एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील मेगो पोलीस सिटीजवळ काल (दि.3) रात्री दीडच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीवरील तरुण जागीच मरण पावला आहे.

राजीव माहेती (वय 25 रा. शिवगंगा सोसायटी, रहाटणी चौक, पिंपळे सौदागर) हा मित्रासोबत मोटार सायकलवरून जात असताना माण रोडवर मेगा पोलीस सिटी येथे भरधाव येणा-या ट्रकच्या धडकेत राजीव याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याचा सोबती गोविंद मारवाह हा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रात्री दीडच्या सुमारास घडल्याने ट्रक चालकाची ओळख पटू शकलेली नाही.

हिंजवडी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली असून अज्ञात ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

04 Jun 2017

साडे नऊ लाखांचा ऐवज जप्त

 

एमपीसी न्यूज – वाकड पोलिसांनी चोरी व घरफोडीच्या विविध गुन्ह्यांची उकल करत चोरीला गेलेला तब्बल 9 लाख 52 हजारांचा ऐवज जप्त केला आहे. या गुन्ह्यामध्ये एकूण 6 आरोपींना अटक केली आहे.

यामध्ये रहाटणी परिसरात तीन महिन्यांपासून बंद असणा-या घराचे कुलुप तोडून घरातील 9 लाख रुपयांचे दागिने पळवणा-या तीन चोरांनाही पोलिसांनी अटक केली आहे. यामध्ये फिर्यादीच्या मुलानेच मित्रांच्या मदतीने घऱफोडी केली होती. केदार वाल्मीक हजारे, अक्षय प्रकाश सस्तरे, ओमकार नागनाथ अलंगे या तिघांना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 290 ग्रॅम वजनाचे 8 लाख 49 हजार 326 रुपये किमतीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. ही घऱफोडी अवघ्या तीन दिवसात पोलिसांनी उघडकीस आणली.

तर कस्पटेवस्ती येथे घरातील 9 लाखांच्या दागिन्यावर डल्ला मारणा-या नोकरालाही वाकड पोलिसांनी अटक केली आहे. लोकबहाद्दूर लालबहाद्दूर शाही, नामराज महारुप शाही अशी आरोपींची नावे आहेत. दोघेही मुळचे नेपाळचे असून त्यांच्या जवळून 15 ग्रॅम वजनाचे 45 हजार रुपये किमतीचे दागिने जप्त केले आहेत. ही घऱफोडी 28 मे रोजी पहाटे घडली होती. तसेच सॅमसंगचा स्मार्ट फोन, दोन लॅपटॉप असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून वेगवेगळ्या दोन्ह गुन्ह्यात एका सराईत चोराला पोलिसांनी अटक करत एकूण 4 गुह्यात 6 आरोपी व 9 लाख 52 हजार 405 रुपयांचा ऐवज वाकड पोलिसांनी जप्त केला आहे.

03 Jun 2017

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या मुख्य सुरक्षा अधिका-याला त्रयस्थ व्यक्तीमार्फत लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिका-यांनी रंगेहात पकडले. ही कारवाई आज सायंकाळी सव्वासहा वाजता महानगरपालिकेच्या समोर असलेल्या हॉटेल ऑलंपिया कॅफेत करण्यात आली.

संतोष संभाजीराव पवार (वय-44, रा.दामोदर सोसायटी, लेन नंबर 4 रो हाऊस क्रमांक - 2 नवग्रह मारुती मंदिराचे समोर बिबवेवाडी, पुणे), असे अटक केलेल्या मुख्य सुरक्षा अधिका-याचे नाव आहे. याप्रकरणी एका इसमाने तक्रार दिली होती.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, तक्रारदार व्यक्तीची सुरक्षा एजन्सी आहे. त्याच्यात व महापालिका यांच्यामध्ये सुरक्षा पुरविण्याबाबतचे टेंडर होते. सदरचे टेंडर संपले होते. नवीन टेंडर प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत मुदतवाढ देण्यासाठीचा अहवाल पाठविण्यासाठी  संतोष पवार याने तक्रारदाराकडे 10 लाखांची मागणी केली होती. यातील चार लाख रुपये त्रयस्थ इसम अशोक गिरमे याच्या हस्ते स्वीकारताना पोलिसांनी दोघांनाही अटक केली. त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ही कारवाई सहाय्यक पोलीस आयुक्त दत्तात्रय भापकर, पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, चंद्रकांत चौधरी, पोलीस नाईक विनोद झगडे, पोलीस कॉन्स्टेबल किरण चिमटे आणि विनायक डोळस यांच्या पथकाने केली.

03 Jun 2017

एमपीसी न्यूज - अमली पदार्थांच्या विक्री प्रकरणी पोलिसांनी वारजे उड्डाणपुलाखालून काल (शुक्रवारी) अटक केली. त्यांच्याकडून 85 हजार रुपयांच्या मेफे ड्रोनसह एकूण 7 लाख 95 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. न्यायालयात हजर केले असता त्यांना 5 जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.

मंदार अजित मुनोत (वय 29, रा. मुक्ताई रेसीडेन्सी, फ्लटॅ नं. 304, भूगाव, मुळशी) आणि विपूल गोरखनाथ राऊत (वय 30, गुरुदत्त हाईटस, सुखसागर नगर, कात्रज), अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी फिर्याद दिली आहे.

अमली पदार्थांचे गैरव्यवहार प्रकरणातील व्यक्तींबाबत माहिती काढण्यासाठी गस्त घालत असताना पोलिसांनी मुनोत व राऊत यांना अटक केली. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारात हे दोघेही कर्वेनगर-वारजे रोडवरील उड्डाणपुलाखाली मेफेड्रोनसह आढळून आले. त्यांच्याकडून 85 हजार रुपयांच्या मेफे ड्रोन, रोख 12 हजार रुपये, पाचशे रुपये किंमतीचा वजन काटा आणि सात लाख रुपये किंमतीची एक चारचाकी असा एकूण 7 लाख 95 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. त्याला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने मेफेड्रोन कोठून आणले, याबाबत तपास करण्यासाठी त्यांना पोलीस कोठडी देण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

03 Jun 2017

एमपीसी न्यूज - टेम्पोमध्ये घरगुती साहित्य भरत असताना चारचाकी मधून आलेल्या एका सराईत गुन्हेगारासह दोघांनी माथाडी नेता असल्याचे सांगत एका तरुणाला पैशांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास टेम्पो जाळून टाकण्याची धमकी दिली. ही घटना शुक्रवारी (दि.2) रात्री नऊच्या सुमारास काळेवाडी, फाटा येथे घडली.

याप्रकरणी सतिश कालीदास दुधवडे (वय 21, निगडी) या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. तर, त्याचा साथीदार विशाल वाघमारे (रा. वाकड) हा पसार झाला आहे. याबाबत प्रविण खोत (वय 24, रा. वाकड) याने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

प्रवीण हा शुक्रवारी रात्री काळेवाडी फाटा येथे त्याचे मामा बालाजी पांढरे यांचे घरगुती साहित्य शिफ्ट करत होता. त्यावेळी आरोपी सतिश आणि विशाल एका कारमधून तिथे आले. विशाल याने आम्ही माथाडी कामगारांचे नेते आहोत ''तू गाडीत सामान भरण्याचे दोन हजार रुपये आणि टेम्पो चालकाने दोन हजार'' असे एकूण चार हजार रुपये देण्याची मागणी प्रविण याच्याकडे केली. तसेच पैसे नाही दिले तर टेम्पो सामानासह जाळून टाकण्याची धमकी आरोपी सतिश याने दिली. सतिशने त्याची कार बेदरकारपणे चालवून प्रविण याचे मामा बालाजी पांढरे यांना धक्का दिला आणि पसार झाला. पोलिसांनी पाठलाग करून सतिश याला गजाआड केले. तर, विशाल हा पसार झाला आहे.

सतिश दुधवडे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याचे, पोलिसांनी सांगितले. वाकड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डी. आर. लोंढे तपास करत आहेत.

03 Jun 2017

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील व्यवसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून एक लाख रुपयांची मागणी करणा-या तिघांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली. पोलिसांनी त्यांच्याकडून गावठी पिस्टलसह 65 हजार रुपयांचा ऐवज जप्त केला. ही कारवाई बापूजी बुवा मंदिर फेज 3 येथे करण्यात आली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस. सी. खैरनार यांनी एक दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिले आहे.

 

अमित छगन मेंगडे (वय 22, रा. मुगावडे, ता. मुळशी), नागेश विठ्ठल मेंगडे (वय 23, निंबाळकर चाळ, वारजे माळवाडी) आणि नागेश लक्ष्मण मेंगडे (वय 22, रा. मुगावडे, ता. मुळशी) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. याप्रकरणी किरण छबन मालपोटे यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.

 

हिंजवडी येथील शिवाजी चौकात किरण मालपोटे स्वामी समर्थ मेडिकल चालवतात. त्यांच्या दुकानात घुसून अटक केलेल्या आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत हाताने मारहाण केली. तसेच जमीन विक्रीच्या व्यवहारात झालेली एक लाख रुपयांची नुकसान भरपाईची मागणी करत जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत किरण मालपोटे यांनी शुक्रवारी (दि.2) हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

 

पोलीस आरोपींचा शोध घेत असताना, आरोपी आपल्या साथीदारांसोबत घोटावडेकडून हिंजवडीकडे जात असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी बापूजी बुवा मंदिर फेज 3 येथे सापळा रचून आरोपींना अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ एक गावठी पिस्टल आढळून आले. पोलिसांनी या तिघांकडून गावठी पिस्टल, पॅशन प्रो दुचाकी असा एकूण 65 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

 

ही कारवाई परिमंडळ 3 चे पोलीस उप आयुक्त गणेश शिंदे, चतुःशृंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त विक्रांत पाटील, वरीष्ठ पोलीस निरीक्षक अरुण वायकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रंगनाथ उंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश धामणे, आशिष बोटके, आनंद खोमणे, सचिन सुपे, विजय पाटील, सचिन उगले, विवेक गायकवाड, अतिक शेख, ज्ञानेश्वर मुले, आण्णा गायकवाड या पथकाने केली.

03 Jun 2017

एमपीसी न्यूज - मोटारीला काळी काच लावलेल्या वाहनचालकाला अडवून दंड भरण्यास सांगितले असता, वाहनचालकाने हिंजवडीत वाहतूक नियमनाचे काम करणा-या वॉर्डनला मारहाण केली. ही घटना गुरुवारी दुपारी बाराच्या सुमारास हिंजवडी चौकात घडली.

 

याप्रकरणी जितेंद्र लाखे (वय 23, रा. साखरेवस्ती, हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दीपक बबन हुलावळे (वय 43, रा. श्रीनाथनगर, हुलावळेवस्ती, हिंजवडी) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र हिंजवडी वाहतूक विभागामार्फत वॉर्डन म्हणून काम करतात. त्यांनी गुरुवारी काळी काच असलेली आरोपीची मोटार अडवली. दंडाची पावती फाडण्यास सांगितले. मात्र, आरोपीने ‘‘तुम्ही इतर काळ्या काचेच्या गाड्या का नाही अडवत, असे बोलून दंडाची पावती फाडण्यास नकार दिला.

 

तसेच त्याने वॉर्डन जितेंद्र यांना मारहाण केली. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा आरोपीवर दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हिंजवडी पोलीस करीत आहेत.

02 Jun 2017


एमपीसी न्यूज - बोपोडीतील जलतरण तलावात बुडून सात वर्षीय चिमुरड्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली. ही घटना आज सकाळी 11.30 वाजता घडली. अरहान अस्लम शेख (वय-7, रा.बोपोडी, पुणे) असे मयत मुलाचे नाव आहे.


अधिक माहिती अशी की, अरहान हा आज सकाळी साडेअकरा वाजता आपल्या चुलत भावासह बोपोडीतील जलतरण तलावावार पोहण्यासाठी गेला असताना तेथील महिला गार्डने फक्त अरहानला आत सोडले. त्यामुळे अरहानला पोहता येत नसल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला.

याप्रकरणी अस्लम शेख यांनी फिर्याद दिलेल्या फिर्यादीनुसार जलतरण तलावाच्या महिला गार्डच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडली. जलतरण तलावाच्या व्यवस्थापकांनी योग्य ती काळजी न घेतल्यामुळेच अरहानचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांनी केला. याप्रकरणी त्यांनी तेथील चार लाईफ गार्ड आणि जलतरण तलावाच्या व्यवस्थापकाविरोधात तक्रार दिली आहे.

02 Jun 2017


एमपीसी न्यूज - मार्केटयार्ड परिसरात पोलिसांनी गुरूवारी (1 जून) केलेल्या कारवाईत ब्राऊन शुगर विक्रीसाठी आलेल्या एकाला जेरबंद केले. यावेळी त्याच्या ताब्यातून 80 हजार किमतीचे ब्राऊन शुगर आणि रोख 13 हजार 400 रुपये जप्त केले. त्याला न्यायालयात हजर केले असता जूनपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.एस.सराफ यांनी दिला आहे.

सैफन ऊर्फ शफिक इस्माईल शेख (वय 45, रा. आनंदनगर झोपडपट्टी, बिबवेवाडी-कोंढवा रस्ता) आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.

बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावरील आनंदनगर येथे पोलीस गस्त घालत असताना आरोपीने त्यांना पाहून पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला पकडले. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे ब्राऊन शुगर आढळले. पोलिसांनी अधिक चौकशी केली असता तो ब्राऊन शुगर विकत असल्याची माहिती समोर आली. ब्राऊन शुगर विकलेले 13 हजार 400 रुपये पोलिसांनी त्याच्याकडून जप्त केले. त्याला पोलिसांनी आज न्यायालयात हजर केले. त्यावेळी त्याने ही ब्राऊन शुगर कोठून आणली, याबाबत तपास करण्यासाठी शेख याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहाय्यक सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली.

02 Jun 2017


एमपीसी न्यूज - पुणे शहर गुन्हे शाखा युनिट तीनच्या कर्मचा-यांनी मागील आठ दिवसात केलेल्या वेगवेगळ्या कारवाईत पाच चोरट्यांना जेरबंद केले. यावेळी त्यांच्या ताब्यातून 4 लाख 54 हजार किमतीचे 122 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. या आरोपीकडून शहरातील कोरेगाव पार्क, बिबवेवाडी, बंडगार्डन आणि निगडी पोलीस ठाण्यातील गुन्हे उघडकीस आले आहेत.


प्रतीक विठ्ठल गायकवाड (वय-27, रा. ताडीवाला रोड, पुणे), गणेश आदिनाथ लोखंडे (वय-23, रा.आंबीलओढा, पुणे), तौसीफ निजाम कुरेशी (वय-28, रा.पर्वती दर्शन, पुणे), अलीम सलाउल्ला खान (वय-24, कुदळवाडी, पुणे) आणि नरेश लक्ष्मण शिंदे (वय-23, रा. फुगेवाडी, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

यातील नरेश शिंदे याच्या ताब्यातून पोलिसांनी 84 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी जप्त केली. ती साखळी त्याने सहा महिन्यापूर्वी खडकी येथील जय हिंद सिनेमागृहासमोरून चोरल्याचे सांगितले. या सोनसाखळी चोरीची फिर्याद अद्याप पोलिसांकडे नाही. त्यामुळे ज्या कुणाची ही सोनसाखळी असेल त्यांनी ओळख पटवून घेऊन जावी, असे आवाहान पोलीस    उप-आयुक्त पंकज डहाणे यांनी केले आहे.

02 Jun 2017


एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या ट्रकने दुचाकीस्वाराला धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवार) दुपारी दोनच्या सुमारास वडगाव (मावळ) येथील हॉटेल ज्योतिर्लिंग समोर झाला.


विनोद दत्तात्रय केदारी (वय 25, रा. पाचगाव, ता. मावळ), असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केदारी हा त्याच्या दुचाकीवरून तळेगाव चाकण महामार्गावरून जात होता. त्यावेळी मागून येणा-या भरधाव ट्रकची धडक त्याच्या दुचाकीला बसली. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन केदारी याचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पुढील तपास वडगाव (मावळ) पोलीस करीत आहेत.

Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start