• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
21 Aug 2017

एमपीसी न्यूज- कौटुंबिक वादातून आपल्याच भाचीच्या पाच महिन्याच्या मुलीचे अपहरण करून पलायन करणाऱ्या महिलेला विश्रांतवाडी पोलिसांनी अवघ्या काही तासातच सोलापूर रेल्वे स्थानकावरून जेरबंद केले. शुक्रवारी (१८ आॅगस्ट)  हा प्रकार घडला.

रत्ना मरोळ (वय ३५, रा. मूळ आंध्रप्रदेश) असे अटक केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अमृता आखाडे (वय २० रा. धानोरी) यांनी तक्रार दाखल केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रत्ना ही फिर्यादी अमृता यांची मावशी आहे. रत्नाचा अमृताच्या पतीसोबत वाद होता त्या वादातून रत्ना हिने पहाटे साडेपाचच्या सुमारास सर्वजण झोपेत असताना अमृताच्या पाच महिन्याच्या मुलीचे अपहरण करून घरातून पलायन केले. सकाळी अमृताच्या कुटुंबियांनी मोबाइलवर तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने कोणताही प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे घाबरलेल्या अमृता आणि तिच्या  कुटुंबियांनी विश्रांतवाडी पोलिसांत धाव घेत रत्नाविरोधात तक्रार दाखल केली.

विश्रांतवाडी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक संगीता पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक अभिजीत चौगुले,कर्मचारी दिनकर लोखंडे, सुनील  खंडागळे, विनायक रामाणे, प्रवीण  भालचिम, सुभाष आव्हाड, योगेश चांगण, ज्योती खरात, रूचिका जमदाडे यांच्या पथकाने रत्नाचा शोध सुरू केला. तिच्या  मोबाईल लोकेशननुसार तपास केला असता ती लोणावळा येथे असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर रात्री साडेआठ वाजता तिच्या मोबाईलचे लोकेशन खडकी  असल्याची माहिती पोलिसांना समजली. रत्ना ही आंध्रप्रदेशमधील आपल्या मूळ गावी जात असावी असा संशय व्यक्त करीत पुणे तसेच सोलापूर रेल्वे पोलिसांना आरोपी महिला आणि तिच्या जवळ असलेल्या लहान मुलीचे फोटो व्हॉटसअप वरून पाठवीत रेल्वेमध्ये तिचा शोध घेण्यास सुरूवात केली. दरम्यान, चेन्नई एक्सप्रेसमधून रात्री बारा वाजता सोलापूर रेल्वे स्थानकावरून रत्ना आणि मुलीस सुखरूप ताब्यात घेतले.
21 Aug 2017

मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ खोळंबली 

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई द्रुतगतीमार्गावर आडोशी जवळ मुंबईकडे जाणारा ट्रक अचानक उलटल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ खोळंबली होती. ही घटना आज (सोमवारी) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. 

पुण्याहून मुंबईकडे पिओपीचे साहित्य घेऊन जाणारा ट्रक आडोशी गावाजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे उलटला. या अपघातात ट्रकमधील सर्व साहित्य रस्त्यावर पसरल्याने मुंबईकडे जाणारी वाहतूक काहीकाळ खोळंबली होती.यामध्ये चालक जखमी झाला असून त्याला जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यावेळी आयआरबी  पेट्रोलिंग, देवदूत, बोरघाट पोलीस, सनी डेल्टा फोर्सच्या कर्मचाऱ्यांनी क्रेनच्या साहाय्याने ट्रक व रसत्यावरील साहित्य हटवले असून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्ववत झाली आहे.

acci 2
acci 3
 
21 Aug 2017

पैशाच्या वादातून वेटरनेच केली हॉटेल मालकाची हत्या ; निगडी पोलिसांकडून दोन दिवसात आरोपी अटक 

एमपीसी न्यूज- दोन दिवसांपूर्वी निगडीच्या उड्डाणपुलावर हॉटेल मालक शंकर झेंडे यांचा डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला. पोलिसांनी केलेल्या कसून तपासात झेंडे यांचा मृत्यू अपघातामुळे नव्हे, तर त्यांचा खून झाल्याचे निष्पन्न झाले. हा खून त्यांच्याच हॉटेलमधील वेटरने पैशाच्या वादातून केल्याचे तपासात उघडकीस आले.

या प्रकरणी आझाद शेखलाल मुलाणी (वय 26 रा. ताम्हणी वस्ती चिखली), सहदेव मारुती सोळंकी (वय 26 रा.त्रिवेणी नगर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.

चिंचवड स्टेशन जवळील एका हॉटेलचे मालक शंकर झेंडे (वय 39) यांचा मृतदेह डोक्याला मार लागलेल्या अवस्थेत शुक्रवारी ( १८ ऑगस्ट) पहाटे दोनच्या सुमारास आढळून आला होता. प्रथमदर्शनी हा अपघात असल्याचे पोलिसांनी सांगितले होते. मात्र त्यानंतरच्या तपासात काही गोष्टी संशयास्पद गोष्टी आढळल्या.  शंकर झेंडे यांच्या आई आणि भावाने हा अपघात नसून खून झाला असल्याची तक्रार दिल्यानंतर तपासाची चक्रे फिरली. निगडी पोलिसांनी दोन दिवसात खुनाचा छडा लावून दोन आरोपीना अटक केली. 

आझाद मुलाणी याच्याशी शंकर याचे पैशावरुन खटके उडत होते. तसेच झेंड याच्याकडे वेटरचे काम  करणारा सोळंकी हा मुलाणीकडे काम करत होता. त्याला झेंडे यांनी पगाराची सुमारे 40 हजार रुपयांची रक्कम थकवून त्याला कामावरुन काढून टाकल्याचे तपासात समोर आले. त्याचा राग मनात धरून  पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये आरोपींची झेंडे यांचा खून केल्याची कबुली दिली.

आरोपी सोळंकी व मुलाणी यांनी 18 ऑगस्ट रोजी पवळे उड्डाणपुलाजवळ स्वीफ्ट गाडीमध्ये बसून झेंडे यांचयवर पाळत ठेवली.  झेंडे दुचाकीवरून जाताना दिसताच त्याचा पाठलाग करुन पाठीमागून त्याच्या दुचाकीला जोरात धडक  दिली. ते  खाली पडताच गाडीतून उतरुन आरोपींनी गाडीतील लोखंडी रॉडने झेंडे याच्या डोक्यावर मारले. यामध्येच झेंडे याचा मृत्यू झाला. 

त्यामुळे सुरुवातीला अपघात वाटणारी घटना नंतर खून असल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दोन्ही आरोपींना मोरवाडी न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली  असून या गुन्ह्याचा पुढील तपास निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले करत आहेत.

ही कारवाई निगडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयकुमार पळसुले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक खारगे,  देवेंद्र चव्हाण, मच्छिद्र घनवट, मंगेश गायकवाड, बाबा चव्हाण, नितीन बहिरट, जमीर तांबोळी, पोलीस नाईक फारुख मुल्ला यांनी केली.
21 Aug 2017

एमपीसी न्यूज- पुणे शहरात विविध ठिकाणी भरदिवसा घरफोडी करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका 'बंटी आणि बबली'ला त्यांच्या एका साथीदारांसह गुन्हे शाखा युनिट १ ने केलेल्या कारवाईत पोलिसांच्या जाळ्यात अडकले. त्यांच्या अटकेमुळे पुणे शहरात विविध ठिकाणी केलेल्या घरफोडीचे अनेक गुन्हे उघडकीस आले आहेत.

पुणे शहरात मागील काही दिवसांपासून घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. पुणे शहर गुन्हे शाखा युनिट १ ने या घटनांचा शोध घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. दरम्यान, घरफोडीच्या गुन्ह्यातील एक सराईत आकाश हेमराज परदेशी (वय २५ रा. येरवडा, पुणे) हा येरवडा येथील साईबाबा मंदिराजवळ उभा असल्याची माहिती पोलीस कर्मचारी गजानन सोनुने आणि अशोक माने याना त्यांच्या खबऱ्यामार्फत मिळाली. त्यानुसार याठिकाणी सापळा रचून आकाश हेमराज परदेशी याच्यासह अनिल काशिनाथ लष्करे (वय २८, रा. वडारवाडी, विश्रांतवाडी) आणि उषा राम कांबळे (वय २५ रा. येरवडा) या 'बंटी बबली' जोडीला अटक केली.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत या आरोपींनी अलंकार, कोथरूड, वारजे माळवाडी, विश्रामबाग, विश्रांतवाडी, निगडी, विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकूण १० घरफोडीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून १६० ग्राम सोन्याचे दागिने, ५९० ग्राम चांदीच्या वस्तू, एक एलईडी टीवी, रुपये २१०० रोख आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा पाच लाख ८३ हजार २० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. 

या आरोपींपैकी आकाश परदेशी याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात २४ गुन्हे दाखल असून अनिल लष्करे आणि उषा कांबळे यांच्यावर अनुक्रमे ८ आणि १६ गुन्हे दाखल आहेत. यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कारवाई गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपयुक्त पंकज डहाणे आणि सहाय्य्क पोलीस आयुक्त सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन भोसले पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक धनंजय कापरे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश पाटील, हर्षल कदम, पोलीस कर्मचारी गजानन सोनुने, अशोक माने, प्रकाश लोखंडे, राजू पवार, राजाराम सुर्वे, कैलास गिरी, विजयसिंह वसावे, प्रशांत गायकवाड, मोहन येलपले, मेहबूब मोकाशी, रिजवान जिनेडी, उमेश काटे, सुभाष पिंगळे, सुरेंद्र आढाव, सुधाकर माने, तुषार खडके, श्रीकांत वाघवाले, इरफान मोमीन आणि इम्रान शेख यांनी केली.   
21 Aug 2017

एमआयडीसी भोसरी पोलिसांकडून दरोडयातील फरार आरोपी अटक

आरोपींकडून चार गुन्ह्यांची उकल 

एमपीसी न्यूज - एमआयडीसी भोसरी पोलिसांनी कारवाई करत 2016 मध्ये  टेल्को कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या बसवर दरोडा टाकणा-या टोळीतील फरार आरोपीसह आणखी एका सराईत गुन्हेगारास पोलिसांनी अटक केली आहे.

दरोड्यातील फरारी आरोपी पवन बंडू शिरसाठ (वय.20 रा बालाजीनगर झोपडपट्टी, एमआयडीसी भोसरी),  व आमीर हुसेन  शेख (वय.22 रा. पत्राशेड,पिंपरी) असे अटक आरोपींची नाव नावे आहेत.

शिरसाठ व त्याच्या पाच सहका-यानी 2016 मध्ये टेल्को कंपनीच्या बसवर दरोडा टाकला होता. यातील इतर पाच आरोपीना यापूर्वीच अटक केली असून शिरसाठ हा फरार झाला होता. आमिर शेख हा देखील सराईत आरोपी आहे.

संबंधित आरोपी बालाजीनगर येथील संत निरंकारी बाबा मठाजवळ बसले असल्याची खबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचत दोघांना अटक केली. यावेळी त्यांच्याकडून  एसएस व एमएस स्टीलच्या  पट्ट्या, 25 वॉल तसेच एक अॅक्टीवा गाडी असा दोन लाख 18 हजार 863 रुपयांचा माल जप्त करण्यात आला. पोलिसांनी केलेल्या तपासात एमआयडीसी भोसरी येथील तीन तर निगडी पोलीस ठाण्यातील एक गुन्हा असल्याचे उघड झाले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे करत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र विभांडीक, तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब बांबळे, पोलीस हवालदार रवींद्र तिटकारे, पोलीस  नाईक किरण काटकर, पोलीस शिपाई विजय दौंडकर, नवनाथ पोटे, करण विश्वासे, विशाल काळे, यांनी केली. 
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून गणेश मंडळाचे कार्यकर्ते उत्सवाच्या तयारीला लागले आहेत. आगामी गणेशोत्सवात  कायदा आणि सुव्यवस्था राखली जावी या दृष्टीने पोलीस यंत्रणा देखील कामाला लागली आहे. पिंपरीतील नेहरुनगर येथे आज (सोमवारी) दुपारी दोनच्या सुमारास पोलिसांनी मॉकड्रील करून गणेशोत्सवासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले.

यामध्ये पोलीस नियंत्रण कक्षातून कॉल आल्यानंतर घटनास्थळी जाऊन दंगलीवर नियंत्रण मिळवणे, जखमींना तातडीने रुग्णालयात पोहचवणे, आग लागली असता अग्निशामक दलाला वेळेते पाचारण करणे, बाँम्ब सदृश्य वस्तू आढळल्यास बाँम्ब निकामी करणारी यंत्रणा पाचारण करुन तेथील परिस्थितीवर नियंत्रण मिळवणे अशा प्रकारचे सराव यावेळी करण्यात आले.

यामध्ये परिमंडळ तीनचे  पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक आयुक्त राम मांडुरके तसेच पिंपरी पोलीस ठाण्याचे सात अधिकारी 120 पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. यामध्ये गणेश उत्सवात कंट्रोल रुमवरुन दंगलीचा कॉल आल्यानंतरच्या कारवाईचा पोलीसांनी यावेळी सराव केला. या मॉकड्रिलमुळे नागरिकांमध्ये काही काळ अफवा पसरल्या. मात्र पोलिसांनी नागरिकांना विश्वासात घेऊन हा सराव असल्याचे सांगितले. 
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - बांधकाम साईटवर खेळण्याच्या बहाण्याने नेऊन एका 6 वर्षाच्या चिमुकलीवर 26 वर्षीय तरुणाने अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील वानवडी परिसरात रविवारी रात्री ही घटना घडली. याप्रकरणी पीडित तरुणीच्या पालकांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी या नराधम तरुणाला अटक केली आहे.

चश्मू उर्फ सदेर मंहमद उमर खान (वय 26), असे अटक करण्यात आलेल्या आरोपी तरुणाचे नाव आहे. वानवडी पोलीस अधिक तपास करीत आहे.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - कोंढवा येथील शिवनेरीनगरमध्ये अचानक आग लागून दोन कार भस्मसात झाल्या. गाडीत कोणीही नसल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, पोलीस व अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यात आली आहे.

कोंढवा परिसरातील शिवनेरीनगर येथे साईबाबा मंदिराजवळील रमा अव्हेन्यू सोसायटी समोरील मोकळ्या मैदानात  एक इंडिका (MH12CT 9747) व एक फोर्ड आयकॉन (MH04DN6739) शेजारी-शेजारी उभ्या करण्यात आल्या होत्या. दरम्यान, आज सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दोन्ही गाड्यांना अचानक आग लागली. नागरिकांनी अग्निशामक दलाला याची माहिती दिली. अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. मात्र, तोपर्यंत कार आगीच्या भस्मसात झाल्या होत्या. 

कोंढवा पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले असून कार कोणाच्या आहेत तसेच कारला आग कशी लागली याचा तपास करीत आहेत.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - भवानीपेठेतील लक्ष्मीबाजार येथे आज (सोमवार) पहाटे साडेचारच्या सुमारास रस्त्यावर उभ्या असलेल्या एका टेम्पोला अचानक आग लागली. यावेळी टेम्पोत कोणीही नसल्याने जीवितहानी टळली.

मिळालेल्या माहितीनुसार, भवानीपेठेतील लक्ष्मीबाजार येथे टाटाचा एक टेम्पो उभा होता. पहाटे साडेचारच्या सुमारास टेम्पोला अचानक आग लागली. यावेळी टेम्पोत कोणीही नव्हते. स्थानिकांनी पाहिल्यानंतर अग्निशामक दलाला याची माहिती दिली. दलाच्या जवानांनी तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली. या आगीत टेम्पोचे सीट जळून खाक झाले व काचा फुटून टेम्पोचे मोठे नुकसान झाले.

ही कामगिरी समीर शेख, फायरमन तांदेल केदारे व मिळवणे यांनी बजावली.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुण्यातील पौड फाट्याजवळील एका मोबाईल रिपेअरिंग दुकानाला काल मध्यरात्रीच्या सुमारास आग लागून सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक झाल्या. अग्निशामक दलाच्या जवानांना माहिती मिळताच तातडीची कारवाई करत अवघ्या 15 मिनिटात आग आटोक्यात आणली.

मिळालेल्या माहितीनुसार, पौड फाट्याजवळील आयडियल कॉलनी मोदी गणपती शेजारील सिटी मोबाईल दुकानाला मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. दुकानासमोरील हॉटेलमधील लोकांनी पाहिल्यानंतर अग्निशामक दलाला याची माहिती दिली. माहिती मिळताच तातडीने कारवाई करत अग्निशामक दलाच्या जवानांनी एक रेस्क्यू व्हॅन व दोन गाड्यांच्या सहाय्याने अवघ्या 15 मिनिटांत आग आटोक्यात आणली.

मात्र, मोबाईलचे दुकान असल्याने इलेक्ट्रॉनिक वस्तू मोठ्या प्रमाणात होत्या. तसेच दुकानात लाकडी पोटमाळा असल्याने थोड्याच वेळात आग मोठ्या प्रमाणात भडकली. त्यामुळे आग विझवेपर्यंत दुकानातील सर्व इलेक्ट्रॉनिक साहित्य मोबाईल व बॅट्र्या तसेच फर्निचर जळून खाक झाल्या. आग रात्रीच्या सुमारास भडकल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ही कामगिरी अग्निशामक दलाचे जवान सुनील नाईक नौरे, सचिन आयवळे, सचिन वाघोले, जितेंद्र कुंभार, राठोड, ड्रायव्हर अमोल शिंदे, फायरमन कुलकर्णी व उभे यांनी बजावली.

20 Aug 2017


एमपीसी न्यूज - उद्यमनगर येथील सागर अपार्टमेंटमध्ये तीन घराचे मुख्य दरवाजा तोडून घरातील 56 हजार रुपये किंमतीचे दागीने चोरट्यांनी चोरुन नेले. ही घटना काल (शनिवार) सकाळी आठ ते सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली.


डॉ. मिलींद मार्तंड शिंदे (वय.26 रा, सागर अपार्टमेंट उद्यमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, शनिवारी सकाळी आठ ते सायंकाळी साडे सहाच्या दरम्यान अज्ञातांनी शिंदे यांच्या घरासह शेजारी राहणारे संदीप गोयल व श्रीकांत निरगे यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून घरातील कपाटातील सोन्याचे मंगळसुत्र व दोन अंगठ्या असा 56 हजार रुपयांचे सोन्याचे दागीने चोरुन नेले.

पिंपरी पोलीस ठाण्यात अज्ञाता विरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.

20 Aug 2017


एमपीसी न्यूज - बावधन येथे कोलते पाटील स्टारगंज या बांधकाम साईटवर सेंट्रीगचे काम करत असताना आठव्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू झाला. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात कंत्राटदारा विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आलीम जमनसाब शेख (वय.38) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी कंत्राटदार महमुद सादुल्ल शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सलिम शेख यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बावधान बुद्रुक येथे कोलते पाटील स्टारगंज या बांधकाम साईटवर सेंट्रीगचे काम करत असताना सलिम यांचा भाऊ आलीम याचा पाय घसरुन तो खाली पडला. त्याच्या डोक्याला गंभीर जखम झाल्यामुळे तो मयत झाला.

या प्रकरणी कंत्राटदार शेख याच्यावर कामगारांना सुरक्षितीतचे साधने न पुरवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हिजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

20 Aug 2017


एमपीसी न्यूज - नवीन घर खरेदी करण्यासाठी गावाकडची जमीन विकून आणलेल्या सुमारे 5 लाख 71 हजार रुपयांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. ही घटना चिंचवड येथील रांका ज्वेलर्सजवळ 2 ऑगस्ट रोजी घडली.

या प्रकरणी सुरज तरडगांवकर (वय.47 रा. चिंचवडेनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात काल फिर्याद दिली. तरडगावकर हे मुळचे पंढरपुरचे आहेत. त्यांनी गावाकडची जमीन विकून त्यातून मिळालेल्या पैशातून पिंपरी-चिंचवड येथे नवीन घर खरेदीसाठी रक्कम आणली होती. त्यांनी कामानिमीत्त गाडी चिंचवड येथील रांका ज्वेलर्सच्या पाठीमागील पार्कींगमध्ये लावली होती. मात्र अज्ञात चोरट्यांनी गाडीच्या डक्कीतून रक्कम लंपास केली.

तारडगावकर यांची मानसीकता ठीक नसल्यामुळे त्यांनी काल चिंचवड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. यापक्ररणी चिंचवड पोलीस अदिक तपास करत आहेत.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - मोकळ्या जागेत लावलेल्या एक टेम्पो, एक चारचाकी मोटारीसह साऊंड सिस्टिमला अज्ञाताने आग लावून बारा लाखांचे नुकसान केले. ही घटना भोसरीत शुक्रवारी भर दुपारी दीड वाजता घडली.

याप्रकरणी निलम उपरवट (वय 42, रा. भोसरी) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उपरवट यांनी त्यांच्या घराजवळील पत्र्यांच्या कंपाऊंडमध्ये टेम्पोत दोन साऊंड सिस्टिम ठेवली होती. तसेच शेजारी इर्टिगा मोटारही पार्क केली होती. शुक्रवारी भर दुपारी अज्ञात आरोपीने टेम्पो, चारचाकी मोटारीसह दोन साऊंड सिस्टिमला आग लावून दिली. यामध्ये उपरवट यांचे 12 लाखांचे नुकसान झाले आहे.
 पोलीस उपनिरीक्षक पी. आर. कठोरे अधिक तपास करत आहेत.

19 Aug 2017

पाच दिवसात शहरात 6 तर ग्रामीण भागात 5 चोर्‍या

एमपीसी न्यूज - लोणावळाकरांनो सावधान लोणावळा परिसरात पुन्हा चोरांचा सुळसुळाट सुरू झाला आहे. 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या पाच दिवसात लोणावळा शहराच्या विविध भागात सहा ठिकाणी चोर्‍या झाल्या असून लोणावळा ग्रामीण परिसरात दोन दिवसात पाच चोर्‍या झाल्या आहेत. ओळकाईवाडी येथे शुक्रवारी रात्री एकाच ठिकाणी चार दुकानांचे शटर उचकटून चोरी केली आहे. सहा महिन्यापूर्वी असाच चोरांचा सुळसुळाट वाढल्याने नागरिकांना रात्र जागून काढण्याची वेळ आली होती.

लोणावळा परिसरात दिवसेंदिवस चोरीच्या घटना वाढू लागल्या आहेत. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून गस्त देखील वाढविण्यात आली असताना चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोणावळा शहरात मागील पाच दिवसात खंडाळा, तुंगार्ली, अंबरवाडी, बाजारपेठ, नौसेना बाग या ठिकाणी चोर्‍यांच्या सहा घटना घडल्या आहेत. तर ग्रामीणच्या हद्दीत मळवली सदापूर रोड व ओळकाईवाडी येथे पाच ठिकाणी चोर्‍या झाल्या आहेत. शहरातील चोर्‍या या बहुतांश प्रमाणात बंगले व हॉटेलमध्ये झालेल्या असल्याने या चोर्‍यांमागे काम करणारे कामगार यांचाच हात असल्याचा संशय असला तरी अद्याप चोर सापडलेले नाही.

ग्रामीण भागातील ओळकाईवाडी येथे चार दुकानांचे शटर उचकटण्याचा प्रकारामागे टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ओळकाईवाडी येथे शुक्रवारी रात्री चार दुकानांचे शटर उचकटून चोरी झालेल्या ठिकाणी पोलीस पथकाने पाहणी करून पंचनामा केला. सोशल मीडियावर ही बातमी वार्‍यासारखी पसरली नागरिकांनो सावधान असा मेसेज घटनेचे गांभीर्य वाढवत असताना चोरी झालेल्या दुकान व्यवसायिकांपैकी एकही दुकानदार तक्रार देण्यासाठी सायंकाळपर्यंत पोलीस ठाण्यात गेला नाही ही खरे तर शोकांतिका आहे.

मुद्देमाल गेला नसला तरी घटनेची नोंद होणे महत्वाचे

एखाद्या दुकानात अथवा घरात चोरी झाल्यानंतर मुद्देमाल कमी प्रमाणात गेला अथवा काहीच गेला नसला की नागरिक तक्रार देण्यास टाळाटाळ करतात काही प्रकरणात पोलीस देखील तक्रार दाखल करून घेत नाही. खरे तर असे करणे म्हणजे चोरी करणार्‍याला अभय देण्यासारखे आहे. याकरिता चोरी झाली व मुद्देमाल गेला नाही अथवा कमी प्रमाणात गेला, नुकसान झाले नसले तरी त्या घटनेची नोंद पोलीस रेकॉर्डवर होणे गरजेचे याकरिता संबंधितांनी पोलीस स्थानकात तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.

19 Aug 2017

पिंपरी-चिंचवड शहरातील घटना

एमपीसी न्यूज - युनायटेड किंग्डममध्ये वास्तव्यास असलेल्या एका व्यक्तीची पिंपरी-चिंचवड शहरातील थेरगावमधील एका युवतीशी फेसबुकद्वारे ओळख झाली. दरम्यान कालांतराने आरोपीने त्या युवतीला लग्नाचे आमिष दाखवले आणि तिच्याकडून 92 हजार रुपये घेतले आणि नंतर तिच्याशी संपर्क न करता फसवणूक केली.

रॉबर्ट नेलसन (रा.यु.के.), असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी थेरगाव येथील 25 वर्षीय युवतीने वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी आणि आरोपीची फेसबुकद्वारे ओळख झाली होती. ऑनलाईन चॅटींग करत असताना आरोपीने फिर्यादी युवतीला लग्न करण्याचे आमिष दाखवत सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पाठवतो, असे सांगितले. दरम्यान, एके दिवशी फिर्यादीला दिल्ली विमानतळावरून फोन आला आणि दागिने व रोख रक्कम सोडविण्यासाठी 92 हजार रुपये भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादीने ऑनलाईन पद्धतीने पैसे भरले, त्यानंतर आरोपीने तिच्याशी संपर्क न साधता तिची फसवणूक केली.

याप्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील पिंजन अधिक तपास करीत आहेत.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज- गाडी पार्क करीत असताना एका ज्येष्ठ नागरिकाला धक्का लागल्याने संतप्त झालेल्या काही तरुणांच्या टोळक्याने संबंधित तरुणाला जबर मारहाण करीत या ठिकाणी असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांची नासधूस केली. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जंगली महाराज मंदिरासमोर घडली.

दीक्षित असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव असून तो पोलीस कर्मचाऱ्याचा मुलगा असल्याचे समजते.

प्राथमिक माहितीनुसार, जंगली महाराज मंदिरासमोर दीक्षित आपली दुचाकी उभी करीत असताना त्याच्या गाडीचा धक्का एका ज्येष्ठ नागरिकाला बसला. त्याने ज्येष्ठ नागरिकांची माफी मागितली. मात्र तेथे उभ्या असलेल्या काही तरुणांनी दीक्षित याच्याशी वाद घालून त्याला हाताने, हेल्मेटने जबर मारहाण केली. या मारहाणीत दीक्षित जबर जखमी झाला.

त्यानंतर या टोळक्याने परिसरात दहशत माजवून येथे असलेल्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांकडे आपला मोर्चा वळवीत या गाड्यांची नासधूस केली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

याप्रकरणी तरुणाने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. या ठिकाणी वाहने उभी करण्यासाठी नेहमीच कसरत करावी लागते. शिवाय येथील खाऊगल्लीमुळे वाहतुकीची कोंडी नित्याची झाली आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज- पुणे शहरातील कॅम्प परिसरातील कयानी बेकरी शेजारी असलेल्या क्वालिटी रेस्टॉरंटला आज (19 ऑगस्ट) मोठी आग लागली. पहाटे चारच्या सुमारास ही आग लागली असून शॉर्टसर्किटने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अग्निशमनदलाच्या सहा फायरगाड्यानी आगीवर नियंत्रण मिळवले. परंतु या आगीत रेस्टॉरंट जळून भस्मसात झाले आहे. आतमध्ये असलेल्या कामगारांना वेळीच बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.

हे हॉटेल कॅम्प परिसरातील मुख्य रस्त्यावर आहे. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास अग्निशामकदलाला आग लागल्याचा कॉल होता. त्यानंतर अग्नीशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं असलं तरीही आग अद्याप धुमसत आहे. कँप परिसरातील हे सर्वात जुने रेस्टॉरंट होते.

Kwality 1

Page 1 of 65
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start