• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Aug 2017

पोलिसांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण पुणेचा अभिनव उपक्रम


एमपीसी न्यूज - निसर्गाने मानवाला विचार करण्याची अद्भूत शक्ती प्रदान केली आहे. ज्याप्रमाणे प्राणी दिवसभर खाल्लेल्या गोष्टी संध्याकाळी रवंथ करू शकतात, त्याप्रमाणे माणूस विचारांचे रवंथ करू शकतो. या भूतलावर माणूस असा एकमेव प्राणी आहे; जो विचारांचे रवंथ करू शकतो, असे हसायदान फाउंडेशनचे मकरंद टिल्लू म्हणाले.


कामाच्या व्यापामुळे पोलिसांना येणारा मानसिक ताण-तणाव दूर करण्यासाठी रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणच्या वतीने निगडी पोलिसांसाठी आर्ट ऑफ लाफिंग हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमात मकरंद टिल्लू निगडी पोलिसांशी संवाद साधत होते. यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त राम मांडुरके, निगडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पळसुले, वरिष्ठ अधिकारी खरगे, रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष विलास गावडे, सतीश आचार्य, प्रकल्पाधिकारी बहार शहा, वैजयंती आचार्य, बलबीर चावला, सुनील कुलकर्णी, कुलदीप मोकाशी, रफील जोस, गेविन अँथनी, अजय लंके आदी उपस्थित होते.

 

मकरंद टिल्लू पुढे म्हणाले की, माणसाचे जसजसे वय वाढायला लागते तसतसे माणसाचे हास्य कमी व्हायला लागते. ही माणसासाठी गंभीर बाब आहे. वयासोबत हास्य वाढायला हवे. दररोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनातील ताण-तणाव कमी करण्यासाठी हास्य हे एकमेव औषध आहे. हसण्याचे मानसिक, शारीरिक आणि बौद्धिक फायदे आहेत. तसेच सामाजिक फायदे देखील आहेत. चेह-यावरील तेज कायम ठेवण्यासाठी मन हलके होणे गरजेचे आहे आणि मन हलके होण्यासाठी हसणे आवश्यक आहे.

 

निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय पळसुले यांनी देखील आपल्या पोलीस सहका-यांशी यावेळी संवाद साधला. पळसुले म्हणाले की, दररोजच्या कामामुळे ताण येणे साहजिक आहे. परंतु कामाचा ताण घरी घेऊन जाऊ नये. कामाच्या ताणाचा परिणाम मनावर आणि शरीरावर होतो. त्यामुळे अवेळी येणा-या ताणाला वेळीच दूर करणे आवश्यक आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - च-होली परिसरातील चोविसावाडी व वडमुखवाडी येथील मंजूर विकास योजनेमधील रस्त्यांचे भूसंपादन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. भूसंपादन करण्यास पिंपरी पालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शनिवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

रस्ते भूसंपादनाच्या मान्य करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये मौजे चोविसावाडी येथील स.नं.102  ते स.नं.92 पासून स.नं. 91 पर्यंत चोविसावाडी हद्दीपर्यंत मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता भूसंपादन करणे. मोजे चोविसावाडी येथील स.नं.183 पासून स.नं. 195 चोविसावाडी हद्दीपर्यंत मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता भूसंपादन करणे.

मौजे वडमुखवाडी येथील स.नं.25 पासून ते स.नं. 55 पर्यंत वडमुखवाडी हद्द मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता भूसंपादन करणे यांचा समावेश आहे. तसेच मौजे वडमुखवाडी मधील स.नं. 217 पासून ते स.नं. 188 पर्यंत वडमुखवाडी हद्दीपर्यंत मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता भूसंपादन करणे. मौजे चोविसावाडी मधील स.नं. 30 पासून स.नं. 39 पर्यंत मंजूर विकास योजनेतील 24  मीटर व तेथून पुढे स.नं. 39 पर्यंत विकास योजनेतील 18 मीटर रस्त्याचे भूसंपादन करणे.

मौजे च-होली स.नं.227 ते स.नं. 198 पर्यंत 24 मीटर मंजूर विकास योजनेतील रस्ता भूसंपादन करणे. मौजे च-होली, स.नं. 192 ते स.नं. 87 पर्यंत 18 मीटर मंजूर विकास योजनेतील रस्ता भूसंपादन करणे. मौजे च-होली, कोतवालवाडी स.नं. 461 ते डी.वाय.पाटील शाळा च-होली हद्दीपर्यंत (स.नं.134) 30 मीटर विकास योजनेतील रस्ता भूसंपादन करणे. मौजे च-होली ताजणे मळा स.नं.430 च-होली गावापर्यंत 18 मीटर विकास योजनेतील रस्ता ताब्यात करणे. मौजे च-होली स.नं. 1013 ते स्मशानभूमीपासून जाणारा 18 मीटर विकास योजनेतील रस्ता स.नं. 8 पर्यंत भूसंपादन करणे.

मौजे च-होली स.नं. 1027 ते 1010 पर्यंत 30 मीटर व पुढे 12 मीटर विकास योजनेतील रस्त्याचे भूसंपादन करणे. मौजे     च-होली म्हसोबा मंदिर स.नं.519 ते स.नं. 475 कोतवालवाडीपर्यंत विकास योजनेतील 30 मीटर रस्ता भूसंपादन करणे. मौजे च-होली हिरामाता मंदिर स.नं. 43 ते स.नं.109 पर्यंत विकास योजनेतील 30 मीटर रस्ता भूसंपादन करणे. मौजे  च-होली मंजूर विकास योजनेतील आ.क्र. 2/64 उद्यान भूसंपादन करणे. मौजे डुडूळगांव येथील स.नं. 189 पासून स.नं. 191 पर्यंत 24 मीटर रस्ता भूसंपादन करणे यांचा समावेश आहे. भूसंपादन करण्याला सर्वसाधरण सभेत मंजुरी देण्यात आली.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - शहरातील 'स्वाईन फ्लू’ चा प्रादुर्भाव सतत वाढतच चालला असून यावर्षात आज (19 ऑगस्ट) रोजीपर्यंत पुणे शहरातील विविध रुग्णालयात 95 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर अद्यापही 29 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयात व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये पुणे शहरातील 28 तर पुण्याबाहेरील 67 नागरिकांचा समावेश आहे. स्वाईन फ्लूची लागण झालेल्या 60 रुग्णांवर शहरातील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर त्यातील 29 जणांची प्रकृती चिंताजनक झाल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे.

1 जानेवारीपासून आजपर्यंत शहरात तब्बल 5 लाख 33 हजार 138 जणांची स्वाईन फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 12 हजार 701 संशयितांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले आहे. तर आज दिवसभरात 3 हजार 286 रुग्णांची तपासणी करण्यात आली असून 187 जणांना टॅमी फ्लूचे औषध देण्यात आले आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेऊन सर्दी व खोकला असेल, तर तातडीने सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावेत, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज -  पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात होत असलेला मेट्रो प्रकल्प हा पुणे शहराबरोबरच राज्यासाठी देखील महत्त्वाचा प्रकल्प असून तो पूर्ण करण्यासाठी एकत्रितपणे काम करीत महामेट्रोला सर्वोतोपरी मदत करू, असे आश्वासन जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी शनिवारी दिले.

महामेट्रोच्या घोले रस्त्यावरील महात्मा फुले संग्रहालयातील प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन बापट यांच्या हस्ते आज (शनिवार) करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित, कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम्, सल्लागार शशिकांत लिमये आदी यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले संग्रहालयातील महामेट्रोच्या कार्यालयाची ही जागा सुमारे अडीच हजार चौरस फुट इतकी असून या ठिकाणाहून महामेट्रोचे प्रशासकीय काम चालणार आहे.

उद्घाटन प्रसंगी बोलताना गिरीश बापट म्हणाले की, मेट्रो, रिंगरोड आणि राष्ट्रीय महामार्ग हे प्रकल्प पुण्याच्या भविष्यासाठी महत्वाचे आहेत. त्यामुळे ते वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी आमची असून यासाठी कोणतीही अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. याबरोबरच आता मेट्रोचे कार्यालय शहराच्या मध्यवर्ती भागात असल्याने सर्वांसाठी सोयीचे होणार आहे. इतकी वर्षे प्रतीक्षेत असलेली मेट्रो आता अखेर पुण्यात येत आहे याचा आम्हाला आनंद असून मेट्रोमधून प्रवास करण्यास आम्ही उत्सुक आहोत.

नागपूर मेट्रो नंतर पुणे मेट्रोची जबाबदारी पडल्यानंतर प्रत्येक टप्प्यावर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गिरीश बापट यांचा सल्ला आमच्यासाठी महत्त्वाचा ठरला आहे. त्यांच्याच प्रयत्नाने आम्हाला शहराच्या मध्यवर्ती भागात कार्यालयासाठी जागा मिळू शकली. त्यांचे सहकार्य असेच कायम राहील, अशी आम्ही आशा करतो, असे डॉ. ब्रिजेश दीक्षित यावेळी सांगितले.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - केंद्रीय संरक्षण विभागाने देशभरातील मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. निर्णयाची झळ पिंपरी येथील मिलिटरी डेअरी फार्मला देखील बसणार आहे. हजारो गायी देशभरातील डेअरी फार्ममध्ये आहेत. डेअरी फार्म बंद झाल्याने गायीचे भवितव्य धोक्यात आले आहे. तसेच डेअरी फार्ममध्ये हजारो कामगार कार्यरत आहेत. फार्म बंद झाल्याने त्यांच्यावर देखील आर्थिक संकट येणार असल्याने येत्या बुधवार (दि. 23) रोजी खडकी-पिंपरी सिव्हिलियन एम्प्लॉईज मिलिटरी फार्म ट्रेड युनियनच्या वतीने केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी रॅली व धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.

मिलिटरी फार्म कोअर ही संस्था ब्रिटिश सरकारने 1889 मध्ये सुरू केली. भारतात एकूण 39 मिलिटरी डेअरी फार्म आहेत. त्यामध्ये एकूण 25 हजार पेक्षा अधिक संकरित गायी असून चार हजार पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. महाराष्ट्रात अहमदनगर, नाशिक (देवळाली) आणि पिंपरी येथे मिलिटरी डेअरी फार्म आहेत. त्यातील एकट्या पिंपरी डेअरी फार्ममध्ये 2 हजार संकरित गायी असून दररोज सात हजार लिटर दूध संकलन होत आहे.

डेअरी फार्म मधून भारतीय सेनेला दूध, दुधाचे पदार्थ तसेच सीमेवर काम करणा-या घोडे व खाचरांसाठी चारा तयार करून पुरविण्यात येतो. मिलिटरी फार्म बंद झाले तर 25 हजार पेक्षा अधिक साहिवाल व फ्रिजवाल जातीच्या गायींचे भविष्य अडचणीत आले आहे. देशातील मिलिटरी फार्ममध्ये तात्पुरत्या स्वरूपातील चार हजार पेक्षा अधिक मजूर प्रत्यक्षरित्या तर 12 हजार पेक्षा अधिक लोक अप्रत्यक्षरीत्या बेरोजगार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्राने मिलिटरी डेअरी फार्म बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - हिंजवडी येथील भूमकर चौकातील उड्डाण पुलावर नवीन बस थांबा केल्याने वाहतूक कोंडी होत आहे. तसेच खासगी बस व रिक्षा, टॅक्सी देखील थांबू लागल्या आहेत. त्यामुळे अपघाताची शक्यता वाढत आहे.

कात्रज-देहूरोड बाह्यवळण रस्ता हिंजवडी पुलाजवळील भूमकर चौकातील सेवा रस्त्यावर (सर्व्हिस रोड) असणारा पुणे-मुंबई-पुणे एसटी बस थांबा पहिल्या जागेवरून मुख्य रस्त्यावर स्थलांतरित करण्यात आला आहे. नवीन झालेल्या थांब्यामुळे पुलाच्या सुरुवातीलाच एसटीच्या शिवनेरी, हिरकणी तसेच लाल डबा असणा-या बस थांबत आहेत. सोबतच खासगी मोटारी, टॅक्सीजदेखील अनधिकृतपणे थांबू लागल्या आहेत. परिणामी वाहतुकीची प्रचंड कोंडी होत आहे.

प्रशासनाने त्वरित याची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी पुणे-मुंबई नियमित प्रवास करणा-या प्रवाशांनी आणि परिसरातील नोकरदार, कर्मचा-यांनी केली आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - जागतिक छायाचित्रदिनाचे औचित्य साधून छायाचित्रण छंद म्हणून जोपासलेल्या अथवा व्यवसाय म्हणून स्वीकारलेल्या सर्वांना योग्य मार्गदर्शन मिळण्यासाठी पिक्सलेन्ट या भारतातील पहिल्या संकेतस्थळाची सुरुवात पुण्यात करण्यात आली. या संकेतस्थळामुळे छायाचित्रण कलेमध्ये जास्तीत जास्त आकर्षकता आणि सफाई आणण्याबरोबरच प्रख्यात छायाचित्रकारांकडून या विषयी मार्गदर्शन मिळवण्याची संधी सहज शक्य झाली आहे.

पुण्यातील डॉ. यशोधन जोशी यांच्या संकल्पनेतून pixlent.com या संकेतस्थळाची निर्मिती झाली असून वारी हॉस्पिटॅलिटीतर्फे जागतिक छायाचित्रण दिनाचे औचित्य साधून सुमंत मुळगांवकर सभागृहात या संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. ‘लँडस्केप’ छायाचित्रणातील तज्ज्ञ ललित देशमुख यांच्या हस्ते संकेतस्थळाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी संकेतस्थळावर मार्गदर्शन करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेले सुप्रसिद्ध छायाचित्रकार ललित देशमुख, समीर बेलवलकर, रितेश रमैय्या, विनोद बारटक्के, सुशील चिकणे, सागर गोसावी, सतीश पाकणीकर, रॉबिन सैनी आणि विक्रम पोतदार हे उपस्थित होते.

डॉ. यशोधन जोशी संकेतस्थळाविषयी माहिती देताना म्हणाले की, www.pixlent.com या वेबसाईटवर नोंदणी केल्यानंतर फोटोग्राफरने काढलेले पाच फोटो त्याला या वेबसाईटवर ‘अपलोड’ करता येतील. ‘अपलोड’ करण्यात आलेल्या फोटोच्या अनुषंगाने तज्ज्ञ छायाचित्रकार त्या फोटोमधील त्रुटी, चांगल्या गोष्टी, काय सुधारणा करता येतील आणि इतर गोष्टींबद्दल सविस्तर मार्गदर्शन फोटोग्राफरला करतील. ‘रिव्ह्यू’ करण्यासाठी फोटो पाठविणा-या फोटोग्राफर्सचे तीन गट करण्यात आले आहेत. ‘बेसिक’, ‘अॅडव्हान्स्ड’ आणि ‘एक्स्पर्ट’ अशा तीन गटानुसार फोटोग्राफर्सची विभागणी करण्यात येईल आणि त्यांच्या फोटोची चर्चा केली जाईल. तज्ज्ञांनी व्यक्त केलेले मत पूर्णतः गुप्त राखण्यात येणार असून फक्त छायाचित्र अपलोड करणा-या व्यक्तिसच ते दिसू शकेल. तांत्रिकदृष्ट्या उत्तम फोटोंना 'बेस्टी' विभागात स्थान मिळेल जे या संकेतस्थळाला भेट देणा-या प्रत्येक व्यक्तीस दिसू शकेल.

पिक्सलेन्टवर नियुक्त करण्यात आलेल्या छायाचित्रकारांबरोबर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. प्रशांत देसाई यांनी उत्तम छायाचित्र कसे मिळवावे आणि छायाचित्रास उत्तमरित्या सादर कसे करावे या विषयांवर तज्ज्ञांशी संवाद साधला. पिक्सलेन्टचे सल्लागार ललित देशमुख आणि फॅशन फोटोग्राफर समीर बेलवलकर यांनी पिक्सलेन्ट संकेतस्थळावर अपलोड करण्यात आलेल्या काही छायाचित्रांचे परीक्षण करून त्यातल्या त्रुटी काय आहेत यावर अभिप्राय दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तेजश्री धारणे यांनी केले. समीर बेलवलकर यांनी आभार मानले.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुण्याकडून दौंड आणि बारामतीकडे सहा पॅसेंजर गाड्या धावतात. दिवसेंदिवस या मार्गावर प्रवास करणा-या प्रवाशांची संख्या देखील वाढत आहे. या मार्गावर धावणा-या पॅसेंजर रेल्वेच्या गाडी क्रमांकामध्ये रविवार (दि. 20 ऑगस्ट) पासून बदल करण्यात आले आहेत. नवीन नंबर खालीलप्रमाणे -

 

जुने नंबर

पासून

पर्यंत

नवीन नंबर 

 (20.08.2017 पासून)

51323

दौंड

बारामती

71401

51324

बारामती

पुणे

71402

51325

पुणे

दौंड

71403

51326

बारामती

पुणे

71404

51327

दौंड

बारामती

71405

51353

पुणे

दौंड

71411

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट वस्तीतून न देता पर्यायी मार्गाने वळविण्याची मागणी घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी नगरविकास विभागाचे राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्याकडे केली.

घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी (दि.18) मुंबईत नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांची भेट घेऊन रिंगरोड बाधितांना न्याय देण्याची मागणी केली. या शिष्टमंडळात संघर्ष समितीचे विजय पाटील, रेखा भोळे, रजनी पाटील, नारायण चिघळीकर आदी सहभागी झाले होते.

पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणी पर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामवर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

घर बचाव संघर्ष समितीच्या पदाधिका-यांनी मुंबईत नगरविकास राज्यमंत्री पाटील यांची भेट घेऊन रिंगरोड पर्यायी मार्गाने वळविण्याचे एक निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, प्रस्तावित रिंगरोड पिंपरी पालिका व प्राधिकरणाच्या हद्दीतून जात आहे. वाल्हेकरवाडी, रावेत, बिजलीनगर, चिंचवडेनगर, थेरगाव, पिंपळेगुरव, रहाटणी, कासारवाडी या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून हा रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे हा प्रस्तावित रिंगरोड दाट लोकवस्तीतून न नेता, पर्यायी मार्गाने वळवावा आणि बाधित नागरिकांना न्याय द्यावा, अशी मागणी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने केली आहे.

Ringroad 1

Ringroad 2

19 Aug 2017

राष्ट्रीय श्रमिक आघाडीने कंपनीच्या सुरक्षा रक्षकांकडून बळजबरीने लेखी आश्वासन लिहून घेतले

एमपीसी न्यूज - अल्फा लावल कंपनीतील कंत्राटी कामगारांबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे लेखी आश्वासन देऊनही कंपनीने ते पाळले नसल्याचा राष्ट्रीय श्रमिक आघाडीने केलेला आरोप खोटा व पूर्णतः दिशाभूल करणारा आहे. कंपनीतील कंत्राटी कामगारांसबंधीचा वाद सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे असे कोणतेही आश्वासन देण्याचा प्रश्नच उद्भवत नसून कंपनीने कंत्राटी कामगारांबाबत कोणतेही आश्वासन राष्ट्रीय श्रमिक आघाडीला दिलेले नाही, असे खुलासा अल्फा लावल कंपनीने केला आहे.

याबाबत कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, राष्ट्रीय श्रमिक आघाडी ज्या काही कंत्राटी कामगारांचे प्रतिनिधित्व करते ते अल्फा लावल कंपनीचे कर्मचारी नाहीत. ते संबंधित कंत्राटदारांचे कर्मचारी आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे मुद्दे अल्फा लावलकडे न आणता थेट संबंधित कंत्राटदारांकडे न्यावेत, अशी कंपनीची भूमिका आहे. राष्ट्रीय श्रमिक आघाडी कंपनीच्या कर्मचा-यांचे प्रतिनिधित्व करीत नाही. कंपनीमध्ये एक अधिकृत मान्यता असलेली कर्मचारी संघटना आहे. कंत्राटी कामगार या संघटनेचे सदस्य नाहीत. कंपनीने कंत्राटदारांच्या सेवा पूर्णतः कायद्याच्या चौकटीत राहूनच घेतल्या आहेत.

या कंत्राटी कामगारांचा मुद्दाच न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे कंत्राटी कामगार तीन ऑगस्ट रोजी कंपनीच्या दापोडी येथील कारखान्यामध्ये कामावर रूजू होण्यासाठी आले होते हा, श्रमिक आघाडीचा दावा चुकीचा आहे. कंत्राटी कामगारांना कंपनीच्या सेवेत परत घेण्यात यावे अशा आशयाची मागणी करणारे एक निवेदन राष्ट्रीय श्रमिक आघाडीने तीन ऑगस्ट रोजी कंपनीला दिले होते. हे पत्र कंपनीच्या सुरक्षा कर्मचा-याने स्वीकारले. मात्र या पत्रावर असलेला ‘ कंपनी या मुद्द्यावर सकारात्मक बैठक घेईल’ असा पोचपावतीवजा शेरा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या नेत्यांनी सुरक्षा कर्मचा-यांकडून बळजबरीने लिहून घेतला आहे, असे कंपनीने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.-

Page 8 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start