• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
20 Aug 2017

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात काल (शनिवारी) रात्रीपासूनच संततधार पावसाला सुरुवात झाली असून आज सकाळी पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. पावसाच्या या कम बॅकने नागरिक सुखावले आहेत.

गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली होती. त्यामुळे जूनमध्ये पडलेला पाऊसही अपुरा वाटत होता. मात्र, मागील 24 तासात पावसाने ही कमी भरून काढली आहे. पवना परिसरातही सकाळी सहा वाजेपर्यंत 22 मिमी पावसाची नोंद झाली आहे तर पुणे व पिंपरी-चिंचवड परिसरताही सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. आज रविवार असल्यामुळे नागरिक सकाळपासूनच पावसाचा आनंद लुटत आहेत. त्यात अवघ्या पाच दिवसावर गणरायाचे आगमन आल्यामुळे गणरायाच पाऊस घेऊन आला अशी भावनाही नागरिक व्यक्त करत आहेत.

तर मावळातही माना टाकलेल्या पिकांनी पुन्हा उभारी घेतली असून मावळातील बळीराजाही सुखावला आहे. पावसाच्या या कम बॅकमुळे सर्वांनाच सुखद धक्का दिला आहे. त्यात पुणे वेधशाळेचा अंदाज हा अचुक ठरला असून येत्या 25 ऑगस्टपर्यंत परिसरात हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडणार असल्याचेही हवामान विभागाने सांगितले आहे. त्यामुळे धरण जरी काठोकाठ भरले असले तरी पाऊस हवाच म्हणणा-या बळीराजाची इच्छा पावसाने पूर्ण केली आहे.

तर शहर परिसरात पडत्या पावसात नागरिक गणरायाच्या आगमनाच्या तयारीसाठी बाजारपेठेत अगदी आनंदाने खरेदी करत आहेत.
Rain 1
Rain 2
Rain 3
Rain 4
Rain 5
Rain 7
Rain 12
Rain 10
Rain 8
 MG 6941 copy
 MG 6957 copy
 MG 6974 copy
 MG 6991 copy


20 Aug 2017

एमपीसी न्यूज - शतकोत्तर रौप्य गणेशउत्सवानिमित्त पुणे महापालिका आयोजित दुचाकी रॅलीमध्ये किमान 1000 दुचाकी सहभागी होतील, असे महापौर मुक्त टिळक यांनी सांगितले होते. मात्र, या दुचाकी रॅलीत फक्त 100 दुचाकी सहभागी झाल्याने  अक्षरशः या दुचाकी रॅलीचा चांगलाच फज्जा उडाला आहे. भाजपचे पुणे महापालिकेत 98 नगरसेवक असताना अवघे 5 ते 6 नगरसेवक रॅलीसाठी उपस्थित राहिले. तर उपमहापौर तसेच विरोधी पक्षानेत्यासह आयुक्तही अनुपस्थितीत होते.

यंदाचे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 125 वे वर्ष असून यानिमित्त महिना भर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यातील एक भाग म्हणून आज दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीची सुरुवात सकाळी आठ वाजता महापालिका भवनापासून होणार होती. मात्र, अल्प प्रतिसादामुळे ही रॅली 9.00 वाजता सुरू करण्यात आली. ती शनिवारवाडा ते कसबा गणपती, दगडूशेठ हलवाई गणपती चौक, मंडई त्यानंतर पुढे शिवाजी रस्त्याने, स्वारगेट ते सारसबाग, अभिनव चौक ते अलका टॉकीज, शास्त्री रोड, सेनादत्त पोलीस चौक, म्हात्रे पूल, कर्वे रोड, डेक्कन, खंडोजी बाबा चौक, गुडलक चौक, एफ सी रोड, झाशीची राणी चौक ते ओंकारेश्वर, वर्तकबाग आणि रमणबाग येथे रॅली संपणार होती. मात्र, तेथील मैदानावर पावसामुळे चिखल झाल्याने केसरी वाडा येथे याची सांगता झाली.

जवळपास 1000 जण या दुचाकी रॅलीत सहभागी होणार होते. तसेच जास्तीत जास्त लोकांनी या रॅलीत सहभागी व्हावे, असे आवाहनही महापौरांनी केले होते. मात्र, आज प्रत्यक्षात केवळ 100 दुचाकी रॅलीत सहभागी झाल्याने या रॅलीचा चांगलाच फज्जा उडाला. परिणामी गर्दी कमी असल्याने बापटसाहेबही रॅलीला झेंडा न दाखविताच निघून गेले. त्यामुळे महापौर मुक्ता टिळक यांच्या हस्ते रॅलीचे उद्घाटन करावे लागले. या रॅलीला येणाऱ्या प्रत्येकासाठी नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे एक हजार लोकांचा ना मागवण्यात आला होता. परंतु केवळ 100 जण सहभागी झाल्याने राहिलेला  नाश्ता वाया जाऊ नये म्हणून त्याचे गरीबांना वाटप करण्यात येणार आहे, असे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले.

rally 2

rally 1

rally

20 Aug 2017

एमपीसी न्यूज - डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांना अद्याप शिक्षा झालेली नाही याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने आज भर पावसात जवाब दो रॅली काढण्यात आली. 

अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज चार वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना शिक्षा झालेली नाही. तसेच सर्व तपास अत्यंत संथ गतीने होत आहे. याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येत आहे. 20 ऑगस्ट 2013 साली पुण्यात दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांची हत्या केली होती.

नरेंद्र दाभोलकर यांच्यावरील पोवाडा व जोशपूर्ण गीतातून डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना अभिवादन करून विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून रॅलीला सुरुवात करण्यात आली. ही रॅली महापालिकाभवन, शनिवारवाडा, शिवाजी रोड, लक्ष्मी रोड, अलका चौक, दांडेकर पूल या मार्गे निघणार असून पर्वती येथील साने गुरुजी स्मारकाजवळ रॅलीची सांगता होणार आहे. याठिकाणी संपूर्ण दिवस अंनिसच्या वतीने विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहे. हिंसा के खिलाफ मानवता की और हा कार्यक्रम होणार आहे. 

तसेच सकाळी अकरा वाजता जावेद अख्तर आणि डॉ. शैला दाभोळकर, राजदीप सरदेसाई आणि अविनाश पाटील यांची व्याख्याने होणार आहेत. तर हिंसा के खिलाफ मानवता की और या कार्यक्रमाचे मनस्विनी लता रवींद्र, विजय केंकरे, किशोर कदम यांचे सादरीकरण होईल. तर झी मराठी फेम अरविंद जगताप यांच्या कार्यक्रमाचे सायंकाळी सव्वाचार वाजता सादरीकरण होणार आहे.

सायंकाळी पाच वाजता दाभोळकर व पानसरे कुटूंबीय कार्यक्रमाचा समारोप करतील.  
Dablokar rally 1
Dablokar rally 2
Dablokar rally 4
Dablokar rally 8
Dablokar rally 9
Dablokar rally 7


 

19 Aug 2017

पुणे पोलिसांच्या मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

एमपीसी न्यूज - पुणे-मुंबई यांसारख्या मोठ्या शहरात वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे. ही समस्या सोडविण्यासाठी आम्ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर भर दिला पाहिजे. तसेच नियमभंग केल्याबद्दल नागरिकांकडून दंड वसुलीचा आकडा वाढण्याऐवजी त्यांच्यामध्ये स्वयंशिस्त वाढावी. आपल्याला कोणीतरी पाहत आहे, याची जाणीव असल्यास नागरिक शिस्त पाळतील, असे मत राज्याचे पोलीस महासंचालक सतिश माथूर यांनी व्यक्त केले.

पुणे पोलिसांच्या मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सतिश माथूर यांच्या हस्ते शनिवारी झाले. यावेळी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी पुणे पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला, सह पोलीस आयुक्त रवींद्र कदम, रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेरचे अभय गाडगीळ, फोक्सवॅगनचे डॉ. अँड्रीसन लौरेमन यांच्या वतीने भारतातील सुरक्षा प्रमुख टॉर्स्टन स्टार्क, वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे, तसेच वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. फोक्सवॅगन इंडिया प्रा.लि. कंपनी व रोटरी क्लब ऑफ पुणे बाणेर यांच्या संयुक्त विद्यामाने मध्यवर्ती वाहतूक व्यवस्थापन केंद्राची नूतन इमारत उभारण्यात आली असून, त्यासाठी 55 लाख रुपये खर्च आला आहे. 

खिशाला झळ बसल्यावरच नागरिक नियमांचे पालन करतात. यावेळी माथूर यांनी सांगितले. तर, आम्ही एकत्रित येऊन, पुणे शहराला जे शक्य आहे ते देण्याचा प्रयत्न करत असल्याचे यावेळी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी सांगितले.

या नूतन वाहतूक व्यवस्थापन केंद्राच्या इमारतीमध्ये सीसीटीव्ही, वायरलेस, कंट्रोल तसेच इ-चलनचे कामकाज चालणार आहे. मार्च 2017 पासून वाहतूक पोलिसांनी इचलनच्या माध्यामातून 3 लाख केसेस केल्या असून, 40 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - वाल्हेकरवाडी, चिंचवडगाव, थेरगाव, पिंपळेगुरव या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरातून प्रस्तावित रिंगरोड जाणार आहे. यामुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. लोकांच्या घरावर बुलडोझर फिरवून नवे रस्ते करण्याची गरज नाही. सत्ताधा-यांनी निवडणुकीत घरांची वीट देखील हलू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्या आश्वसनांचे सत्ताधा-यांनी आता पालन करावे. रिंगरोड रद्द करावा किंवा पर्यायी मार्गाने वळवावा, असा एकमुखी ठराव करून सरकारकडे पाठवावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नगरसेवकांनी केली. मात्र, सत्ताधारी भाजपने ठराव न करता महापौरांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती गठीत करण्याचा निर्णय घेऊन पळवाट शोधली. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. 

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शनिवारी) पार पडली. विषय पत्रिकेवरील विषय सभा संपल्यानंतर सर्वपक्षीय नगरसेवकांनी रिंगरोडवर चर्चा केली. अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

पिंपरी महापालिका आणि प्राधिकरणाच्या मंजूर विकास आराखड्यानुसार 30 मीटर रुंद एचसीएमटीआरचा 65 टक्के जागेचा ताबा असून उर्वरीत जागा ताब्यात घेण्याबाबत पालिका व प्राधिकरणामार्फत कारवाई करण्यात येणार आहे. वाल्हेकरवाडी ते रहाटणीपर्यंतच्या प्राधिकरणाच्या नियोजन क्षेत्रातील एचसीएमटीआर रस्त्याच्या आरक्षित जागेवरील अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. यामुळे हजारो नागरिक बेघर होणार आहेत. या कारवाईला विरोध करत रिंगरोड बाधित नागरिक गेल्या दोन महिन्यांपासून सनदशीर मार्गाने आंदोलन करत आहेत.

चर्चेला सुरुवात करताना नगरसेवक अभिषेक बारणे म्हणाले की, रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे या विषयावर कोणीही राजकारण न करता रिंगरोड बाधित नागरिकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करावेत. सचिन चिखले म्हणाले, शहरात विकास झाला पाहिजे. मात्र, गोरगरीब नागरिकांच्या घरावर बुलडोझर फिरवून विकास नको आहे. निलेश बारणे म्हणाले, रिंगरोडमुळे दीड ते दोन हजार घरे पाडली जाणार आहेत. नागरिकांनी पै-पै करून घरे बांधली आहेत. सभागृहाने ठरवले तर रिंगरोड पर्यायी मार्गाने वळविला जावू शकतो.

भाऊसाहेब भोईर म्हणाले की, रिंगरोड शहरावर आलेले संकट आहे. त्याचे कोणीही राजकीय भांडवल करू नये. मानवतेच्या नात्याने सर्वांनी एकत्र यावे. रिंगरोडमध्ये बदल होऊ शकतो. त्यासाठी मानसिकता हवी. रिंगरोड रद्द करण्याचा एक ठराव करून राज्य सरकारकडे पाठवावा. अपर्णा डोके म्हणाल्या, प्राधिकरण प्रशासनाच्या चुकीमुळे रिंगरोडचा प्रश्न उद्‌भवला आहे. या रिंगरोडमुळे हजारो कुटुंबे बेघर होणार आहेत. जिथे रस्त्याची गरज आहे तिथे मिळत नाहीत आणि जो नको आहे तो केला जात आहे. हा मोठा विरोधाभास आहे. नागरिकांची घरे वाचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

मंगला कदम म्हणाल्या की, प्राधिकरणाने घरांवर कारवाई करताना कोणताही विचार केला नाही. घरात कोणी नसताना सुद्धा कारवाई केली आहे. घरातील साहित्य देखील बाहेर काढू दिले गेले नाही. पवना नदीतून जसे रक्तरंजित पाणी नको आहे. तसाच नागरिकांची घरे पाडून रिंगरोड नको आहे. रिंगरोडला राष्ट्रवादीचा प्रखर विरोध असणार आहे.

डॉ. वैशाली घोडेकर म्हणाल्या की, रिंगरोड रद्द करण्याचा पालिकेने पाठविलेला प्रस्ताव राज्य सरकार मान्य करणार आहे का? हा विचार करणे गरजेचे आहे. त्यामुळे एखदा प्रस्ताव पाठवून बाधित नागरिकांना खोटे आश्वासन देण्यात येऊ नये. सरकार मान्य करू शकतो असाच प्रस्ताव करून राज्य सरकारकडे पाठविण्यात यावा.

अजित गव्हाणे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड शहराच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने घरांचा प्रश्न आहे. पै-पै करून नागरिकांनी घरे बांधली आहेत. त्यामुळे रिंगरोड, अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. एकमेकांची उणीदुणी काढत बसणे चांगले नाही.

सचिन भोसले म्हणाले की, निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराच्या विटेलाही हात लावू देणार नाही, असे आश्वासन शहरातील जनतेला दिले होते. आता मात्र त्यांना त्याचा विसर पडल्याचे दिसून येत आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी रिंगरोड बाधित नागरिकांचे साधे निवेदन देखील स्वीकारले नाही. याउलट न्याय मागायला आलेल्या नागरिकांवर लाठीमार केला. बाधित नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे देण्याचे आश्वासन दिले जात आहे. मात्र, त्यातील घरे देण्याचा अधिकार पालिकेला आहे का? असा प्रश्न उपस्थित करून ते म्हणाले नागरिकांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल करू नका.

विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की, पालिकेचा विकास आरखाडा 1995 साली मंजूर झाला आहे. त्याला 20 वर्ष पूर्ण झाली असून हा आराखडा कालबाह्य झाला आहे. त्यामुळे हा रिंगरोड कायद्याने रद्द होऊ शकतो. महाराष्ट्र प्रादेशिक नगररचना अधिनियमानुसार 10 वर्षाच्या आतमध्ये आरक्षण ताब्यात न घेतल्यास ते रद्द होण्याची तरतूद आहे. त्यामुळे रिंगरोड रद्द करावा, अशी सूचना त्यांनी केली. नगरसेवक दत्ता साने, करुणा चिंचवडे, माया बारणे, झामाबाई बारणे, नामदेव ढाके यांनी या चर्चेत भाग घेतला.

त्यानंतर सत्ताधारी भाजपच्या पदाधिका-यांनी महापौर नितीन काळजे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वपक्षीय समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. या समितीत विरोधी पक्षनेते, स्थायी समिती अध्यक्ष आणि सर्वपक्षांचे गटनेते असणार आहेत. ही समिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन रिंगरोड बाबत चर्चा करणार आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने करण्यात आलेल्या 3 ऑगस्ट रोजीच्या आंदोलनावेळी अल्फा लावल कंपनीचे अधिकारी हृषीकेश विस्तूरीकर यांनी कंपनीचे एच आर हेड बाहेर देशात असल्याचे कारण सांगत आघाडीच्या निवेदनावर सही केली. तसेच सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. दिलेल्या वेळेत चर्चा केली नाही, यासाठी पुन्हा 17 ऑगस्ट रोजी आंदोलन करण्यात आले, असा दावा राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने करण्यात आला आहे.

कंपनीचे एच आर हेड कंपनीत नाहीत, बाहेर देशात गेले आहेत. ते 8 ते 10 दिवसात येतील; आल्यानंतर संघटनेशी संपर्क करण्यात येईल तसेच सकारात्मक चर्चेसाठी बैठक देखील घेण्यात येईल, असे हस्तलिखित कंपनीचे अधिकारी हृषीकेश विस्तूरीकर यांनी दिले. त्यानुसार कंपनी प्रशासनाने संघटनेसोबत कोणत्याही प्रकारची बैठक घेतली नाही अथवा सकारात्मक निर्णय देखील घेतला नाही. त्यामुळेच 17 ऑगस्ट रोजी पुन्हा आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार कंपनीपासून 500 मीटर दूर अंतरावर आंदोलन केले. तसेच कंपनी प्रशासनाकडे कोणत्याही प्रकारची बैठक झाली नसल्याचे निवेदन देखील पोलिसांच्या बंदोबस्तात देण्यात आले. कंपनीच्या वतीने माध्यमांना चुकीची माहिती दिल्याने आता कंपनीच्या प्रतिमेचा सवाल उभा राहिला आहे. हा प्रकार लक्षात घेता कंपनीने अचानक काढलेल्या 402 कामगारांना पुन्हा कामावर घ्यावे, असे राष्ट्रीय श्रमिक आघाडीकडून सांगण्यात आले आहे.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच सामाजिक विकासाचे भान मिळावे याकरिता निगडी ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघातर्फे शाळेच्या परिसरात वाचन कट्टा सुरू केला आहे. हा वाचन कट्टा सर्वांसाठी खुला असून ज्ञानप्रबोधिनी शाळा व निगडी परिसरातील नागरिक, पालक व विद्यार्थी या वाचन कट्ट्यावर येऊ शकणार आहेत.

मुलांना दररोज ओरडून ओरडून अभ्यासाला बसवावे लागते. काही घरात मारण्याचा सपाटा देखील सुरू असतो. प्रत्येक पालकांना वाटते की आपल्या मुलाने किंवा मुलीने खूप अभ्यास करावा आणि भरपूर प्रगती करावी. पण त्यासाठी केवळ रागावून किंवा मारून मुलांना अभ्यासाला बसवून ती अभ्यास करणार नाहीत. तर त्यासाठी घरातच तसे वातावरण तयार करायला हवे, हा उपाय निगडीतील पालकांनी चांगलाच ओळखला आहे.

निगडी ज्ञानप्रबोधिनी पालक महासंघातील उत्साही पालकांनी एकत्र येऊन वाचन कट्टा सुरू केला आहे. या वाचन कट्ट्यावर सर्व पालक आणि परिसरातील उत्साही नागरिक प्रत्येक महिन्याच्या चौथ्या शनिवारी सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत एकत्र येऊन महिनाभर केलेल्या वाचनाचा अभिप्राय सर्वांसमोर मांडणार आहेत. या उपक्रमामुळे वैचारिक क्षमता वाढीस लागेल आणि हा वारसा आपल्या पाल्यांना देता येईल एवढाच यामागचा उदात्त हेतू आहे.

पालकांकडे बघून मुले देखील वाचनाकडे वळतील आणि वाचनाची गोडी त्यांच्यामध्ये देखील निर्माण होईल. उद्याचा आदर्श समाज निर्माण करण्यासाठी हा उपक्रम म्हणजे एक सक्षम पाऊल ठरले आहे.

19 Aug 2017

आयुक्तसाहेब ठसा पाडण्यासारखे काम करा; कोणाच्या दबावाखाली काम करू नका

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे आत्ताच पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. त्यासाठी पवना बंद जलवाहिनी प्रकल्प मार्गी लागणे गरजेचे आहे. तसेच पाण्याचा इतरही स्रोत वाढविण्यासाठी भामा आसखेड धरणातून पाणी आणण्याचे नियोजन करावे. पाण्याची होणारी गळती, चोरी यावर नियंत्रण ठेवून अनधिकृत घरांनाही अधिकृत नळ कनेक्शन द्यावेत. यातून पालिकेचे उत्पन्नही वाढेल, अशी मागणी सर्व पक्षीय नगरसेवकांनी महासभेत केली. तसेच आयुक्तसाहेब छाप पाडण्यासारखे काम करा. कोणाच्या दबावाखाली काम करू नका, अशा सूचनाही नगरसेवकांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांना केल्या.

सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते. या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी शहरातील पाणी पुरवठा संदर्भात प्रश्न विचारले होते. यावर तब्बल सव्वा दोन तास ऊहापोह झाला.

पिंपरी शहराची लोकसंख्या 22 लाख असताना नळ कनेक्शन 1 लाख 45 हजार आहेत. त्या तुलनेत नळ कनेक्शन वाढत नाहीत. पवना धरणातून दररोज 500 एमएलडी पाणी उचलते जाते. परंतु 30 ते 40 टक्के पाणी गळती, चोरी होते. याकडे भाऊसाहेब भोईर यांनी सभागृहाचे लक्ष वेधले. पवना बंद जलवाहिनी मार्गी लागल्यास दिवसाला 1 टीएमसी पाणी वाचेल, असे भोईर म्हणाले.

सर्जिकल स्ट्राईक्स सारखा आयुक्तांनी हर्डीकर स्ट्राईक करावा. तीन वर्षांनी आपली बदली होईल. आपण शहर सोडून दुस-या शहरात जाताल. त्यामुळे ठसा उमटविणारे शहरात काम करा. कोणाच्या दबावाखाली काम करू नका. तत्कालीन आयुक्त डॉ. श्रीकर परदेशी यांच्यासारखे काम करा अशा सूचनाही भोईर यांनी आयुक्त हर्डीकर यांना केल्या. तसेच पाण्याचे नियोजन करण्यासाठी सर्वपक्षीयांची 'जलसमिती' तयार करण्याची मागणीही त्यांनी केली.

दत्ता साने म्हणाले की, भोईर यांनी विचारलेल्या प्रश्नांवर संबंधित अधिका-याने चुकीची उत्तरे दिली असून त्यांचा मी निषेध करतो. शहरात पाण्याच्या 85 टाक्या आहेत. परंतु, अनेक ठिकाणी पाण्याची समस्या जाणवते, असे केशव घोळवे म्हणाले. समाविष्ट गावात आजही पाणी पुरवठा अपु-या प्रमाणात होत असून संपर्णू शहरात समान पाणी पुरवठा व्हावा, अशी मागणी अजित गव्हाणे यांनी केली. पवना बंद जलवाहिनी होणे शहराच्या हिताचे आहे. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून या योजनेसाठी सर्वांनी एकत्र यावे, असे शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे म्हणाले.

विरोधी पक्षनेते योगेश बहल म्हणाले की,  गल्लीपासून दिल्लीपर्यंत भाजपची सत्ता आहे. त्यामुळे पवना बंद जलवाहिनीचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. तरच शहरात 24 बाय 7 तास पाणी पुरवठ्याचे स्वप्न पूर्ण होईल. शहरात अनधिकृत पाणी कनेक्शन मोठ्या प्रमाणात देण्यात येत असून सोसायट्यांना एक बिल न देता फ्लॅटनुसार बिले द्यावीत.

सभागृह नेते एकनाथ पवार म्हणाले की, जनतेची प्रामाणिक सेवा करण्यासाठी आम्ही काम करत आहोत. पाण्यासाठी राजकारण करणार नाहीत. परंतु, पवना बंद जलवाहिनी प्रकल्प करण्यासाठी शेतक-यांचे समाधान होईल, असा तोडगा काढू. तसेच बंद जलवाहिनी मार्गी लावण्यासाठी मावळातील जनतेच्या शंभर वेळा पाया पडू, असेही पवार म्हणाले.

राहुल कलाटे व सीमा सावळे यांच्यात तू-तू, मै-मै!

बांगलादेशी, पळपुटे कोणाला म्हणता, हिंमत असेल तर समोर बोला मागे काय बोलता, आम्ही गाववाले आहोत, शंभर एकरचा मालक आहे, असे म्हणत शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांनी सभागृह नेते एकनाथ पवार यांच्यावर आगपाखड केली. तर आरे-तुरेची भाषा करू नको, असे म्हणत स्थायीच्या अध्यक्षा सीमा सावळे यांनी कलाटे यांना प्रतिउत्तर दिले. यावरून कलाटे व सावळे यांच्यात तू-तू, मै-मै झाले.

सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीला अजेंड्यावरील अंदाजपत्रक सभेतील वृत्तांत कायम करण्यात येत असतानाच कलाटे यांनी सभागृह नेते पवार यांनी विरोधकांना अंदाजपत्रकाच्या सभेत बांगलादेशी, पळपुटे अशी भाषा वापरल्याचे सांगत त्यांच्यावर एकेरी भाषेत आगपाखड केली. यामुळे सभागृहात काही काळ तणाव निर्माण झाला. महापौर नितीन काळजे यांनी हस्तक्षेप करीत पवार आणि कलाटे या दोघांचीही वाक्ये कामकाजातून वगळण्यात येतील, असे सांगितले. त्यानंतर या वादावर पडदा पडला.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - पवना नदीच्या निळ्या पूररेषेत पालिका नियमानुसार कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नसल्याने चिंचवडगावातील दोन आरक्षणांमध्ये फेरबदल करण्यात आला. सर्वसाधारण सभेत या फेरबदलास मंजुरी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची ऑगस्ट महिन्याची सर्वसाधारण सभा आज (शनिवारी) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

चिंचवडगावातील माध्यमिक शाळा (सर्व्हे क्रमांक 296 पैकी), प्रसूतिगृह व दवाखाना (सर्व्हे क्रमांक 284) आणि पोहण्याचा तलाव (सर्व्हे क्रमांक 174) या आरक्षणात बदल करण्यात आला आहे. माध्यमिक शाळेचे आरक्षण सात हजार चौरस मीटर इतके आहे. प्रसूतिगृह व दवाखाना हे आरक्षण चार हजार चौरस मीटर इतके असून पोहण्याच्या तलावाचे आरक्षण चार हजार 500 चौरस मीटर इतके आहे.

निळ्या पूररेषेत पालिका नियमानुसार कोणत्याही प्रकारचे बांधकाम करता येत नाही. त्यामुळे या आरक्षणात उद्यान, खेळाचे मैदान किंवा पुररेषेने प्रतिबंधित क्षेत्रात अनुज्ञेय होणा-या क्षेत्रात फेरबदल करणे आवश्यक ठरते. माध्यमिक शाळेच्या आरक्षणाचे खेळाच्या मैदानात व प्रसूतिगृह व दवाखाना या आरक्षणाचे उद्यान या आरक्षणात आणि पोहण्याच्या तलावाचे व्यापारी केंद्र व प्रसूतिगृह या आरक्षणात फेरबदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याला सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली.

19 Aug 2017

एमपीसी न्यूज - स्वाईन फ्लूमुळे पिंपळे निलख येथे राहणा-या 63 वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. जानेवारीपासून आतापर्यंत शहरात 261 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यातील 34 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 212 रुग्णांना बरे होऊन घरी पाठविण्यात आले आहे. 

 

पिंपळे निलख येथील 63 वर्षीय रुग्णाला स्वाईन फ्लूची लक्षणे आढळल्यावरून 15 ऑगस्ट रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. स्वाईन फ्लूचा त्रास वाढल्याने रुग्णाला त्याच दिवशी कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मंगळवार (दि. 15) रोजी मृत्यू झाला.

सौम्य ताप, घशात खवखव, खोकला, अंगदुखी, डोकेदुखी, उलट्या, जुलाब अशी लक्षणे स्वाईन फ्लूच्या प्राथमिक अवस्थेत आढळून येतात. आजाराच्या पुढील टप्प्यात 38 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक ताप, तीव्र घसादुखी, घशाला सूज येणे, धाप लागणे, छातीत दुखणे, रक्तदाब कमी होणे, खोकल्यावाटे रक्त पडणे, नखे निळसर काळी पडणे, लहान मुलांमध्ये चिडचिड, झोपाळूपणा अशी लक्षणे दिसून येतात. अजूनही 15 रुग्ण शहरातील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत.

Page 7 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start