• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना आरोग्य सेवा-सुविधा पुरविणा-या महापालिका रुग्णालयांची अवस्था दयनीय झालेली आहे. अनेक रुग्णालयात विविध आजारावरील तज्ज्ञ डॉक्‍टरांची वानवा आहे. डोळ्यातील मोतीबिंदूसह अन्य शस्त्रक्रिया होत नाहीत. रुग्णालयात ऑपरेशन थिएटर बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या सर्व रुग्णालयाचे 'ऑडिट’ करावे, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका अश्विनी चिंचवडे यांनी केली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.19) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.  महापालिका रुग्णालयासाठी कान, नाक, घसा तज्ज्ञ अभिनामाचे पद सरळसेवा प्रवेशाने भरण्यासाठी कर्मचारी निवड समितीने शिफारस केलेल्या प्रतीक्षा यादीवरील डॉ. परमानंद देवदास चव्हाण यांची खुल्या प्रवर्गातून नियुक्‍ती करण्यास महासभेने मान्यता दिली.

अश्विनी चिंचवडे म्हणाल्या की, महापालिकेची शहरात आठ रुग्णालये आहेत. या रुग्णालयाची स्थिती बिकट आहे. अनेक रुग्णालयात विविध तज्ज्ञ डॉक्‍टर उपलब्ध नाहीत. विशेषतः बालरोग तज्ज्ञ, स्त्रीरोग व प्रसुती तज्ज्ञांसह अन्य डॉक्‍टर अद्याप भरलेले नाहीत. त्याचशिवाय परिचारिका, वॉर्डबॉय, अशा कर्मचा-यांची कमतरता आहे. त्यामुळे उपलब्ध असणा-यांवर कामाचा ताण वाढला आहे. रुग्णांना आरोग्य सेवा व औषधोपचार करताना अनेकांच्या नाकी नऊ येऊ लागले आहे.

तालेरा रुग्णालयात शस्त्रक्रिया विभाग बंद ठेवण्यात आलेला आहे. महापालिकेचे फिरते दवाखाने बंद आहेत. त्या फिरत्या दवाखान्यांची वाहने धूळखात पडलेली आहेत. शवविच्छेदन विभागातील आडमुठ्या डॉक्‍टरामुळे मृत व्यक्‍तीच्या नातेवाईकांची फरफट होऊ लागली आहे. तालेरा रुग्णालयातील पूर्वीची क्रांतीवीर चापेकर रक्‍तपेढी बंद करण्यात आलेली आहे. त्यामुळे रुग्णांच्या नातेनाईकांना रक्‍तासाठी अन्यत्र जावे लागत आहे. महापालिका रुग्णालयाची अवस्था मरणासन्न झालेली आहे. याकरिता महापालिका रुग्णालयाचे 'ऑडिट’ करण्यात यावे, अशी मागणी नगरसेविका चिंचवडे यांनी महासभेत केली.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - शासन सेवेतील अधिका-यांना महापालिका सेवेत समाविष्ठ करून आपल्या कर्मचा-यांना पदोन्नती देताना अडचण निर्माण होणार नाही, याची खबरदारी घेणे आवश्‍यक आहे. त्याचबरोबर पालिकेचा 'ब' वर्गात समावेश झालेला आहे. त्यामुळे आकृतीबंध शासनस्तरावर अद्याप रखडलेला आहे. त्या आकृतीबंधाला मंजुरी घेण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी केली.

महापालिकेची सर्वसाधारण सभा शनिवारी (दि.19) पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन काळजे होते.

पिंपरी-चिंचवड महापालिका आस्थापनेवर प्रशासन अधिकारी अभिनामाची पदे शासन मंजूर आहेत. या पदावर संदीप खोत व सिताराम बहुरे यांना सरळसेवा प्रवेशाने प्रशासन अधिकारी या पदावर नियुक्‍ती देण्यात आलेली आहे. त्या दोन्ही अधिका-यांना महापालिका सेवेत सामावून त्यांना विविध सेवा-सुविधांचा लाभ देण्यास सभेने मान्यता दिली.

शासन सेवेतील प्रशासन अधिका-यांना पालिका सेवेत कायम करणार का? त्यांना कोणत्या नियमाने सामावून घेत आहात? त्यांना सामावून घेताना पालिकेतील अन्य कर्मचा-यांना अन्याय तर होत नाही का? यावर संबंधित प्रशासन विभागाच्या अधिका-यांनी खुलासा करावा, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली.

20 Aug 2017


एमपीसी न्यूज - मोठ्या विश्रांतीनंतर पुण्यासह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली. शहरात मध्यरात्रीपासून सुरु झालेला पाऊस आणि त्यासोबत हलक्या वार्‍याने शहरातील विविध भागात 38 झाडपडीच्या घटना घडल्या. मात्र, यामध्ये जिवीतहानी तसेच नुकसान झालेले नाही.

दिर्घ विश्रातीनंतर मराठवाडा, विदर्भासह राज्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली. शहरातही शनिवारी मध्यरात्रीनंतर पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर रविवारी दिवसभर संतधार तर अधून-मधुन मोठ्या सरी बरसल्या. पावसासोबतच हलके वारेही सुरु होते. दरम्यान पाऊस सुरु झाल्यापासून शहरात झाडपडीच्या तीस घटना घडल्या आहेत. कर्वेनगर, कोथरुड, औंध, बोपोडी, कल्याणीनगर, येरवडा याभागांमध्या या घटनां घडल्या. सुदैवाने यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. तसेत, नुकसानही झाले नसून, याघटना किरकोळ असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले. त्यामुळे कोठेही वाहतूकीला अडथळा निर्माण झाला नाही.

20 Aug 2017


एमपीसी न्यूज - दारुबंदी हा राजकीय विषय असला, तरीही यामध्ये आर्थिक व सामाजिक हितसंबंध आहेत. चंद्रपूरमध्ये जशा प्रकारे दारुबंदी झाली, त्याप्रमाणे पुण्यातून दारुबंदी करण्याकरीता सामाजिक संस्थांनी एकत्रितपणे पुढे यायला हवे, असे आवाहन पुण्याचे उपमहापौर सिद्धार्थ धेंडे यांनी केले. 

आनंदवन व्यसनमुक्ती केंद्राच्या 9 व्या वर्धापनदिनानिमित्त पांगारा स्मरणिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला. यावेळी पुणे जिल्हा समाजकल्याण अधिकारी प्रविण कोरगंटीवार, रा.स्व.संघाचे पुणे महानगर कार्यवाह महेश करपे, मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले, केंद्राचे अध्यक्ष डॉ.अजय दुधाणे, राजन चांदेकर, विवेक कदम, प्रसाद ओक, प्रकाश धिडे, गोरख रायकर, अनिरुद्ध हळंदे उपस्थित होते.

यावेळी बोलताना धेंडे म्हणाले की , शहरात तब्बल 20 टक्के नागरिकांचे मृत्यु हे दारुमुळे होतात. त्यामध्ये वयवर्षे 32 ते 40 या वयोगटातील तरुणाईचा आकडा मोठा आहे. त्यामुळे व्यसनाच्या गुलामगिरीतून पुण्याला मुक्त करण्याचे आव्हान पेलण्याकरीता आपण सज्ज असायला हवे, असे मत उपमहापौर धेंडे यांनी व्यक्त केले.

मेघराज भोसले म्हणाले, कामाचा ताण आणि अवेळी काम यामुळे अनेक चित्रपट कलाकार व्यसनाधिनतेमध्ये अडकले आहेत. अनेकजण व्यसनांमध्ये विनाकारण पैसा वाया घालवितात. त्यांना यापासून परावृत्त करायला हवे, असेही त्यांनी सांगितले. महेश करपे म्हणाले, सन 2022 मध्ये समर्थ भारताचे स्वप्न आपण पहात आहोत. त्यामध्ये व्यसनमुक्त भारत हे चित्र हवे. सध्या ई -व्यसन वाढत असून हा मोठा धोका आहे, असे मत भोसले ांनी व्यक्त केले.

20 Aug 2017


पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा यांची मागणी : बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार प्रदान

एमपीसी न्यूज - बाजीराव पेशवे यांचा पुतळा उभा रहायला 30 वर्षे लागली. त्यानंतर त्यांचे तिकीट यायला 10 वर्षे लागली. त्यांचे तैलचित्र आजही कुठे नाही, त्यामुळे विधानसभा आणि विधानपरिषदेत त्यांचे तैलचित्र लावायलाच हवे, आणि त्यांच्या सन्मानार्थ लोहगाव विमानतळाला बाजीराव पेशवे यांचे नाव दया,अशी मागणी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा यांनी केली.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे टिळक स्मारक येथे झालेल्या कार्यक्रमात श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 317 व्या जयंतीनिमित्त कॅप्टन दिलीप दोंडे यांना थोरले बाजीराव पेशवे शौर्य पुरस्कार आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी पेशवे यांचे वंशज श्रीमंत उदयसिंह पेशवा, मस्तानीसाहेब यांचे वंशज नवाब अली बहादूर पेशवा, उद्योजक रविंद्र प्रभूदेसाई, प्रतिष्ठानचे अध्यक्ष निवृत्त एअरमार्शल भूषण गोखले, उपाध्यक्ष अनिल गानू, सचिव कुंदनकुमार साठे,श्रीकांत नगरकर उपस्थित होते. सन्मानचिन्ह, २५ हजार रुपये रोख, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप होते.

मेधा कुलकर्णी म्हणाल्या, ऐतिहासिक पुरुषांवर जेव्हा विकृत पद्धतीने बोलले जाईल, त्यावेळी आपण सर्वांनी एकत्र यायला हवे. इतिहास रोमारोमात भिनला पाहिजे, तो केवळ पाठांतराचा विषय नाही. हा इतिहास अभिवृत्ती बदलेपर्यंत विद्यार्थ्यांच्या मध्ये कसा येईल, हे पहायला हवे. इतिहासापासून प्रेरणा घ्यायला हवी. भारतवर्षात जन्मलेली व्यक्ती कितीही मोठी असली, तरी आपण त्यांना जातीपातीत गुंतवितो, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

नवाब अली बहादूर पेशवा म्हणाले, छत्रपती शिवराय, बाजीराव पेशवे यांनी हिंदुत्वाचा नारा दिला, परंतु त्यांनी धर्माचे समर्थन केले नाही. त्यांचा लढा जुलमी मुघलांशी होता. या योद्धयांच्या सैन्यदलात देखील मुस्लीम होते. पूर्वी हिंदू मुस्लिम असा भेद नव्हता, भारताच्या स्वातंत्र्यानंतरच हा भेद सुरु झाला. मस्तानीसाहेबा यांचा योग्य इतिहास समोर आला नाही. काही लेखकांनी मस्तानी यांचा चुकीचा इतिहास समोर आणला आहे.

भूषण गोखले म्हणाले, मराठा साम्राज्याच्या विस्ताराचे श्रेय हे बाजीराव पेशवे यांना जाते. शिवाजी महाराज आणि बाजीराव पेशवे हे संकुचित वृत्तीचे नव्हते. त्यांनी दुरदृष्टी दाखविली. शिवाजी महाराजांनी दुरदृष्टीने आरमाराची स्थापना केली. पण पुढे त्यात प्रगती झाली नाही. त्यामुळे कित्येक वर्षे पाश्चिमात्य देशांनी आपल्यावर राज्य केले,असेही त्यांनी सांगितले. राजेश दामले यांनी सूत्रसंचालन केले. कुंदनकुमार साठे यांनी आभार मानले.

20 Aug 2017


नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा ईशारा


एमपीसी न्यूज - काल रात्रीपासून पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे दुपारी पवना धरणाचे सहा दरवाजे उघडून त्यातून 3 हजार 636 क्यूसेस पाणी सोडण्यात येत आहे. पावसामुळे पवना नदी अगोदरच दुथडी भरून वाहत आहे. त्यातच धरणाचे पाणी सोडल्यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्‍यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

जिल्ह्यात सुरु असणाऱ्या संततधार पावसाने सर्वच धरणातून पाणि सोडण्यात येत आहे. चास कमान धरणातून दुपारी तीन वाजता 13 हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग भीमा नदी पात्रात सोयडण्यात येत आहे. तर डिंभे धरणातून 18 हजार 500 क्युसेक्स विसर्ग नदी पात्रात सोडण्यात आला आहे. वरसगाव धरणात 86.81 टक्के पाणीसाठा झाला आहे तर खडकवासला धरणात 81 टक्के साठा झाला आहे. डिंभे धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत.

20 Aug 2017

एमपीसी न्यूज :  पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या बससाठी पुणेकरांनी हिरव्या व निळ्या रंगासह त्यावर रंगीबेरंगी पाने-फुले असलेल्या रंगसंगतीला पसंती दिली आहे.त्यानुसार  पीएमपीच्या ताफ्यात लवकर नवीन मध्यम आकाराच्या 200 बस दाखल होणार आहेत. या बसेसला हीच रंगसंगती निश्चित करण्यात आली असून या बसेस सज्ज झाल्या आहेत. लवकरच त्या ताफ्यात दाखल होणार आहेत.

पुणे महापालिका, पिंपरी- चिंचवड महापालिका व पीएमपीने एकत्रितपणे तब्बल 1550 बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी 550 बस या एसी व अत्याधुनिक असणार आहेत, तर 200 बस या साध्या 34 सीटच्या असतील, तर 800 बस साध्या; परंतु मोठ्या आकाराच्या असणार आहेत. एकूण 200 बसपैकी 120 बस पुणे महापालिका, तर 80 बस पिंपरी-चिंंचवड महापालिका खरेदी करणार आहे. या बस सज्ज झाल्या असून लवकरच त्या नव्या रंगात पीएमपीच्या ताफ्यात दाखल होतील.

सध्या पीएमपीच्या ताफ्यात लाल रंगाच्या बस आहेत, तर ‘जेएनएनयूआरएम’ अंतर्गत मिळालेल्या बसचा रंग पांढरा-गुलाबी असा आहे. ताफ्यात नव्याने येणाऱ्या बससाठी यापेक्षा वेगळा रंग देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी तीन रंगसंगतीचे पर्याय तयार करण्यात आले होते. रेनबो इंद्रधनुष्य बस म्हणजे, बीआरटी मार्ग आणि रेनबो इंद्रधनुष्य लिंक बस म्हणजे, बीआरटी वगळता इतर मार्गांवर धावणाऱ्या बससाठीही ही रंगसंगती वेगळी ठेवण्यात आली. या पर्यायांवर पुणेकरांकडून मतदान घेण्यात आले. 5 ते 12 आॅक्टोबर 2016 या कालावधीत एका टोल फ्री क्रमांकावर पर्यायानुसार ‘मिस कॉल’ देण्याचे आवाहन पुणेकरांना करण्यात आले होते. त्यानुसार या कालावधीत पुणेकरांनी दुसऱ्या पर्यायाला अधिक पसंती दिली आहे. बीआरटी मार्गासाठी हिरवा व इतर मार्गांसाठी निळा रंग दुसऱ्या पर्यायात देण्यात आला होता. त्यानुसार या पर्यायाची रंगसंगती असलेल्या बस शहरातील रस्त्यांवर धावण्याची शक्यता आहे.

20 Aug 2017

अनिसचे जवाब दो आंदोलन; हिंसा के खिलाफ मानवता की और कार्यक्रम 

एमपीसी न्यूज - आज काल मोठमोठे चॅनल आणि त्यांचे पत्रकार धर्मावर बोलायला घाबरतात पण नरेंद्र दाभोळकर कधी घाबरले नाही. आजची पत्रकारिता पैशाच्या ताकदीला बळी पडत आहे. मात्र, दाभोळकर कशाच्या पुढे झुकले नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले.

अंधश्रद्धा निर्मूलनातील अग्रणी डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज (दि.20) चार वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही त्यांच्या मारेक-यांना शिक्षा झालेली नाही. तसेच सर्व तपास अत्यंत संथ गतीने होत आहे. याच्या निषेधार्थ अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या वतीने जवाब दो आंदोलन करण्यात येत आहे. निषेध रॅलीनंतर आयोजित हिंसा के खिलाफ मानवता की और उपक्रमांतर्गत आयोजित व्याख्यानात ते बोलत होते.

यावेळी बोलताना सरदेसाई पुढे म्हणाले की, श्री श्री रवी शंकर, आणि बाबा रामदेव यांच्या वर आजकल कोणी बोलायला तयार नाही, कोणताही पत्रकार कोणताही चॅनल त्यांच्यावर बोलत नाही. कारण त्यांच्याकडे पैशाची ताकद आहे. तसेच राजनैतिक पाठबळ देखील या लोकांना लाभत आहे. पतंजली हा सर्वात मोठा जाहिरातदार आहे. त्यामुळे कोणताही मीडिया त्यांच्यावर लिहिण्यास दाखवण्यास घाबरत आहे. पत्रकारिता हा टीआरपीचा व्यवसाय झाला आहे.

ज्या बातम्यांना टीआरपी आहे तीच दाखवली जाते. देश हिताशी कोणाला देणे घेणे नाही. मीडिया एक तमाशा झाला आहे. रोज रात्री मोठमोठ्या चैनल वर 10 लोकांना बोलवून चर्चासत्राच्या नावाखाली तमाशा दाखवला जातो. पहिले हे हिंदीमध्ये होते आता मराठीतही सुरू झाले आहे, अशी टिप्पणीही त्यांनी केली.

20 Aug 2017

एमपीसी न्यूज - गेले तीन महिने रिक्त असलेले पुणे महापालिकेचे आरोग्य प्रमुखपद भरण्यात येणार आहे. त्यासाठी पालिका प्रशासनाने जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

महापालिकेचे तत्कालीन आरोग्यप्रमुख एस.टी. परदेशी सेवानिवृत्त झाले होते. त्यानंतर वारंवार मागणी करूनही प्रशासनाच्या उदासीन धोरणामुळे हे पद रिक्त होते. आधीचे आरोग्यप्रमुख सेवानिवृत्त झाल्यावर महापालिका प्रशासनाने आरोग्यप्रमुखाची नेमणूक राज्य सरकारने करावी असे पत्र  दिले. त्या पत्राला नकारात्मक प्रतिसाद मिळाल्यावर आयुक्त कुणालकुमार यांनी या पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार अखेर प्रशासनाने जाहिरात जारी केली असून शहराला लवकरच नवे आरोग्यप्रमुख मिळणार आहेत.

या पदासह विविध विषयांचे तज्ज्ञ आणि प्रशासकीय अधिकारी अशा एकूण 11 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीला मिळणा-या प्रतिसादावरून मुलाखतीचे स्वरूप निश्चित करण्यात येते. एखाद्या पदासाठी 50 पेक्षा अधिक संख्येने उमेदवार आल्यास त्यांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर मुलाखत घेतली जाणार आहे. मात्र 50 पेक्षा कमी उमेदवार आल्यास थेट मुलाखत घेतली जाणार आहे. आरोग्यप्रमुख पदासाठी एमडी, पीएसएम या शैक्षणिक अहर्तेबरोबरच सहाय्यक आरोग्य अधिकारी पदाच्या अनुभवाची अट आहे.

20 Aug 2017

एमपीसी न्यूज - सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील गणेश मंडळांना कमानीसाठी महापालिकेतर्फे आकारण्यात येणारी अनामत रक्कम आणि परवाना शुल्क यंदा माफ करण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव शिवसेनेच्या सदस्यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

पुण्यासह देशभरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जातो. आगामी गणेशोत्सवानिमित्त महापालिकेतर्फे वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने शहरातील अनेक गणेश मंडळांकडून रस्त्यावर कमानी लावण्यात येतात. या कमानींसाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागातर्फे अनामत रक्कम आणि परवाना शुल्क आकारण्यात येते.

मात्र, यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी ही अनामत रक्कम आणि परवाना शुल्क माफ करण्यात यावे, अशा मागणीचा प्रस्ताव शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, विशाल धनवडे आणि प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

Page 6 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start