• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
21 Aug 2017

एमपीसी न्यूज -  जगताप डेअरी चौकात उड्डाणपुलाचे काम सुरु आहे. त्यामुळे या चौकात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत असून  ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी सांगवी वाहतूक पोलिसांनी आजपासून (सोमवार दि. 21) पुलाचे काम पूर्ण होईपर्यंत पुढील प्रमाणे वाहतुकीत बदल केले आहेत.

# वाकड वाय जंक्शन येथून जगताप डेअरी चौकाकडे (साई चौक) जाणा-या सर्व वाहनांना प्रवेश बंद करण्यात येत आहे. त्यामुळे  वाहन चालकांनी सरळ कस्पटे चौकातून जगताप डेअरी चौकातून इच्छित स्थळी जावे.

# शिवार चौकातून येणा-या वाहनांना जगताप डेअरी चौकातून उजवीकडे वळून काळेवाडी फाट्याकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. वाहनचालकांनी सरळ जाऊन सावित्रीबाई फुले उद्यान चौकातून युटर्न घेऊन इच्छित स्थळी जावे.

# काळेवाडी फाटा, रावेतकडून येणाऱ्या वाहनांना जगताप डेअरी चौकातून सरळ औंध व पुणेकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात येत आहे. वाहन चालकांनी जगताप डेअरी चौकातून उजवीकडे वळून कस्पटे चौकातून इच्छित स्थळी जावे.

जगताप डेअरी येथील उड्डाणपुलाचे काम युद्धपातळीवर सुरु असून तो पूर्ण  होताच वाहतूक पूर्ववत व सुरळीत होणार आहे. तरी नागरिकांनी दिलेल्या पर्यायी मार्गाचा वापर करून वाहतूक कोंडी टाळावी असे आवाहन सांगवी वाहतूक पोलिसांनी केले आहे.
21 Aug 2017
एमपीसी न्यूज- पुणे शहरात दरवर्षी सुमारे सहा लाख गणेश मूर्तीची विक्री केली जाते त्यातील पाच लाख मूर्ती प्लॉस्टर ऑफ पॅरिस पासून बनवल्या जातात या मूर्ती पाण्यात व्यवस्थिपणे विरघळत नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात जल प्रदूषण होते. त्यामुळे मागील वर्षीप्रमाणेच पुणे महापालिका आणि कमिन्स इंडिया यांनी रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या सहकार्याने  खाण्याचा सोडा ( अमोनियम बायकार्बोनेट ) वापरून पर्यावरण पूरक पद्धतीने तब्बल एक  लाख गणेश मूर्तींचे विसर्जन करण्याचा मानस असल्याचे महापौर मुक्त टिळक यांनी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.

पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा करण्याच्या उद्देशाने पुणे महापालिका, कमिन्स इंडिया यांनी रासायनिक प्रयोगशाळा आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळ यांच्या सहकार्याने खाण्याचा सोडा वापरून शास्त्रीय विघटनातून प्लॉस्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीचे विघटन करून पर्यावरणाची  हानी टाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मागील वर्षी महापालिके कडून ५५ टन अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप २४ हजार २५० पुणेकरांना केले होते.  तर ३२ टन  बायकार्बोनेटचा वापर पालिकेतर्फे विसर्जन हौदामध्ये करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी देखील १०० टन बायकार्बोनेट खरेदी करण्यात आले असून त्याचे वाटप क्षेत्रीय कार्यलयात मोफत करण्यात येणार आहे. 

कशा प्रकारे टाळता येणार प्रदूषण 

प्लॉस्टर ऑफ पॅरिस पाण्यात विरघळत नाही त्यामुळे विहिरीत, तलावात नद्यांमध्ये मूर्ती विसर्जित केल्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण होते व लाखों लिटर पाण्याचा अपव्यय होतो. मूर्ती रंगवण्यासाठी वापरलेले घातक रासायनिक रंग पाण्यात मिसळून जलसृष्टीची प्रचंड हानी होते. परंतु राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेतील संशोधनातून बेकरीत वापरला जाणारा खाण्याचा सोडा म्हणजे अमोनियम बायकार्बोनेटच्या साहाय्याने प्लॉस्टर ऑफ पॅरिसचे शास्त्रीय पद्धतीने सहज विघटन करता येत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जलप्रदूषण रोखता येऊ शकते. 
पुणे महापालिकेची उपाययोजना 

पुणे महापालिकेतर्फे काही विसर्जन घाटावर उभारण्यात आलेल्या हौदामध्ये या पद्धतीचा अवलंब करून पर्यावरण पूरक पद्धतीने गणेश मूर्तीचे विसर्जन करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. या पद्धतीचा वापर  घरगुती छोट्या गणेश मूर्तीपासूनते गणेश मंडळाच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी करता येणार आहे. तसेच महापालिकेतर्फे अमोनियम बायकार्बोनेटचे दोन किलोचे पॅकेट नागरिकांना देऊन घरच्याघरी गणेश विसर्जन करण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. 
21 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे- नाशिक महामार्गावर भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत 60 आणि 61 मीटर रस्ता रूंदीकरण करण्यात येणार आहे. रस्ता रुंदीकरणामुळे बाधित होणा-या 180 नागरिकांपैकी 95 बाधित नागरिकांनी जागेचा पालिकेला ताबा दिला आहे. त्यांना मोबादला देण्याची प्रक्रिया सुरु आहे, अशी माहिती नगररचना व विकास विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकुर यांनी दिली. तसेच उर्वरित जागेचा ताबा लवकरच घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुणे - नाशिक महामार्गावरील नाशिक फाटा ते मोशीतील इंद्रायणी नदी दरम्यानचा भाग हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 60 मध्ये आहे. या रस्त्याअंतर्गत भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत सुमारे 2 हजार 200 मीटर रस्ता 61 मीटर रूंदीकरणासाठी आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत सुमारे 4 हजार 400 मीटर रस्ता 60 मीटर रूंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी भूसंपादन करण्यात येत आहे. 180 बाधित नागरिकांपैकी 95 नागरिकांनी जागेचा ताबा दिला आहे. त्याचा त्यांना मोबादला देण्याची प्रक्रिया सुरु आहे. उर्वरित जागेचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यासाठी शिबिर घेण्यात येणार आहे, असे ठाकुर यांनी सांगितले.

दरम्यान,  पुणे- नाशिक महामार्गावर भोसरीतील रोशल गार्डनपासून स्पाईन चौकापर्यंत आणि स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत 60 आणि 61 मीटर रस्ता रुंदीकरणाला मोशीतील काही बाधित नागरिकांनी विरोध दर्शविला आहे. स्पाईन चौकापासून इंद्रायणी नदीपर्यंत 60 मीटर रस्ता रुंद करण्यात येणार आहे. त्याची रुंदी कमी करुन 45 मीटर करण्याची विनंती नागरिकांनी पालिकेकडे केली आहे. यासंदर्भात महापौर नितीन काळजे यांची देखील नागरिकांनी  भेट घेतली होती. 

​ ​
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका कार्यक्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळांसाठी गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शहरातील मंडळांनी त्यामध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन,   महापौर नितीन काळजे यांनी केले आहे. तसेच यंदा प्रथम क्रमांकाच्या 
बक्षीस
​ ​
रकमेत देखील वाढ करण्यात आली आहे. 

या स्पर्धेचे प्रवेश अर्ज 19 ते 25 ऑगस्ट दरम्यान सकाळी  11 ते दुपारी चार वाजेपर्यंत महापालिकेच्या माहिती व जनसंपर्क विभागात (सुट्टीचे दिवस वगळून ) उपलब्ध असणार आहेत.

गणेशोत्सव सजावट स्पर्धा 2017 मध्ये धार्मिक, जिवंत व समाजप्रबोधनपर या देखाव्यांचा समावेश असणार आहे. यामध्ये विजेत्या गणेशोत्सव मंडळांना एकूण पाच लाख 50 हजार रुपयांची 

बक्षिसे व प्रशस्तीपत्रके देण्यात येणार आहेत.

प्रथम क्रमांकांचे बक्षीस 30 हजार रुपयांवरुन 51 हजार रुपये, तर दुस-या क्रमांकाचे बक्षीस 25 हजारावरुन 31 हजार रुपये ठेवण्यात आले आहे. तसेच इतर बक्षीस रक्कमेतही वाढ करण्यात आलेली आहे. या स्पर्धेत सहभागी होणा-या गणेशमंडळांनी 25 ऑगस्ट  दुपारी चार वाजेपर्यंत महापालिकेत अर्ज जमा करावे, असे आवाहन महापौर नितीन काळजे यांनी केले आहे.
21 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी पालिकेच्या वतीने आठ वर्षांपूर्वी काम सुरू झालेला निगडी ते दापोडी दरम्यानचा बीआरटी मार्ग अद्याप सुरू होऊ शकलेला नाही. हा बीआरटीएस मार्ग सप्टेंबर अखेरपर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या आहेत.

नागरिकांना विनाअडथळा जलद प्रवास करता यावा, प्रदूषणमुक्तीसाठी सार्वजनिक वाहतुकीचा जास्तीत जास्त उपयोग व्हावा, यासाठी बस रॅपिड ट्रान्झीट सिस्टम’ अर्थात बीआरटीएस मार्ग उभारण्यात आले आहेत. औंध- रावेत या मार्गावर बीआरटीएस बससेवा सुरू आहे. परंतु, गेल्या दहा वर्षांपासून मुंबई-पुणे मार्गावरील निगडी ते दापोडी या साडेबारा किलोमीटर लांबीच्या मार्गावर बीआरटीएस सेवा सुरू करण्याचा प्रकल्प रेंगाळला आहे.

नाशिक फाटा ते वल्लभनगर दरम्यान पुणे मेट्रोचे काम वेगात सुरु आहे. या मेट्रोच्या कामामुळे रस्ता अरुंद झाला आहे. रस्ता छोटा असल्याने वाहतुकीची कोंडी वाढल्याचे दिसून येत आहे. त्यासाठी उपाय म्हणून काही दिवसांपूर्वी बीआरटी मार्गातून दुचाकी वाहनांना परवानगी देण्यात आली होती. पिंपरीतील मेट्रो प्रकल्पाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. यापुढे हे काम वाढत जाणार असून वाहतूक कोंडींची झळ नागरिकांना बसणार आहे. त्यापूर्वीच बीआरटी मार्ग सुरू करण्याचे पालिका प्रशासनाचे नियोजन आहे.

गेल्या काही दिवसांपासून हे रखडलेले काम मार्गी लावण्याच्या वेगवान हालचाली दिसून येत आहेत. पुणे-मुंबई बीआरटीएस मार्ग सप्टेंबर अखेरपर्यंत पुर्ण करण्याच्या सूचना आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी संबंधित विभागाला दिले आहे. ऑक्टोंबरच्या पहिल्या आठवड्यात हा मार्ग सुरु करण्याचे पालिकेचे नियोजन आहे.
21 Aug 2017एमपीसी न्यूज - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्या वतीने ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी (125) वर्षानिमित्त श्री ब्राह्मणस्पती मंदिर साकारण्यात आले आहे. गणेश चतुर्थीला शुक्रवार, दिनांक 25 ऑगस्टला सकाळी 10.09 वाजता प.पू. पीरयोगी श्री गणेशनाथ महाराज, गोरक्षनाथ मठ, त्र्यंबकेश्वर यांच्या हस्ते श्रींची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. तर, मंदिरावरील विद्युतरोषणाईचे उद्घाटन सायंकाळी 7.00 वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

यावेळी हेमंत रासने, महेश सूर्यवंशी, सुनील रासने, माणिक चव्हाण, डॉ. बाळासाहेब परांजपे, प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. शुक्रवारी (25 ऑगस्ट) प्राणप्रतिष्ठापनेपूर्वी सकाळी 8.00 वाजता मुख्य मंदिरापासून फुलांनी सजविलेल्या रथामध्ये श्रींची आगमन मिरवणूक काढण्यात येणार आहे. यंदाच्या ब्राह्मणस्पती मंदिराचा आकार 111 बाय 90 फूट असून 90 फूट उंची आहे. याशिवाय गोलाकार घुमटाखाली साकारलेला तब्बल 36 फुटी नयनरम्य गाभारा हे वैशिष्टय असणार आहे. डेक्कन कॉलेजचे डॉ. श्रीकांत प्रधान आणि गाणपत्य प.पू.स्वानंद पुंड महाराज यांनी मुद्गल पुराणातून याविषयी शास्त्रशुद्ध माहिती दिली आहे. 

त्याआधारे गणेशाची त्रिशूल, अंकुश, शंख, कमळ अशी अनेक आयुधे मंदिरावर लावण्यात आली आहेत. तर, हत्ती, मोर, गाय अशा विविध प्राण्यांच्या शिल्पांनी मंदिरातील खांब सजविण्यात आले आहेत. सभामंडपाच्या छतावरील काचेच्या झुंबरांच्यावर रेखाटण्यात आलेली ब्राह्मणस्पती आणि गणेश यंत्र हे खास आकर्षण असणार आहे. तब्बल एक लाख 25 हजार मोतिया रंगाच्या दिव्यांनी हे मंदिर उजळून निघणार आहे. तसेच अत्याधुनिक लाईटस् विद्युतरोषणाईकरिता लावण्यात आले आहेत. शिल्पकार विवेक खटावकर यांनी मंदिराचे काम, विद्युतरोषणाइचे काम वाईकर बंधू, मंडपव्यवस्था काळे मांडववाले यांनी केली आहे. 

गणेशोत्सवातील कार्यक्रमांबाबत बोलताना अशोक गोडसे म्हणाले की, शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने भारताचे राष्ट्रपती, पंतप्रधान यांसह भारतरत्न, खेलरत्न, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांना आणि विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय मंत्री यांना श्रींच्या दर्शनाकरीता आमंत्रण देण्यात आले आहे. शनिवारी (दि 26) पहाटे 6.00 वाजता ॠषिपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे 25 हजार महिला सामुदायिकरित्या अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. तर, रात्री 10.00 वाजता महाराष्ट्रातील समस्त वारकरी बंधू वारकरी गजर करीत गणरायाचरणी सेवा अर्पण करणार आहेत. (दि 26) ते 4 सप्टेंबर दरम्यान दररोज पहाटे 5 ते 6 यावेळेत विविध शाळांतील विद्यार्थी अथर्वशीर्ष पठण करणार आहेत. अनंत चतुर्दशीला दिनांक 5 सप्टेंबर रोजी श्रींची वैभवशाली सांगता मिरवणूक श्री धूम्रवर्ण रथातून निघणार आहे. 

गणेशभक्तांसाठी 50 कोटींचा विमा व उत्सवावर तब्बल 150 कॅमे-यांचा वॉच

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचवड मनपा यांसह कॅम्प हद्दींतर्गत गणेशभक्तांसाठी तब्बल 50 कोटींचा विमा ट्रस्टतर्फे करण्यात आला आहे. यामध्ये अतिरेकी हल्ला वा दुर्घटना झाल्यास विम्याचे सुरक्षाकवच मिळणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव देखाव्याच्या परिसरात सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच फरासखाना चौक, बाबू गेनू गणपती, दगडूशेठ दत्तमंदिर, सिटीपोस्ट अशा परिसरात देखील सीसीटिव्ही कॅमेरे असणार आहेत. याशिवाय मंदिर परिसरात कायमस्वरुपी असलेल्या कॅमे-यांचा वॉच उत्सवावर असणार आहे. त्यामुळे तब्बल 150 कॅमे-यांद्वारे या परिसरावर पोलीस यंत्रणेसोबत ट्रस्टची 250 लोकांची खासगी सुरक्षाव्यवस्था लक्ष ठेवणार आहे.

बाप्पाला सुमारे 40 किलो सोन्याचे नाविन्यपूर्ण सुवर्णालंकार

भक्तांनी श्री चरणी प्रतिवर्षी अर्पण केलेल्या सोन्यातून भक्तांचे भाव जपण्याकरिता शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्या निमित्ताने नाविन्यपूर्ण अलंकार घडविण्यात आले आहेत. आकर्षक नक्षीकाम, हत्ती शिल्प, मोरतुरे आणि नवग्रहांच्या समावेशासह 8 ते 10 हजार खडयांची सजावट असलेला 9.5 किलोचा मुकुट बाप्पासाठी साकारण्यात आला आहे. 

रत्नजडित खडयांनी नटविलेला 700 ग्रॅमचा शुंडहार, सूर्यांच्या किरणांचा आभास निर्माण करणारे 2 किलोचे कान, तब्बल 4 हजार सुवर्णटिकल्यांनी मीणाकाम करून चंद्रकोराची आभास निर्मिती करणारा 2.5 किलोचा अंगरखा बाप्पाला अर्पण करण्यात येणार आहे. याशिवाय कपडयावर खडेकाम असलेले 3.5 किलोचे उपरणे, 6.5 किलोचे सोवळे, पांढ-या खडयांचे कोंदण असलेला 1 किलोचा हार, असे दागिने साकारले आहेत. कपडयावर प्रथमच अशा प्रकारचे काम करण्यात आले आहे. याकरिता दाजीकाका गाडगीळ यांच्या पु.ना.गाडगीळ अॅण्ड सन्सचे महाराष्ट्र, बंगाल, कर्नाटक येथील निष्णात 40 कारागीर गेल्या 5 महिन्यांपासून कार्यरत आहेत. बाप्पासाठी साकारलेले सुमारे 40 किलोचे सुवर्णालंकार घडविण्याकरीता सौरभ गाडगीळ व पराग गाडगीळ यांनी विशेष मेहनत घेतली आहे. याकरीता सुमारे 1.25 कोटी रुपये मजुरीचा खर्च न घेता त्यांनी बाप्पाचरणी ही सेवा अर्पण केली आहे. 

शतकोत्तर रौप्यमहोत्सवाच्यानिमित्ताने ट्रस्टतर्फे सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रात विविध उपक्रम राबविण्यात आले. त्यामध्ये हिंद केसरी कुस्ती स्पर्धा, कबड्डी स्पर्धा यांसह गणेश बीजमंत्र सोहळा व दीड महिन्याचा श्री गणेश महायज्ञ धार्मिक सोहळा, चातुर्मासानिमित्त प.पू.बाबामहाराज सातारकर यांचे प्रवचन व सत्संग सांप्रदायातील अधिपती व्यक्तींचा प्रवचन सोहळा आयोजित करण्यात आला होता. पुण्यातील विविध हॉस्पिटलसोबत ट्रस्टतर्फे जय गणेश रुग्णसेवा अभियान राबविण्यात आले. यामध्ये शेकडो रुग्णांची मोफत तपासणी व उपचार करण्यात आले. 

तसेच कोंढव्यातील कुष्ठरोगी औद्योगिक केंद्राला 5 कोटी रुपयांची टप्याटप्याने मदत देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ, देहू ते पंढरपूर आणि आळंदी ते पंढरपूर या पालखी मार्गावर 50 लाख वृक्ष लावण्याच्या वृक्षसंवर्धन अभियानाला प्रारंभ झाला. तर, सांस्कृतिक महोत्सवात सलग 43 दिवस देशभरातील दिग्गज कलाकारांनी आपली कला पुणेकरांसमोर सादर केली. प्रख्यात गायक सुरेश वाडकर यांच्या सुश्राव्य गायनाने या महोत्सवाची नुकतीच सांगता झाली. तसेच देशासाठी प्राण्यांची आहुती देणा-या सैनिकांच्या 125 वीरमाता, पिता व पत्नींचा शौर्य गौरव सन्मान सोहळा आयोजित करून त्यांना आर्थिक मदत देखील देण्यात आली.

21 Aug 2017विजय कोटगोंड यांचे भोसरीत 'लिव टू लीड' विषयावरील व्याख्यान

एमपीसी न्यूज - जगातील प्रयेकाला यशस्वी व्हायचे आहे. त्यासाठी प्रयेकजण धडपडतो आहे. पण यश मिळविण्यासाठी नेमके काय करायला हवे हे मात्र काहीच लोकांना ठाऊक आहे. आपल्यातील योग्यता आणि कौशल्ये ओळखून आपली अधिकार आणि कर्तव्ये समजायला हवी, ती समजली तर माणूस यशाच्या जवळ पोहोचतो. यासाठी भोसरी येथील कै. अंकुशराव लांडगे सभागृहात येत्या गुरुवार (दि. 24) रोजी दुपारी 12 ते साडेचार दरम्यान उद्योग क्षेत्रात येऊ इच्छिणा-या युवकांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

व्यवसायाचे नुसते नाव जरी काढले तरी मराठी माणूस घाबरतो. व्यवसायात त्याला भरपूर अडचणी दिसू लागतात. त्यावर मात कशी करायची हे मात्र तो शिकू इच्छित नाही. व्यवसायाची इच्छा असूनही योग्य प्रयत्न न केल्याने तो शेवटी नोकरी करण्यासाठी तयार होतो. व्यवसायाची संस्कृती आपल्याकडे रुजायला हवी. त्यासाठी तरुणांनी पुढाकार घ्यायला हवा. योग्य मार्गदर्शन आणि उचित ध्यासाच्या माध्यमातून व्यवसायात प्रगतीच्या शिखरावर जाता येते. यासाठी पिंपरी-चिंचवड येथील युवा बिझनेस या संस्थेतर्फे व्यवसायात येऊ इच्छिणा-या तरुणांना मार्गदर्शन देण्यात येते.

येत्या दहा वर्षांमध्ये एक कोटी तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन करण्याचे संस्थेचे ध्येय आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 2017 चा आयकॉन पुरस्कार प्राप्त व्यवसाय मार्गदर्शक विजय कोटगोंड यांनी आतापर्यंत पाच लाख तरुणांना व्यावसायिक मार्गदर्शन केले आहे. मार्गदर्शनाच्या मालिकेतील पुढचा भाग म्हणून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 'लिव टू लीड' या विषयावर विजय कोटगोंड उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.

कार्यक्रमासाठी 200 रुपये प्रवेश फी आकारण्यात आली असून प्रवेश संख्या मर्यादित आहे. प्रवेश निश्चित करण्यासाठी अथवा प्रवेशपत्र घेण्यासाठी 8657343246 या क्रमांकावर संपर्क करावा लागणार आहे. व्याख्यानांव्यतिरिक्त विजय कोटगोंड यांच्या अन्य व्यावसायिक मार्गदर्शनकरिता www.vijaykotagond.com या संकेतस्थळाला देखील भेट देता येईल.

21 Aug 2017

सार्वजनिक गणेशोत्सवाचे 126 वे वर्ष जाहीर करण्याची मागणी

एमपीसी न्यूज - सार्वजनिक गणेश उत्सवाची सुरुवात भाऊसाहेब रंगारी यांनी केली आणि लोकमान्य टिळक यांनी प्रसारक म्हणून काम केले आहे, अशी भूमिका भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. त्यामुळे यंदाचे वर्ष हे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 125 वे वर्ष नसून 126 वे वर्ष असल्याचे सरकारने जाहीर करावे, या मागणीसाठी भाऊसाहेब रंगारी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चक्रीय उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्यामान्य न झाल्यास बेमुदत उपोषणाचा इशारा देखील देण्यात आला आहे. 

भाऊसाहेब रंगारी गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून कालपासून उपोषण सूरु करण्यात आले आहे. या उपोषणाचा आज दुसरा दिवस आहे. यावेळी मंडळाचे विश्वस्त सुरज रेणुसे म्हणाले की, समाजापुढे अत्यंत चुकीच्या पद्धतीने गणेश उत्सवाचा इतिहास मांडला जात आहे. यंदा पुणे महापालिकेच्या वतीने 125 वे वर्ष सार्वजनिक गणेश उत्सव म्हणून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. त्या महोत्सवाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी देखील त्यांच्याशी संवाद साधला. मात्र त्यांनी त्यावर काही भाष्य केले नाही.

तसेच या उत्सवापूर्वी महापौरांसमवेत झालेल्या बैठकीत त्यांनी भाऊ रंगारी यांनी सुरुवात केल्याची कबुली दिल्याचे सांगितले. मात्र, त्या आता पुढे येऊन बोलत नाही. यावरून अनेक शंका उपस्थित होत आहे. त्याचबरोबर भाऊ साहेबांचा फोटो महापौरांना देऊन देखील लावला नाही. गणेश उत्सवाला सुरुवात होण्यासाठी काहीच दिवस राहिले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर हे सार्वजनिक गणेश उत्सवाचे 126 वे वर्ष असल्याचे जाहीर करावे अन्यथा बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे, असे रेणुसे यांनी सांगितले.

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - पावसाळ्याच्या सुरुवातीला पावसाने समाधानकारक हजेरी लावल्यानंतर मध्यंतरी काही काळ पावसाने दडी मारली होती. त्यामुळे खरीप हंगाम जवळपास हातातून गेल्याचे चित्र स्पष्ट झाले होते. इतक्यात वरुणराजाने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले असल्याने बळीराजाला काही अंशी उभारी आली आहे. निसर्गावरची नाराजी बाजूला ठेवत बळीराजाने बैलपोळ्याची जय्यत तयारी केली आहे. बैलपोळ्यानिमित्त आज (सोमवार, दि. 21) देखील पिंपरी येथील बाजारपेठा सजलेल्या आहेत.

सणासाठी आवश्यक साहित्य खरेदीसाठी शेतक-यांची बाजारात गर्दी आहे. बैलांना सजविण्यासाठीच्या विविध प्रकारच्या साहित्याच्या दरात फारशी वाढ झाली नसल्याने शेतक-यांना यंदा दिलासा मिळाला आहे. शिंगांना वेगवेगळ्या प्रकारचे गोंडे, माणिकमाळ, घुंगरमाळ, भोरकडी, फुगे, कपाळाला बाशिंग, म्होरकी, कासरा, वेसण, भोंडे, घंटी, घुंगरे, तोडे, मुथळी, पट्टे, कंडा, शेंबी, शिंगदोरी, शिंगगोंडा, जोतं, चाबूक अशा प्रकारच्या वस्तू बाजारात विकण्यासाठी आल्या आहेत आणि त्या खरेदी करण्यासाठी शेतक-यांनी झुंबड उडवली आहे.

वर्षभर शेतीच्या कामात बळीराजाला मदत करणारा बैल म्हणजे ग्रामीण संस्कृतीचे दैवत. याप्रती कृतज्ञता व्यक्त केली नाही तर नवलच. म्हणून श्रावणातला शेवटचा अमावास्येचा दिवस बैलपोळा म्हणून साजरा केला जातो. बैलपोळ्याच्या आदल्या दिवशी शेतकरी आपल्या घरची सर्व जनावरे स्वच्छ पाण्याने धुतो व बैलांच्या खांद्याला भंडारा (हळद) लावतो. याला खांदेमळणी असे म्हणतात. दुस-या दिवशी म्हणजेच बैलपोळ्याच्या दिवशी बैलांना पुन्हा अंघोळ घातली जाते. त्यांच्या अंगावर रेशमी झूल, गळ्यात घुंगराची माळ, घंटा, अंगावर रंगबेरंगी चित्रे, शिंगांना रंग देऊन त्यावर फुगे आणि तुरे लावण्यात येतात. घरापासून मिरवत नेऊन ग्रामदैवताचे दर्शन घेऊन परत घरी आणतात. त्यानंतर घरच्या सुहासिनी बैलांची पूजा करतात. सणाचे जेवण बैलांना चारतात. हे दोन दिवस जनावरांकडून कोणत्याही प्रकारचे काम करून घेतले जात नाही. यावरून शेतक-याचे जनावरांवरील प्रेम स्पष्ट होते.

Bail Pola Bail Kharedi 0

21 Aug 2017

एमपीसी न्यूज - संत तुकारामनगरकडून नेहरू नगरच्या दिशेला येताना संतोषी माता चौकात पावसाचे पाणी साचल्याने वाहन चालकांना जीवावर उदार होऊन वाहने चालवावी लागत आहेत.

शनिवारी रात्रीपासून शहर परिसरात पावसाचे दमदार पुनरागमन झाल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. परंतु काही भागात पावसाच्या पाण्याची विल्हेवाट लावण्याची योग्य खबरदारी न घेतल्याने शहरात विविध ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले आहे. अपवाद वगळता शहरातील सर्वच रस्त्यांवर खड्डे पाहायला मिळतात. अशा खड्डेयुक्त रस्त्यावर पाणी साचल्यास वाहन चालकांना खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे मोठे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.

पावसाळ्यापूर्वी गटारींची स्वच्छता आणि रस्त्यांची कामे करण्यात आली असून करण्यात आलेली कामे किती दर्जेदार झाली आहेत. याचे वास्तव जणू पावसाने शहरवासीयांना दाखवून दिले आहे. पावसाच्या पाण्याचा योग्य पद्धतीने निचरा होण्यासाठी आणि पावसाचे पाणी रस्त्यावर साचू नये यासाठी वेळीच योग्य उपाययोजना केली असती तर शहरवासीयांना आज रस्त्याने जाताना असा जीवावरचा खेळ करावा लागला नसता.

Page 5 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start