• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
23 Aug 2017

एमपीसी न्यूज -  मतदानाचा टक्का वाढावा यासाठी पिंपरी पालिकेतर्फे मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले होते. त्यासाठी विविध जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले. मात्र यासाठी दुपटीने वाढीव खर्च झाला आहे. सुरुवातीला 81 लाखांच्या खर्चास मंजुरी देण्यात आली असताना आता पुन्हा 91 लाखांच्या वाढीव खर्चास मंजुरी देण्याचा विषय स्थायी समितीसमोर ठेवला आहे.

पिंपरी-चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणूक फेब्रुवारी 2017 मध्ये पार पडली. मतांची टक्केवारी वाढावी यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार पालिकेतर्फे शहरात मतदार जनजागृती अभियान राबविण्यात आले. गर्दीच्या ठिकाणी, झोपडपट्टीमध्ये पथनाट्ये सादर केले. फलक, महिला बचत गटांद्वारे मतदार जनजागृती, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या वक्तृत्व स्पर्धा, सोसायट्यांचे अध्यक्ष व सभासदांचे मेळावे, कंपनी मालक, कामगारांचे मेळावे, गॅस वितरकांद्वारे मतदान करण्याबाबतचे स्टिकर्स वितरित करणे, मॅरेथॉन स्पर्धा व सायकल रॅली स्पर्धा घेण्यात आल्या.

त्याचबरोबर पीएमपीएमएल बस, रिक्षावर स्टिकर्स लावणे, रेडिओवर जाहिरात करणे, वृत्तपत्रे, सोशल मीडिया, ऑडिओ, व्हिडिओ किल्प, स्थानिक केबलद्वारे जाहिरात करण्यात आली. तसेच स्काय बलून, एलईटी स्क्रिन यांच्यामार्फत प्रचार करून मतदार जनजागृती करण्यात आली होती.

या जनजागृतीसाठी 81 लाख 36 हजार 500 रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव 11 जानेवारी 2017 रोजी आयुक्तांची मान्यता घेऊन स्थायी समोर ठेवला होता. या खर्चास 11 मे 2017 रोजी स्थायी समितीने मान्यता दिली. दरम्यानच्या कालावधित राज्य निवडणूक आयोग यांनी वेळोवेळी दिलेल्या सूचनांच्या अनुषंगाने विविध अतिरिक्त उपक्रम राबवून मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली आहे. त्यासाठी मंजूर खर्चाव्यतिरिक्त 91 लाख 17 हजार 760 रुपये इतका वाढीव खर्च झाला आहे. त्यानुसार हा प्रस्ताव स्थायी समिती समोर ठेवण्यात आला आहे.

23 Aug 2017

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने गणेशोत्सवाच्या निमित्ताने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरात विशेष स्वच्छता मोहीम अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात आयुक्त श्रावण हर्डीकर, पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका, अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 15 आकुर्डी रेल्वेस्टेशन येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत उपमहापौर शैलजा मोरे, नगरसदस्या शर्मिला बाबर, आरोग्य कार्यकारी अधिकारी विजय खोराटे, सहाय्यक आरोग्याधिकारी जी.एस. देशपांडे, मुख्य आरोग्य निरिक्षक डी. एस. सासवडकर, आरोग्य निरिक्षक एन.जी.गायकवाड सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेमध्ये एकूण 57 कर्मचारी सहभागी झाले होते.

या मोहिमेअंतर्गत सुमारे 850 किलो कचरा उचलण्यात आला. ब क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 16  व 17  बिजलीनगर पाण्याच्या टाकीपासून धर्मराज चौक रावेतपर्यंत राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्य बाळासाहेब ओव्हाळ, नामदेव ढाके, नगरसदस्या संगीता भोडवे, सहआयुक्त दिलीप गावडे, क्षेत्रीय अधिकारी एस.डी. खोत, कार्यकारी अभियंता देव अण्णा गटुवार, सहाय्यक आरोग्याधिकारी के.डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक के.बी.पारोल, आरोग्य निरीक्षक राजेंद्र उजिनवाल, उमेश कांबळे सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेमध्ये एकूण 51 कर्मचारी, सेवाभावी संस्था व नागरिक सहभागी झाले होते.

प्रभाग क्र. 18 चिंचवडगाव अमित पार्क परिसर येथे स्वच्छता अभियान राबविण्यात आली. यामध्ये नगरसदस्य राजेंद्र गावडे, सुरेश भोईर, अश्विनी चिंचवडे, अपर्णा डोके, क्षेत्रीय अधिकारी एस.डी खोत, सहाय्यक आरोग्याधिकारी के.डी. दरवडे, मुख्य आरोग्य निरीक्षक के.बी.पारोल, आरोग्य निरीक्षक कांचनकुमार इंदलकर यांच्यासह 71 ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, शिक्षक, नागरिक सहभागी झाले होते. प्रभाग क्र. 22 भारत नगर तिरंगा कॉलनी येथेही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामध्ये नगरसदस्या उषा काळे, निता पाडाळे यांच्यासह 26 मनपा कर्मचारी सहभागी झाले होते.

क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. सहा आळंदी रोड, भोसरी ओव्हर ब्रिज स.नं.1 मैदान येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत आयुक्त श्रावण हर्डीकर, नगरसदस्य रवी लांडगे, नगरसदस्या यशोदा बोईनवाड, सहाय्यक आयुक्त आण्णा बोदडे, सहाय्यक आरोग्याधिकारी बी. बी. कांबळे, मुख्य आरोग्य निरीक्षक आर. एम. भोसले, आर. एम. बेद, बी. आर. कांबळे, विजय दवाळे, वैभव कांचनगौडा, एस. जी. जाधव सहभागी झाले होते. यामध्ये एकूण 50 कर्मचारी व 11 एनजीओ सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत सुमारे 8.1 टन कचरा उचलण्यात आला.

ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 25 चौधरी पार्क, हॉरी झोन सोसायटी, प्रभाग क्र. 26 हॉटेल अॅम्बीयन्स शेजारी प्लॉट, प्रभाग क्र. 28 सुखवाणी लॉन्स ते कुंजीर वस्ती, प्रभाग क्र. 29 जगताप पाटील पेट्रोल पंप वैदुवस्ती येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

फ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 12 ताम्हाणे वस्ती त्रिवेणीनगर येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्य प्रवीण भालेकर, पंकज भालेकर, नगरसदस्या संगीता ताम्हाणे, फ क्षेत्रीय अधिकारी मनोज लोणकर, सहाय्यक आरोग्याधिकारी डी.जे.शिर्के, मुख्य आरोग्य निरिक्षक जे.जे. गायकवाड, आरोग्य निरिक्षक एस.ए.माने सहभागी झाले होते.

यामध्ये एकूण 59 कर्मचारी, महिला बचत गट तसेच 64 महाविद्यालयीन विद्यार्थी सहभागी झाले होते. या मोहिमेअंतर्गत सुमारे 1 मे. टन कचरा उचलण्यात आला. प्रभाग क्र. 13 मधील स.नं. 22 अंकुश चौक निगडी येथे ही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यावेळी मनसे गटनेते सचिन चिखले, नगरसदस्या कमल घोलप, सहआयुक्त दिलीप गावडे यांच्यासह 97 अधिकारी कर्मचारी व महिला बचत गट सहभागी झाले होते.

या मोहिमेअंतर्गत सुमारे 1.5 मे. टन कचरा उचलण्यात आला ह क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 20 कासारवाडी दहीतुले ओटा ग्राउंड येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्या सुलक्षणा धर, सुजाता पालांडे, सहाय्यक आरोग्याधिकारी व्ही.के.बेंडाळे आदी सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेमध्ये एकूण 40 कर्मचारी सहभागी झाले होते.

प्रभाग क्र. 30 हॅरिस पूल गणपती विसर्जन घाट येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सहाय्यक आरोग्याधिकारी व्ही.के.बेंडाळे, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, सुनील चव्हाण आदी सहभागी झाले होते. तसेच या मोहिमेमध्ये एकूण 30 कर्मचारी सहभागी झाले होते. प्रभाग क्र. 31 शनिमंदिर परिसर येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत कांबळे प्रभाग अध्यक्ष अंबरनाथ चंद्रकांत, नगरसदस्या सीमा चौगुले, माधवी राजापुरे, माजी नगरसेवक राजेंद्र राजापुरे, क्षेत्रीय अधिकारी आशा राऊत, सहाय्यक आरोग्याधिकारी व्ही.के बेंडाळे, आरोग्य निरीक्षक एस.बी. मानमोडे, आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी, रश्मी तुंडलवार आदी सहभागी झाले होते. प्रभाग क्र. 32, S.T कॉलनी, मोकळे मैदान, जुनी सांगवी व दत्तमंदीर विसर्जन घाट येथे राबविण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेत सहाय्यक आरोग्याधिकारी व्ही.के बेंडाळे, आरोग्य निरीक्षक एस.बी मानमोडे, रश्मी तुंडलवार आरोग्य निरीक्षक उद्धव डवरी तसेच या मोहिमेमध्ये एकूण 30 कर्मचारी सहभागी झाले होते.

ग क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र. 21 डेअरी फार्म रोड येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसदस्या झामाबाई बारणे, आरोग्य निरीक्षक सतीश पाटील यांच्यासह एकूण 50 कर्मचारी सहभागी झाले होते. यावेळी 580  किलो कचरा उचलण्यात आला. प्रभाग क्र. 23 जगताप नगर येथे राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये आरोग्य निरीक्षक सदाशिव पुजारी यांच्यासह 45 कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. यावेळी 510 किलो कचरा उचलण्यात आला.

प्रभाग क्र. 24 भगवती रॉयल मैदान खिवंसरा पाटील येथे राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये आरोग्य निरीक्षक सुरेश चन्नाल यांच्यासह 35 कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. यावेळी 630 किलो कचरा उचलण्यात आला. प्रभाग क्र. 27 तापकीर नगर येथे राबविण्यात आलेल्या मोहिमेमध्ये आरोग्य निरीक्षक धनश्री भत्ते यांच्यासह 30 कर्मचा-यांनी सहभाग घेतला होता. यावेळी 210 किलो कचरा उचलण्यात आला.

ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग क्र.पाच गवळीनगर, आंबेडकर उद्यान येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्या प्रियंका बारसे यांनी सहभाग घेतला तर प्रभाग क्र. सात भोसरी गावठाण येथे झालेल्या स्वच्छता मोहिमेत नगरसदस्या सोनाली गव्हाणे, सहाय्यक आरोग्यधिकारी प्रभाकर तावरे यांनी सहभाग घेतला. तसेच मोशी घाट येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

23 Aug 2017

एमपीसी न्यूज - भारत निवडणूक आयोग यांच्याकडील आदेशानुसार तरुण व पात्र मतदारांची नोंदणी करण्यासाठी उद्या (गुरुवारी) विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

आयोगाच्या आदेशानुसार 1 ते 31 जुलै या कालावधीत विशेष मोहीम राबविण्यात आली होती.  त्यानंतर या मोहिमेचा कालावधी दि. 31 ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आलेला आहे. या मोहिमेंतर्गत आजपर्यंत एकूण 1400 अर्ज या कार्यालयास प्राप्त झाले आहेत. उद्या (गुरुवार) विशेष मोहीम राबविण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी पुणे यांनी निर्देश दिले आहेत.

त्यानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बीएलओ हे सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये उपस्थित राहून नवीन व पात्र मतदारांचे नमुना फॉर्म नं. 6 स्वीकारणार आहेत. त्याचप्रमाणे 205 चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या हद्दीमधील थेरगांव येथील निवडणूक कार्यालय, ब प्रभाग कार्यालय, ड प्रभाग कार्यालय व पिंपरी-चिंचवड महापालिका करसंकलन विभाग, मुख्य इमारत या ठिकाणी  इच्छुक अर्ज करू शकतात.

1 जानेवारी 2017 या दिनांकापर्यंतच त्यांचे वय 18 वर्षे पूर्ण झाले असेल अशा तरुणांनी फॉर्म नं. 6 रहिवास पुरावा, वयाचा पुरावा व ओळखपत्रासह भरून द्यावा. मतदार नोंदणी करावी, असे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी तथा सहआयुक्त दिलीप गावडे यांनी केले आहे.

23 Aug 2017

-  022-26478989 व 022-26478899 या क्रमांकावर फोन करून घेता येईल नवीन कनेक्शन

- वीजग्राहकांच्या समस्या तातडीने सोडविण्यासाठी विशेष मदत कक्षाची सुरुवात

- चार महिन्यात 792 ग्राहकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज - ज्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांना नवीन वीजजोडणी हवी आहे, अशा इच्छुक ग्राहकांसाठी 'कनेक्शन ऑनकॉल सेवा' महावितरणतर्फे सुरू करण्यात आलेली आहे. त्यासाठी ग्राहकांना मुंबई मुख्यालयातील विशेष मदत कक्षाकडे आपले नाव, मोबाईल क्रमांक व घरचा पत्ता इत्यादी माहितीची नोंदणी करावी लागणार आहे.

नवीन वीजजोडणी हवी असलेल्या घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकाने मुख्यालयातील मदत कक्षाला दूरध्वनी केल्यानंतर त्या कक्षातील कर्मचारी ग्राहकाची सविस्तर माहिती घेतली. त्यानंतर या कक्षामार्फत संबंधित कार्यालयाला कळविण्यात येईल. त्यानुसार त्या कार्यालयातील कर्मचारी वीजजोडणीसाठी लागणारा फॉर्म घेऊन ग्राहकाच्या घरी जातील व फॉर्म भरून घेतील. वीजग्राहकांना योग्य सुविधा मिळवून देणे हा उद्देश यामागे असल्याचे महावितरणने सांगितले.

नवीन वीजजोडणीसाठी इच्छुक असणा-या ग्राहकाला ओळखपत्र पुरावा म्हणून निवडणूक ओळखपत्र, आधारकार्ड, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहनपरवाना, फोटोपास (शासन मान्यता प्राप्त छायाचित्रीत ओळखपत्र), खरेदी विक्री कराराचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, शासनाने दिलेले वरिष्ठ नागरिकाचे ओळखपत्र यापैकी एक तसेच पत्त्याचा पुरावा म्हणून शिधापत्रिका, स्थानिक करपावती, सक्षम शासकीय अधिकारी यांचा मंजूर नकाशा, घरमालकाचे ना-हरकत प्रमाणत्र (अर्जदार भाडेकरू असल्यास), शासनाने दिलेले मालमत्ता कार्ड किंवा 7 x 12 चा उतारा यापैकी एक कागदपत्र महावितरणच्या कर्मचा-यांकडे द्यावे लागणार आहे.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - पुणे शहरातील ऐतिहासिक वास्तू असलेल्या शनिवारी वाडा परिसराचे सुशोभिकरण आणि वड्याच्या समोर असलेल्या श्रीमंत बाजीराव पेशवेच्या पुतळ्याच्या दुरुस्ती साठी 57 लाखाच्या प्रस्तावाला आज झालेल्या स्थयी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

काही दिवसांपूर्वी श्रीमंत बाजीराव पेशव्यांची जयंती साजरी करण्यात आली होती त्यावेळी शनिवार वाडा परिसरात असलेल्या पेशव्यांच्या पुतळ्याच्या दुरवस्था पाहता समाजसेवी संस्थेनी पालिका प्रशासनावर ताशेरे ओढले होते या नंतर पालिका प्रशासन आज पुतळा दुरुस्ती , बैठक व्यवस्था, आणि शनिवार वाडाचे सुशोभीकरण करण्यासाठी 57 लाखांची दरतुदीला मंजुरी देण्याचा प्रस्ताव आज स्थयी समिती समोर ठेवला होता त्यास मंजुरी देण्यात आली.

22 Aug 2017


जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही; न्यायालयाच्या स्थगिती आदेशामुळे मुदतवाढ 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत राखीव प्रवर्गातून निवडून आलेल्या भाजपच्या तीन नगरसेवकांनी अद्याप जात प्रमाणपत्र पडताळणी दाखला जमा केला नाही. दाखला जमा करण्यासाठी सहा महिन्यांची मुदत आज (मंगळवारी) संपली आहे. संबंधित नगरसेवकांनी उच्च न्यायालयाकडून स्थगित आदेश मिळविल्याचे महापालिकेस कळविले आहे. तसा अहवाल बुधवारी (दि.23) शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. या तीन नगरसेवकांबाबत शासन निर्णय घेणार आहे. त्यामुळे या नगरसेवकांवर कारवाईची टांगती तलवार कायम आहे. 

पिंपरी-चिंचवड पालिकेची सार्वत्रिक निवडणुक फेब्रुवारी 2017 मध्ये झाली. या निवडणुकीत 64 नगरसेवक राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. या नगरसेवकांना निवडून आल्यापासून सहा महिन्याचा आत जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल जमा करणे बंधनकारक होते. जुलै महिन्यात 22 जणांनी जात प्रमाणपत्र पडताळणी दाखल जमा केला होता. त्यामध्ये वाढ होऊन आजपर्यंत 60 जणांनी दाखला जमा केला आहे. दाखला जमा करण्यासाठी आज मंगळवारची अंतिम मुदत होती. अद्याप चार नगरसेवकांनी प्रमाणपत्र जमा केलेले नाही.

त्यामध्ये नगरसेविका यशोदा बोईनवाड (प्रभाग सहा, धावडे वस्ती-भोसरी), मनीषा पवार (प्रभाग 23, थेरगाव) आणि कमल घोलप (प्रभाग 13, निगडी) यांनी उच्च न्यायालयाकडून स्थगिती आदेश मिळविला आहे. त्या संदर्भात बोईनवाड यांनी महापालिकेस पत्र दिले असून, घोलप व पवार यांचा वकीलांनी न्यायालयाने स्थगित आदेश दिल्याचे दूरध्वनीवरून मंगळवारी (दि.२२) महापालिकेस कळविले आहे. मात्र, लेखी काहीही दिले नाही.  या तीन नगरसेवकांनी न्यायालयातून स्थगिती आदेश मिळवल्याने त्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यास मुदत वाढ मिळू शकते. त्या मुदतीमध्ये प्रमाणपत्र सादर न केल्यास त्याचे नगरसेवक पद रद्द होण्याची शक्यता आहे. 

याबाबत बोलताना निवडणूक विभागाचे सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर म्हणाले, निवडणुक झाल्यानंतर सहा महिन्यांच्या कालवाधीत राखीव जागेवर निवडून आलेल्या नगरसेवकांनी जात पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याची अट आहे. अन्यथा नगरसेवक पद रद्द होते. या संदर्भातील अहवाल बुधवारी (दि.23) शासनाकडे पाठविला जाणार आहे. चार नगरसेवकांनी उच्च न्यायालयाकडून स्थगित आदेश मिळविल्याचे अहवालात नमूद केले जाईल. त्यावर शासन निर्णय घेईल.

22 Aug 2017स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी केली मागणी 

एमपीसी न्यूज  - अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात नागरिकांच्या हरकती व सूचना नोंदविण्यासाठी मुदत वाढविण्यात देण्यात यावी, अशी मागणी स्थायी समितीचे माजी सभापती प्रशांत शितोळे यांनी राज्य सरकारकडे केली आहे. 

तसेच विभागीय आयुक्त कार्यालय, महापालिका, यूडी ऑफीस आणि जिल्ह्याच्या ठिकाणी हरकती व सूचना नोंदवून घेण्याची सोय करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवडसह राज्यभरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासंदर्भात राज्य सरकारने जाहीर केलेल्या नियमावलीबाबत नागरिकांच्या हरकती व सूचना नोंदवून घेण्यात येत आहेत. हरकती व सूचना मुंबईतील मंत्रालयातील नगरविकास विभागाच्या मुख्य सचिवालयात नोंदवाव्या लागतात. त्याची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आली आहे. 

अनधिकृत बांधकामे नियमित करण्याबाबतची प्रक्रिया नागरिकांच्या लक्षात आलेली नाही. तथापि, मंत्रालयात जाऊन हरकती व सूचना नोंदविणे बहुतांश नागरिकांना शक्‍य नाही. यामुळे विभागीय आयुक्त कार्यालये, महानगरपालिका, यूडी ऑफिसमध्ये हरकती व सूचना स्वीकारण्याची सोय करावी, अशी मागणी शितोळे यांनी केली आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शासकीय कार्यालयात सुविधा उपलब्ध करावी. नागरिकांच्या सोयीसाठी संपूर्ण नियमावली मराठीत तयार करून वृत्तपत्र, चॅनेलच्या माध्यमातून प्रसिध्द करावी, अशी मागणीही शितोळे यांनी निवेदनातून केली आहे.

22 Aug 2017एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेतील भाजपचे नगरसेवक कुंदन गायवाड यांचा कैकाडी जातीचा दावा रद्द करण्यात आला आहे.  बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीने हा दावा रद्द केला. त्यामुळे त्यांचे नगरसेवकपद रद्द होण्याची दाट शक्यता आहे. 

कुंदन गायकवाड हे भाजपच्या तिकीटावर चिखली प्रभाग क्रमांक एक मधून राखीव प्रवर्गातून निवडून आले आहेत. त्यांनी कैकाडी जातीचे प्रमाणपत्र सादर केले होते. परंतु, त्यांचा कैकाडी जातीचा दावा खोटा असल्याचा आक्षेप त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार नितीन दगडू रोकडे यांनी घेतला होता. 

याबाबत बुलढाणा जिल्हा जात पडताळणी समितीकडे त्यांनी तक्रार दाखल केली होती. गायकवाड यांचे काही पुरावे पुणे बुलडाणा तर काही पुरावे सोलापूर जिल्ह्यातील असल्याचे आढळून आले आहेत. यामुळे  बुलढाणा जात पडताळणी समितीने त्यांचा जातीचा दावा रद्द केला आहे. त्यामुळे त्यांचे नगरसेवक पद रद्द होण्याची दाट शक्यता आहे. 

याबाबत नगरसेवक कुंदन गायकवाड यांना विचारले असता ते म्हणाले, आपला जातीचा दावा रद्द झाला नाही. त्यामुळे आपल्याला कोणतीही भिती नाही. पालिकेचे निवडणुक अधिकारी प्रविण अष्टीकर म्हणाले, याबाबत आपल्याकडे कोणतीही कागदपत्रे आली नाहीत.

22 Aug 2017

 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचा 1, 2 आणि 3 सप्टेंबर असा तीन दिवसांचा 'गणेश फेस्टिवल' असणार आहे. या दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज (मंगळवारी) पत्रकारांशी बोलताना दिली. शहरातील नाट्यगृहात हे कार्यक्रम घेण्यात येणार असून स्थानिक कलाकारांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

आर.एस.कुमार महापौर असताना 1996 साली पालिकेने पिंपरी-चिंचवड गणेश फेस्टिवल सुरु केला होता. या अंतर्गत विविध सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येत होते. चार दिवस हा फेस्टीवल चालत होता. हा महोत्सव पिंपरी, निगडी, भोसरी अशा विविध ठिकाणी करण्यात आला. भारतरत्न भीमसेन जोशी, उदित नारायण, सोनू निगम, अण्णु मालक, साधना सरगम अशा विविध मान्यवर कलावंतांचा कलाविष्कार शहरवासियांना अनुभवयास मिळाला. दरम्यान, गणेश फेस्टीवलच्या आयोजनावरुन चढाओढ सुरु झाली. त्यामुळे प्रकाश रेवाळे यांनी महापौर असताना 2003 साली गणेश फेस्टिवल बंद केला.

त्यानंतर एक वर्ष पिंपरी-चिंचवड उत्सव, सांस्कृतिक संस्था आणि पालिकेच्या सहकार्याने एक वर्ष गणेश फेस्टिवल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर 2004 पासून पिंपरी-चिंचवड सोशल क्लब यांच्या वतीने 2014 पर्यंत 11 वर्ष गणेश फेस्टिवलचे आयोजन करण्यात येत होते.

आता पुन्हा पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे यंदा पासून तीन दिवसांचा गणेश फेस्टिवल सुरु करण्यात आला आहे. गणेश फेस्टीवलची रुपरेषा ठरविण्यात येणार आहे. पिंपरीतील आचार्य अत्रे सभागृह, चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृह, भोसरीतील अंकुशराव लांडगे नाट्यगृह आणि पिंपळेगुरव येथील नटसम्राट निळू फुले नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहेत.

फेस्टिवलमुळे महाराष्ट्रीयन लोककला आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवाणी पिंपरी - चिंचवडकरांना मिळणार आहे, असे महापौर नितीन काळजे म्हणाले.

22 Aug 2017


एमपीसी न्यूज - बकरी ईदच्या कत्तलीसाठी पिंपरी, नेहरुनगर येथील पालिकेच्या गुलाबपुष्प शेजारील एमआयडीसीची मोकळी जागा तात्पुरत्या स्वरुपात देण्यात येणार आहे. दोन आणि तीन सप्टेंबर या दोन दिवसांसाठी जनावरे कुर्बानीसाठी येथे आणण्यात येणार आहेत.

कुर्बानीसाठी जागा देण्याबाबत पालिका मुख्यालयात आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या उपस्थितीत आज (मंगळवारी) बैठक झाली. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, सहायक पोलीस आयुक्त राम मांडूरके, पिंपरी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर, एमआयडीसी ठाण्याचे भिमराव शिंगाडे तसेच बीफ विक्रेते असोसिएशन, उलेमा काऊंसिल संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

पिंपरी-चिंचवड शहरात कत्तलखाना नाही. पिंपरीत कत्तलखाना करण्याचे पालिकेचे नियोजन होते. मात्र, त्यास पिंपरीकरांचा तीव्र विरोध झाला. त्यामुळे तेथे कत्तलखाना करण्याचे नियोजन बारगळले. पिंपरी येथील पुलाखाली कुर्बानी दिली जात होती. पंरतु, पिंपरी पुलाखालील जुना कत्तलखाना 2012 मध्ये बंद करण्यात आला आहे. 2012 पासून दरवर्षी बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कुर्बानीसाठी वेगवेगळी जागा उपलब्ध करुन दिली जाते. मुस्लिम संघटनांनी कुर्बानीसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी पालिकेकडे केली होती. त्यासाठी पालिकेने तीन जागांची पाहणी केली होती.

पिंपरी, नेहरुनगर येथील पालिकेच्या गुलाबपुष्प शेजारील एमआयडीसीची मोकळी जागा तात्पुरत्या स्वरुपाती कुर्बानीसाठी निश्चित करण्यात आली. या जागेची पालिका प्रशासन आणि पोलिसांनी पाहणी केली आहे. त्यानंतर ही जागा निश्चित करण्यात आली. या जागेचे पालिकेने सपाटीकरण करुन दिले आहे. पाण्याची टाकी उपलब्ध करुन देण्यात आली असून सर्व सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पत्राशेड करण्यात येणार आहे. तसेच कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यात येणार आहे. सुरक्षिततेसाठी 'सीसीटीव्ही' कॅमेरे देखील बसविण्यात येणार आहेत. याठिकाणी पशुवैद्यकीय डॉक्टर देखील उपलब्ध असणार आहेत. दोन आणि तीन सप्टेंबरला या ठिकाणी जनावरे कुर्बानीसाठी आणले जाणार आहेत, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Page 2 of 296
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start