• IMG-20170812-WA0103.jpg
  • IMG-20171012-WA0071.jpg
  • IMG-20171013-WA0075.jpg
  • MPC_news.JPG
  • TVS.jpg
18 Nov 2017

एमपीसी न्यूज - आपल्या पहिल्याच ‘ख्वाडा’ या चित्रपटातून राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालणारे दिग्दर्शक भाऊराव नानासाहेब क-हाडे आगामी ‘बबन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. या सिनेमाच्या ‘साज ह्यो तुझा’ या पहिल्या गीताने सोशल मिडीयावर रसिकांची पसंती मिळविली आहे.

आता ‘बबन’ सिनेमातील दुसरे गाणे ‘मोहराच्या दारावर कै-या मागणं’ चाहत्यांच्या भेटीला आले आहे. या गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्या जादुई आवाजाने बॉलीवूडला वेड लावणा-या दोन गायिका पहिल्यांदाच एकत्र गाणार आहेत. सुनिधी चौहान आणि शाल्मली खोलगडे या दोघींनी याचे पार्श्वगायन केले असून संगीत ओंकारस्वरूप यांचे आहे. प्रा. डॉ. विनायक पवार यांनी गीत लेखन केले आहे. रेकॉर्डिंगला लाईव्ह संगीत असलेल्या या गीताचे शूटिंग प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या ओरीजनल तमाशाच्या तंबूत झाले आहे.

या गाण्यासाठी संगीतकार प्रीतम यांच्या सोबत काम केलेले दीपेश वर्मा आणि उस्ताद झाकीर हूसेन यांचे भाचे शिखरनाद कुरेशी यांनी काम पाहिले. तसेच प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रेहमान यांच्यासोबत काम केलेल्या काही जणांचा समावेश वादकांच्या टीममध्ये आहे. या गाण्याचे खास आकर्षण म्हणजे ‘सौदागर’, ‘खलनायक’ अशा हिंदी सिनेमातील गाण्यामध्ये आपल्या 'नादरूपमं'चे विविधांगी कौशल्य दाखविणा-या गजानन साळूके यांचे नादरूपमं आणि सुंदरी वादन.

‘मोहराच्या दारावर कै-या मागणं’ या गीतामध्ये दाक्षिणात्य, लावणी आणि बेले असे तिहेरी संगम असलेल्या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन नेहा मिरजकर आणि गणेश पतंगे यांनी केले आहे व वेशभूषा अस्मिता राठोड व अंजली भालेराव यांची आहे. या गाण्यांचे रेकॉर्डिंग यशराज स्टूडीओ मध्ये झाले असून गाण्याचे मास्टरिंग लंडन येथील स्टूडीओ मध्ये करण्यात आले असल्याने रसिकांना एक वेगळी अनुभूती मिळणार आहे.

‘चित्रक्षा फिल्म्स’ प्रस्तुत ‘बबन’ या चित्रपटात भाऊसाहेब शिंदे, गायत्री जाधव, शीतल चव्हाण, देवेंद्र गायकवाड, योगेश डिंबळे, अभय चव्हाण, प्रांजली कंझारकर, मृणाल कुलकर्णी, कृतिका तुळसकर, सीमा समर्थ या कलाकारांच्या प्रमुख भूमिका असून हा चित्रपट २९ डिसेंबर संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

संपूर्ण गाणे पाहण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. – https://www.youtube.com/watch?v=TVzMjnJj5LY

Media

17 Nov 2017

प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी प्रमुख भूमिकेत

प्रख्यात लेखक, संगीत दिग्दर्शक आणि दिग्दर्शक अजय नाईक यांनी आत्तापर्यंत बावरे प्रेम हे, लग्न पाहावे करून आणि सतरंगी रे यांसारखे गाजलेले चित्रपट दिल्यानंतर ते आता पुन्हा एकदा 'हॉस्टेल डेज' या आगामी चित्रपटातून रसिकांसमोर येत आहेत. हा चित्रपट 29 डिसेंबर 2017 रोजी सर्वत्र प्रदर्शित होत असून त्यांत प्रार्थना बेहेरे, आरोह वेलणकर आणि विराजस कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अक्षय टांकसाळे आणि संजय जाधव हे कलाकारही महत्वाच्या भूमिकांमधून दिसणार आहेत.

या चित्रपटाची प्रस्तुती श्री पार्श्व प्रॉडक्शन आणि ट्वेन्टी फोर स्टुडिओ यांनी केली आहे आणि चित्रपटाची निर्मिती सुभाष बोरा, चंदन गेहलोत आणि हरविंदर सिंग ह्यांच्या श्री पार्श्व प्रॉडक्शन आणि अजय नाईक प्रॉडक्शनच्या सहकार्याने केली आहे.

"हॉस्टेलमध्ये राहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात हॉस्टेलमधील दिवसांची एक वेगळी अशी विशेष आठवण असते. ज्यांनी हे हॉस्टेलचे आयुष्य कधीच अनुभवले नाही, त्यांना या आयुष्याबद्द्ल नेहमीच कुतूहल लागून राहिलेले असते. हॉस्टेलमधील त्या दिवसांबद्दल आठवण आली कि कोणीहि नॉस्टॅल्जिक होतोच," असे उद्गार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करताना अजय नाईक यांनी काढले.

ते पुढे म्हणाले की, कॉलेज जीवनावर कित्येक यशस्वी चित्रपट आले आहेत आणि जगभरात कित्येक भाषांमध्ये त्यांची निर्मिती झाली आहे. पण हॉस्टेल जीवनावर बेतलेला हा एक आगळा असा चित्रपट आहे. म्हणूनच या चित्रपटाबद्दल रसिकांमध्ये आत्ताच मोठया प्रमाणावर उत्सुकता लागून राहिली आहे.

चित्रपटाचे निर्माते सुभाष बोरा म्हणाले, "बहुआयामी अजय नाईक यांच्या दिग्दर्शनाखालील आमचा पहिला चित्रपट जाहीर करताना आम्हाला अतिशय आनंद होत आहे. ही हॉस्टेलमधील आयुष्यावर बेतलेली गोष्ट आहे. ती 1990 च्या दशकात आकाराला येते. त्यावेळी मोबाईल फोन नव्हते, स्मार्ट फोन नव्हते, केबल टीव्ही नव्हता की डिश टीव्ही नव्हता. इंटरनेट तर नव्हताच नव्हता. त्यामुळेच आयुष्यात खूप मजा होती. हॉस्टेलमधील आयुष्य त्यावेळी आता आहे त्याच्या कीतीतरीपट अधिक आकर्षक होते. म्हणूनच आजच्या प्रेक्षकांना त्यावेळच्या अगदी सोप्या सरळ गोष्टींची आठवण हा चित्रपट पाहताना येईल. हा संगीत चित्रपट त्यातील कर्णमधुर संगीतामुळे रसिकांसाठी एक पर्वणी ठरणार आहे"
Page 1 of 91