• IMG-20170812-WA0103.jpg
  • MPC_news.JPG
13 Sep 2017

Pune : विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू, नणंदेला कारावासाची शिक्षा

एमपीसी न्यूज - माहेरहून पैसे घेऊन येण्यासाठी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ करणाऱ्या पती, सासू आणि नणंदेला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन.डी.मेश्राम यांनी सहा महिने सक्तमजुरी आणि प्रत्येकी 5 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास अतिरिक्त 15 दिवस कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

पती मोहिंदर साहेबराव जाधव (वय 28), सासू देवकीबाई साहेबराव जाधव (वय 55), नणंद कामिनी मोहन साळुंके (वय 40, तीघेही, रा. दत्तवाडी) अशी शिक्षा झालेल्या तिघांची नावे आहेत. याबाबत मोहिंदर जाधव यांच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली आहे. 22 ऑगस्ट 2005 ते 13 ऑगस्ट 2011 या कालावधीत हा प्रकार घडला.

या प्रकरणात सहाय्यक सरकारी वकील एस.ए.क्षीरसागर यांनी काम पाहिले. पोलीस नाईक मनोज चव्हाण यांनी न्यायालयीन कामकाजासाठी मदत केली. घराच्या दुरूस्तीसाठी आणि सासू देवकीबाई हिच्या उपचारासाठी 3 लाख 25 हजार रुपये माहेरहून आणावेत, यासाठी तिघेजण मिळून फिर्यादींचा शारीरिक आणि मानसिक छळ करत असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी दत्तवाडी पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. यावर सुनावणी करत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली.

Read 40 times