• 123.jpg
  • IMG-20170812-WA0103.jpg
  • mpc.jpg
  • mpc1.jpg
  • MPC_news.JPG
19 Jun 2017

वल्लभनगर येथे महामेट्रोच्या साईटवर अपघात, कंटेनरच्या धडकेने दोन सुरक्षा रक्षक जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव कंटेनरने धडक दिल्यामुळे महामेट्रोच्या साईटवरील दोन कर्मचारी जखमी झाले. पुणे-मुंबई महामार्गावरील एक्सप्रेस लेनवर वल्ल्लभनगर येथे रविवारी पहाटे अडीचच्या सुमारास हा अपघात झाला.

विनायक देवेंद्र बडोदिया (२१, रा. पिंपरी) व नितीन धनंजय सुरवसे (रा. नेहरूनगर) हे दोघे या अपघातात जखमी झाले आहेत. कंटेनरचालक अंकुश शिवाजी म्हस्के याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. परंतु, दोघा जखमींनी तक्रार द्यायची नसल्याचे सांगितल्यानंतर कंटेनरचालकाला सोडून देण्यात आले.

महामेट्रोच्या पिंपरी ते स्वारगेट या पहिल्या टप्प्याचे काम सुरू आहे. त्यासाठी पुणे-मुंबई महामार्गावरील एक्स्प्रेस लेनपैकी दोन्ही बाजूच्या एकेक लेन लोखंडी कठडे लावून वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्या आहे. त्या ठिकाणी वाहतूक वळविण्यासाठी या दोन कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती.

हा अपघात एवढा भयंकर होता की कंटेनरसह दोघेजण काही मीटरपर्यंत फरफटत गेले. अपघातानंतर या ठिकाणी लावण्यात आलेले डायव्हर्जनचे पत्रे, बॅरिकेड्स संपूर्ण रस्त्यात पसरले होते. नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी ते बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.

पहाटे अडीचच्या सुमारास पोलिसांच्या नियंत्रणकक्षाला अपघाताबाबत माहिती समजली. तोपर्यंत तेथे काही नागरिक गोळा झाले होते. निगडीकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांचा वेग भरधाव असल्याने सुरुवातीला वाहनांना थांबविण्याचे काम पोलिसांना करावे लागले.

निगडीकडून येताना पिंपरी येथून ग्रेड सेपरेटरमधून पुढे आल्यानंतर नाशिक फाटापर्यंत कोणताही सिग्नल नसल्याने वाहनांचा वेग जास्त असतो. तर, नाशिकफाटा कडून पिंपरीकडे जाताना नाशिक फाटा येथे सिग्नल असल्याने वाहनांचा वेग हा तुलनेने कमी असतो.

पिंपरीकडून येताना वल्लभनगरपर्यंत आल्यावर केवळ ५० मीटर अलीकडे वाहनांना वळणाचा (एक लेन बंदचा) फलक दिसतो. त्यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला आहे. रात्रीच्या वेळेस वाहनांचा वेग जरा जास्तच असल्याने आणि दिवसा कोंडी होऊ नये, म्हणून महामेट्रोकडून दोन्ही लेनवर प्रत्येकी दोन-दोन सुरक्षारक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मात्र, वाहनांचा वेग जास्त असल्याने याठिकाणी रविवारी अपघात झाला. येथील लोखंडी कठडे एका जखमीच्या अंगावर पडले होते. तो त्याखाली दबला गेला होता. जखमींपैकी एकाने त्याचा सहकारी कुठे आहे, याची विचारणा केल्यावर पोलीस आणि नागरिकांनी त्याचा लोखंडी कठड्यांखाली शोध घेऊन दोघांना महापालिकेच्या वायसीएम रुग्णालयामध्ये दाखल केले. दोघांवर उपचार करून दुसऱ्या दिवशी सोडण्यात आले.

अशा प्रकारचे अपघात टाळण्यासाठी महामेट्रोच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक ती उपाययोजना करण्यात येणार असल्याचे पिंपरी पोलिसांनी सांगितले.

Read 229 times Last modified on Monday, 19 June 2017 03:14
Facebook Google Plus Twitter LinkedIn
Open Chat
1
Close chat
Hello! Thanks for visiting us. Please press Start button to chat with our support :)

Start